हिंदु-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान…साध्वी बन्नोमाँ

0
533

बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे…

बन्नोमाँ यांचा जन्म त्यांच्या आजोळी खामगाव येथे एका सर्वसामान्य कुटुंबात 1860 मध्ये झाला. खामगाव हे नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील त्यांच्या मामाचे गाव. बन्नोमाँ यांचे वडील बोधेगाव येथे ब्रिटिशकाळात हवालदार होते. त्यांना जानू व बानुबाई अशी दोन अपत्ये होती. ते बानुबाईसह तेथील घोरतळे गल्लीजवळच्या खारामळा परिसरातील वाड्यात राहत होते. त्या ठिकाणीच बन्नोमाँ लहानाच्या मोठ्या झाल्या. बन्नोमाँ यांच्या घराण्याशी संबंधित त्यांचे निकटवर्तीय तेथील वाड्यात राहत आहेत.

बन्नोमाँ यांच्या जन्मापासून त्यांच्यात काही असाधारण गुण असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले होते. त्यांच्या बाबतीत असे सांगितले जाते, की त्यांना कपडे नेसवले असता त्या ते कपडे अंगावर ठेवत नसत. अंगावरील कपड्यांच्या चिंध्या चिंध्या करून, फाडून फेकून देत व स्वत: विवस्त्र अवस्थेत राहत असत. त्या मनोरूग्ण आहेत असा समज गावातील काही लोकांचा होता. परंतु काही लोक त्यांना दैवीशक्तीचा अवतार मानत. जसजसे बन्नोमाँ यांचे वय वाढले, तसतसे गावातील व पंचक्रोशीतील लोकांना त्यांचे चमत्कार दिसू लागले. घरातील लोकांना त्यांचे विवस्त्र अवस्थेत फिरणे बरोबर वाटत नसे. ते त्यांना घरात कोंडून ठेवत. मात्र त्या तेथून अदृश्य होऊन बन्नोमाँ यांची समाधी (कबर) नंतर जेथे आहे, त्या जागी येऊन बसलेल्या दिसत. अखेरीस, गावातील लोकांनी त्यांना मुंगी येथील गोदावरी नदीतीराच्या पलीकडे होडीतून सोडून दिले व ते गावी परतले. परंतु ते परत येण्याअगोदर बन्नोमाँ गावात हजर झाल्या!

जो बन्नोमाँ दर्गा सध्या आहे, त्याच्यासमोर गावचा आठवडी बाजार भरत असे. बन्नोमाँ बाजारात फिरून व्यापाऱ्यांच्या दुकानातील मिठाई व इतर माल स्वतःच्या हाताने घेऊन मुक्या जीवांना खाण्यास घालत असत. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या मालास बन्नोमाँचा हात लागे, त्यांचा तो माल तासाभरात संपूर्ण विकला जाई! अशी वेगवेगळी प्रचीती लोकांना आल्याने जो-तो त्याचा माल बन्नोमाँला हात पुढे करून देत असे. परंतु त्यांचे बन्नोमाँच्या इच्छेपुढे काहीही चालत नसे.

दर्ग्याच्या पाठीमागे एक बारव (पायऱ्या असलेली विहीर) आहे. त्या बारवेत बन्नोमाँ महिन्यातून तीन दिवस राहत असे. त्या त्यावेळी गावात फिरताना दिसत नसत. त्या बारवेबाहेर चौथ्या दिवशी येत.

बन्नोमाँ यांच्यासंदर्भात ग्रामस्थ आख्यायिका सांगतात, की बोधेगावात महापूर एकदा आला. पुराचे पाणी वेशीच्या आत घुसले. गावात हाहाकार झाला. लोक भयभीत झाले, तेव्हा बन्नोमाँ पाण्याला उद्देशून ‘हट जाव पिछे’ म्हणत पाण्याच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागल्या. पाणी तसतसे मागे सरकू लागले व शेवटी, नदीला जाऊन मिळाले. पूर ओसरला.

एक मुसाफिर गावातील धर्मशाळेत मुक्कामी थांबला असता, त्याला बन्नोमाँ विवस्त्र अवस्थेत आढळून आल्या. त्यास बन्नोमाँमध्ये आध्यात्मिक शक्ती असल्याचे माहीत नव्हते. त्याच्या मनात वाईट विचार आला. त्या क्षणी त्याची दृष्टी गेली. सकाळी गावकऱ्यांनी त्या मुसाफिरास मोठमोठ्याने विव्हळताना पाहिले. त्याने घडलेली घटना गावकऱ्यांना कथन केली. तेव्हा लोकांनी त्यास ‘तू बन्नोमाँची माफी माग, त्यांच्यात दैवी शक्ती आहे’ असे सांगितले. त्या मुसाफिराने माफी मागितल्यानंतर त्यास एका डोळ्याने दिसू लागले.

ब्रिटिशकालीन फौजदार चाँदखा हे बोधेगावी आले असता, त्यांनाही बन्नोमाँच्या दैवीशक्तीची अनुभूती आली होती. त्यांनी रात्रीच्या सुमारास भीतीपोटी बन्नोमाँ यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या, परंतु बन्नोमाँ यांना काहीएक झाले नाही. त्या सहीसलामत होत्या. असे अनेक चमत्कार त्यावेळी गावकरी, पंचक्रोशीतील लोक, गावचे पाटील यांनी पाहिले व ठरवले, की गावात बन्नोमाँची यात्रा (ऊरूस) भरवावी. तेव्हा बन्नोमाँ जिवंत असताना, त्यांच्या हयातीत चार ते पाच वर्षे यात्रा भरली. पहिल्या दिवशी बन्नोमाँस भरजरी वस्त्रे, गळ्यात फुलांच्या माळा, फुले वाहून गावच्या पाटलांच्या घरापासून वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढली जात असे. त्या पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना गाडीस बांधून ठेवले जाई. परंतु बन्नोमाँ तेथून अदृश्य होऊन सध्याच्या दर्ग्याच्या जागी जाऊन बसत. त्या 17 ऑक्टोबर 1903 मध्ये अनंतात विलीन झाल्या. तेव्हा सध्याच्या दर्ग्याच्या जागी त्यांचा दफनविधी करून समाधी बांधण्यात आली. तर त्यांच्या खारामळा येथील राहत्या घरी त्यांचा मृत्यू झालेल्या व नियमित आराम करत असलेल्या जागेवर एक थडगे बांधण्यात आलेले आहे.

साध्वी बन्नोमाँचा महिमा ज्यांनी स्वतः अनुभवला व येणाऱ्या पिढीला सांगितला अशी तिसरी-चौथी पिढी बोधेगावी हयात आहे. सुलेमान बागवान, बन्नोमाँ यांच्या घराण्याशी संबंधित असणारे मुसाभाई शेख, हवाबी शेख, युन्नुस पठाण यांनी ही सर्व माहिती दिली.

‘बानुबाई’ नावाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री बोधेगाव नाम खेड्यात राहत असे. ती शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीची धनी होती. ती अध्यात्माच्या परम आनंदात तल्लीन होऊन विवस्त्र अवस्थेत गावच्या रस्त्यावरून फिरत असे; नारायण गोविंद चांदोरकर यांना तिचे दर्शन घेण्याचे होते. त्यासाठी ते श्री साईबाबांची परवानगी घेऊन बोधेगावी आले होते. त्यांतील बानुबाई म्हणजेच बोधेगावचे ग्रामदैवत साध्वी बन्नोमाँ देवी होय. तसा उल्लेख साईबाबांचे जीवन चरित्र असलेल्या ‘देव जो भूवरी चालला’ या रंगास्वामी पार्थसारथी यांनी लिहिलेल्या व लीना सोहनी यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकात आहे.

नारायण गोविंद चांदोरकर हे साईबाबांचे भक्त होते. त्यांचा जन्म ठाणे येथे 1860 सालच्या, (शके 1782) पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या दिवशी झाला. त्यांचे मराठी शिक्षण कल्याण येथे, तर इंग्रजी शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालय (मुंबई) येथे झाले. ते मुंबई विद्यापीठाचे बीए पदवीधर होते. त्यांची प्रथम नेमणूक संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथे मामलेदार कचेरीत कारकुनाच्या जागेवर झाली. ते कोपरगावी अव्वल कारकून म्हणून काही वर्षांनी नेमले गेले. ते नगर येथे कलेक्टरसाहेबांचे चिटणीस 1892 साली झाले. पुढे, त्यांना पुणे जिल्ह्यात घोडनदी तालुक्याचे मामलेदार म्हणून 1893 साली नेमण्यात आले. ते पुन्हा 1894  ते 1901 पर्यंत नगरच्या कलेक्टरसाहेबांचे चिटणीस होते. त्यांना जामनेर तालुक्याचे मामलेदार म्हणून 1902 मध्ये नेमले. नंतर त्यांची बदली नंदूरबारपंढरपूर या ठिकाणी झाली. ते पुणे येथे डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर 1908 मध्ये झाले. त्यांची बदली ठाणे येथे 1909 मध्ये झाली. त्यानंतर ते डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर पदावरून सेवानिवृत्त 1915 मध्ये झाले. नानासाहेब चांदोरकर यांनी साईबाबा यांची सेवा हयातभर केली. शेवटी, ते कल्याण येथे स्वतःच्या घरी साईचरणी 21 ऑगस्ट 1921 रोजी विलीन झाले.

– संजय सुपेकर 8459100131 sanjaysupekar123@gmail.com

————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here