हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक – साध्वी बन्नोमाँ जत्रा

0
320

बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा 1898 सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते…

साध्वी बन्नोमाँ जत्रा ही हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजली जाते. त्यापैकीच एक आहे बोधेगाव येथे भरणारी जत्रा. बोधेगाव हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात शेवगाव-गेवराई रोडवर सोळा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव पारंपरिक भारतीय समाजजीवनाचे अनेक कंगोरे असलेले आहे. प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेनंतर येणाऱ्या बुधवारी साध्वी बन्नोमाँ जत्रा सुरू होते. नंतर सलग पाच दिवस जत्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून हिंदू-मुस्लिम बांधव त्या पाच दिवसांच्या कालावधीत तेथे येत असतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे आणि दोन्ही धर्मांच्या प्रथा-परंपरा नवस बोलणे, नवस फेडणे, कोंबड्या-बकऱ्यांचे बळी देणे वगैरे रूपातून तेथे दिसून येतात. अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आहे.

साध्वी बन्नोमाँ यांचा दर्गा बोधेगावी एसटीतून उतरताच रस्त्याच्या कडेला समोर दिसतो. गोल घुमट, सुबक-आखीवरेखीव बांधकाम, दर्गा बाहेरून पाहताक्षणी नजरेत भरतो. दर्ग्यात प्रवेश करताना बाजूला सुंदर अशा फुलांची दुकाने दुतर्फा सजवलेली असतात. घुमटाच्या आतून काचेचे नक्षीकाम पूर्ण केलेले, त्यात सुंदर सजावट आहे. तो दर्गा संपूर्ण संगमरवरी दगडाचा व कोरीव काम केलेला आहे. तो साधारण वीस गुंठे जागेमध्ये पसरलेला आहे. दर्ग्यात सभामंडप व पिण्याच्या पाण्याचा हौद आहे. प्रशस्त अशी जागा सर्वत्र मोकळी आहे. दर्ग्याच्या डाव्या बाजूला डाळिंबाचे एक झाड आहे. झाडाविषयी आख्यायिका अशी, की ज्या स्त्रीस पुत्रप्राप्ती होत नाही, त्या स्त्रीने त्या झाडाचे फळ खाल्ल्यास तिला पुत्रप्राप्ती होते.

विश्वस्त सय्यद व सचिव हिरालाल आसाराम जैन यांनी जत्रेविषयी माहिती दिली, की जत्रा 1898 सालापासून नियमितपणे भरत आहे. जत्रेच्या पहिल्या दिवशी रात्री नऊ वाजता देविदास तोरडमल यांच्या निवासस्थानापासून पांढर्‍या शुभ्र घोड्यावर संदल (चादर) मिरवणूक निघते. त्या चादरीचा मान तेथील स्थानिक रहिवासी दगडू पटेल यांचा असतो. मिरवणुकीत बँड-बाजा-आतषबाजी मोठ्या प्रमाणात होते. उच्च प्रतीचा असा लोबन धूप/उदी जाळण्यात येते, त्यामुळे बाजूचा परिसर प्रसन्न, उत्साही होतो. मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. मिरवणुकीत भाविकांनी आणलेल्या गंगेतील पाण्याच्या कावडीदेखील सहभागी असतात. संदल वाजत-गाजत दर्ग्याजवळ येताच कावडीतून आणलेल्या गंगेच्या पाण्याने दर्गा धुतला जातो. त्या गंगा स्नानानंतर संदलला मुल्ला-मौलवी; तसेच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सामोऱ्या जातात. ती मंडळी चादर डोक्यावर घेऊन दर्ग्यास प्रदक्षिणा पूर्ण करतात. ‘साध्वी बन्नोमाँ की जय’चा जयघोष चालू असतो. छबिन्यात चादर अर्पण केली, की त्यानंतर गुलाबफुलांची चादर चढवून त्यावर उच्च प्रतीचे अत्तर टाकण्यात येते. अंगारे-धुपारे मोठ्या प्रमाणात चालू असतात. मंदिर परिसर लख्ख विद्युत रोषणाईने लखलखून निघालेला असतो. विद्युत रोषणाईत तो दर्गा अधिकच शोभून दिसतो.

दुसऱ्या दिवशी दुपारपासूनच रस्त्यावरील ट्रॅफिक जाम होऊन जातो. जत्रेसाठी शेकडो भाविक पंचक्रोशीतून जमलेले असतात. दर्ग्याजवळ नारळ फोडले जातात. रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल असतात. नुक्कलदाण्यांचा (साखरफुटाणे) प्रसाद ठिकठिकाणी वाटला जातो. खेळणी, जोडे, चपला, बॅग्ज, कपडे, भांडीकुंडी, पुस्तके, कॅसेट वगैरे वस्तूंची दुकाने लागलेली असतातच. त्याशिवाय शाकाहारी-मांसाहारी खानावळी, पान टपऱ्या अशा प्रकारे सर्वसाधारण कोणत्याही ग्रामीण जत्रेत आढळतात तशी दुकाने-पाले तेथेही असतात.

तिसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजता बन्नोमाँ दर्ग्यावर कलाकारांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम पार पडतो. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी त्यांची कला थोडक्यात सादर करून बन्नोमाँ यांचा आशीर्वाद घ्यावा अशी प्रथा आहे. अनेक तमाशा कलावंत सहभाग घेऊन गण-गौळण सादर करतात. रात्री तमाशा कलाकारांचे तमाशाचे फड आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन गेलेले दिसतात. रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, मालती इनामदार यांचे तमाशांचे फड रात्री रंगतात, तर बाजूच्या पंचक्रोशीतील लोक त्या रंगात दंगलेले असतात.

चौथ्या दिवशी सकाळपासूनच हरिजन, ब्राह्मण, जैन-मुस्लिम असे सर्व समाजाचे लोक साध्वी बन्नोमाँ ला चादर चढवण्यास येऊ लागतात. चौथ्या दिवशीच रात्री नामांकित कव्वालांच्या कव्वालीचा कार्यक्रम होतो. त्यासाठी कादर हाश्मी हे नामांकित कव्वाल सलग दहा वर्षे येऊन गेल्याची माहिती एकाने सांगितली.

जत्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्तीचे जंगी सामने भरवले जातात. त्याकरता बाजूच्या पंचक्रोशीतील अनेक नामवंत पैलवान हजेरी लावतात. मानाची पहिली कुस्ती ही एकवीस हजार रुपयांपर्यंत असते. जत्रेच्या निमित्ताने अठरापगड समाज त्यांचे अस्तित्व दाखवतो. जत्रेतील बाजाराने आधुनिक रूप धारण केले आहे. तेथे अठरापगड जातीच्या लोकांची पारंपरिक पेहरावातील ओळख पुसली गेली आहे. जत्रेच्या पाच दिवसांत साधारण चारशे ते पाचशे बकऱ्यांची कत्तल केली जाते. हा पाच दिवसांचा जत्रौत्सव वगळल्यास वर्षभरात तुरळक भाविक अगरबत्ती वा चादर चढवण्यासाठी बन्नोमाँच्या दर्ग्यावर येतात. एरवी तेथे शांतता असते.

– वैभव रोडी, शेवगाव  9421021333  vaibhavrodi@gmail.com

———————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here