हर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप

हर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते ! हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ! ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे. हर्णे हे गाव सर्व सुखसंपन्न असून तेथे सर्व जाती-धर्म-पंथांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

कडेकपाऱ्या, डोंगर राज हिरवाईचा घालून भरजरी साज
अथांग सागर साद घालतो फेडतो माझ्या हर्णे गावाचे पांग

हर्णेमध्ये आकर्षणाचा मानबिंदू म्हणजे ‘सुवर्णदुर्ग’. त्या दुर्गाने हर्णेच्या सौंदर्यात मानाचा तुरा खोवला आहे. गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेदुर्ग या किल्ल्यांमुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या रक्षणासाठी या तीन उपदुर्गांची उभारणी करण्यात आली ! हर्णे बंदरावरून वीस मिनिटांत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर बोटीने पोचता येते.

‘हर्णे’ हे गाव इसवी सनाच्या सुरुवातीस नव्हते. परंतु त्यावेळेस तेथे, समुद्रात घुसलेला खडक आणि जवळच रूंद खाड्या होत्या. हे सर्व चाच्यांच्या उद्योगास पूरक, पोषक असे होते. त्यामुळे सुवर्णदुर्गाच्या जागी चाच्यांची वस्ती असावी असे इतिहासकारांचे मत आहे. हर्णेला विशेष महत्त्व आदिलशाही आणि शिवशाही यांच्या काळात प्राप्त झाले.

हर्णे येथे हर्णेश्वराचे अति प्राचीन असे मंदिर होते. त्यावरून गावाला हर्णे हे नाव पडले म्हणे. आधी गाव की आधी ईश्वर? ते मंदिर इसवी सन 1350 ते 1450 या काळात मोडले असावे असा अंदाज आहे. त्या मंदिराचा पाया दिसतो. त्या भागाला ‘जुनी ब्राह्मण आळी’ असे म्हणतात. तसेच सोनार पेठ, कासारपेठ येथील ‘महाकाली मंदिर’ हे सुद्धा हर्णे येथे आहे. हर्णे घागवाडी येथे खेमराज (खेमदेव) मंदिर आहे. ते ग्रामदैवत आहे. ते मंदिर हर्णे बायपासपासून अर्ध्या तासावर आहे. तेथे फाल्गुन महिन्यात उत्सव साजरा होतो. त्याची पालखी आणि मिरवणूक पाहण्यासारखी असते. त्याला लागूनच खेम धरण आहे. पावसाळ्यात खेम धरणावर गर्दी असते. हर्णे गावामध्ये राखण म्हणजेच बलिदानाची प्रथा आहे. ती साजरी करण्यासाठी आषाढ महिन्यात खेमावर गर्दी होते. बारा वाड्या असलेल्या हर्णे गावामध्ये हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन अशी संमिश्र वस्ती आहे.

दापोलीकडून हर्णे गावात शिरल्यावर सध्या जी ग्रामरचना आहे त्यापेक्षा वेगळी ग्रामरचना पूर्वी असावी. हल्लीची फणसवाडी, कुंभारवाडी, ख्रिश्चनवाडी, बाजार मोहल्ला या भागात शिवकाळात परिचित अशी प्रसिद्ध धुळप, सावंत, सुकदरे, कदम, कडू, पासलकर यांची वसतिस्थाने होती. बाजारपेठेतील दोन मशिदींमधील पट्ट्याला ‘महामाया राजवाडा’ असे नाव होते. हर्णेमध्ये कान्होजी आंग्रे यांच्या काळात बांधलेली त्यांच्या मातोश्री ‘बिंबाबाई आंग्रे’ यांची समाधी आहे. त्या समाधीभोवती उत्तम बाग होती. त्या समाधी परिसराला ‘जेठीबाग’ असे म्हटले जात असे. ती समाधी मोडकळीस आलेली आहे. हर्णेमध्ये कमळेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर संभाजी आंग्रे यांच्या पत्नी कमळजाबाई यांच्या स्मरणार्थ 1734 साली बांधण्यात आले.

इंग्रजांनी कारभाराच्या दृष्टीने कोकण प्रांताचे सुभे (तालुके) 1818 नंतर पाडले. त्यात ‘सुवर्णदुर्ग’ नावाचा सुभा होता. त्यानंतर व्यापाराच्या दृष्टीने व हवामानाच्या दृष्टीने सोयिस्कर असे ‘दापोली’ हे तालुक्याचे ठिकाण म्हणून निवडण्यात आले. हर्णे येथे ‘सेंट ऍने चर्च’ हे रोमन कॅथॉलिक चर्च आहे. हर्णेचे महत्त्व ब्रिटिश काळानंतर कमी झाले.

सृष्टी सौंदर्याने नटलेल्या हर्णे गावातील मासळी बाजार म्हणजे माणसाने निर्माण केलेले दुसरे आकर्षण आहे. डोकीवर पाट्या, हातगाड्या, छोट्या चारचाकी गाड्या… तऱ्हतऱ्हेच्या वाहनांनी माणसे मासळीच्या राशीच्या राशी समुद्रकिनाऱ्यावर आणत असतात आणि मोठमोठ्या ‘ट्रकां’मध्ये ‘लोड’ करत असतात- त्यावेळी त्या बंदरावर हजारभर माणसांची- स्त्री-पुरुषांची कमनीय शरीरे निसर्गाचा भाग असल्यासारखी भासतात. श्रमणारे हात म्हणजे काय ते दृश्य तेथे पाहवे. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल तेथे होते. तो रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आहे. मुंबई-गोवा मार्गावरील बोटी पूर्वी तेथे थांबत असत. खरे तर, तेथे कोणतीही नदी समुद्राला मिळत नाही. शिवाय नैसर्गिक आसरा उपलब्ध नाही तरीही बोटी तेथे थांबत. बोटी पार खोल समुद्रात उभ्या राहत आणि बोटीला मचवे (छोट्या होड्या) लावून माणसे उतरत असत. त्यांना किनारी आणले जात असे. बोट बंद झाल्यानंतर वाहतूक बंद झाली. परंतु आजही तेथे मासळी बाजारासोबत प्रत्येक प्रकारचा बाजार भरतो. अगदी कपडे, भांडी, फळे, भाज्यांपासून कडधान्ये, गरम मसाले, सुकी मासळी असे सर्व काही मिळते. आठवड्यातील सातही दिवस तो बाजार भरगच्च असतो !

हर्णे बंदर आणि पाजपंढरी या गावात कोळी समाजाची वस्ती मोठी असून मच्छिमारी व पर्यटन हे तेथील मुख्य व्यवसाय आहेत. त्या बंदरामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या नौका थांबतात व मासळी त्यातून छोट्या होड्यांमार्फत किनाऱ्यावर आणली जाते. काही प्रमाणात बैलगाडीतून ती बंदरात किनारी आणली जाते आणि तेथील वाळूत दर्याचे हे धन पसरून सुरू होतो लिलाव ! मासळी वाळूत फडफडत असते आणि बोली बोलणारे खरीददार हातात नोटा फडफडावत स्पर्धेमध्ये मग्न असतात. त्या बाजाराचे स्वरूप म्हणजे ज्याचा माल त्याची किंमत ! तेथे छोटीमोठी कोळंबी, शेवंड, लॉब्स्टर, पापलेट, सुरमई, बांगडा, सौंदाळे, मांदेली, करली, हैद, कानिट, म्हाकुळ, वाघुळ, वाटु, शिंगटा, लेप असे कित्येक प्रकारचे मासे मिळतात. लिलाव जिंकणाऱ्याला ताबडतोब रोख रक्कम अदा करून माल ताब्यात घ्यावा लागतो. बाजाराच्या वेळेत पाय ठेवण्यास जागा नसते, इतकी गर्दी असते. समुद्रकिनारा छोट्या होड्या, बर्फाची ने-आण करणारी वाहने, डिझेलचे कॅन्स, मासेवाहू ट्रक्स, वजनकाटे, ट्रे, टोपल्या, बैलगाड्या आणि हजारो माणसे यांनी भरलेला दिसतो. हर्णेच्या बाजारात छोटे व्यापारी, फेरी व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला, दर्दी खवय्ये, रत्नागिरीतील कारखान्यांना; तसेच, मुंबई मार्केटला मासळी पुरवणारे लोक मोठ्या प्रमाणावर हजर असतात. खरेदी केलेला माल कुलाबा मार्केट, पुणे, कोल्हापूर येथे आणि महाराष्ट्राबाहेरही पाठवला जातो. मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांची ‘कलेक्शन सेंटर्स’ तेथील किनाऱ्यावर आहेत. तेथून माल देशोदेशी निर्यात केला जातो. किनाऱ्यावर बर्फ व डिझेल पुरवणारी केंद्रे आहेत. तेथे बर्फाची विक्री तडाखेबंद असते. हर्णे बंदर हे मत्स्य व्यवसायाचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित झालेले आहे. दापोलीत येणारा पर्यटक हर्णे बंदराला हमखास भेट देतोच ! नव्याने स्थापन झालेल्या हर्णे-पाळंदा एकता मंचाद्वारे हर्णे विकासाच्या योजना व जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. गावात बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. गावाजवळच समुद्र असल्यामुळे उष्ण-दमट असे हवामान आहे. हर्णेच्या जवळपास पाजपंढरी, मुरुड, कर्दे, आंजर्ले, केळशी अशी समुद्र किनारा असलेली गावे आहेत. ती सर्व पर्यटन स्थळे आहेत.

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य हर्णेला नवी मुंबई आणि महानगरीशी जोडण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम सद्यस्थितीला चालू आहे. तो सागरी महामार्ग पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचीसुद्धा खूप बचत होणार आहे. ते प्रदुषणाच्या दृष्टीनेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

बेचाळीस खाड्यांनी व्यापलेल्या प्रदेशाच्या कोकणपट्टीतून जाणारा सागरी महामार्ग म्हणजे स्वर्गातून जाणारा मार्गच जणू. नितांत सुंदर समुद्रकिनारा, अथांग अशा किनाऱ्याला सागरलाटांची साद, नारळ पोफळीच्या बागा, रुप्यासारखी चकाकणारी वाळू, सीगल बगळ्यांची विहंगमय दृश्य म्हणजे हिऱ्यामाणकांची माळ पर्यटकांना ती पर्वणीच आहे. तो महामार्ग हर्णे नवा नगरातून सुरू होतो. पुढे, आंजर्ले, आडे, केळशीमार्गे बाणकोटला जोडला जातो. पुढे, बागमांडला, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिघीबंदर, मुरुडकडून अलिबागला जोडला जातो.

डॉ. समृद्धी संदेश लखमदे 8087666788 samruddhi.lakhamade@gmail.com
मु.पो. हर्णे, ता-दापोली, जिल्हा- रत्नागिरी
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here