स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी : स्वप्नाचेच जेव्हा ध्येय बनते (Snehalay’s Girish Kulkarni)

_Girish_Kulkarni_0.jpg

अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी नावाचा तरुण वयाच्या अठराव्या वर्षी विलक्षण चमत्कारिक स्वप्ने पाहू लागला आणि नुसती पाहू लागला नव्हे, तर त्याने त्या स्वप्नांना त्याचे ध्येय बनवले व त्यांच्या पूर्ततेकडे वाटचाल करू लागला!

त्यातून उभे राहिले नगरचे ‘स्नेहालय’ व संलग्न संस्था यांचे साम्राज्य!

‘स्नेहालय’च्या डॉ. गिरीश कुलकर्णी यांना कै. कृ.ब. तळवलकर ट्रस्टचा २०१७चा ‘सेवाव्रती’ पुरस्कार देण्याचे ठरले. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले, पण ‘त्याआधी आमची संस्था बघून जा’ असे आग्रहाचे निमंत्रण दिले. मी व अरुण नित्सुरे, आम्ही सपत्नीक नगरला निघालो. आमचे स्नेही डॉ. प्रकाश सेठ ‘स्नेहालय’च्या पुणे प्रकल्पात काम पाहतात. तेही आमच्या बरोबर होते.

आम्ही १०.३० वाजता ‘स्नेहालय’ संलग्न ‘स्नेहांकुर’ या अनाथाश्रमास पोचलो. गिरीश यांनी स्नेहालय परिवाराचा बिनीचा कार्यकर्ता भरत कुलकर्णी याची आम्हाला ‘स्नेहालय’ दाखवण्यासाठी नेमणूक केली होती. ‘स्नेहांकुर’ची इमारत दोन मजली आहे. तो बंगला गिरीशचे गुरू कै. शंकर केशव आडकर यांच्या नावाच्या ट्रस्टतर्फे ‘स्नेहांकुर’ला वापरण्यास देण्यात आला आहे. त्याच इमारतीत ‘स्नेहालय’च्या स्वत:च्या FM रेडिओ स्टेशनचे बांधकाम चालू आहे. ‘स्नेहांकुर’मध्ये तीस-पस्तीस मुले असावीत. बहुतेकांच्या रडण्याचा कोलाहल सुरू होता. चार-पाच आया मुलांना आंघोळ घालत होत्या. काही मुले पाळण्यात खेळत होती, काही रडत होती- त्यात तान्ह्या मुलांपासून दोन-तीन वर्षांपर्यंत मुले होती. साताठ अर्भके इन्क्युबेटरमध्ये होती.

“येथे एक दिवसापासून ते तीन-चार वर्षांपर्यंतची मुले येतात. काही सापडलेली मुले तर पोलिसच आणून देतात. अनाथ मुले पोलिसांकडे ठेवून घेण्याची व तेथे त्यांना सांभाळण्याची सोय नाही. ती आमच्याकडेच पाठवली जातात. कालच रात्री अडीच वाजता कार्यकर्त्याचा, नगरपासून ऐंशी किलोमीटर दूरच्या गावात एक दिवसाचे मूल मिळाल्याचा फोन आला. ‘स्नेहालय’ची अॅम्ब्युलन्स त्याला घेऊन आली. आमचे कार्यकर्ते सर्वदूर पसरले आहेत. येथील क्षमता वीस मुलांची आहे. पण मूल येण्याचा ओघ जास्त असल्याने ती संख्या चाळीसपर्यंत जाते. ही जागा कमी पडते. काही दिवसांतच ‘स्नेहांकुर’ नव्या जागेत शिफ्ट होईल, मग मुले जास्त ठेवता येतील.” भरतने माहिती देणे सुरू केले.

“मोठी झाल्यावर ह्या मुलांचे काय?” आमचा प्रश्न

“अहो, बरीचशी दत्तक जातात. पूर्वी दत्तक देणे सोपे होते, आता कायदा बदलला आहे. दत्तक प्रक्रिया क्लिष्ट झाली आहे. त्यामुळे दत्तक जाणारी मुले कमी झाली. त्यामुळे येथे मुलांची संख्या वाढू लागली आहे. येथून आजपर्यंत साडेतीनशेच्या वर मुले दत्तक गेली आहेत. मुले मोठी झाली, की त्यांना आम्ही आमच्या ‘स्नेहालया’त पाठवतो. जोपर्यंत त्यांना पालक मिळत नाही तोपर्यंत आम्हीच त्यांचे पालक. आता ही मुलगी आणि हा मुलगा अमेरिकेत दत्तक जाणार आहेत.”

भरतने आम्हाला दाखवलेली मुलगी साताठ वर्षांची होती. तिचे संपूर्ण शरीर भाजल्यामुळे सुरकुतलेले होते. फक्त चेहरा वाचलेला होता. तिचे सर्व कुटुंबीय एका गॅसस्फोटात गेले. ती एकटी वाचली आणि ‘स्नेहांकुर’मध्ये आली. पण तिला आता आईवडील मिळाले आहेत. ती अमेरिकेत ह्युस्टन येथे जाईल. तिच्या आई-वडिलांनी देशोदेशीची चार-पाच अनाथ मुले दत्तक घेतली आहेत. एक तर सिरियातील आहे. भरतने आठ-नऊ महिन्यांचे आणखी एक मूल दाखवले. त्याचा वरचा ओठ दोन ठिकाणी जन्मजात फाटलेला होता. पण मुलगा मोठा गोड, हसतमुख व बाळसेदार होता. भरत म्हणाला, “दोघांचे दत्तकविधान पुढील महिन्यात आहे. दोघेही एकाच घरात जाणार आहेत. कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. तेथे गेल्यावर मुलीवर स्कीन रोपणाची शस्त्रक्रिया करणार आहेत व याचे ओठ ऑपरेशन करून एकत्र केले जातील.” मुलगी आई-वडील मिळणार म्हणून खुश दिसली. ‘स्नेहांकुर’मधील मुलांची दररोज डॉक्टरांकडून तपासणी होते. त्यांना वेगवेगळ्या लसी-डोस दिले जातात. त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले असते.

‘स्नेहांकुर’मधून खाली उतरून आलो तर आवारातच गिरीश कुलकर्णी बसलेले होते. मध्यम उंची, टिपिकल कुलकर्णी वर्ण (मी स्वत: कुलकर्णी असल्याने त्या वर्णावर बोलू शकतो), प्रसन्न, हसऱ्या आणि उमद्या चेहऱ्यावर ओसंडणारा उत्साह… गिरीश सांगू लागले – ‘स्नेहालय’ घडलं एका प्रसंगातून. माझा शाळकरी मित्र कोमटी समाजाचा होता. मी अठरा-एकोणिसाव्या वर्षी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेलो. घरात स्त्री राज्य होते. टिपिकल रेड लाईट एरियातील घर. त्याची आई, बहीण, मावशी, आजी त्याच व्यवसायात. घरात वर्दळ, त्यामुळे मुले बाहेर. मारामाऱ्या, शिव्या देणे चालू होते. मी आतून हादरलो. मी एका सुशिक्षित ब्राह्मण शिक्षकाच्या पोटी जन्म घेतला हे केवढे मोठे भाग्य असे मला वाटले, पण डोक्यात कोठे तरी जे समोर बघतोय ती परिस्थिती कशी बदलेल याचा विचार सुरू झाला आणि ठिणगी पडली! त्या मुलांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. अभ्यासवर्ग सुरु केले. मग लक्षात आले, की त्यांच्यासाठी जे करायचे ते रात्री असले पाहिजे. त्यामुळे त्यांची राहण्याची सोय करणे आले. वडिलांनी मोठ्या मनाने परवानगी दिली. तर सुरुवातीला, नऊ मुले माझ्याच घरी राहू लागली. पण आजुबाजूचा समाज हादरला होता. शेजारी हेटाळणी करू लागले. ‘गिरीशपासून दूर राहा’ हा मुलांना संदेश गेला. काही मित्र टाळू लागले, पण काही मित्र कायमचे साथीदार झाले. त्यांना गिरीश चांगले काम करतोय याची खात्री झाली आणि ‘स्नेहालय’ उभे राहिले. काही दिवसांतच स्वत:ची जागा घेतली व मुले तेथे राहू लागली. रेडलाईट भागात व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाच त्यांची मुले आमच्याकडे सोडू लागल्या. प्रश्न तेथे संपणार नव्हता. कित्येक अभागी भगिनी त्यांच्या त्या व्यवसायातून बाहेर पडू इच्छित होत्या, त्यांच्यासाठी काय करायचे? मग एक हेल्प लाईन सुरू केली. ज्यांना सुटका हवी त्या फोन करत. मग कार्यकर्ते आणि पोलिस मिळून त्यांची सुटका करत. त्या स्त्रियांच्या राहण्याचा प्रश्न आला. तो सोडवला. असे करता करता ‘स्नेहालय’ वाढू लागले. मग HIV+, चांगल्या कुटुंबातील सोडलेल्या स्त्रिया, अपंग असे अनेक प्रश्न हाती घेतले.” एक प्रश्न विचारला. “हे सगळं एकटे कसे जमवता?”

गिरीश कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वातील व्यावसायिक मॅनेजर बोलू लागला. “एक तर मी हे काम करत नाही. आम्ही करतो. अनेक कार्यकर्ते, व्यावसायिक, डॉक्टर्स असे सगळ्या स्तरांतील लोक यात सहभागी आहेत. प्रत्येक काम करण्यास माणसे नेमली आहेत, ते काम दररोज झालेच पाहिजे हा दंडक सर्वजण पाळतात. त्यात मुले, स्त्रिया… सर्व जण आले. जबाबदाऱ्या देताना योग्यतेनुसार दिल्या जातात. त्यात पैशाचे नियोजन आहे. स्टोअर्स, शाळा व्यवस्थापन, भोजनगृह व्यवस्थापन, भाजी व दूध व्यवस्थापन हे बघणारी माणसे आमची आपलीच आहेत. शिवाय देणग्या मिळवणे हे काम माझी अनेक मित्रमंडळी करतात. आमची प्रसिद्धी जास्त झाली असल्याने देणग्या मिळणे सोपे झाले आहे. त्यामुळे नव्या देणगीदारांना इतर संस्थांना मदत करण्यास सांगतो. त्यांची भेटदेखील घडवून आणतो. मला एक जाणीव आहे, की केवळ आमची संस्था मोठी झाली तर तिचे संस्थान बनेल, कार्यक्षमता कमी होईल, त्यात साचलेपण येईल, कंट्रोल करणे अवघड जाईल. त्यामुळे मी इतर संस्था देखील कशा वाढतील हे बघतो. अहो, लोक वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतात, हो.”

मला गिरीश यांच्यामध्ये एक मॅनेजमेंट तज्ज्ञ दिसू लागला. “गोंदवल्याला महाराजांच्या पहाटेच्या आरतीनंतर स्नेहशर्करा (गाईच्या दुधाचे लोणी व साखर) प्रसाद म्हणून दिली जाते. मला तो प्रसाद आवडतो. गिरीश यांचे बोलणे त्या प्रसादासारखे आहे. स्नेह आणि गोडवा यांनी ओतप्रोत भरलेले. वास्तविक गिरीश कुलकर्णी राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.

‘स्नेहालय’च्या कॉम्प्लेक्सच्या गेटवरच आमच्या नावासकट स्वागताची पाटी सुवाच्य सुंदर अक्षरात लिहिली होती. तो सात एकरांत पसरलेला भव्य प्रकल्प पाहिल्यावर त्याची व्याप्ती कळायला सुरुवात होते. प्रत्येक मुलाच्या वयानुरूप त्याची राहण्याची सोय. प्रत्येक दहा-बारा मुलींमागे एका स्त्रीची ‘आई’ म्हणून नेमणूक. ती आश्रित स्त्रीयांमधून नियुक्त केली जाते. तशीच, प्रत्येक दहा-बारा मुलांमागे एका ‘पित्या’ची सोय. त्यांनी त्या मुलामुलींच्या हजेरीपासून संस्कारापर्यंत सर्व जबाबदाऱ्या घ्यायच्या. त्यात मुलांचे आरोग्य, भोजन हे सर्व आले. अमीरखानच्या ‘सत्यमेव जयते’मुळे आलेल्या पैशांतून अद्ययावत असे एकावेळी एक हजार जण जेवू शकतील एवढे भोजनालय आणि ऑफिस अशी एक भव्य इमारत बांधली गेली आहे. आवारातच इंग्रजी मिडियम शाळा आहे. ‘स्नेहालय’ची मुले तर तेथे शिकतातच; शिवाय, गावातून झोपडपट्टीतील मुले शाळेच्या बसने आणली जातात. सर्वांना शिक्षण मोफत. तेथेच HIV+ साठी हॉस्पिटल आहे. तेथे बारा कॉट्सची सोय आहे. जवळच, सत्तर कॉट्सचे हॉस्पिटल पूर्ण होत आले आहे. तेथे HIV+ साठीचे उपचार मोफत केले जातात. त्यांना काही औषधे नियमित घ्यावी लागतात. ती देखील मोफत मिळतात.

विप्रो कंपनीचे ग्लोबल HR head श्री राजीव सिंग गिरीश यांच्याबरोबर तेथे भेटले. ते गिरीश यांचे सहकारी मित्र. त्यांचेही प्रसन्न व्यक्तिमत्त्व. महिन्यातील अनेक दिवस जगभर फिरणारे ते गृहस्थ महिन्यातून एकदा तेथे येतातच. ते देणग्या मिळवण्याचे काम बघतात. ‘इथे आले की आत्मिक समाधान लाभते’ – राजीव आवर्जून सांगत होते. राजीव यांच्यासारखे आणखी काही कर्तबगार मित्र गिरीश यांनी जोडले आहेत. निक आणि त्याची मैत्रीण टीफिनी हे ब्रिटिश नागरिक इंग्लंडमध्ये राहून ‘स्नेहालय’ला मदत करतात.

बेसमेंटमध्ये भांडार (Stores) आहे. एखाद्या मॉलप्रमाणे मोठे आहे. त्यात शालेय साहित्य, कपडे, अन्नधान्य इत्यादी साठवले जाते. दिवसाला बाराशे पोळ्यांना लागतील एवढ्या गव्हाची दररोज गरज असते. देणग्या धान्य, जुने कपडे, अंथरुणे, पांघरुणे, वह्या, पुस्तके, स्टेशनरी अशा कोणत्याही स्वरूपात घेतल्या जातात. पैशांच्या स्वरूपात तर मिळतातच. काही स्त्रिया तेथे धान्य निवडत होत्या, काही जणी मुलांचे कपडे आकारानुसार सॉर्ट करून ठेवत होत्या. मुलांची रांग त्यांच्या गरजेच्या वस्तू घेत होती. प्रत्येक गोष्टीची नोंद होत होती. वरील मजल्यावर क्राफ्ट शिकवली जाते. मुलांमधील कलागुण पाहून ते वाढवले जातात. कलेतून विक्री करता येईल अशी अनेक प्रॉडक्ट बनवली जातात. गिरीश यांची मेहुणी तो विभाग बघते. त्या बंगलोरला असतात, पण महिन्यातून अनेक वेळा तेथे येतात.

‘सत्यमेव जयते ग्राम’ हा ‘स्नेहालय’चा नवीन भाग. तिकडे मोर्चा वळवला. ती संस्था ‘स्नेहालय’पासून पुढे आठ किलोमीटरवर आहे. तो रस्ता ओसाड माळरानातून जातो. ‘सत्यमेव जयतेग्राम’ या इमारतीत अंध व अपंग यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र आहे. शिवाय, तेथे राहण्याची सोय आहे. साताठ अंधांचा ग्रूप मोटर वार्इंडिंग करत होता. मिलिंद कुलकर्णी यांचा नगरमध्ये पम्प बनवण्याचा कारखाना आहे. त्यातील मोटर्सचे वार्इंडिंग तेथे होते. अस्लमखान नावाचे गृहस्थ मुलांना शिकवतात आणि काम करून घेतात. प्रत्येक माणसाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याची मोठी आच असते. शारीरिक कमतरता त्याच्या आड येऊ शकत नाही याचे प्रत्यंतर तेथे दिसत होते. विलक्षण होते ते सगळे!

पुढे आहे हिंमतग्राम. पुन्हा सात किलोमीटरचा तसाच प्रवास. तोच उदास ओसाडपणा. खुद्द हिंमतग्राममध्ये मात्र त्या उदासीनतेचे नामोनिशाण नाही. सगळीकडे हिरवळ दिसू लागली. तेथे HIV+ राहतात. हिंमतग्राम! नाव मोठे सार्थ दिले आहे. ज्यांना समाजाने, कुटुंबाने बहिष्कृत केले अशांसाठी जगण्याची हिंमत देणारे गाव. तेथे काही Positive कुटुंबेदेखील राहतात. सगळेच HIV+, पण आनंदाने राहतात. शशिकांत तो विभाग सांभाळतो. तो स्वत: नॉर्मल आहे. पण शेती बघतो. शेतीतज्ज्ञ आहे. सर्वांकडून नेमून दिलेली कामे करून घेतो. एका मोठ्या पॉलिहाउसमध्ये आधुनिक पद्धतीने भाजी पिकवली जाते. सगळीकडे ड्रिप लावले आहेत. पाण्याचा एक थेंबदेखील वाया जाऊ दिला जात नाही. शेती तीस एकरांत आहे. पलीकडे तीनशे कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. तेथील भाजीपाला ‘स्नेहालय’ची तीनशे-चारशे जणांची गरज भागवतो. बाहेरून काहीही आणावे लागत नाही. शशिकांत प्रत्येक जेवणासाठी काय भाजी द्यायची त्याचे नियोजन करतो. मोठा उत्साही कार्यकर्ता आहे. प्रचंड सामाजिक भान असलेले भरत, अस्लम आणि शशिकांत यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे ‘स्नेहालय’चे मोठे आधारस्तंभ आहेत. तेथेच पलीकडे आधुनिक गोठ्यात दहा-बारा जर्सी गायी ‘स्नेहालय’ची दुधाची गरज भागवतात. प्रत्येक मुलास दिवसात एक ग्लास ताजे दूध मिळते. विलक्षण, सगळेच विलक्षण!

भारत सरकारच्या आरोग्य विभागात काम करतो. तो त्याचा वीक एंड आणि हॉलिडे ‘स्नेहालया’स देतो. बायकोची तक्रार नाही. कोणतेही काम करतो. अतिशय निरलस कार्यकर्ता. त्याने सगळे ‘स्नेहालय’ ज्या उत्साहाने दाखवले त्याला तोड नाही. प्रश्न निर्माण होण्याच्या आतच त्याच्याकडून उत्तर मिळत असे. समर्पण हे तेथील प्रत्येकाचे वैशिष्‍ट्य आहे.

जे पाहिले ते मुळी विलक्षण आणि वेगळे. फक्त वंचितांचा विचार. केवळ गिरीश कुलकर्णी नव्हे तर तेथील प्रत्येक कार्यकर्ता ज्ञानेश्वरांचे पसायदान जगत आहे.

‘स्नेहालय’ची वाटचाल आणि गिरीश कुलकर्णी यांचा जीवनपट सौ. शुभांगी कोपरकर यांनी ‘परिवर्तनाची पहाट’ या पुस्तकात छान मांडला आहे. तसेच आहे ‘स्नेहालया’तून शिकून बाहेर पडलेल्या अनेक भाग्यवान मुलांच्या अतिशय करुण कहाण्या असलेले ‘परीसस्पर्श’ हे पुस्तक.

स्नेहालय – ९०११०२०१७६ / ९४२०७५२५९०

स्नेहालय, एफ – 239 एम.आय.डी.सी. श्री टाईल्स चौकाशेजारी, अहमदनगर.

वेबसाईट – www.snehalaya.org

– श्रीकांत कुलकर्णी, whatsapp: ९८५००३५०३७

shrikantkulkarni5557@gmail.com

 

Previous articleपंचाळे गावचा शिमगा
Next articleलवथवती
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'प्रजावाणी', 'तरुण भारत', 'लोकसत्ता' अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्‍यांना साहित्याची - विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्‍यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्‍ट व्‍यक्‍तींवर लिहिलेल्या 'असे छन्द असे छांदिष्ट ' आणि 'जगावेगळे छांदिष्ट' या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: 'छांदिष्ट' असून ते दगडांमधून पशुपक्ष्‍यांच्‍या आकारांचा शोध घेतात. ते 'निर्मळ रानवारा' या 'वंचित विकास' संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422319143

5 COMMENTS

 1. रियली hats of u डॉ.गिरीश…
  रियली hats of u डॉ.गिरीश कुलकर्णी

 2. खुप छान उपक्रम हाती घेण्यात…
  खुप छान उपक्रम हाती घेण्यात आला आहे खुप खुप आभार

 3. मुलगा किंवा मुलगी दत्तक घेणे…
  मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्यासाठी मार्गदर्शन करावे.

 4. मा. कुलकर्णी साहेबांचे कार्य…
  मा. कुलकर्णी साहेबांचे कार्य खूप मोठे आहे हे मी स्नेहालय ला दिलेल्या भेटीत बघितले आहे आणि त्यांचे हे कार्य भविष्यात सुद्धा चालू राहो हीच अपेक्षा…!
  येत्या पुढील महिन्यात एकदा पुन्हा स्नेहालय ला मी माझ्या मित्रांसहित भेट देणार आहो त्यावेळी पुन्हा नवीन माहिती मिळेल अशीही अपेक्षा आहे.

 5. गिरीश कुलकर्णी एक ध्येयवेडे…
  गिरीश कुलकर्णी एक ध्येयवेडे व्यक्ती ….स्नेहालय ची व्याप्ती व नावलौकिक बघून त्याची प्रचिती येते ….मला पानी फाउंडेशन च्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने तिथे जाण्याचा योग आला ….खरचं समाजसेवेच ज्वलंत उदाहरण म्हणजे स्नेहालय …माणुसकीचे दर्शन आम्हाला त्या ठिकाणी झाले …खऱ्या अर्थाने जगण्याला दिशा …ऊर्जा …प्रेरणा मिळाली

Comments are closed.