‘स्नेहसेवा’

0
54

स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता

‘स्नेहसेवा’

‘स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता’ असं ब्रीदवाक्य असलेली ‘स्नेहसेवा’ ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली. स्नेह म्हणजे कौटुंबिक स्नेह व या स्नेहाची परिणती समाजसेवेत व्हावी हा विचार. सभासद त्रिसूत्रांचे पालन करतात. 1. परस्परांबद्दल विश्वास; 2. सामुहिक जबाबदारीची जाणीव; 3. हाती घेतलेल्या कामासाठी झोकून देण्याची वृत्ती.

या संस्थेने पहिला उपक्रम हाती घेतला तो खानापूर येथे शिबिर परिसर उभारणीचा. याला लागणारा पैसा सभासदांनी देणगी म्हणून व बिनव्याजी डिपॉझिट म्हणून दिला. तिथे मतिमंद, कर्णबधिर, अंध, कॅन्सरग्रस्त मुले व त्यांचे पालक, अनाथाश्रमातील मुले, डोअरस्टेप स्कूलची मुले, रस्ते-प्लॅटफॉर्म व फूटपाथवर राहणारी मुले यांच्यासाठी विविध प्रकारची शिबिरे घेतली जातात. याशिवाय शाळा, कॉलेजे, अनेक कॉर्पोरेट ऑफिसे यांचीही येथे शिबिरे भरतात. शिबिराचा परिसर देखणा व योजनापूर्वक उभारलेला आहे, हे पाहताक्षणी जाणवते.

नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी ‘स्नेहसेवे’चे सभासद नेहमीच समाजाच्या मदतीसाठी धावून जातात. किल्लारी भूकंप भागातली जी मुले पुण्यामध्ये शिक्षण घेत होती त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तीन-चार वर्षे, संस्थेने आर्थिक आधार दिला. 1987 मध्ये दुष्काळग्रस्त शिरूर तालुक्यातील शंभर हातपंप दुरुस्त करून दिले. त्यातूनच पुढे मग चर खणणे, बंडिंग करणे, बंधारे बांधणे, संडास बांधणे, वृक्षारोपण करणे असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले.

‘स्नेहसेवा’चा अनोखा उपक्रम म्हणजे घर, दवाखाने, हॉस्पिटल येथील न वापरलेली औषधे जमा करणे, त्यांचे वर्गीकरण करणे आणि ती संस्थेच्या पाच दवाखान्यांतून गरजू रुग्णांना मोफत देणे. याशिवाय, सेवाभावी संस्थांनाही औषध पुरवठा मोफत केला जातो. संस्थेच्या पाचही दवाखान्यांत अल्प मोबदल्यात म्हणजे पाच रुपयांत तपासणी केली जाते. इथे सर्व निष्णात डॉक्टर जवळ जवळ विनामूल्य सेवा देतात. पंढरपूरच्या पालखीच्या वेळी औषधे आणि डॉक्टर नेहमी तयार असतात! औषधपेढी हा खरोखरच कौतुकास्पद उपक्रम आहे.

‘स्नेहसेवा’च्या कामातील ‘मानाचा तुरा’ म्हणावा लागेल, तो म्हणजे ‘सैनिक स्नेह’. कर्नल चांदवळकरांच्या व्हिएतनाममधल्या अनुभवातून हा उपक्रम सुरू झाला आणि स्नेहाचा हा वटवृक्ष देशाच्या रक्षणार्थ सैनिकांना आनंद देत आहे. सीमेवर, जंगलात, बर्फात गस्त घालणा-या जवळ जवळ चार हजार सैनिकांना, दरवर्षी नरक चतुर्थीच्या दिवशी, मिठाईचा डबा आणि शाळेतील मुलांनी हातांनी तयार केलेली शुभेच्छा कार्डे पोचवली जातात. आजपर्यंत मराठा रेजिमेंट, गुरखा रेजिमेंट, जम्मू-काश्मिर रेजिमेंट, बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रूप, सदर्न कमांड, राजपुताना रायफल्स, 297 फील्ड रेजिमेंट, 68 फील्ड रेजिमेंट, 852 एटी क्रॉस, 190 माऊंटन ब्रिगेड मधील जवळ जवळ चार हजार सैनिकांना दरवर्षी ही दिवाळी भेट मिळत आलेली आहे. या सैनिकांची भावोत्कट पत्रे वाचण्यासारखी आहेत. एका सैनिकाने शुभेच्छा पाठवणा-या मुलांचे आभार मानले आहेत –

चाँदसे बढकर रोशनी हो तुम्हारी,

सितारोंसे बढकर उम्र हो तुम्हारी,

हर पल तुम्हे नयी खुशी मिलें,

यही दुआ है हमारी।

दुसरा सैनिक लिहितो – बच्चो, तुम्ही इस देश के भावी कर्णधार हो।

या व्यतिरिक्त खडकीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये आणि क्वीन मेरी रिहॅबिलिटेशन केंद्रामध्ये जखमी आणि अपंग झालेल्या जवानांसाठी कार्यकर्ते नेहमी उभे असतात. म्हणून भारताचे रक्षण करणा-या सैनिकांकडून ‘स्नेहसेवा’ला मानाचा मुजरा मिळतो.

”शायद आप जैसे लोगोंकी प्रेरणा ही हमको इन कठीन परिस्थितीयों मे भी हिम्मत और धैर्य रखनेको प्रेरित करती है।”

संस्थेचा पत्ता : स्नेहसेवा,

अध्यक्ष : निळकंठ पटवर्धन

कुमार बडवे, 26 अमर सोसायटी,

गुलमोहर पार्क, एरंडवणे, पुणे – 411 004

ईमेल – nrpatwardhan@yahoo.com

– सतीश राजमाचीकर

भ्रमणध्वनी : 9823117434

 

Previous articleसासवडपुढे सगळं जग फुक्काट….!
Next articleलेकास निरोप
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.