सौंदर्यपूर्ण शब्दांत शिल्पकलेचा शोध

_Pratibhavant_Shilpkar_2.jpg

दृश्यकलेविषयी आणि त्यातही शिल्पकलेविषयी मराठीत लिखाण कमी झालेले आहे, त्यामुळे ‘प्रतिभावंत शिल्पकार’ हे दीपक घारे यांनी लिहिलेले शिल्पकलेविषयीचे पुस्तक म्हणजे त्या विषयातील मोलाची भर आहे. घारे मराठीतील दृश्यकलेचे अभ्यासक आहेत.

शिल्पकला म्हटली, की भारतीय लोकांसमोर देव-देवतांच्या मूर्ती किंवा गावोगावी दिसणारी स्मारकशिल्पे – अश्वारूढ शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर अशा लोकप्रिय ऐतिहासिक व्यक्ती यांच्या मूर्ती डोळ्यांसमोर येतात. त्यात गेल्या दशकातील नवीन भर म्हणजे मायावती! त्यांनी त्यांच्या पक्षाची निशाणी असलेल्या हत्तीच्या अनेक मूर्ती उत्तरप्रदेशात उभारल्या आहेत.

घारे यांचे पुस्तक वाचकांना त्या पलीकडील मोठ्या विश्वात घेऊन जाते. मात्र ते त्यांना केवळ अभिजात शिल्पकला म्हणजे काय याबाबत माहिती देत नाही वा त्याबाबत तात्त्विक चर्चा करत नाही. तर मराठी भाषिक वाचक शिल्पकलेच्या अस्सल गुणांशी, त्या कलेच्या विकासक्रमाशी अपरिचित आहे हे ध्यानी ठेवून घारे यांनी युरोपातील रेनेसान्सच्या काळापासून विसाव्या शतकापर्यंत पाश्चात्य देशांत झालेली शिल्पकलेची निर्मिती-त्यातील अभिजात सौंदर्य- कलाकारांच्या प्रतिभेच्या जाणिवा यांसह काही निवडक कलाकारांची ओळख करून दिली आहे व त्याबरोबर त्यांच्या जगप्रसिद्ध कलाकृतींद्वारे शिल्पकला कशी बघावी, तिचा आस्वाद कसा घ्यावा हे समर्पकपणे सांगितले आहे.

लेखकाने ‘आपले वाड्मयवृत्त’ या ‘लोकवाङ्मय गृहा’च्या अंकात शिल्पकलेविषयी लेख लिहिले. त्याच लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. ते प्रसिद्ध करताना रेखाचित्रे, छायाचित्रे यांचा मुबलक वापर करून वाचकांना विषय सहजतेने समजावा असा प्रयत्न करण्यात आला आहे. लेखकाने केवळ पाश्चात्य व भारतीय शिल्पकारांची ओळख करून देणे हा हेतू ठेवलेला नसून, शिल्पकलेतील दोन्ही प्रवाह- त्यात प्रयोग करणारे कलाकार, दोन्ही प्रवाहांतील सौंदर्यस्थळे आणि त्यांतील वैशिष्ट्ये यांची वाचकांना ओळख करून दिली आहे. लेखकाने कोठलीही बाजू न घेता शिल्पकलेचा विकास कसा झाला आणि अभिजात शिल्पकलेचा आस्वाद कसा घेतला गेला पाहिजे हे हळुवारपणे समजावून सांगितले आहे.

डोनॅटेलो, मायकेल अँजेलो, बर्णीनी, हेन्री मूर यांच्या आधुनिक शिल्पकलेचा विकास कसा झाला हे सांगताना, त्यांनी रेनेसान्सचा काळ ते विसावे शतक यांतील शिल्पकलेचा आढावा घेतला आहे. ते करत असताना ‘थिंकर’, ‘मडोना ऑफ द स्टेअर’ यांसारख्या जगप्रसिद्ध कलाकृतींचा आस्वाद वाचकांसमोर मांडला आहे. शिल्पकारांची कामे, तत्कालीन सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे व त्यांचा शिल्पकारांच्या कामावर झालेला परिणाम सांगत घारे यांनी कला ही समाजाशी कशी एकजीव झालेली असते हेही दाखवून दिले आहे.

_Pratibhavant_Shilpkar_1.jpgत्यांनी भारतीय उपखंडातील शिल्पकलेची सौंदर्यस्थळे दाखवत पारंपरिक पद्धतीने शिल्पकलेतील काम करतानाच भारतीय कलाकारांवर युरोपातील द न्यू स्कल्प्चर चळवळीचा प्रभाव कसा पडला हेही दाखवून दिले आहे. त्यांनी रावबहादूर शास्त्री, बालाजी तालीम, करमरकर, पानसरे या शिल्पकारांच्या कामाचा आस्वाद घेताना त्यांच्या कामातील सौंदर्यस्थळेही दाखवली आहेत. तसेच, त्या कलाकारांनी व्यक्तिशिल्पातील आविर्भाव व्यक्त करण्याची पारंपरिक पद्धत कशा प्रकारे वापरली आहे तेही घारे यांनी उलगडून दाखवले आहे. न्यू इन्शुरन्स इमारतीवरील पानसरे यांची उत्थित शिल्पे लोकांनी मुंबईतील हुतात्मा चौकातून येता जाता अनेक वेळा पाहिलेली असतील; पण त्यांचा आस्वाद कसा घ्यायचा हे घारे यांचे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते.

आधुनिक कला-जाणीव ही इतकी मूलगामी आहे, की तिने जगातील सर्व कलाकारांना झपाटून टाकले. आधुनिक शिल्पकलेचा विचार करताना चित्रकलेचाही त्या बरोबर विचार करावा लागतो. कारण ज्याला मॉडर्न म्हटले जाते, ती जाणीव एक्स्प्रेशनिझम, क्युबिझम अशा वेगवेगळ्या प्रवाहांतून पुढे पुढे सरकत गेली आणि चित्रकला व शिल्पकला यांच्यातील सीमारेषा धूसर होत गेल्या. कलाकार त्याच्याजवळ असलेला अवकाश कलाकृतीद्वारे कसा व्यापतो आणि तो काय सांगतो, हे महत्त्वाचे ठरू लागले. त्यातूनच शिल्पकलेचा पुढील प्रवास वेगवेगळे धातू, दगड, लाकूड, पोलिएस्टर, रेक्झिन, फायबर यांसारखी इतरही माध्यमे वापरून चालू आहे. राम किंकर बैज, सदानंद बाक्रे, पिलू पोचखानवाला, मीरा मुखर्जी यांच्यासारख्या शिल्पकलाकारांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर सन्मान मिळवून दिला आहे. लेखक घारे यांच्यासमोर अडीचशे पानांत इतक्या मोठ्या कालखंडातील कलेचा मागोवा घेणे, दोन्ही प्रवाहांची तुलना करणे आणि वाचकांमध्ये शिल्पकलेविषयी अभिरुची उत्पन्न करणे ही मोठी आव्हाने होती. त्यांनी ती बोजड भाषा न वापरता साध्या सरळ सौंदर्यपूर्ण शब्दांत पूर्ण केली आहे.

– प्रकाश बाळ जोशी

(सकाळ साप्ताहिक११ मार्च २०१७ वरून उद्धृत)