सोफिया कॉलेट – राममोहन यांची निष्ठावंत (Sophia Collet – Rammohan Roy’s Devoted Follower)

राजा राममोहन रॉय

सोफिया डॉब्सन कॉलेट ही स्त्री ब्रिटनमध्ये एकोणिसाव्या शतकात होऊन गेली. तिने भारतीय राजा राममोहन रॉय यांच्या कार्याचा ध्यास असा घेतला, की मला राधा आणि कुब्जा या मिथकांची आठवण झाली! राधा ही सर्वांच्या माहितीची आहे. कुब्जा ही अत्यंत कुरूप आणि पाठीला कुबड आलेली, पण कृष्णावर नितांत प्रेम करणारी अशी तिची ओळख. तिच्यावर इंदिरा संत यांनी एक अतिशय सुरेख असे गीत लिहिले आहे अजून नाही जागी राधा | अजून नाही जागे गोकुळ | अशा अवेळी पैलतीरावर | आज घुमे का पावा मंजूळ | मावळतीवर चंद्र केशरी | पहाटवारा वरती भणभण | अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती | तिथेच टाकूनी आपुले तनमन | विश्वचि अवघे ओठा लावून | कुब्जा प्याली तो मुरलीरव | डोळ्यामध्ये थेंब सुखाचे | “हे माझ्यास्तव… हे माझ्यास्तव…” |

सोफिया कॉलेट

 

सोफियाचा जन्म 2 फेब्रुवारी 1822 रोजी झाला. तिचे चुलत आजोबा ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत मद्रासचे गव्हर्नर होते. तिचा मामाही ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला होता. सोफियाच्या जन्मापूर्वी तिच्या आईला झालेल्या अपघातामुळे सोफियाला जन्मतः अपंगत्व आले. तिच्या पाठीचा कणा वाकडा झाला होता. त्यामुळे तिला शाळेत घातले गेले नाही. तिने तिच्या वयाच्या दहाव्या वर्षी राममोहन रॉय यांना प्रथम बघितले. ती त्यांच्या भाषणाने, व्यक्तिमत्त्वाने, त्यांच्या कार्याच्या महत्त्वाने भारून गेली. पण राममोहन रॉय यांचे देहावसान त्यानंतर अगदी थोड्या काळात, 1833 साली झाले. परंतु सोफियाची त्यांच्या कार्याच्या महत्त्वावरील निष्ठा कमी झाली नाही. ती ब्राह्मो समाजाबद्दलची माहिती सतत गोळा करत राहिली. त्यातून ती केशवचंद्र सेन यांच्या संपर्कात आली. केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजाचे मोठे पुढारी झाले होते (1869). त्यांनी इंग्लंडचे दौरे केले. तेथे महत्त्वाची भाषणे दिली. ब्राह्मो समाजाचा इतिहास सांगणारा एक लेख एप्रिल महिन्याच्या क्वार्टर्ली रिव्ह्यू या नियतकालिकाच्या अंकात प्रकाशित झाला. केशवचंद्र सेन यांच्यावर प्रतिकूल असे शेरे लेखाच्या अखेरीस मारले गेले होते. सोफियाने त्या लेखाला उत्तर म्हणून 1870 च्या फेब्रुवारी महिन्यात कॉण्टेम्पररी रिव्ह्यूया मासिकात प्रदीर्घ लेख लिहिला. त्याचे शीर्षक होते, ‘हिंदुस्थानचा एकेश्वरवाद आणि त्याचे ख्रिस्ती धर्माशी नाते’. त्या लेखावर सर्व मासिकांतून कौतुकास्पद टिप्पणी आल्या. तिने केशवचंद्र सेन यांच्या बाजूने लढण्याचे कर्तव्य चालू ठेवले. तिने केशवचंद्र सेन यांची भूमिका अंतर्गत सुसंगतीपूर्ण आहे हे दाखवून दिले. तिने ब्राह्मो समाजाच्या एकेश्वरवादाचे समर्थन जोरदारपणे केले. तिने सेन यांच्या भाषणांचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तिने त्या पुस्तकाची सुधारून वाढवलेली आवृत्ती 1870 च्या अखेरीस प्रकाशित केली. तिने आणखी एक पुस्तक त्यानंतर तयार केले – केशवचंद्र सेन यांची इंग्लंडची भेट’. ते पुस्तक सहाशे पृष्ठांचे होते आणि सेन त्यांच्या वास्तव्यात ज्या ज्या सभांना गेले त्या सर्व सभांचे वृत्तांत त्या पुस्तकात होते.

 

सोफिया यांच्या ह्या सर्व प्रयत्नांमुळे इंग्लंडमध्ये ब्राह्मो समाजाबद्दल उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली.ब्राह्मो समाजाला मदत करण्यासाठी एक समिती निर्माण करण्याचेही ठरले. त्यासाठी 21 जुलै 1871 रोजी भरलेल्या सभेच्या पुरस्कर्त्यांपैकीं एक प्रमुख व्यक्ती होती सोफिया. त्या सभेत ठराव सेन यांच्या लंडनमधील प्रार्थना मंदिरासाठी निधी उभा करण्याचे प्रयत्न प्राधान्याने केले जावेत असा संमत झाला. सेन यांच्या समर्थनाला पूर्णविराम मिळाला तो 1872 साली. त्या वर्षी सेन यांच्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजपुत्राशी झाला, त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन होती. हे सेन यांच्या तत्त्वाच्या आणि ते ज्या सुधारणांचा प्रचार करत होते त्यांच्या विरूद्ध होते. मात्र ब्राह्मो समाज हा सोफियाचा ध्यास कायम होता. तिने ब्राह्मो इयरबुक 1879 -1886 या काळात सातत्याने प्रकाशित केले. तिने ब्राह्मो समाजाची हकिगत हजारो मैल अंतरावर असूनही इत्थंभूत गोळा केली – तिने ब्राह्मो समाजाच्या अगदी लहानसहान बैठकांचे तपशीलही मिळवले. तो त्या काळाचा ब्राह्मो समाजाचा इतिहासच आहे.

सोफियाने राममोहन रॉय यांचे वर्णन खानदानी दिसणारा हा माणूस होता. जवळ जवळ सहा फूट उंच, त्याचा आब, डौल आणि देखणे व्यक्तिमत्त्व डोळ्यात भरण्यासारखे होते” असे केले आहे. मात्र राममोहन रॉय यांचा एकेश्वरवाद तिला भावला असला आणि जुन्या ख्रिस्ती तत्त्वज्ञानातील त्रिमूर्ती (बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा) तिला मान्य नसली तरी तिने ख्रिस्ती धर्माचा त्याग  केला नाही. तिचा जॉर्ज होलिओक (George Holyoake) या प्रख्यात संपादकांशी परिचय झाला. त्यांनी सेक्युलॅरिझम हा शब्द 1851 मध्ये प्रचारात आणला. सोफिया हिने द रेकनर (The Recknor) आणि द मुव्हमेंट (The Movement) या होलिओक यांच्या दोन नियतकालिकांत लेखन केले. तिने मॉरल रिफॉर्म युनियनचे सभासदत्व घेतले. तिची Phases of Atheism – described, examined and answered (1860) आणि George Jacob Holyoake and Modern Atheism – A biographical and critical Essay (1855) ही दोन पुस्तके 1855-1860 या काळात प्रकाशित झाली.

तिने हे सारे केले, पण ना ती हिंदुस्तानात जन्मली होती, ना ती स्वतः हिंदुस्तानात कधी गेली होती. हिंदुस्तानातील कोणत्याही व्यक्तीशी – केशवचंद्र सेन वगळता – तिची व्यक्तिगत ओळख नव्हती. हे सारे कष्ट ती जन्मजात शारीरिक अपंग असताना करत होती आणि त्यात तिला कोणताही आर्थिक लाभ नव्हता.

 

तिने सर्वात शेवटी सुरुवात केली ती राजा राममोहन रॉय यांचे चरित्र लिहिण्यास. ते पूर्ण करणे हा तिचा ध्यास होता, स्वप्न होते. ती ते पुरे करण्यासाठी सतत बारा वर्षे कष्ट घेत राहिली. मात्र ते तिच्या मृत्यूसमयी पुरे होऊ शकले नाही. ती बिनचूकपणा यावा यासाठी आग्रही होती. बंगालीत लिहिलेली मूळ पत्रके वगैरे वाचता यावी म्हणून तिने बंगाली भाषा खूप उशिरा शिकली. जेव्हा तिला स्पष्ट दिसले, की मृत्यू जवळ येऊन ठेपला आहे आणि चरित्र पुरे होणार नाही, तेव्हा तिने एका परिचिताला ते पुरे करण्याची तळमळून विनंती केली. मिथकातील कुब्जा श्रीकृष्णाच्या परिसरात राहत होती, त्याच्या भूमीत जन्मलेली होती, त्याच्या धर्माची होती. येथे सारेच भिन्न. कुब्जेला श्रीकृष्णाचे पाय यमुनेचे पाणी बनून धुवायचे होते, तिला त्याच्या अधरावरची बासरी व्हायचे होते. सोफिया हजारो मैल दूर जन्मली, पण ती एका दर्शनात रॉयमय झाली. सोफिया स्वतः कुब्जेच्या त्या भावनेने जगली. तिचे निधन 27 मार्च 1894 रोजी झाले. इतिहासाच्या पुस्तकात राजा राममोहन रॉय आणि ब्राह्मो समाज यांच्याबरोबर सोफियाची कथाही जोडली जाण्यास हवी. (वाचकांना पुस्तक सोबतच्या लिंकवरून वाचता येईल.)

 

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

रामचंद्र वझे9820946547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केले. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ’शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ’टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

—————————————————————————————————————————————————————————————-