वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते.
हा ही लेख वाचा – मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)
वामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘यमक्या-वामन’ असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे.
– नितेश शिंदे niteshshinde4u@gmail.com / info@thinkmaharashtra.com