साने गुरुजी- मी पाहिलेले!

1
175
साने गुरुजी
साने गुरुजी

     आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाचे वेड होते. तेव्हा मुलांसाठी पुस्तके म्हणजे इसापच्या नीतिकथा, बालबोध मेवा जोडाक्षरविरहित (मी वाचायची जोडाक्षर विहिरीत) असायची. आमच्या समाजात दरवर्षी दसर्‍याला सोने लुटण्याबरोबर पुस्तके वाटायचाही समारंभ व्हायचा. म्हणजे जी मुले त्या वर्षी एखादी शालेय परीक्षा पास झाली असतील त्यांना अध्यक्षांच्या हस्ते छानपैकी गोष्टीचे पुस्तक बक्षीस मिळत असे. नुसते पास झाले की, पुरे! शाबासकी म्हणून आणि वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तक मिळे. किती टक्के? कितवा नंबर? असे प्रश्न कोणी विचारत नसे.

वसुमती धुरी यांना बक्षीस मिळालेल्या! ‘गोड गोष्टी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ     एका वर्षी, आम्हा लहान मुलांना वेगळीच नवीन पुस्तके मिळाली. साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी.’ नेहमीपेक्षा वेगळा आशय, छोटी छोटी सोपी वाक्ये, रंजक – अकृत्रिम शैली अशी ती पुस्तके आम्हाला (मी जेव्हा आम्ही म्हणते तेव्हा शरयू (ठाकूर) माझी बहीण मनात असते.) इतकी आवडली, की आपले पुस्तक संपवून दुसर्‍याचं घेऊन वाचू लागलो. साने गुरुजींची ती पहिली ओळख!

‘श्यामची आई’ पुस्तकाचे मुखपृष्ठ     त्यानंतर ‘श्यामची आई’ वाचली. वाचताना डोळ्यांत पाणी येई. दादा (आमचे वडील) रागवत. कशाला तो रडका साने गुरुजी वाचता, असे म्हणत. पण, मुलांच्या निरागस मनाला कळे, की हे हताश अश्रू नाहीत. निर्मळ प्रेमाचा झरा वाहत आहे. आणखी पुढे मग ‘भारतीय संस्कृती’, ‘राष्ट्रीय हिंदुधर्म’ वगैरे वाचले आणि प्रभावित झाले. कधी जर गुरुजी मुंबईत आले, त्यांचे कोठे व्याख्यान असले तर ऐकायला जायचेच. कॉलेज प्रॅक्टिकल बुडाली तर बुडू देत! तो काळच असा होता, की स्वत:च्या उन्नतीपेक्षा देशाचे भवितव्य, समाजाची उन्नती अधिक महत्त्वाची वाटत होती. मी त्या दृष्टीने जमेल तशी धडपड करत होते. पण, कुणाचे तरी अनुभवी मार्गदर्शन हवे होते. त्या दृष्टीने साने गुरुजींचा प्रत्यक्ष परिचय व्हावा असे फार फार वाटत होते. गुरुजींची पट्टशिष्य कुसुम कुलकर्णी (हेगडे) आमच्या बरोबर ‘रुईया’त होती. तिला आम्ही आमची मनीषा पुष्कळदा बोलून दाखवली.

     एकदा साने गुरुजी कुठूनतरी कुठेतरी जाताना वाटेत दादर स्टेशनवर अर्धा तास थांबणार होते. कुसुम आम्हाला त्यांना भेटायला घेऊन गेली. आम्हाला कोण आनंद! पण ते फार काही बोलले नाही. मी म्हणाले, “देशासाठी, समाजासाठी काहीतरी भरीव काम करण्याची तीव्र इच्छा आहे. तर काय, कसे ते सांगा.”

     गुरुजींनी विचारले, “सध्या तुम्ही काय करता?”

     “सध्या कॉलेजमध्ये इंटरला आहोत. मागासवस्तीत थोडे काम करतो. सुट्टीत नेवाळकरांकडे काम करतो.”

     “पुष्कळ झाले. सध्या हेच चालू ठेवा. त्यातच काहीतरी दुवा तुम्हाला आपोआप सापडेल.” गुरुजी हसून म्हणाले. आमची थोडी निराशाच झाली. ‘आता उठा आणि देश पेटवा’ असे ते सांगतील असे आम्हाला वाटले होते.

साने गुरुजी     आमचं शिक्षण पुढे चालू राहिले. गुरुजींची पुस्तके वाचणे, त्यांचे मुंबईत कुठे व्याख्यान असले तर ऐकायला जाणे वगैरे पण जोमात चालले होते आणि एकदा गुरुजींचे भाषण आमच्या घरातून जवळच असलेल्या वनिता समाजात होते. इतकी उत्तम संधी कोण दवडणार? मी ते ऐकायला आजीला घेऊन गेले. आई मुंबईत नव्हती. आमची आजी निरक्षर, पण सुसंस्कृत व प्रेमळ होती. बुद्धिमान असावी. वटपौर्णिमेचा दिवस जवळ आला होता. गुरुजी त्याविषयास अनुसरून बोलले. ते म्हणाले, “मला तर वाटतं, की आपण वटपौर्णिमा हे व्रत न ठेवता, सण जगवला आहे. त्या दिवशी म्हणे उपवास करायचा, सकाळी उठून उत्तम साडी नेसून, नथ, पाटल्या, तोडे, वाकी वगैरे असतील-नसतील ते दागिने, सौभाग्यलंकार अंगावर चढवून पूजेचे तबक हातात घेऊन मैत्रिणींच्या घोळक्यात मंदिरात जायचे. गुरुजी (भटजी) तेथे वटवृक्षाखाली बसलेले असतात व बायकांची ही गर्दी जमलेली असते. गुरुजी (भटजी) सांगतील त्याप्रमाणे त्या वटवृक्षाची पूजा करायची. त्याला एक रायवळ आंबा मुद्दाम पूजेसाठी घेतलेला- पाच जांभळे, फणसाचे गरे, केळी, मूठभर कडधान्य- नैवेद्य दाखवायचा. गुरुजींना दक्षिणा द्यायची आणि रायवळ आंबा पण द्यायचा. मग तिथे जमलेल्या सुवासिनींपैकी ज्या आपल्या विशेष परिचित असतील किंवा सहजपणे आवडतील (रंग-रूप, कपडे, दागिने इत्यादीवरून) त्यांना सवाष्णींना वाण द्यायचे. ते मात्र, हापूस आंब्याचे! पूजेच्या वटवृक्षाला रायवळ आंबा आणि सग्यासोयऱ्यांना हापूस? कुठला देव प्रसन्न होईल या पूजेने? जरा विचार करा भगिनींनो, श्रद्धा असेल तर व्रत अवश्य पाळा, नसेल तर आनंदाने सण साजरा करा. पण, धर्माच्या नावाखाली त्या महान वृक्षाची अवहेलना करू नका. त्याहून वाईट म्हणजे पूजेसाठी फांदी तोडून घरी आणू नका. अखेरीस धर्म म्हणजे काय? खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे…”

     माझी आजी प्रभावित झाली, ते सर्व ऐकून म्हणाली, “किती खरे बोलतोय गं हा बाबा! कुठे मिळवले एवढे ज्ञान? आणि किती, साधा आहे. पुराणिकबुवांसारखे कपडेसुद्धा नाही. खरा ज्ञानी पुरुष.”

       थोडे दिवस गेले. भारताला ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाले. सर्वसामान्य जनता आनंदाने बेहोष झाली. पण, दुर्दैव आपले की, वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये मतभेद झाले. विकोपाला जाऊ लागले. विशेषत: भारताचे पोलादी पुरुष गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल व तरुण रक्ताच्या प्रजा समाजवादी पार्टीचे पुढारी जयप्रकाश नारायण यांच्यात तीव्र स्वरूपाचे तांत्रिक मतभेद होते. साने गुरुजींनी प्रजा समाजवादी पक्षाची भूमिका प्रांजळपणे मांडणारे पत्र, मध्यस्थी करण्याच्या हेतूने गृहमंत्र्यांना पाठवले होते. त्याला त्यांनी जळजळीत उत्तर दिले होते. ते नायगाव (दादरच्या) मैदानावर सभा घेऊन गुरुजी वाचून दाखवणार होते. त्या गच्च भरलेल्या सभेत आम्ही होतोच. गुरुजी गृहमंत्र्यांचे पत्र वाचू लागले. पत्रात होते-

     एखादे युद्ध विजयी झाले की थाटामाटात विजययात्रा निघते. शृंगारलेला भव्य रथ असतो. वारू जोडलेले असतात. वाद्ये वाजत असतात आणि लोक रस्त्यावर उभे राहून प्रशंसा करत असतात. मोठा सोहळा असतो. त्यामुळे रस्त्यावरची कुत्री प्रभावित होतात. तीही मोठमोठ्याने भुंकत रथाबरोबर धावत असतात. थोड्या वेळाने त्या कुत्र्यांना वाटू लागते की आपल्या धावण्या व भुंकण्यामुळेच विजयरथाला ऊर्जा मिळत आहे व ती अधिकच जोराने भुंकू लागतात. तुमच्या पक्षाची अवस्था त्या कुत्र्यापेक्षा निराळी नाही…

     गुरुजींनी थरथरत्या हातात ते पत्र धरून संतप्त सूरात वाचून दाखवले आणि फाडून त्याचे बारीक बारीक तुकडे करून हवेत फेकून दिले. शेकडो प्रेक्षकांसमोर! म्हणाले, “हेच या पत्राला उत्तर. निराळे उत्तर देण्याची गरज नाही. एवढा अहं… निष्ठावंत कार्यकर्त्यांची ही कदर!!”

     हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवताना आमच्या शरीरावर सरसरून काटा आला.

     दादर स्टेशनवर कोरलेले ते साने गुरुजींचे बुझरे रूप, वनिता समाजाच्या प्रौढ सुरक्षित स्त्रियांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ म्हणून परखड शब्दांत सांगणारे मायाळू आईचे स्वरूप आणि आज घोर अन्यायाशी सामना करायला उभे ठाकलेले, लढाऊ रुद्र स्वरूप. त्यांची ही सर्व रूपे आयुष्यभर माझ्या मन:पटलावर कोरलेली आहेत.

– वसुमती धुरू

साने गुरूजी यांचेश्‍यामची आईहे पुस्‍तक वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

 

1 COMMENT

Comments are closed.