साठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये!

उमा सहस्‍त्रबुद्धेकाय? साठाव्या वर्षी परत कॉलेजमध्ये? शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? साठाव्या वर्षी कोणी परत कॉलेजमध्ये जायला लागते का? होय, हे घडू शकते. नव्हे, माझ्या बाबतीत हे घडले आहे. ‘रामनारायण रुईया ‘ हे माझे कॉलेज. मी तिथून ग्रॅज्युएट झाले. मी आता, चाळीस वर्षांनंतर पुन्हा तिथे जायला सुरूवात केली आहे. काही शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी नाही, तर मी जात आहे मला मिळणार्‍या निर्मळ आनंदासाठी. तिथे माझा दिवस सार्थकी लागतो, ह्या समाधानासाठी.

निवृत्तीनंतर नुसते आरामखुर्चीत विसावण्यापेक्षा काहीतरी वेगळे करायची संधी मिळाली आणि ती मी लगेच उचलली; आणि म्हणूनच मी कॉलेजमध्ये जाते, अगदी नियमितपणे, जवळजवळ रोज.

महाविद्यालयीन अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक आणि लेखनिक म्हणून काम करायची कल्पना मला ‘स्नेहांकित’ या संस्थेमुळे मिळाली आणि मी रुईयामध्ये पुन्हा पाऊल ठेवले. अंध मुले शाळेचे शिक्षण ब्रेल लिपीतून वेगवेगळ्या शाळांतून घेतात. त्यांचा अभ्यासक्रम ठरावीक असतो आणि त्यांचे शिक्षकही विशेष प्रशिक्षित असतात, पण त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सर्वसामान्य मुलांप्रमाणे घ्यावे लागते. वर्गात बसून लेक्चर्स ऐकायची, ती कानांत साठवून ठेवायची. नंतर कोणी रीडर मिळाला तर परीक्षेची तयारी होणार. अभ्यासक्रमाच्या कॅसेटस् रेकॉर्ड करून दिल्या तर त्या ऐकून परीक्षेची तयारी करणार, या पध्दतीने अंध मुले अभ्यास करतात. ती डोळस मुलांकडून अभ्यासाच्या नोट्स घेतात, त्या रीडरकडून वाचून घेतात. कोणी त्याच्या सी.डी. करून दिल्या तर त्या ऐकून त्या मुलांना अभ्यास करायला सोपे पडते.

रुईया कॉलेज अंध मुलांना अभ्यासात विशेष सहाय्य करते. त्यासाठी स्वतंत्र केंद्र आहे. अंध मुलांच्यासाठी संगणक आहेत, त्यावर वेगळे, बोलणारे सॉफ्टवेअर आहे. तिथे बसून सोशल वर्कर त्या मुलांना वाचवून दाखवू शकतात. कॉलेजमधली डोळस मुलेही या केंद्रामध्ये अंध मुलांना मदत करतात.

मी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आर्टसला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे व तिसर्‍या वर्षाच्या ऑक्टोबरच्या परीक्षांचे पेपर्स गेली चार वर्षे लिहीत आहे. आता जेव्हा मी माझ्या समवयीन मैत्रिणींना हे सांगते तेव्हा त्या जरा साशंक असतात. “आम्हाला कसं जमेल? शाळा-कॉलेज सोडून इतकी वर्षं झाली आम्हांला, आता लिहायला स्पीड कमी पडेल, मग उगीच आपल्यामुळे मुलांचं नुकसान नको व्हायला” वगैरे. पण या सगळ्या पळवाटा आहेत, बहाणे आहेत. मला या मैत्रिणींना सांगावेसे वाटते, की एकदा करून तर बघा हे काम, खूप स्पीड वगैरे लागत नाही लिहायला. मुले उत्तरे जुळवून जुळवून सांगतात. आपण ती फक्‍त लिहायची.

मी तिसर्‍या वर्षाला असलेल्या काही विद्यार्थ्यांची प्रॉजेक्टस लिहायचे काम केले. त्यांनाही सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे प्रॉजेक्ट्स कॉलेजमध्ये ठरावीक वेळात सबमिट करायची असतात. वीस-बावीस पानी प्रॉजेक्टस चित्रांसहित आकर्षक पध्दतीने सजवून द्यायची असतात. ह्यात काही वेळा पुस्तकाचे परीक्षण, थोर लोकांची चरित्रे, कवितासंग्रह असे विषय असतात. या कामात त्यांना मदत करतांना मला सतत नवीन अनुभव मिळाले. आम्ही कॉलेजमध्ये शिकताना असे काही नव्हते. अंध मुले प्रॉजेक्टसच्या नोट्स ब्रेल लिपीत तयार करतात. आपण त्या कागदावर चांगल्या अक्षरांत नीटनेटकेपणे उतरवून, जरा सजवून योग्य पध्दतीने द्यायच्या. एकदा एका अंध मुलीने प्रॉजेक्ट म्हणून एका प्रसिध्द कवीची मुलाखत कॅसेटवर रेकॉर्ड करून घेतली होती. मी तिला ती मुलाखत लिहून दिली. ती मुलाखत, त्या कवीचे विचार, यांमुळे मला मी संपन्न झाल्यासारखे वाटले. पुढे त्या कवींशी संपर्क साधून त्या मुलाखतीची एक कॉपी मी त्यांना पाठवून दिली. त्यांना त्याचा फार आनंद झाला व कौतुक वाटले.

एकदा बी.एड. करत असलेल्या एका मुलाला मी आधीच्या काही वर्षांतल्या प्रश्नपत्रिका वाचून दाखवत होते. ते सगळे पेपर्स ऑब्जेक्टिव होते आणि उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय होते. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाप्रमाणे असलेले ते पेपर्स वाचताना ऐकून बारा-पंधरा विद्यार्थी जमा झाले आणि पर्याय शोधून उत्तरे देताना पुढचे दोन-अडीच तास अशी काही मैफील रंगली की माझ्या कायमच्या स्मरणात राहिला तो प्रसंग!

अंध विद्यार्थी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून मुंबईला आलेले असतात. शासकीय वसतिगृहांत राहतात आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिकतात. अपंगत्वावर मात करून जिद्दीने, कौशल्याने आणि मेहनतीने आपले आयुष्य यशस्वीपणे जगता येते हे दाखवून देतात. आपले कॉलेज लाइफ एंजॉयही करत असतात. हास्यविनोद, चेष्टामस्करी चालू असते. कॉलेजचा परिसर रोजचा, सवयीचा असल्याने आपली पांढरी काठी फोल्ड करून बॅगेत ठेवतात आणि सहजपणे वावरायचा प्रयत्न करतात. तरूण वयच ते! त्यांचे उत्साहाने भरलेले चेहरे आपल्याला सांगत असतात, की आम्हांला नुसती तुमची सहानभूती नको आहे. जमले तर आम्हांला मदत करा, आमची वाट सुकर करा. नाही तरी आम

About Post Author