पालगड हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील छोटेसे टुमदार गाव. त्या गावाजवळच पालगड हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी गावामध्ये साने गुरुजी यांचे स्मारक आहे. ते साने गुरुजींचे जन्म गाव आहे…
पालगड हा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना पुरवण्यासाठी; तसेच, टेहळणी करण्याकरता बांधला गेलेला छोटेखानी किल्ला आहे. त्यामुळे त्यावर लढाईच्या फारशा खाणाखुणा नाहीत. तो दापोली तालुक्यात आहे. ‘पालगड’ला महत्त्व आहे ते साने गुरुजी यांचे गाव म्हणून. किल्ला गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आहे. तो समुद्रसपाटीपासून बाराशे-तेराशे मीटर उंचावर आहे. किल्ल्याची उभारणी कोणत्या काळात झाली याबद्दल ऐतिहासिक पुरावा नाही. पण तो किल्ला शिवकाळात स्वराज्याशी जोडलेला होता. शिवाजी महाराजांनी हर्णे येथील सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी समुद्री आरमार उभारताना केली. तेव्हा पालगड आणि मंडणगड या किल्ल्यांचा किल्ल्याच्या बांधणीसाठी व रसद पुरवण्यासाठी उपयोग केला असावा.
किल्ल्याचे बांधकाम दोन डोंगरांच्यामधील छोट्या डोंगरावर करण्यात आले आहे. ते किल्ल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. मुख्य किल्ला (खेड व दापोली या दोन्ही बाजूंनी) दुरून दिसत नाही. किल्ल्याच्या एका बाजूला टकमक टोकासारखा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला आयताकार असा डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगराचा आकार पालीसारखा आहे म्हणून किल्ल्याला ‘पालगड’ हे नाव देण्यात आले. पूर्वी दापोलीकर पालगडात जाताना ‘पालनात जातो’ असे म्हणत.
किल्ल्याबाबत एक आख्यायिका अशी आहे, की किल्ल्याचे बांधकाम मधल्या डोंगरावर न होता आयताकार डोंगरावर प्रथम होणार होते, त्याला रामगड म्हणतात. पण डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि शत्रूपासून भविष्यात कच खावी लागेल या त्या वेळच्या समजुतीनुसार किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली ! तो किल्ला खेडचा रसाळगड व मंडणगड या दोहोंमधील एक थांबा शिवकाळात असावा असे त्या किल्ल्याच्या स्थानावरून जाणवून जाते.

किल्ला लहान म्हणजे एक ते दीड एकरामध्ये वसला आहे. किल्ल्यावर पाच तोफा आढळल्या. त्यांतील दोन किल्ल्यावर आणि दोन किल्ले माचीत आहेत. पालगड किल्ल्याला चार माची आहेत. जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची. त्या किल्ल्याच्या चारही बाजूंना मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यांतील किल्ले माची फक्त खेडच्या बाजूस तर इतर तीन दापोलीच्या दिशेने आहेत. किल्ल्याकडे जाणारा सोयीचा मार्ग किल्ले माची व राणे माची यांमधून आहे. किल्ल्यावरील एक तोफ श्री. क्षेत्र परशुराम (चिपळूण) येथे आहे असे सांगण्यात येते.

किल्ल्याची तटबंदी नैसर्गिक डोंगरकडा कापून तयार झाली आहे. त्यात किल्ल्याची भिंत काही ठिकाणी निसर्गत: डोंगरकडा सरळसोट कापून तयार केलेली आहे. त्यामुळे त्यावर तटबंदी भिंत उभारण्याची गरज भासली नसावी. सरळसोट कापलेला डोंगरकडा शत्रूला चढून वर येण्यास अगदी अशक्य असल्याचे दिसते. नैसर्गिक तटबंदीमुळे किल्ला मजबूत आणि सुरक्षित आहे. काही ठिकाणी नैसर्गिक कड्याच्या वर दहा-पंधरा मीटर उंचीची भिंत उभारून तटबंदी तयार केली आहे. ती तटबंदी बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे. किल्ल्याच्या आतील सर्व इमारती कोसळलेल्या आहेत. त्यांच्या पायाचा भाग जुन्या खुणा म्हणून शिल्लक आहे. किल्ल्यावर एकही विहीर नाही. किल्ल्याच्या मागील बाजूस दगड खोदून बांधलेल्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत, एक भुयारी वाट आहे. ती बुजलेली आहे. ती मंडणगड किल्ल्याकडे जाते असे म्हटले जाते. मात्र ते अशक्य वाटते.

किल्ल्याच्या पायथ्याला जुनी बाजारपेठ आहे. त्यात बारा बलुतेदारांची वस्ती आहे. हिरवीगर्द देवराई किल्ल्याखाली आहे. पालगडची देवी ‘श्री. झोलाई’ हिचे मंदिर त्या देवराईत आहे. मंदिराकडून किल्ल्याकडे पायवाट जाते. ती वाट उंच, निमुळती आणि दोहो बाजूंस जंगल व खोल दरी अशा प्रकारची आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दोनशेच्या आसपास पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोर दोन बुरुज दिसतात. बुरुजांच्या मधून केवळ दोन माणसे प्रवेश करू शकतील एवढा निमुळता दरवाजा आहे. तो दरवाजा साधारण आठ फूट उंच व तीन फूट रुंद असा, दगडी बांधकामात आहे. किल्ल्याला ते एकच प्रवेशद्वार आहे. ते उत्तर दिशेस आहे.

मंडणगड किल्ल्याचे गडकरी ‘दळवी’ (पालवणीचे) हे किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार होते. त्यांनी त्यांच्या मुलींची लग्ने ‘बेलोसे व पवार’ कुटुंबात करून त्यांच्याशी सोयरीक जोडली आणि किल्ल्याची व्यवस्था ‘बेलोसे व पवार’ यांच्याजवळ दिली.
किल्ल्याचा मध्ययुगीन ते ब्रिटिश कालखंडापर्यंतचा इतिहास पूर्ण आढळत नाही. त्रोटक असे काही उल्लेख आढळतात. त्यात पहिला बाजीराव आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांच्यात त्या किल्ल्यावर लढाई झाली होती असा एक उल्लेख आहे.
– संकलन – अश्विनी भोईर 8830864547 ashwinibhoir23@gmail.com
—————————————————————————————————————————————-