समृद्ध आणि विविध परंपरांनी नटलेली सांगवी

_Sangavi_1.jpg

सांगवी गाव गोदावरी आणि देवनदी यांच्या संगमावर वसलेले आहे. त्या गावात पूर्वापार ब्राह्मण, कोळी, महार, मराठी या चार समाजगटांची कुळे दक्षिण तीरावर राहत होती. दत्त उपासक श्री नृसिंह सरस्वती तेथे वास्तव्यास होते. तेथून त्यांनी गोदावरी प्रदक्षिणा करण्याचा संकल्प सोडला. ते व त्यांचे शिष्यगण मजल दरमजल करत असताना गोदावरी काठाने उत्तरवाहिनी देवनदी व पूर्ववाहिनी गोदावरी यांच्या संगमाच्या दक्षिणेला सांगवी या गावी नदीकाठ परिसराजवळ असलेल्या टेकडीवर त्यांचा मुक्काम झाला. तो काळ चातुर्मासाचा होता. नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या शिष्यांसमवेत सांगवी येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्य केले, त्यामुळे सांगवी गावास धर्मक्षेत्राचे महात्म्य लाभले.

नृसिंह सरस्वती दररोज नदीवर स्नान करून टेकडीवर चिंतन करत व गावातील नागरिकांकरता आध्यात्मिक प्रवचन करत.

सांगवी येथील दत्तमंदिराच्या ठिकाणी आनंदवन आश्रम उभे केले. प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला सांगवी येथे दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो.

मौजे सांगवी या गावी शिवाचे हेमांडपंथी मंदिरे बांधलेले आहे. मात्र मंदिराबाबत कोठलाही पुरावा नाही. सांगवी गावात दक्षिणमुखी हनुमंताची पाच फूट उंचीची मूर्ती आहे. त्याच्या समोर तीन हजार लोकांना बसण्यासाठी भव्य सभामंडप आहे.

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दरीडोंगरात राहणाऱ्या भिल्ल समाजाचा एक तरुण ब्रिटिश अत्याचाराने पेटून उठला आणि क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या सान्निध्यात दाखल झाला. त्या युवकाने स्वतःची फौज ब्रिटिशांविरुद्ध निर्माण केली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्लाबोल सुरू केला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध जिवंत अथवा मृत पकडण्याची मोहीम राबवली. तो तरुण म्हणजे क्रांतिवीर भागोजी नाईक. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड आणि सिन्नर येथून पाठलाग करणाऱ्या ब्रिटिशांना चुकवत क्रांतिवीर भागोजी नाईक सांगवी येथे १०-११-१८५९ रोजी दोन नद्यांच्या बेटावर दाखल झाले. नदीच्या तीरावरून ब्रिटिश व उत्तर बाजूने भागोजी नाईक व त्यांचे सहकारी यांचे दोन दिवस युद्ध सुरू होते. क्रांतिवीर भागोजी नाईकाचा संपूर्ण परिवार त्या बंडात वेगवेगळ्या ठिकाणी धारातीर्थी पडला. भागोजी नाईक जखमी झाले. त्यावेळी सांगवी गावातील काळे कुटुंबातील मुख्य पुरुषाने नदीतून पोहत जाऊन स्वातंत्र्य संग्राम करणाऱ्या भागोजी नाईक यांस गुपचूप गावात आणले, परंतु अपुरा शस्त्रपुरवठा आणि केवळ तीरकामठा यांमुळे जखमांनी विद्ध झालेल्या भागोजी यांनी स्वतःचा देह ११ नोव्हेंबर १८५९ रोजी सांगवीच्या मातीत ठेवला.

ती माहिती दुसऱ्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपशील काढण्यासाठी गावकऱ्यांवर अत्याचार केले व गाव पेटवून दिले, म्हणून त्या गावाला लढाईची सांगवी असे म्हटले जाई. सांगवी येथे दरवर्षी क्रांतिवीर भागोजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

काही स्थलांतरित धनगर मंडळी गावकुसाजवळील देवनदीच्या तीरावर विसावली. त्यांनी बिरोबा नावाच्या देवतेची स्थापना केली. बिरोबा देवस्थानाचा यात्रोत्सव सांगवीत होतो.

अशा तऱ्हेने आध्यात्मिक अधिष्ठान, क्रांतीची प्रेरणा, शरणागतांसाठी ‘ममता’ असा वारसा सांगवी गावास आहे. गोदावरी तीरावरील ते गाव वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करते.

गावाच्या पूर्वेस असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वडगाव येथे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येस संपूर्ण गावकरी शनी देवतेची प्रतिमा असलेला रथ व त्या काळातील करमणुकीचे प्रसिद्ध साधन असलेला तमाशा घेऊन सवाद्य मिरवणुकीने सीमेपर्यंत जातात, त्या गावचे ग्रामस्थ रथ – मानकऱ्यांसह गावकऱ्यांचे यथोचित स्वागत करून रथ – मिरवणुकीने त्यांच्या गावी गोदाकाठावर असलेल्या शनी मंदिराकडे घेऊन जातात. वडगावी सर्व नागरिक वंजारी समाजाचे आहेत व सांगवी येथील सर्व मानकरी मराठा समाजाचे आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असलेला तो रथोत्सव दोन वेगवेगळ्या समाजांचे लोक एकत्र येऊन साजरा करतात.

गावाचा इतिहास व भूगोल नीटपणे माहीत असलेले अशोक सीताराम घुमरे हे उपक्रमशील व्यक्तित्व आहे. ते वेळोवेळी युवकांना संघटित करून विविध उपक्रम राबवतात. ते नाट्यक्षेत्र, साहित्यक्षेत्र, काव्य आणि राजकारण या क्षेत्रांत कार्यरत आहेत.

त्यांनी वेगवेगळे उपक्रम करत असताना पाऊस पडण्यासाठी ‘गाढवाचं लग्न’ हा उपक्रम गावात तीन-चार वेळेस राबवला. इतिहास असा – अयोध्येचा राजा दशरथ याला एक कन्या होती, परंतु पुत्र नसल्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी दशरथ राजाचे कुलगुरू वशिष्ठऋषी यांनी दशरथ राजाला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा असे सांगितले. तो यज्ञ पार पाडताना अयोध्यानगरी सुजलाम् सुफलाम् असायला हवी. पण त्यावेळी दुष्काळ पडला होता. तेव्हा नगरी सुजलाम् सुफलाम् होण्याकरता पर्जन्यदेवतेची आराधना केली. त्याचा निषेध म्हणून इंद्रदरबारातील नर्तकांचे प्रतीक म्हणून गंधर्व विवाह लावला. त्या विवाहास सर्व देवतांनी आशीर्वाद दिले. तेव्हा या अयोध्यानगरीमध्ये पर्जन्यवृष्टी झाली अशी आख्यायिका आहे.

अशोक घुमरे यांनी १९८२ मध्ये पहिला गंधर्व विवाह (गाढवाचे लग्न) लावला. तो विवाह लावल्यानंतर एक-दोन तासांनंतर तेथे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सांगवी गावात दुष्काळजन्य परिस्थितीत गाढवांची लग्ने तीन ते चार वेळेस लावण्यात आली. सांगवीत गाढवाचे लग्न २०११ मध्ये देखील लावण्यात आले होते. गाढवाचे लग्न हे पारंपरिक लग्नसोहळ्याप्रमाणे लावले जाते. म्हणजे लग्न या गावात लावायचे असल्याने ‘वधू’ या गावातील असते तर ‘वर’ शेजारच्या गावातील असतो. बस्ता-हळदी समारंभ होतो, मिरवणूक काढली जाते, ब्राह्मणांच्या साक्षीने मंगलाष्टके म्हटली जातात आणि सर्व विधी पूर्ण करून नवरीला निरोप दिला जातो. सांगवी येथे गाढवाच्या लग्नाची लोकपरंपरा यथासांग पार पाडली जाते. लग्नसोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.

– माधुरी वसंत घुमरे

(‘लोकपरंपरेचे सिन्नर’ या पुस्तकातून)

Last Updated On – 14th July 2017