समृद्धी रणदिवे – वंडर गर्ल

4
13
carasole
धर्नुविद्या, काव्य, वक्तृत्व आणि बरंच काही… 

समृद्धी हरिदास रणदिवे! धनुर्विद्येतील राष्ट्रीय रौप्यपदक वयाच्या अकराव्या वर्षी मिळवणारी समृद्धी ही एकमेव खेळाडू असेल! समृद्धी म्हणजे चैतन्य आहे. काव्य, क्रीडा, कला, वक्तृत्व, अभिनय, लेखन, चित्रकला या सर्व क्षेत्रांमध्ये तिच्या असामान्य प्रतिभेने सर्वांचे डोळे दिपले गेले आहेत. समृद्धीचा, ‘मासे’ हा कवितासंग्रह अकराव्या वर्षी प्रकाशित झाला. तिच्या काव्यात कल्पनाविलास आहे. नादमाधुर्य व गेयता आहे. ज्येष्ठ कवी कै. दत्ता हलसगीकर यांनी समृद्धीला ज्ञानेश्वरांची उपमा दिली! भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी तिचा व तिच्या काव्याचा मुक्तकंठाने गौरव केला. तिच्या ‘मासे’ या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले.

समृद्धी सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण गावात राहते. ती उत्तम वक्ता आहे. समृद्धीने तिच्या वक्तृत्वगुणाचा समाजप्रबोधनासाठी उपयोग केला आहे. तिने स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती या व अशा अन्य विषयांवर महाराष्ट्रभर व्याखाने दिली आहेत. शालेय वक्तृत्वस्पर्धेपासून ते राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेपर्यंत तिने घेतलेली झेप मोठी आहे. वक्तृत्वकलेसाठी लागणारे गुण म्हणजे भाषेवर प्रभुत्व, त्याला अभिनयाची उत्तम जोड, बुलंद आवाज… त्या गुणांमुळे तिचे वक्तृत्व हे प्रभावी होते.

समृद्धीने वयाच्या अकराव्या वर्षी, इयत्ता पाचवीत असताना राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिने संत सावता माळी विद्यालयाची सुवर्णकन्या गीतांजली शिंदे, सुप्रिया रणदिवे, अश्विनी गाजरे, अनुराधा पाटील या तिच्या सिनियर खेळाडूंसमवेत धनुर्विद्या या वेगळ्या क्रीडाप्रकारात असामान्य कामगिरी केली. तिने जिल्हा स्तरापासून ते राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझ या पदकांची लयलूट केली. पाचवी ते बारावी, तिने मिळवलेल्या पदकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिली जाणारी क्रीडा शिष्यवृत्ती समृद्धीने सलग तीन वेळा मिळवली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श खेळाडू पुरस्कारही समृद्धीने लहान वयात मिळवला.

समृद्धीने इतक्या प्रकारांत भाग घेऊनही तिचे अभ्यासातील गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालेले नाही. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत तिच्या गुणांची सरासरी काढली तर ती ९५ टक्क्यांपेक्षा अधिक होते, आणि इयत्ता दहावीमध्ये तिने ९६.५५ टक्के गुण मिळवले आहेत. समृद्धी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, जि. पुणे येथे शिकत आहे.

समृद्धीला विविध क्षेत्रात धडपड करण्याासाठीची प्रेरणा तिच्यात कुटुंबाकडून मिळत असली पाहिजे. तिचे वडिल हरिदास रणदिवे हे माढ्याच्या वरवडे गावातील ‘श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ येथे प्राचार्यपदी कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र  शासनाच्या ‘गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कारा’ने आणि ग्रंथमित्र पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. समृद्धीची आई सुनिता रणदिवे या गृहिणी. त्यांना समाजकार्याची आवड आहे. समृद्धीची मोठी बहिण सुप्रिया किरनाळे हीदेखील धुर्नविद्या प्राप्त  केलेली राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. तिचा भाऊ अजिंक्य रणदिवे हा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू असून तो उत्तम वक्ता आहे. तो सध्या पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. समृद्धीची शाळा, ‘संत सावता माळी विद्यालय’ येथे धुर्नविद्येचे रीतसर शिक्षण दिले जाते. त्यास शाळेतील किमान एक विद्यार्थी दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास जातो, असा शाळेचा लौकीक आहे. समृद्धीबद्दल तिचे वडिल हरिदास रणदिवे म्हणतात, समृद्धी लहानपणापासून खूप उत्साही, जिज्ञासू, सर्जनशील व मनमिळावू आहे. इतरांची कळजी घेते. ती जे ठरवते ते करते, असा तिचा स्व‍भाव आहे. ती दुस-या इयत्तेत असल्यापासून कविता करु लागली. ती पाक कलेपासून थेट साहित्यव क्षेत्रापर्यंत सर्वत्र लिलया संचार करते.

समृद्धीचे राहते गाव अरण, त्याचे संत नामदेवांनी वर्णन करताना तेराव्या शतकात म्हटले आहे, की –

धन्य ते अरण | रत्नाचिया खाण |
जन्मला निदान | सावता तो |

त्या शब्दांत थोडा बदल करून मी असे म्हणेन,

धन्य ते अरण| रत्नाचिया खाण|
जन्मली निदान| समृद्धी ती|
धन्य तिची माता| धन्य तिचा पिता|
घडविला पुतळा| चैतन्याचा|

– प्राचार्य सावता घाडगे

हरिदास रणदिवे (समृद्धीचे वडिल) 9422428857

4 COMMENTS

  1. समृधी रनदिवे ला हार्दिक
    समृधी रनदिवे ला हार्दिक शुभेच्छा
    स्वतःचे व देशाचे नाव अंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करावे ही इश्वरचरनी प्रार्थना भावी वटचालीस हार्दिक शुभेच्छा .

  2. समृध्दि तु आणखी समृद्ध व्हावे
    समृध्दी तू आणखी समृद्ध व्हावे. मनापासून शुभेच्छा अन् आशिर्वाद.

Comments are closed.