समुद्र प्रवास आणि कोरोना (Sailor Experience of Corona)

नाविक आम्ही फिरतो सात नभांखाली…

 

बहुतेक लोकांना असे वाटते, की नाविक व्यक्तींचे जीवन मनमोहक असेल, त्यांना भरपूर जगभर फिरण्यास, भरपूर वाइन पिण्यास मिळत असेल आणि त्यासोबत पैसेही कमावता येत असतील! पण जसे म्हणतात, ना अज्ञानात आनंद आहेतसेच हेही आहे. सेलिंग करता करता चहा पिणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्यासाठी जिगर लागते!
          शिपिंग उद्योग हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार जहाजांद्वारे केले जातात. अन्नधान्यापासून तेल, कार आणि फोन यांसारख्या लक्झरी वस्तूंची ने-आण समुद्रमार्गे केली जाते. ते काम करणारे नाविक त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर, ताणतणाव असलेल्या वातावरणात, कधीकधी वादळाशी झुंज देत समुद्रातून प्रवास करत असतात. कोट्यवधी डॉलर्स किमतीची मालवाहतूक अशा तऱ्हेने होत असते.
          आम्ही नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून निघालो. माझे जहाज डिसेंबरमध्ये अटलांटिकमध्ये होते, आम्ही अमेरिकेहून युरोपकडे जाण्याच्या मार्गावर होतो. तेव्हा आम्ही प्रथम नोव्हल कोरोना विषाणू आणि कोविद-19 यांबद्दलची बातमी ऐकली. त्यावेळी कोरोना मुख्यतः चीन भागात होता; अन्य जग सुरक्षित वाटले. खोल समुद्रात नेटवर्क कनेक्टिव्हिटी खूपच खराब असते. त्यामुळे आम्हांला बंदरात पोचलो, तरच माहिती मिळू शकत होती. मी जानेवारी महिन्यात बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होतो, तेव्हा काही कोरोना रोगी युरोपमध्ये आढळले. तरीही जनजीवन सर्वसामान्य होते. आम्हाला कोरोना ही जगातील इतर समस्यांप्रमाणे एक वाटत होती. परंतु फेब्रुवारीपासून, युरोप हा कोरोनाचा केंद्रबिंदू बनू लागला आणि मार्चपर्यंत जहाज वाहतूक उद्योग आणि विशेषत: समुद्रकिनाऱ्यांवरील कामगारांचे काम यावर फार मोठा परिणाम झाला. जागतिक व्यापार ठप्प होऊन गेला. त्याचा थेट परिणाम जहाज वाहतुकीवर झाला. तेलासह इतर वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे जहाजे बंद पडली.          
            आम्ही ज्या देशांना भेट दिली (अॅमस्टरडॅम, नेदरलँड, बेल्जियम) त्या देशांत असे दिसून आले, की ते देश त्यांच्या पद्धतीने या स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या सुविधांवर लक्ष दिले. काहींनी मास्क, काहींनी पीपीई किटवर अधिक लक्ष केंद्रित केले. आमचे खलाशी लोक स्वत:चा बचाव कोरोना आजारापासून करण्यासाठी खबरदारी घेत होते. स्थानिकांना त्या संबंधात जी पथ्ये होती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची) त्यांची अडचण वाटे. कोरोनामुळे समुद्रात प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी याची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात जहाजात येण्यापूर्वी प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजले जाते. सॅनिटाइझरचा वारंवार वापर करण्याच्या सूचना दिल्या जात. जेथे जेथे जहाजातील व्यक्तींनी बंदर गावांना भेटी दिल्या तेथे तेथे पीपीईकीट वगैरे गोष्टी परिधान करणे आवश्यक होते. मी सेनेगलमधील डाकार येथे तो अनुभव घेतला. तेथील स्थानिकांना खात्री होती, की त्यांच्या देशावर कोरोनाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि तेथील स्थानिक अधिकाऱ्यांसह प्रत्येकाने जहाजात सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरवले गेलेले साहित्य वापरण्यास नकार दिला. त्यामुळे आमचे खलाशी लोक बिथरले. कंपनीने दीर्घकाळासाठी आवश्यक तेवढे अन्नधान्य जहाजावर ठेवलेले असते. मात्र जहाज दुरुस्ती किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे साहित्य लागले तर ते जहाजांना पुरवताना कंपनीस अडचणी येत होत्या. कारण विमानसेवा बंद होती. त्यामुळे जहाजाला जनरल मेंटेनन्ससाठी रंग, ल्युब्रिकेशन ऑईल वगैरे मिळण्यास वेळ लागत होता. ते साहित्य जहाजात रवाना करण्याची प्रोसिजर वाढली.

 

          देशोदेशीच्या लॉकडाऊनचा थेट परिणाम समुद्रात काम करणाऱ्या खलाशांवर झाला. जहाज वाहतूक बंद पडल्यामुळे ते ज्या बंदरात असतील ते त्या त्या बंदरांत अडकून पडले. आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्यामुळे, ज्या खलाशांचे करार संपले होते त्यांना त्यांच्या देशी परत जाणे गरजेचे होते. घरी त्यांचे कुटुंबीयही वाट पाहत होते. परंतु तशा खलाशांची स्थिती अधांतरी झाली. त्यांना काही आशा दिसत नव्हती. त्यामुळे खलाशी थकून गेले. त्यांची ‘सागरा प्राण तळमळला’ अशी व्याकुळ भावना झाली. तरीसुद्धा जे नाविक स्वदेशी परतू शकले त्यांना त्या त्या ठिकाणी क्वारंटाइनमध्ये राहवे लागले. आधीच समुद्रातील एकांतवास त्यात क्वारंटाइनमधील अलगता, यामुळे त्यांची मनःस्थिती हवालदिल झाली. त्यामुळेच पुन्हा त्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या.   
          कोरोना विषाणूचा फैलाव जगभर झाल्यामुळे जगभरातील जहाजांवर काम करणारे भारतीय लोक रोजगार मोठ्या प्रमाणावर गमावत आहेत. चीन, जपान आणि जगभरातील गोद्या दर आठवड्याला डझनभर नवीन जहाजे तरी त्यांच्या समुद्रातून रवाना करतात. परंतु भारत लॉकडाऊनमध्ये आहे, त्यामुळे भारताच्या समुद्रकिनाऱ्यातून वाहतूक होत नाही. त्यामुळेच भारतीय कामगारांनाही आंतरराष्ट्रीय जहाजांवर कामासाठी जाणे शक्य नाही. त्यांच्याऐवजी त्या जहाजांवर चीन आणि फिलिपाईन्ससारख्या देशांतील कामगार वाढले आहेत. जर लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहिली तर भारतीय खलाशी आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांच्या बाहेर फेकले जातील.   
पत्नी शीतल आणि मुलगी ओवीसोबत कॅप्टन कणसे
          कॅप्टन कणसे त्यांच्या घरी पुण्यात 14 मे रोजी पोचले. त्यांना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, की माझे जहाज डकार येथे फॉस्फेरिक अॅसिडचा माल भरून कांडला बंदरात येणार होते. सर्व देशांना मालाची गरज असते. त्यामुळे समुद्रमार्गावरील मालवाहतूकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. फक्त जहाजातील प्रवाशांवर निर्बंध असतात. माझ्या एका मित्राचा चार महिन्यांचा कार्यकाळ संपून आठ महिने झाले तरी तो बोटीवरच आहे! माझे बोटीवरील कामकाज 4 मार्चलाच संपले. त्यावेळी आमचे जहाज युरोपात होते. मी तेथे उतरून विमानाने भारतात परतणार होतो पण विविध देशांत लॉकडाऊन झाले आणि माझे बोटीवरील वास्तव्य वाढले. तरीसुद्धा “मी नशीबवान. माझी बोट गुजरातच्या कांडला बंदरापर्यंत पोचू शकली. तेथे आम्ही तीन दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिलो. तेथे आमची कोविद-19 ची स्वॅब टेस्ट घेतली गेली. ती निगेटिव्ह आल्यावर मला घरी जाण्याचा पास मिळाला. मी स्वतः गाडी चालवत कांडल्याहून पुण्याला परतलो. माझ्याबरोबर असलेल्या माझ्या इतर सहकाऱ्यांनाही कोचीन, पाटणा, जम्मूपर्यंतचा पन्नास पन्नास तासांपर्यंतचा प्रवास रस्त्यानेच करावा लागला. अजूनही जी जहाजे भारतात येत नाहीत त्यातील भारतीय कामगार वेगवेगळ्या बंदरांतच अडकले आहेत.”
सुहास कणसे 9819563156
सुहास कणसे हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहेत. त्यांनी बारावी सायन्स केल्यानंतर बी एस्सी नॉटिकल सायन्स केले. त्यानंतर ते कमिशन्ड रँक घेत 2011 मध्ये कॅप्टनपदापर्यंत पोचले. त्यांना वाचनाची आणि  पर्यटनाची आवड आहे.

———————————————————————————————————————

9 COMMENTS

  1. वेगळ्या क्षेत्रातील लाॅकडाऊन च्या परिणामाची माहिती दिलीत धन्यवाद. सुंदर लेख. सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे

  2. समुद्रावरच्या संकटांची जमिनीवर रहाणार्यांना कल्पनाच नसते ..तुमच्या लिखाणामुळे किती गोष्टींना तोंड द्यावे लागते ते समजले .तुम्ही सुखरुप परत आलात ते वाचून पण छान वाटले ,माहितीबद्दल धन्यवाद . सौ,अंजली आपटे ,

  3. धन्यवाद, तुमच्या ब्लॉग मुळे समुद्री खलाशांची खरी माहिती समोर आली. माझा भाऊ एप्रिल अखेरीस मुदत संपुष्टात येऊन अजूनही शिपवर आहे. नॉर्थ अटलांटिक समुद्रात शिपचा वावर असल्याने घरी लवकर परतण्याची आशा धूसर आहे. अशा वेळी त्यांची मनस्थिती ते स्वतः (merchant navy) व त्यांचे कुटुंबीय जाणोत.

  4. तरंगत्या विश्र्वाची खरी ओळख या लेखामुळे झाली. समुद्री विश्व हे सामान्य माणसाला देखणी वाटतं. पण या लेखामुळे त्यातल्या अडचणी, संकटं हे ही प्रकाशात आलं.हे जीवनही आव्हानात्मक आहे.

  5. तरंगत्या विश्र्वाची खरी ओळख या लेखामुळे झाली. समुद्री विश्व हे सामान्य माणसाला देखणी वाटतं. पण या लेखामुळे त्यातल्या अडचणी, संकटं हे ही प्रकाशात आलं.हे जीवनही आव्हानात्मक आहे.ॲड.स्वाती लेले अलिबाग

  6. छान लेख. कोरोनामुळे कुठेकुठे काय झाले ,होते ही माहिती think maharashtra मुळे कळू शकली . धन्यवाद त्यांचेही.