सत्याग्रही आणि मिडीया एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का?

     अण्णा हजारे अजूनही आपल्या विचार विश्वात व्यापलेले आहेत. उपोषणाच्या घटनेनंतर सत्याग्रहाच्या संकल्पनेवर जी चर्चा घडली, ती पाहून सत्याग्रहाची कल्पना आणि शास्त्र काळानुरूप बदलत गेले पाहीजे, असे वाटते. हे आंदोलन मिडीयाने मॅनेज केले. अशी चर्चा ऐकण्यास मिळाली. जर एखादी व्यक्त्ती एखाद्या प्रश्नासाठी लढत असेल, तर तो लढा आणि विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मिडीयाचा आधार घेणे गैर नाही. गांधींच्या काळातही वर्तमानपत्रे आणि रेडीओ ही माध्‍यमे होती. मग आताच माध्यमांवर एवढा आक्षेप का?

     सध्‍याचा मिडीया हा व्यापक आहे आणि त्याच्याशी आपल्याला जुळवून घ्यावे लागणारच. मिडीयाचासुध्दा सोशल आणि एज्युकेटीव्ह रोल असला पाहिजे. मिडीयामार्फत हजारे आणि विनायक सेन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. या प्रकारे मिडीयाला हिणवण्यापेक्षा सत्याग्रही आणि मिडीया दोघेही एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का?

     अण्णांच्या सत्याग्रहानंतर विविध माध्यमांमधून जी चर्चा झाली त्यात हा सत्याग्रह म्हणजे ‘ब्लॅकमेलिंग’ किंवा नैतिक दहशतवाद’ असा सूर उमटला. तुम्ही ज्या तत्वाचा आग्रह धरला आहे, तो आम्हास मान्य नाही, म्हणून हा दहशतवाद, असे म्हणणे चुकीचे आहे. सत्याग्रहात, सत्य सगळ्यांना मान्य असले पाहिजे आणि त्यासाठीच सत्याचा आग्रह धरावा, हे अभिप्रेत असते, पण याप्रमाणे गोष्टीस दहशत म्हटले जाऊ लागले, तर जगणेच कठीण होऊन जाईल. विशेष म्हणजे या विधानातून महात्मा गांधी हे सुध्दा नैतिक दहशतवादी होते, असा अर्थ ध्वनित होतो.

शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख

दिनांक – 18/04/2011

{jcomments on}