संजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र (Sanjay Nahar)

heading

संजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात राजकारण, अर्थकारण नाही; असलेच, तर समाजकारण आहे. खरे तर, ती एका ध्येयवेड्या मनुष्याची तडफड आहे, माणुसकीची कळकळ आहे. फक्त काश्मीर नव्हे, तर ‘सरहद’ या नावानुसार भारताच्या विविध सीमाप्रांतांमध्ये मानवतेचा तो झरा, संजयच्या रूपाने गेली तीस-बत्तीस वर्षें अखंड वाहत आहे. त्यामुळेच, पंजाबमधील साहित्य अकादमी असो, ईशान्येतील ऑल इंडिया बोडो स्टुडंट्स् युनियन (आबसू) चे प्रमुख नेते प्रमोद बोरो असोत, मणिपूरमधील जीवनसिंग, जेसुसेन यांसारखे कार्यकर्ते असोत, आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्लकुमार महंतो असोत, की काश्मीरचे राज्यपाल, मुख्यमंत्री; एवढेच नव्हे, तर फुटीरतावादी हुर्रियत नेते यासीन मलिक, शब्बीर शाह आणि गिलानी असोत, ते सर्व लोक जर कोणाशी मुक्तपणे आणि आस्थेने बोलत असतील, तर ते फक्त संजय नहार यांच्याशी. 

संजय यांना त्यांच्या पत्नी, सुषमा यांची तोलामोलाची साथ आहे. देशकार्य हाच त्या जोडप्याचा संसार आहे आणि तो मध्यमवर्गीय आहे, कारण त्यांनी कोठलेही सरकारी वा परदेशी अर्थसाहाय्य पहिल्यापासून वर्ज्य ठरवले आहे. ‘सरहद’मध्ये दीडशे काश्मिरी मुले-मुली शिकत आहेत. त्यातील आठ-दहा काश्मिरी मुले तर पुण्यामध्ये त्यांच्या घरी राहतात. ती त्याच घरात लहानाची मोठी झाली आहेत, संजय आणि सुषमा यांचीच मुले असल्याप्रमाणे!

पंजाब दहशतवादाच्या आगीत 1984-85 मध्ये जळत होता, तेव्हा संजय नहार हा एकोणवीस-वीस वर्षे वयाचा तरुण अस्वस्थ होऊन गेला. तो पुण्यामध्ये कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षात शिकत होता. तत्पूर्वी पुण्यात 1980 मध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती, तेव्हा संजय नहार यांचे सार्वजनिक जीवन सुरू झाले होते. नहार व अन्य तरुण यांनी ‘वंदे मातरम’ ही संघटना स्थापन केली. संजय नहार यांचा स्वभावच काहीतरी वेगळे करावे आणि तेही अचाट, अफाट प्रकारे असा आहे. त्यामुळे त्यांनी ‘वंदे मातरम’ची स्थापना केली ती 23 मार्च 1984 रोजी, म्हणजेच शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्यदिनी त्यांनी पंजाबमध्ये जाऊन शांतता आणि जातीय सलोखा यांसाठी काम करायचे हे उद्दिष्ट ठरवले. त्यासाठी त्यांनी थेट जालियनवाला बागेत जाऊन तेथील मातीत देशसेवेची शपथ घेतली, असे सगळे अफाट. 

-shapth-jaliyanwala-bagमग संजय नहार आणि त्यांचे सहकारी यांनी इकडून-तिकडून उसनवारी करून, रेल्वेप्रवासाचे पैसे गोळा केले, वीस-पंचवीस मुले पंजाबला गेली आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे जालियनवाला बागेमध्ये शपथ घेतलीही. तेथे शांततायात्रा काढून झाली. काही लोकांशी चर्चा झाली. एका गावामध्ये देशप्रेम-देशभक्ती यांच्या घोषणा देऊन झाल्यावर एका शीख गृहस्थाने विचारले, ज्या गावामध्ये पिढ्यान् पिढ्या घरटी एक पुरुष सैन्यामध्ये आहे, त्या गावामध्ये देशभक्ती शिकवू पाहत आहात, तुमच्यापैकी कोणाच्या कुटुंबामध्ये किती लोक सैन्यात आहेत किंवा होते? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा संजय नहार यांच्या लक्षात आले, की देशभक्तीबद्दल तावातावाने बोलणे आणि भावनेच्या आहारी जाऊन घोषणा देणे किती पोकळ असते! त्यांना प्रश्नांच्या मुळाशी जायला हवे आणि त्यांच्या कार्यासाठी स्वतः काहीतरी सोसण्याची जोडही हवी, हे कळले.

संजय नहार यांची ती तरुण संघटना 1987 साली पंजाबमध्ये पूर आला तेव्हा बचाव आणि मदतकार्य यांमध्ये सहभागी झाली. त्यांच्यापैकी दत्तात्रय गायकवाड या तरुणाने तर एका शीख कुटुंबाला वाचवताना सर्वोच्च बलिदानही केले! संजय नहार यांना तेथे लोक ओळखू लागले. ते काम सुरू असताना त्यांच्या एक लक्षात आले, की पंजाबात हिंसाचार चरमसीमेवर असताना, पाकिस्तान सीमेपासून जेमतेम अठरा-एकोणीस किलोमीटरच्या अंतरावरील घुमान गावामध्ये एकही गोळी झाडली गेलेली नव्हती! संत नामदेव यांनी त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध जेथे घालवला, त्या घुमान गावाचे महात्म्य नहार यांच्या लक्षात आले. जात-पात-धर्म-भाषा ओलांडून सर्वांना आपलेसे करण्याचे, माणुसकी जागृत करण्याचे नामदेव महाराजांचे कार्य केवढे महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. त्यांना त्यातूनच पुढे 2015 साली 88 वे मराठी साहित्य संमेलन घुमानमध्ये घेण्याची प्रेरणा मिळाली. संजय नहार व त्यांचे सहकारी यांच्याकडे पंजाबमधील या कामाच्या काळात, पैशांअभावी विनातिकिट प्रवास करणे, दोन-दोन दिवस उपाशी राहणे, एकदा पंजाबहून येताना या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणल्याची ‘खबर’ देऊन त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावून दिले जाणे, असे कितीतरी अनुभव जमा झाले. एकदा तर पंजाबहून पंजाबीमध्ये लिहिलेले एक पोस्टकार्ड त्यांच्या नावे आले. त्यात त्यांना जिवे मारण्याची धमकी होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना वर्षभर संरक्षण दिले. नहार यांनी स्वतः ते संरक्षण काढून घेण्याची विनंती केली.

पंजाब 1990 च्या सुमारास शांत झाला, पण त्याच वेळी दहशतवादाने काश्मीरमध्ये डोके वर काढले. दरम्यान, संजय नहार सुषमा यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. त्यांनी पत्नीसह पहिल्यांदा काश्मीरचा दौरा केला. तेथील भयावह वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे कार्य तिकडे सुरू करण्याचे ठरवले. त्यांचे कार्य आणि संसार चालवायचा तर पैसा हवा, त्याकरता त्यांनी व्यवसाय म्हणून छापखाना सुरू केला. दिवाळी अंक काढणे, कॉलेज-कट्टासारखी नियतकालिके चालवणे, अशा गोष्टी सुरू झाल्या. छापखान्यामध्ये कागद कापणे, लेखन-मजकूर जुळवणे, मोठ्या लोकांच्या मुलाखती घेणे, त्यांना लिहिण्याची विनंती करणे आणि छपाईनंतर विक्री-वितरण अशी सगळी कामे संजय नहार, त्यांच्या पत्नी सुषमा, मेहुणा शैलेश आणि काही मित्र करत असत. त्याच वेळी, पंजाब आणि काश्मीर येथील कार्यही चालूच राहिले. त्याच दरम्यान, त्यांनी ‘सरहद’ ही संस्था स्थापन केली. शांततायात्रा पुन्हा सुरू झाल्या. यावेळी ठिकाण होते काश्मीर. काश्मीरमध्ये दहशतीचे सावट सुमारे दहा वर्षें होते आणि शेजारी देशाने त्यात हस्तक्षेप केल्याने ते अधिकच भयावह झाले होते. सर्वसामान्य काश्मिरी माणूस खऱ्याखुऱ्या समस्या, आदर्शवाद, धाकदपटशा, धार्मिक आवाहन अशा विविध कारणांमुळे गोंधळून गेला होता. त्यांनी 1947 सालीच पाकिस्तान नको, भारत हवा हा निर्णय घेतलेला होता. पण पन्नास वर्षांमध्ये सीमेपलीकडील राजकारण आणि देशांतर्गत राजकारण या दोन पात्यांमध्ये भरडत राहून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि रोजगार यांच्या समस्या सुटल्या नव्हत्या. तिकडे जायचे नाही आणि इकडे आशाआकांक्षांना पाठबळ नाही; तिकडे धर्मांधता तर इकडे धर्माचा अडसर; या गोंधळामुळे बहुतांश लोक प्रारब्धाला शरण गेले, तर काही मोजक्या लोकांनी बंदूक उचलली. देशाचे शत्रू त्या परिस्थितीचा फायदा न उठवते तरच नवल. त्यामुळे हिंसाचार आणि अशांतता फोफावत गेली. पिढ्यान् पिढ्या एकत्र, गुण्यागोविंदाने राहिलेल्या हिंदू पंडित समाजाला काश्मीर खोरे सोडावे लागले. आधीच मुस्लिमबहुल असलेल्या काश्मीर खोऱ्याचे जवळजवळ ध्रुवीकरण झाले. काश्मीरमधील वातावरण कायमकरता बिघडून गेले.

-sanjay-nahar-sarhad-childसंजय नहार यांनी तेथील मुलांना त्या वातावरणातून बाहेर काढण्याचे ठरवले. त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी ठेवले तर सुरक्षित वाटेल आणि शांतताही मिळेल या विचाराने त्यांना उत्साह आला. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून पुण्यामध्ये ‘सरहद’ शाळा सुरू केली. पहिल्या तुकडीमध्ये एकशेपाच काश्मिरी मुले-मुली पुण्यात आली. सर्वात लहान मुलगी चार वर्षांची, तर सर्वात मोठा मुलगा दहा वर्षांचा… नहार दांपत्याला स्वतःचे मूल होऊ देण्याइतका वेळ राहिला नव्हता आणि त्यांना तशी गरजही भासली नसावी. जम्मू, काश्मीर, लेह, कारगिल येथील पुण्यात त्यांच्याकडे आलेली सर्व हिंदू, मुस्लिम, बौद्ध मुले त्यांचीच मुले झाली. त्यांतील काही मुले अतिरेक्यांनी मारलेल्या गरीब लोकांची होती, काही लष्करी जवानांची होती, तर काही अतिरेक्यांचीदेखील होती. त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळायला हवी. ‘सरहद’चे काम त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्याचा वाव मिळण्यास हवा या इच्छेने सुरू झाले.

‘सरहद’ शाळेतील शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि मुख्य म्हणजे, संजय व सुषमा नहार यांनी त्यांना हळूहळू समजून घेतले, समजावून सांगितले आणि विश्वास दिला. त्यांना घरच्यासारखे वाटावे म्हणून नहार यांनी एका मौलवींना बोलावून नमाज पढवून घेण्यास सुरुवात केली. थोड्या मोठ्या मुलांना स्थानिक मशिदींमध्ये जाण्याची सोय केली. मुले हळुहळू रुळू लागली. या देशातील हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध, जैन असे सगळे लोक खाणेपिणे, विचार, संस्कृती, कला, वर्तन आणि वृत्ती यांनी भारतीय आहेत याचा अनुभव पुणेकरांना वेळोवेळी येतो. स्वत:ची वैशिष्ट्ये टिकवूनही इतरांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्याची कला, ही भारतीय संस्कृती हाच ‘सरहद’चा पाया आहे.

शाळा स्थापन झाल्याला चौदा वर्षें झाली आहेत. एक-दोन अपवाद वगळता पहिल्या तुकडीतील मुलगे वा मुली मधील काळात ‘सरहद’ सोडून गेले नाहीत. ती मुले वीस-बावीस वर्षांची झाली आहेत आणि फिजिओथेरपी, लॉ, बी ए, बी कॉम अशा विविध पदव्यांचे शिक्षण घेत आहेत. ती मुले काश्मिरी भाषेबरोबर हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांत बोलतात. काश्मीरहून अनेक तरुण-तरुणी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाकरता पुण्यामध्ये येतात. ते काही अडचण आली तर नहार यांच्याकडे येतात आणि नहार त्यांना शक्य ती आणि शक्य तेवढी मदत करतात. काश्मिरी मुलगा दिसला आणि काही छोटी-मोठी समस्या निर्माण झाली, तर स्थानिक पोलिसदेखील प्रथम नहार यांच्याशी चर्चा करतात. पुण्याने त्या मुलांना सामावून घेतले आहे. सुषमा नहार वर्षातून एकदा आवर्जून काश्मीरला त्या मुलांच्या घरी जातात, त्यांच्या कुटुंबीयांना भेटतात. तेव्हा त्या लोकांना सुषमा यांच्यासाठी काय करू आणि काय नाही असे होऊन जाते. कारण ‘सरहद’ आणि नहार दांपत्यामुळेच त्यांची मुले अतिरेकी न बनता किंवा हिंसाचारामध्ये बळी न पडता सुरक्षित आहेत, चांगले शिक्षण घेत आहेत!

‘सरहद’ शाळा असलेल्या कात्रज भागातील चौकाला पुणे-काश्मीर मैत्री चौक असे नाव मिळाले आहे. पुणे मनपा आणि श्रीनगर मनपा यांच्यात मैत्रीकरार झाला आहे. पुण्याचे नगरसेवक आणि पत्रकार काश्मीरला तर काश्मीरमधील विविध नेते पुण्याला वारंवार येत-जात असतात. आजी-माजी लष्करी अधिकारी, केंद्रीय मंत्री, कलावंत, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते ‘सरहद’ला भेटी देतात, नहार यांच्या जगावेगळ्या कार्याचे कौतुक करतात. काश्मीरमध्ये पूर येवो वा भूकंप, महाराष्ट्रातील, पुण्यातील अनेक व्यक्ती आणि संस्था ‘सरहद’मार्फत मदतकार्यामध्ये सहभागी होतात. काश्मीरमधील पत्रकार, नेते, सर्वसामान्य नागरिक अनेक बाबतींत नहार यांचा सल्ला घेतात. त्यांना तेथील राज्यपालांपासून ते फुटिरतावाद्यांपर्यंत कोणाकडेही मुक्त प्रवेश असतो. संजय नहार हेच फक्त गिलानी किंवा यासीन मलिक यांच्यासारख्या लोकांना तोंडावर तुम्ही असे का करता हे विचारण्याचे धाडस करू शकतात. त्यांनी काश्मीरमधील गरीब, विधवा आणि अर्ध-विधवा स्त्रियांना संघटित करून त्यांना प्रशिक्षण देणे आणि शिवणयंत्रे, कच्चा माल अशा सर्व सुविधा पुरवून त्यांच्याकडून पारंपरिक काश्मिरी कलाकुसरीच्या वस्तू तयार करून घेऊन त्यांना रोजगार पुरवणे; तसेच, त्या वस्तू देशभर विकून त्यातील नफादेखील परत त्यांनाच देणे, हा ‘आश’ नावाचा प्रकल्पही सुरू केला आहे.

-apjkalam-nahar-shindeत्याच काळात, संजय नहार यांचे लक्ष ईशान्य भारताकडेदेखील आहे. त्यांनी 1987 साली प्रफुल्लकुमार महंत आणि अन्य आसामी विद्यार्थी नेत्यांना पुण्यात बोलावून लोकांना तेथील प्रश्नांची माहिती दिली होती. मग अनेक वर्षांनी, त्यांनी बोडो प्रश्नावर बोडो विद्यार्थी नेत्यांना पुण्यात बोलावले. संपर्क कायमच होता. अखेर, 2015 साली अठरा बोडो मुलेदेखील पुण्यात येऊन दाखल झाली. पुन्हा एकदा वय वर्षें पाच ते सोळा या वयोगटातील ती मुले. त्यांना बोडोंच्या बोरोव्यतिरिक्त अन्य भाषा माहीत नाहीत. त्यांनी पुण्याला येताना पहिल्यांदा रेल्वे पाहिली; पुण्यात आल्यावर पहिल्यांदा आईस्क्रीम खाल्ले. मग, काश्मिरी मुलामुलींनी त्यांना आपल्या पंखाखाली घेतले आणि त्यांना कामापुरते मराठी, हिंदी आणि इंग्रजी शिकवले. त्यामुळे त्यांना मला भूक लागली आहे, टॉयलेटला जायचे आहे, झोप आली आहे असे सांगता येऊ लागले. म्हणजे बघा, ईशान्य भारतातील मुलांना काश्मीरच्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये बसून मराठी शिकवले, यापेक्षा भारताची एकात्मता आणखी काय असावी? तसेच, मणिपूरचे काही तरुण मुले-मुली उच्च शिक्षणाकरता ‘सरहद’मध्ये येऊन राहिले आहेत.

संजय नहार यांचा हा प्रवास वयाच्या एकोणिसाव्या वर्षीं 1984 साली सुरू झाला. तो आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. पंजाबमध्ये मराठी साहित्य संमेलन, पुण्यामध्ये विश्व पंजाबी संमेलन, घुमानमध्ये देशाच्या विविध भाषांमधील साहित्यिकांचे बहुभाषा संमेलन, पुण्यामध्ये दरवर्षी काश्मीर महोत्सव असे साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकारांचा काश्मीर दौरा, ईशान्य भारतामध्ये सायकलफेरी, कारगिलमध्ये मॅरॅथॉन शर्यत, संत नामदेवांच्या नावाचे घुमानमध्ये पदवी महाविद्यालय अशा अनेक अंगांनी ते बहरत आहे. पंतप्रधान मोदी आल्यापासून त्या पातळीवर ‘सरहद’ची दखल घेतली जात आहे. त्यामुळे हे अलौकिक कार्य देशपातळीवर ज्ञात होत आहे. मात्र त्यात वैयक्तिक आनंद वा अभिमान वाटण्यापेक्षा त्यापासून प्रेरणा घेऊन अशा आणखी ‘सरहद’ संस्था उभ्या राहिल्या तर जास्त आनंद वाटेल असे संजय आणि सुषमा नहार म्हणतात. शाळाही विस्तारत आहे. खर्चाची तोंडमिळवणी करण्याकरता स्थानिक मुलांना प्रवेश देता-देता ती शाळा आसपासच्या परिसरातील, विशेषतः गोरगरिबांची पसंतीची शाळा झाली आहे, कारण इतर शाळांपेक्षा कमी फी, ती भरण्याकरता वाटेल तेवढी मुदत आणि अडचण सांगितली, तर पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत! त्याशिवाय ‘चिनार पब्लिशर्स’च्या माध्यमातून मोठ्या लोकांची चरित्रे, वेगळ्या पण जोडणाऱ्या, देशाशी संबंधित विषयांवरील पुस्तके पदराला खार लावून प्रकाशित करणे, असे नाना उपक्रमही चालू आहेत. त्याचबरोबर टीकाकार, विरोधक यांच्याशी त्यांचा लढासुद्धा आजही सुरूच आहे. त्यांचा कार्यक्रम उधळण्याचे प्रयत्न होत असतात. त्यांना त्यांच्याविरुद्ध प्राप्तिकर खाते, पोलिस खाते, धर्मादाय संस्था खाते, शाळा खाते अशा विविध खात्यांकडे खोट्या तक्रारी करून चौकशांमध्ये गुंतवण्याचे प्रकारही अधून-मधून होत राहतात. पण संजय नहार टिकून आहेत, कारण त्यांची श्रद्धा दुष्टांइतकेच सुष्टही समाजात असतात. किंबहुना ते जास्त असतात अशी आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करणारे अधिकारी चौकशीअंती आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर उलट त्यांच्याबद्दल आदर घेऊनच बाहेर पडतात आणि वर, ‘काही मदत लागली तर सांगा’ असे म्हणतात. अशा अनेक अडचणी नहार यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत.

-annahajare-nahar-yasinसर्वसामान्य लोकांच्या प्रेमाचे आणि आदराचे तर असंख्य अनुभव त्यांच्याकडे आहेत. कोणी त्यांना त्यांची संपूर्ण इस्टेट या कार्याकरता देऊ केली, कोणा सर्वसामान्य कामगाराने भर उन्हात सायकलवर येऊन त्यांना त्यांच्या तुटपुंज्या मिळकतीतील पैसे देऊ केले आहेत. एका सहकारी कार्यकर्त्याच्या आईने मुलांची ती धडपड पाहून स्वतःचे मंगळसूत्र काढून दिले आणि ते विकून त्या कार्याकरता पैसे उभे करण्यास सांगितले. ही गोष्ट विसरू म्हणता विसरणे शक्य नाही.

संजय नहार यांचे एकूण जीवन विलक्षण अशा अनुभवांनी भरलेले आहे. ते अमृता प्रीतम यांना भेटले आहेत, महान क्रांतिकारक आणि भगतसिंह यांच्या सहकारी दुर्गाभाभींना भेटले आहेत, त्यांनी तरुणपणी एका नामचीन गुंडाच्या कानफटात वाजवली आहे, पोलिसांचा मार खाल्ला आहे; तसेच, पोलिस संरक्षणही अनुभवले आहे. आक्रमक हिंदूंचा विरोध सहन केला आहे आणि धर्मवेड्या मुस्लिमांचाही अपप्रचार अनुभवला आहे. काश्मिरात सरकारचा हस्तक तर पुण्या-मुंबईत आयएसआयचा हस्तक असे दोन्ही म्हणवून घेतले आहे. पाकिस्तानला जाऊन तेथील युवकांच्या टाळ्या मिळवल्या आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कौतुक करून घेतले आहे. ते कोठल्याही पक्षाचे नसून सर्व पक्षांचे नेते त्यांना व्यक्तिशः ओळखतात, त्यांचे कौतुक करतात!

नहार यांनी काश्मीरचा फुटिरतावादी नेता शब्बीर शाह याला पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात भाषणाकरता आणून, स्कूटरवर त्यांच्या मागे बसवून फिरवले आहे, तर अण्णा हजारे यांना ते काश्मीरमध्ये घेऊन गेले आहेत आणि एका धोकादायक प्रसंगात सापडल्यावर, त्यांनी अक्षरशः पळत अण्णा यांच्यासह रेल्वे पकडली आहे! मनात आणले तर एक सर्वसामान्य मनुष्यही किती मोठे कार्य करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘सरहद’ आणि त्यातील ती मूर्ती म्हणजे संजय नहार. अचाट आणि अफाट माणूस आहे, संजय नहार!

सरहद/ संजय नहार 9421656666
sanjaynahar15@gmail.com

प्रशांत तळणीकर 9860408167
prashant.talnikar@gmail.com