शेगाव बुद्रुक

5
16
_ShegavBudruk_2.jpg

एकाच नावाची दोन गावं जवळजवळ वसलेली असतात. त्यांना ओळखण्यासाठी मोठा म्हणजेच बुद्रुक व छोटया गावासाठी खुर्द असे गावाच्या नावापुढे लावले जाते.

शेगाव हे शेगाव बुद्रुक या नावाने ओळखले जाते. शेगाव म्हटले की गजानन महाराजांचे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सर्वाना आठवते. शेगाव बुद्रुक हे  गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात वरोरा-चिमूर मार्गावर आहे. ते आधीपासूनच बाजारहाटासाठी प्रसिद्ध आहे. तेथे सोमवारचा आठवडी बाजार भरतो. आजूबाजूच्या चाळीस-पन्नास खेडेगावांतील रहिवासी बाजारासाठी तेथे येतात.

गावात विठ्ठल रखुमाई, हनुमान ही मंदिरे आहेत. गावाचे नाव शेगाव कसे पडले त्याबाबत आख्यायिका अशी की एक स्त्री सती गेली होती. त्यामुळे सतगाव आणि सतगावचा अपभ्रंश होऊन शेगाव झाले आहे. वरोरा या तालुक्यातून गावात एसटी येते.

तालुक्यापासून शेगाव अठरा किलोमीटर अंतरावर आहे. गावातील सर्व विहिरी खा-या पाण्याच्या आहेत. ईरई नदीचे पाणी गावात पुरवले जाते. गावात तलाव आहे.

गावातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे लांब पोळ्या आणि पाणगे. हनुमान जयंतीला पाणगोचा नैवेद्य करतात. गावात दोन हायस्कूल आहेत. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी वरोरा येथे जातात.

गावातील लोक वऱ्हाडी भाषा बोलतात. बैलपोळा हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी मोठा बैलपोळा तेव्हा गोड जेवण केले जाते. दुसऱ्या दिवशी छोटा बैलपोळा, त्या दिवशी तिखट जेवण केले जाते. त्या दिवशी लहान मुले लाकडी बैलांची पूजा करतात. जे गावकरी बैलाला नैवेद्य देतात. त्यावेळी ज्याचा बैल असतो त्याला ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतो. होळीला पुरुष स्त्रियांची वेशभूषा करतात. तीन-चार किलोमीटर परिसरात दादापूर, मेसा, चारगाव, वडधा, चंदनखेडा ही गावे आहेत. गावातील डॉ. माधुरी मानवटकर या सर्जन आहेत. त्यांचा चंद्रपूरला दवाखाना आहे. तसेच सदाशिव पेटकर हे शिक्षण विभागातील सचिव होते. ती गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आहेत.

गावातील वैशिष्टय हे की तेथे दिवाळी लक्ष्मीपूजनाचा सण एक दिवस उशिराने साजरा करतात. याचे कारण शोधूनही सापडत नाही.

गावात एक जुना किल्ला आहे. पण त्याची पडझड झाली आहे. त्याचे मालक नागपुरात राहतात. त्यांचा एक वाडाही आहे. गावातील लोक नाटकवेडे आहेत. एक प्राथमिक शाळा, दोन हायस्कूल, बँका, दवाखाने गावात आहेत. गावात नरड, घोडमारे, कोसूरकर, बचूवार, पद्मावार, वैद्य, फुलकर, लांजेकर, हांडे, खैरे , पेटकर आणि बोंदगुलवार अशा आडनावाचे लोक आहेत.

_ShegavBudruk_1.jpgआनंदवन (बाबा आमटे यांचे) शेगावपासून पंधरा किलोमीटरवर आहे. इंग्रजांच्या विरुद्ध उठाव झाला तेव्हा तुकडोजी महाराजांच्या भजनाने ‘पथ्थर सारे बॉम्ब बँनेगे …लोग बँनेगे सेना’ अशा भजनाने लोक पेटून उठले होते. या उठावात चिमुरचे पोलिस स्टेशन जाळून टाकले गेले होते. त्यामध्ये शेगावातील काही तरुण मंडळी होती. चिमूर गाव शेगावपासून पंचवीस किलोमीटरवर आहे.

निसर्गरम्य रामदेगी व आता संघरामगिरी नावाने गाजत असलेले ठिकाण तेथून जवळच आहे. वनवासात असताना राम-सीता तेथे जंगलात वास्तव्याला होते अशी आख्यायिका आहे. चारगाव धरण व परिसर बघण्यासारखा आहे. बाबासाहेबांनी मूकनायक हे वर्तमानपत्र काढले होते. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 30 जानेवारीला संघरामगिरीला चर्चासत्र आयोजित केले जाते.

तेथून जवळच असलेले भटाळा हे गाव पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तेथे आणि चंदनखेडा येथे बौध्दकालीन अवशेष सापडलेले आहेत. ते गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. खेमजाई व भटाळा सीताफळ व शिंगाळा या फळांसाठी प्रसिद्ध आहेत.

माहिती स्रोत – श्रीकांत पेटकर

– नितेश शिंदे

5 COMMENTS

 1. खुप छान लिहिलय गावाबद्दल…
  खुप छान लिहिलय गावाबद्दल.माझ्या गावाविषयी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद.

 2. लेखन खूप छ।न गावची माहिती…
  लेखन खूप छ।न गावची माहिती लिहिल्याबद्दल धन्यवाद संजय आत्राम 3/8/2018

 3. सुंदर लिखाण,उपलब्ध असलेली…
  सुंदर लिखाण,उपलब्ध असलेली खरी माहिती आपण लिहलेली आहे. असेच आगळे-वेगळे लिहून गावातील माहिती जगाला कळू द्यावे.

 4. खूप छान माहिती. माझ्या…
  खूप छान माहिती. माझ्या गावाबद्दल मला अभिमान आहे. या माहितीमुळे मला आणखी प्रेरणा मिळाली.

 5. खुप छान गावाचं वर्णन केले…
  खुप छान गावाचं वर्णन केले आहे. यशस्वी विद्यार्थी/शेतकरी मुळे गावाचं नाव मोठं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here