शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)

7
25
_shidobache_gav

शिदोबाचे नायगाव पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. ते पुरंदर तालुक्यात आहे. ते सासवड-सुपा रोडवर म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील गाव. गावाचे पाठीराखे आहेत पुरंदर किल्ला आणि मल्हारगड! त्या गावाजवळून कऱ्हा नदी वाहते. गावाची लोकसंख्या  अडीच हजार आणि गावात उंबरठा पाचशे-सहाशे आहे. गावात सिद्धेश्वर मंदिर आहे. ते ग्रामदैवत आहे. त्याच्या उत्तरेला भुलेश्वर मंदिर व दक्षिणेला पांडेश्वर मंदिर आहे.

गावाचे जीवन सिद्धेश्वराभोवतीच गुंतलेले आहे. एरवी, गावात ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत आहे. तेथे जिल्हा बँकेची शाखा आहे. पोस्ट ऑफिसदेखील आहे. गावात इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थ्यांना सासवड या तालुक्याला जावे लागते. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही शिकलेली माणसे नोकरी करतात. तेथे व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यात पोल्ट्री, शेळीपालन, दुधडेअरी, हॉटेल इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. गावातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. गावात दहीहंडी, गणेशोत्सव; तसेच, महापुरुषांचे व गावकऱ्यांचेही वाढदिवस साजरे केले जातात. गावात सिद्धेश्वर मंगल कार्यालय आहे. तेथे आजूबाजूच्या दहा-बारा गावांतील विवाह होत असतात. गाव प्रगतीकडे वाटचाल करत आहे. चार-पाच किलोमीटर अंतरावर पिसर्वे, राजुरी, मावडी, माळशिरस, पांडेश्वर ही गावे आहेत. गावात कौलांची घरे नाहीत; तसेच, कोठेही दुमजली इमारती नाहीत. रहिवासी घरावर टेरेस बांधू शकतो, पत्रे आणि सिंमेटचे बांधकाम करू शकतो. गावात कौलारू घर किंवा दुमजली इमारत बांधली तर ते बांधकाम कोसळते अशी आख्यायिका आहे.

सिद्धेश्वर मंदिर हेमाडपंथी रचनेचे आहे. मंदिराला सोन्याचा लेप केलेला कळस आहे. तेथील मुख्य गाभारा हा जुन्या बांधकामातील असून सभोवतालच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या सभोवताली तुळशीवृंदावन, दत्तमंदिर ओटा, विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आणि इतर मंदिरे आहेत. मंदिराच्या समोर नगारखाना आहे. तेथे नगारा रोज पहाटे चार वाजता व संध्याकाळी सात वाजता वाजवला जातो. ते काम गावचे भराडी करतात. भराडी समाज म्हणजे गोंधळी. त्यांना मान देवापुढे जागरण गीत गाऊन देवाला जागवण्याचा असतो. त्यांची गोंधळ, जोगवा यांवर आधारलेली गाणीही प्रसिद्ध आहेत.

हे ही लेख वाचा – 
तेरचा प्राचीन वारसा
भागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)

_yatra__kathiमंदिराच्या समोर सोळाव्या शतकात बांधलेली बारव आहे. त्यावर शिलालेख कोरलेला आहे. बारवेला पाणी बारा महिने असते. बारवेमध्ये एक देवळी उजव्या बाजूला आहे. त्या देवळीत शिवलिंग आहे. ते शिवलिंग बारवेत सापडले आहे. तेथे नवसाची रांग असते. नवस अन्नदानाच्या रूपात फेडला जातो, त्याला जागरण म्हणतात. गावचा न्हावी घरोघरी भल्या सकाळी जाऊन जागरणाचे आमंत्रण देतो. वर्षातील एखादा महिना वगळला तर तेथे नियमित अन्नदान होत असते. त्यामध्ये भाजी-भाकर, शिरा-भात-आमटी, पोळी-गुळवणी, गुलाबजाम, आमरस, तर कधी पंचपक्वान्न असे जेवण असते. देवाला दंडवत (दंडस्नान) संध्याकाळी सहा वाजता घातले जाते. नवस ज्याच्या नावे केला आहे त्याने लोटांगण घालत देवापर्यंत जायचे असते. त्यानंतर जेवणाच्या पंगती बसतात. जेवण साडेआठ-नऊपर्यंत चालते. त्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता भराडीचा जागर कार्यक्रम असतो. देवाची गाणी गावच्या भराडी मंडळींकडून गायली जातात. तो कार्यक्रम एक-दीड तास चालतो. मंदिरात वर्षाचे बाराही महिने पौर्णिमेला कीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम असतो. 

गावची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. ती तीन दिवस चालते. पहिल्या दिवशी देवाची हळद, मुख्य यात्रा दुसऱ्या दिवशी, हनुमान जयंतीला असते. सकाळी सात वाजता हनुमान जन्म होतो व यात्रेला सुरुवात होते. गावचे वातावरण गजबजलेले असते. इतर गावांचेही यात्रेकरू येतात. मानाच्या काठ्या पेरणे, खानवडी, न्हावरे, सासवड या गावांच्या असतात. पालखी प्रदक्षिणा सकाळी सात वाजता पूर्ण गावाला घातली जाते. लोक खांद्यावर गुळाची ढेप आणि पेढे घेऊन नवस फेडण्यासाठी येतात; देवाचा नवस फेडून झाला, की ते गूळ आणि पेढे प्रसाद म्हणून वाटतात. त्याला शेरणी असे म्हणतात. गावात खेळणी व खाद्यपदार्थ यांच्या दुकानांची गर्दी असते. मानाच्या काठ्यांचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता असतो. छबिन्याचे खेळ रात्री भरवले जातात. विजेत्या गावांना चांदीच्या ढाली व काही देणगी दिली जाते. लोकनाट्य-तमाशाचा कार्यक्रम पहाटे चार वाजता असतो. दुसरा दिवस उजाडतो तो म्हणजे हागाम्याचा. त्या दिवशी गावभर मांसाहारी जेवण केले जाते. (वग) तमाशाचा फड सकाळी नऊ वाजता उभा राहतो. तो दुपारी एकपर्यंत चालतो. कुस्त्यांचा डाव दुसऱ्या दिवशी चार वाजता आखाड्यात रंगतो. लहान मुलांच्या कुस्त्या रेवड्यांवर होतात. त्यानंतर मोठ्या मुलांच्या व शेवटी चाळीस ते पन्नास हजारापर्यंतच्या कुस्त्या होतात. ती सर्व देणगी गावातील लोकांकडून दिली जाते. सोमवती अमावस्येला देवाची पालखी शेजारच्या पांडेश्वर या गावी जाते. तेथे नायगावच्या प्रत्येक घरातील एका माणसाला जावे लागते. तेथे देवाला कर्हात नदीत स्नान घातले जाते

_kusti_fadअखंड हरिनाम सप्ताह त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरात असतो. तो सात दिवस चालतो. दिवसभर भजन-कीर्तन, हरिपाठ चालतो. संध्याकाळी नऊ वाजता कीर्तन असते. वारकऱ्यांसाठी दोन वेळा उत्तम जेवणाची सोय गावकऱ्यांकडून केली जाते. सात दिवसांनंतर कालाष्टमीच्या दिवशी सप्ताहाची सांगता होते. काल्याचा कार्यक्रम सकाळी असतो. संध्याकाळी सात वाजता कालभैरव जन्म होतो. त्यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात उसळते. 

नवरात्रात गावाच्या प्रत्येक कुटुंबातील एका तरी व्यक्तीला नवरातकरी (प्रत्येक घरातील एका व्यक्तीने नऊ दिवस बाहेर राहणे आणि उपवास करणे.) बसावे लागते. त्यांना नऊ दिवस घरात जाणे वर्ज्य असते. शेकडो वर्षांपासून गावी एक प्रथा रूढ आहे. सिद्धेश्वर देवाच्या आंघोळीसाठी पांडेश्वर या गावावरून कऱ्हा नदीचे पाणी दररोज आणावे लागते. पाणी आणण्यासाठी एक चंबू आहे. तो चंबू घेऊन जाणारी व्यक्ती अनवाणी पायी असते. त्यासाठी गावातील घरांचा नंबर क्रमाने येतो.

– अमोल खेसे 86557 27662
 amolkhese91@gmail.com

7 COMMENTS

  1. एकदम छान माहिती…
    एकदम छान माहिती लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन करतो गावाची प्रगती हीच आपली प्रगती.

Comments are closed.