शिकरण

0
82
_Shikaran_1_0.jpg

पु.ल. देशपांडे यांनी ‘माझं खाद्यजीवन’ या लेखात ‘शिकरण’ या पदार्थाबद्दल असे म्हटले आहे, की ‘शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांची बोळवाबोळव’.

पुलंनी असे म्हणण्याचे कारण, स्वयंपाकघरातील करण्याला सर्वात सोपा पदार्थ कोणता असेल, तर तो शिकरण. दुधात केळे कुस्करून साखर घातली, की झाला तो पदार्थ तयार! इतकी साधी त्याची रेसिपी आहे. तो करण्यास सोपा असल्यामुळे अगदी लहान बाहुलीदेखील पाहुण्यांनी भुकेले जाऊ नये यासाठी शिकरण करण्यास जाते. (आणि अर्थात तिचे दोन भाग पाडूनही घेते)

पण खरे म्हणजे दूध आणि केळी घालून केलेली शिकरण हा आहारशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य पदार्थ आहे. केळे आणि दूध हे दोन्ही पदार्थ पौष्टीक आहेत, परंतु केळे आणि दूध एकत्र खाऊ नयेत असे आयुर्वेदात सांगितले आहे. दूध आणि फळे एकत्र खाणे हाच विरुद्ध आहार आहे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. म्हणूनच दूध-साखरेत फळे घालून तयार केलेले फ्रूट सलाड शरीराला बाधक ठरते. ‘शिकरिन्’ या संस्कृत शब्दापासून मराठीत ‘शिकरण’ हा शब्द तयार झाला आहे. शिकरिन् म्हणजे दही-साखरेत फळे मिसळून केलेला पदार्थ. तेथे दूध वापरलेले नाही, हे लक्षात आले असेल आणि त्यावरूनच भारतीय स्वयंपाकशास्त्र आरोग्यशास्त्राच्या नियमांवर आधारलेले आहे हेदेखील ध्यानात आले असेल.

सर्वात गंमत म्हणजे शिकरिन् तयार करण्याची कृती महाभारतातील भीमाने प्रथम शोधून काढली. भीम हा केवळ कुस्ती आणि गदायुद्ध यांत निपुण असा योद्धा नव्हता, तर तो उत्तम स्वयंपाकी म्हणजे कुकही होता. त्यानेच श्रीखंड आणि शिकरण ह्या पदार्थांचा शोध लावला (पाहा – ‘ऐसपैस गप्पा, दुर्गाबाईंशी’, प्रतिभा कानडे). पांडव एक वर्षाच्या अज्ञातवासाच्या काळात जेव्हा विराट नगरीत राहत होते, तेव्हा भीम ‘बल्लव’ या नावाने विराटाकडे राहिला होता. तो पाकशाळेचा मुख्य होता. म्हणून स्वयंपाक्यांना ‘बल्लवाचार्य’ असेही म्हणतात.

‘शिकरण’ हा अगदी स्वस्त आणि साधा पदार्थ असला, तरी शिकरण खाणे ही चैनही असावी. ‘चैनीची परमावधी पुणेरी मराठीत रोज शिकरण आणि मटार उसळ खाण्यातच संपते’ असे पुलंचे ‘तुम्हाला कोण व्हायचंय – मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?’ या लेखातील निरीक्षण आहे.

– उमेश करंबेळकर

(‘राजहंस ग्रंथवेध’ ऑगस्ट अंकावरून उद्धृत)

About Post Author

Previous articleसोनोपंत दांडेकर – ‘मी’ पण लोपलेले व्यक्तिमत्त्व
Next articleअनिल शाळिग्राम आणि सिटिपिडिया
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810