शाहीर आणि पोवाडा

_Powada_4

पोवाडा हा मराठी काव्यप्रकार आहे. त्याला पवाडा असेही म्हणतात. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, चातुर्य, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र म्हणजे पोवाडा. कृ.पां. कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेतील प्र +वद् = स्तुती करणे या धातूपासून पोवाडा शब्द निर्माण झाला आहे असे म्हटले आहे.

स्तवनात्मक कवने इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून हिंदीत किंवा तत्सम भाषेत रचली जात होती. त्यांना रासो असे म्हणत. पृथ्वीराज चौहान याचा भाट चंद बरदाई याचे पृथ्वीराज रासो हे काव्य म्हणजे पृथ्वीराजाचा पोवाडाच आहे. राजस्थानातून काही राजपूत कुळे महाराष्ट्रात आली, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे भाटही आले. त्यांपैकी काही पुढे महाराष्ट्रातच स्थायिक झाले. त्यांनी आपला भाटगिरीचा म्हणजे पोवाडा रचून गाण्याचा पेशा कायम ठेवला. उत्तर पेशवाईत प्रसिद्धीस आलेला सिद्धनाथ ऊर्फ सिदू रावळ शाहीर हा भाटच होता. भूषण नावाचा एक कवी शिवाजीमहाराजांच्याबरोबर काही काळ होता. त्याने शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही रोमहर्षक प्रसंग काव्यात वर्णिले आहेत. तेही पोवाडा या सदरात जमा होतील.

पूर्वीच्या काळी पोवाडे रचणे आणि ते सदरेवर म्हणून दाखवणे हे काम गोंधळी लोकांचे असे. उत्तर पेशवाईत तमाशेवाल्यांचे स्वतंत्र फड निर्माण झाले. फडांतील कवी शाहीर पोवाडे व लावण्या रचत. गोंधळी लोक संबळ तुणतुणे यांच्या साथीवर पोवाडे म्हणत. तर शाहीर डफाच्या साथीवर ते गात.

पोवाड्यांची भाषा व रचना ओबडधोबड असते. त्यांत मुख्यत्वे वीररसाचा आविष्कार असतो. वीर आणि मुत्सदी पुरुषांच्या लढाया, त्यांचे पराक्रम, त्यांची कारस्थाने इत्यादींचे जोरकस शब्दचित्र पोवाड्यात असते. पोवाड्यांमध्ये सामान्यत: राजकीय इतिहासच वर्णिलेला असतो. काही पोवाडे एखादी महत्त्वाची राजकीय घटना घडल्यानंतर लगेच रचले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त होते.

उपलब्ध पोवाड्यांची संख्या सुमारे तीनशे आहे. त्यांपैकी शिवकालीन म्हणजे शिवाजीमहाराजांपासून पहिल्या शाहू महाराजांपर्यंतच्या काळातील सात आहेत, पेशवेकालीन सुमारे दीडशे आहेत. बाकीचे अव्वल इंग्रजीतील आहेत.

अफझलखानवध, तानाजी व बाजी पासलकर हे तीनच पोवाडे खुद्द शिवाजीमंहाराजांच्या स्वराज्यप्रयत्नांवर व त्यांच्या प्रभावळीवर रचले गेले आहेत. अफझलखानवधाचा पोवाडा शाहीर अज्ञानदासाने रचला व तो महाराजांना म्हणून दाखवला. त्याबद्दल महाराजांनी त्याला एक घोडा व शेरभर सोन्याचा तोडा बक्षीस म्हणून दिला असे, त्यानेच पोवाड्याच्या शेवटी म्हटले आहे. या पोवाड्याचा काही भाग असा –

 

राजा विचारी भल्या लोकांला | कैसे जावे भेटायाला ||
बककर कृष्णाजी बोलला | शिवबा सील करा आंगाला ||
भगवंताची सील ज्याला | आंतून बारीक झगा ल्याला ||
मुसेजरीच्या सुरवारा | सरजा बंद सोडून दिला ||
डावे हाती बिचवा त्याला | वाघनख सरज्याच्या पंजाला ||
पटा जिव म्हाल्याप दिला | सरजा बंद सोडून चालिला ||
अबदुल जातका भटारी | तुमने करना दुकानदारी ||
इतकिया उपरी | अबदुल मनीं खवळला पुरा ||
कव मारिली अबदुल्याने | सरजा गवसून धरला सारा ||
चालविली कट्यार | सीलवर मारा न चले जरा ||
सराईत शिवाजी | ज्याने बिचव्याचा मारा केला ||
उजवे हातीं बिचवा त्याला | वाघनख सरज्याच्या पंजाला ||
उदरच फाडूनी | खानाची चरबी आणिली द्वारा ||

त्या कालखंडातील शाहीर मराठे आहेत. त्यांची भाषा तडफदार पण रांगडी आहे. त्यांनी पोवाड्यात ओवीसारखे सुलभ वृत्त वापरले आहे. त्या कालखंडातील संभाजी व राजाराम यांच्या कारकिर्दीसंबंधी पोवाडा उपलब्ध नाही.

दुसरा कालखंड पेशवाईतील पोवाड्यांचा. त्याची सुरुवात पानिपतच्या पोवाड्यांनी व शेवट खडकी, अष्टी येथील लढायांच्या पोवाड्यांनी होतो. त्या कालखंडात ब्राम्हण शाहीरही उदयाला आले. त्यांनी शाहिरी वाङ्मयात पुष्कळ संस्कृत शब्द वापरले आहेत. त्यांच्या पोवाड्याच्या चालीही अवघड आहेत.

पानिपतच्या लढाईवर अनेकांनी पोवाडे रचले आहेत. त्यांपैकी सगनभाऊंचा पोवाडा सर्वांत चांगला आहे. सगनभाऊ शेवटच्या बाजीरावाच्या वेळी हयात होता. तो पुण्यातच राहत असे. त्याच्या पोवाड्याचा काही भाग –

 

 

भाऊ नाना तलवार धरून | गेले गिलचावर चढाई करून || धृ ||
अटोकाट जमले पठाण कुंजपुऱ्यास साठ हजार |
दुहेरी तोफा लाविल्या पुढे कोसाचा मार ||
कुंजपुरा येईना हाती भाऊ जाहले मनीं दिलगीर |
बोलावून पेंढारी मग त्यांनी काढला विचार ||
दिल्ली सोडावी डावी उदेपूर वेढावे चहूंफेर |
होळकराशी केला हुकूम | बाण मग सोटी नागपूरकर ||
आतां फराशीस पुढे गेले गरनाळा भरगोळ्यांचा मार |
पेंढाऱ्यांनी वेठ उठविला तोफखान्यासमोर ||
(चाल) जागोजागा छबिने भाऊचे | राऊत पडले भाऊचे ||
तट पाडिले किल्ल्याचे | फार सैन्य पडले भाऊचे ||
चढले निशाण शिंद्यांचे | पाट वाहती बहु रक्ताचे ||
एक लाख मनुष्य दिल्लीचे | घायाळ पडले जखमाचे ||
बारा हजार पेंढार भाल्याचे | लूट मुभा दिल्लीची ||

तिसरा कालखंड अव्वल इंग्रजीतील पोवाड्यांचा. पेशवाई 1818 साली बुडाली आणि महाराष्ट्रावर इंग्रजांचा अंमल चालू झाला. त्यानंतर जे पोवाडे रचले गेले, त्यांत स्वराज्य गेल्याबद्दलची हळहळ व्यक्त झाली आहे. पण पुढे इंग्रजी अंमल अंगवळणी पडल्यावर, इंग्रजांच्या शिस्तीची लोकांवर छाप पडली. त्यामुळे त्या काळातील काही पोवाडे इंग्रजांच्या स्तुतीने भरलेले दिसतात. पेशवाईच्या काळात पुण्याला महत्त्व होते. ते इंग्रज आल्यावर मुंबईकडे गेले.

पेशवाईतील प्रभाकर आणि परशुराम हे दोन शाहीर इसवी सन 1843 व 1844 पर्यंत हयात होते. पेशवाई नष्ट झाल्यावर त्यांचा आधार तुटला आणि चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना लुंग्यासुंग्या लोकांची खुशामत करावी लागली.

शाहिरांनी त्यांचे बरेच पोवाडे कोणाच्या तरी सांगण्यावरून रचलेले आहेत. अज्ञानदासाने अफझलखानाच्या वधावर जो पोवाडा रचला, तो जिजाबाईच्या सांगण्यावरून. तो पोवाडा 1659 मध्ये लिहिला गेला. अज्ञानदास, तुळशीदास व यमाजी हे शिवाजी व बाजी यांचे आश्रितच होते. अनंत फंदी हा पेशवे दरबारचा भाट होता. खर्ड्याच्या लढाईवरील त्याच्या पोवाड्यात नाना फडणीसांची अवास्तव स्तुती आहे. गंगू हैबती, होनाजी व प्रभाकर या शाहिरांना सवाई माधवराव व दुसरा बाजीराव यांनी वेळोवेळी इनामे दिलेली आहेत. त्याशिवाय इतर सरदारांचाही त्यांना आश्रय होता. त्यांनी त्या सरदारांच्या वाड्यांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने केली आहेत. प्रभाकराने सवाई माधवराव रंग खेळले या विषयावरही पोवाडा रचला आहे!

वि. का. राजवाडे यांच्यासारखे इतिहासशास्त्रज्ञ अस्सल साधनांत बखरींपेक्षा पोवाड्यांना वरचा दर्जा देतात. इसवीसनाच्या बाराव्या-तेराव्या शतकांतील बिंबस्थानच्या केशवदेवाच्या भाटांनी रचलेल्या पोवाड्यांची मीमांसा करताना महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत वि.का. राजवाडे लिहितात –

पोवाडे हे गद्यपद्यात्मक असून, चंपू काव्याच्या सदरात मोडतात. पोवाडा हे केवळ श्राव्य नव्हे, ते दृश्य काव्यही आहे. पोवाडा हे एक प्रकारचे नाटक आहे. त्यात अनेक पात्रे असतात. मुख्य शाहीर व त्याचा साथीदार हे दोघे पोवाड्यातील व्यक्तींच्या सोंगांची बतावणी करतात. मुख्य पात्राची बतावणी मुख्य शाहीर किंवा गोंधळी करतो. त्याशिवाय कथानकाचा धागा शाबूत ठेऊन, कथेचे तात्पर्य तिऱ्हाइतपणे सांगण्याचे नाटकातील सूत्रधाराचे कामही तो गद्यात करतो. वीरश्रीचा अतिरेक झाला, की तो एकदम पद्याच्या वातावरणात उड्डाण मारतो. वीरश्रीच्या आगीने धगधगणारे व रसरसणारे ते पद्य सहजच तुटक असून, कथानकाचा बराच मोठा भाग अध्याहृत ठेवते. तो अध्याहार शाहीर योग्य अभिनयाने व गद्य भाषेने पुरा करून दाखवतो.

एकूण पोवाड्यांपैकी तानाजी मालुसरे आणि सिंहगड, बाजी पासलकर, प्रतापसिंह व शहाजीमहाराज, प्रतापसिंहाची शिकार, शहाजीच्या स्वारीचा थाट, सातारकर छत्रपती व त्यांचे सरदार, सामानगडच्या गडकऱ्यांचे बंड, पानपतवरची लढाई, नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू, थोरल्या माधवराव पेशव्यांची पतिव्रता स्त्री रमाबाई सती गेली तो वृत्तांत, नारायणराव पेशव्यांचा मृत्यू, सवाई माधवरावांचा जन्म, पेशव्यांची बदामी किल्ल्यावर मोहीम, शेवटले बाजीराव पेशवे, खडकीची लढाई, नाना फडणीस, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, अहल्याबाई होळकरीण, मल्हारराव होळकर, फत्तेसिंग गायकवाड, नागपूरकर आप्पासाहेब भोसले, परशुरामभाऊ पटवर्धन असे सुमारे चव्वेचाळीस पोवाडे जास्त प्रसिद्ध आहेत आणि ते तुळशीदास, यमाजी, हरी, सगनभाऊ, राघूजी पाटील, पिराजी, मार्तंडबाजी, मरी पिपाजी, पेमा माळी, प्रभाकर, लहरी मुकुंदा, खंडू संतू, बाळा लक्ष्मण, अनंत फंदी, होनाजी बाळा, रामजोशी, सुलतान, विकनदास, हैबती, गंगू हैबती इत्यादी शाहिरांनी रचलेले आहेत. 1803 व 1804 या सालांत पुणे शहरात व आसपासच्या प्रदेशांत भयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे अन्नधान्याची महागाई झाली होती. त्यावेळचे वर्णन राम जोशी याने त्यांच्या पोवाड्यात केले आहे. त्यातील काही भाग असा –

 

 

हे राहो भाजींत बागवान जोडका |
पैशाचा एकची मुळा एक दोडका |
पैशास मक्याचा कंद एक मोडका |
हा कांदा दो पैशांस एक बोडका |
जळणास रुपायाला एक लहान खोडका |
काळाने देश यापरि केला रोडका |

शाहीर नानिवडेकर, खाडिलकर इत्यादी काही मंडळी आधुनिक काळातील शाहीर मंडळी होत. स्वातंत्र्य-लढ्याच्या काळात या मंडळींच्या पोवाड्यांनी तत्कालिन वातावरणात काही अंशी चैतन्य निर्माण केले यात शंका नाही.

– (भारतीय संस्कृतिकोश, खंड 9 वरून)