शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !

0
105

समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत.

शिक्षण म्हणजे फक्त एका बंदिस्त वर्गात बसून समोरच्याने शिकवलेले धडे गिरवणे नव्हे, तर मुलाने खऱ्या शिक्षणाच्या सहाय्याने समाजातील सर्व घटकांना जाणणे हे अभिप्रेत आहे. त्यामुळे मूल समाजात आत्मविश्वासाने वावरू लागेल. कारागृह किंवा तेथील पोलिस, बंदी व सर्वसाधारण समाज यांच्या मध्ये खरंच फार उंच दगडी भिंती येतात.

आम्ही ‘भाग्यश्री फाउंडेशन’तर्फे कारागृहात विविध उपक्रम घेत असतो. तेथील एक इन्स्पेक्टर एकदा म्हणाले होते, ‘‘आम्ही कारागृहाशी संबंधित नोकरी करतो. त्यामुळे लोक आमच्याकडे ‘जेलवाले’ म्हणून बघतात. आमच्यापासून चार हात लांब राहतात. आम्ही आमच्या नोकरीनिमित्ताने दिवसाचे बारा तास गुन्हेगारांबरोबर वावरत असतो. त्याचा आमच्या मनावर देखील परिणाम होत असतो. त्यातून समाजातून अशा प्रकारची वागणूक मिळते.’’ खरेच की, समाजाचे लक्ष त्या लोकांच्या त्रासाकडे, दुःखाकडे, त्यांच्या होणाऱ्या मानसिक कोंडमाऱ्याकडे कधी गेलेले नाही. वास्तविक तशा वातावरणात देखील तेथील कित्येक कर्मचारी, अधिकारी त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे करत असतात, पण समाज त्यांची दखल घेत नाही.

मला भायखळा येथील आर्थर रोड, कारागृहातील एक घटना सांगाविशी आठवते. मी तेथील महिलांना लिहिण्यास, वाचण्यास शिकवण्याकरता जात असे. त्या महिलांना शिकवून काही दिवस झाले, तेव्हा एक घटना घडली. ती मला उद्बोधक वाटली. मी महिलांना शिकवताना एके दिवशी मला अचानक जाणवले, की त्यांना फक्त वहीवर लिहणे शिकवण्यापेक्षा समोर एक छोटा फळा असेल तर शिकवणे सोपे होईल. मी त्या उत्साहात जेलबाहेर आले. लॉकरमध्ये ठेवलेला फोन काढून मुख्य अधीक्षक इंदूरकर यांना फोन लावला. “सर, मला शिकवण्याकरता एका छोट्या फळ्याची गरज आहे.” सर हळू आवाजात उत्तरले, “मॅडम, मी एका मीटिंगमध्ये आहे.” मी ‘सॉरी’ म्हणून लगेच फोन खाली ठेवला. मी उत्साहाच्या भरात चक्क त्या कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांना एका छोट्या फळ्यासाठी फोन लावला होता. मी तो फळा दुसऱ्या दिवशी येतानाही आणू शकले असते. मी फोन लॉकरमध्ये ठेवून पुन्हा शिकवण्यास आत गेले. काही वेळात, तेथील महिला पोलिस कॉन्स्टेबल एक फळा आणि काही खडू घेऊन आल्या.

तो साधासा प्रसंग मला खूप शिकवून गेला. तो मनुष्य खऱ्या अर्थाने मोठा असतो जो त्याचे कर्तव्य प्रत्येक क्षणी प्रामाणिकपणे करत असतो. समाजात अशा व्यक्तींची गरज आहे. अशा व्यक्तींची संख्या वाढली तर सामाजिक परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही. या गुणांचे महत्त्व मुलांच्या मनात शालेय वयापासून ठसवणे आवश्यक आहे.

इंदूरकर सर स्वतः प्रतिकूल परिस्थितीतून शिकून त्या पदापर्यंत पोचले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कारागृह वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांचे म्हणणे आहे, की कारागृहांना, खरे तर सुधारगृहे असे संबोधण्यात यावे. बंदी हे जन्मापासून गुन्हेगार नसतात. हे खरे आहे, की कित्येकांमध्ये खूप प्रमाणात गुन्हेगारी वृत्ती असते. त्यांना सूट देऊन चालत नाही. विनाकारण दया दाखवून उपयोग नसतो. पण कित्येकांकडून गुन्हा रागाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे घडलेला असतो. त्यांना सुधारण्याची संधी पुन्हा एकदा देणे आवश्यक असते. प्रत्येक कारागृहाचे ध्येय गुन्हेगारात सुधारणा आणि पुर्नवसन हे असणे आवश्यक आहे. कारागृहातील कर्मचारी, अधिकारी यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेव्हा कारागृहातील बंदी त्यांची शिक्षा भोगून समाजात परत जातात तेव्हा समाजाची मानसिकता देखील त्यांना स्वीकारणारी हवी. त्यांनी पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेवर जाऊ नये यासाठी त्यांना विश्वास व सहकार्य या गोष्टींची गरज असते आणि समाजाने त्यांना ती सुधारण्याची संधी द्यावी.

इंदुरकर आवर्जून शालेय शिक्षणाकडे लक्ष वेधतात. ते सांगतात, समाजामध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढू नये याकरता अभ्यासक्रमामध्ये नैतिकतेचे धडे समाविष्ट केले पाहिजेत. शिक्षणाचे उद्दिष्ट फक्त पैसे कमावणे हे न राहता शिक्षणातून चांगला माणूस कसा घडेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसे घडले तर, समाजात गुन्हेगारी मानसिकता वाढणार नाही व समाजातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.

बंद्यांना कारागृहामध्ये विविध कामे शिक्षेनुसार करणे क्रमप्राप्त असते. त्यांनी ती कामे जर व्यवस्थित केली आणि त्यांची वर्तणूक चांगली असेल, तर त्यांच्या शिक्षेमध्ये त्यांना थोडी सूट मिळू शकते. इंदूरकर यांनी कैद्यांनी करण्याच्या कामांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न, त्यांनी जेथे काम केले त्या प्रत्येक कारागृहामध्ये केला आहे. त्यामुळे बंदी त्यांच्या आवडीच्या कामामध्ये व्यस्त राहू शकतात. सुतार, बाग, शेती, लोहार, विणणे, शिवण, बेकरी प्रॉडक्टस् निर्मिती, कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती अशी विविध कामे बंद्यांना त्यांच्या आवडीनुसार दिली जावी यावर त्यांचा कटाक्ष असतो.

इंदूरकर म्हणाले, की अशा कामांमुळे बंद्यांचा तेथील वेळ चांगल्या प्रकारे जातो. ते कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या मनात वाईट विचार येत नाहीत, चिंता कमी होतात. त्यामुळे निराशेने ग्रस्त होऊन आत्महत्या करणे किंवा बंद्यांची आपापसातील भांडणे यांना आळा बसतो. बंद्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. शिवाय, या कामांमुळे त्यांना त्यांच्या क्षमतांची, कलागुणांची जाणीव होते. तसेच, त्यांना शिक्षा संपवून बाहेर गेल्यावर पुन्हा आत्मविश्वासाने व सन्मानाने जगण्याकरता येथे शिकलेल्या गोष्टींची मदत होते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

इंदूरकर यांनी वेगळाच मुद्दा लक्षात आणून दिला. असे कित्येक बंदी आहेत, की ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना तुरुंगातील कामाचे थोडेफार जे पैसे मिळतात ते त्यांच्या घरी दर महिन्याला पाठवतात. त्यांचा उपयोग घरच्यांना घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी होतो. शेवटी बंदी हा सुद्धा एक माणूस आहे हे विसरून चालणार नाही. गुन्हेगार  त्यांनी जो गुन्हा केला त्याची शिक्षा भोगत असतात. काही अट्टल गुन्हेगार सोडले तर इतर बंद्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणे, त्यांना त्यांच्या चुका सुधारून चांगला माणूस म्हणून जगण्याची पुन्हा संधी देणे ही कारागृह प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे.

इंदूरकर पुणे येथील येरवडा कारागृहाचे मुख्य अधीक्षक म्हणून काम करत होते. त्यांची तेथील कामगिरी उत्तम होती. त्यांची बदली अचानक तातडीने कोल्हापूर येथील कारागृहातील काही अवैध प्रकार थांबवण्याकरता मुख्य अधीक्षक म्हणून केली गेली. ती त्यांच्या प्रामाणिकपणाने केलेल्या सेवेची पावतीच होय असे पोलिस अधिकाऱ्यांत मानले जाते.

इंदूरकर यांची नोकरीबाबतची कल्पना ही कामाची नसून कर्तव्याची आहे. ते म्हणतात, की “आम्ही आमची नोकरी फक्त अमुक एका वेळेपुरती करू शकत नाही. आमच्या कामामध्ये आम्हाला पूर्ण एकरूप व्हावे लागते. जबाबदारी एकनिष्ठेने पार पाडावी लागते. आमचा रोजचा संबंध गुन्हेगारी विश्वाशी येत असतो. आमच्यावर समाजकंटकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न काही वेळा केला जातो. गुन्हेगारांमध्ये सतत वावरल्यामुळे मनावर त्याचा ताण येतो.” इंदुरकर त्यांच्या पत्नी विद्या यांच्या सहभागाबद्दल कृतज्ञ आहेत. ते म्हणतात, “माझ्या कामगिरीमध्ये फार मोठा वाटा माझ्या अर्धांगिनीचा आहे. मला इतक्या वर्षांत घरच्या कोठल्याही गोष्टीत काही बघावे लागले नाही. तिने एकटीने दोन्ही मुलांची, नातेवाईकांची सर्व जबाबदारी सांभाळली. जेव्हा घरी ‘सपोर्ट’ मिळतो, तेव्हाच व्यक्तीला तिच्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे झोकून देऊन काम करणे शक्य असते आणि माझ्या पत्नीने तो ‘सपोर्ट’ मला दिला. म्हणून ती माझी अर्धांगिनी खरोखरच आहे.”

येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहासमोर अशोकस्तंभाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.

इंदुरकर त्यांच्या कोल्हापूर कारागृहातील कामगिरीबाबत म्हणाले, “येथे आल्यानंतर येथील काही बंदी, तसेच काही कर्मचारी यांच्याकडून जे गैरप्रकार चालले होते त्यांना आळा घालणे व त्या गैरप्रकारांमुळे येथील कारागृह प्रशासनाची जी बदनामी होत होती ती धुऊन काढणे, अशी दोन आव्हाने माझ्यासमोर होती. मी येथील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले. येथील अवैध प्रकार थांबवण्याकरता मला काही कठोर पावले उचलावी लागली. परंतु त्यामुळे कारागृहातील चुकीच्या गोष्टी थांबवण्यात मला यश आले. स्त्री व पुरुष या दोन्ही बंद्यांच्या वेगवेगळ्या अडचणी बंदिगृहामध्ये असतात. त्याकरता आम्ही विविध संस्थांची (NGO) मदत घेऊन त्यांच्यासाठी काम करतो. त्यामध्ये मुख्यत्वे त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील इकडे लक्ष दिले जाते. आम्हाला त्यांचे मेडिकल चेकअप, त्यांना औषधे पुरवणे, महिला बंद्यांकरता सॅनिटरी नॅपकिन्सची सोय, पुरुष व महिला बंद्यांना शिक्षणाची सोय करून देणे, कॉम्प्युटर कोर्सेस, शिवणकाम, ब्युटीपार्लर, विणकाम अशा प्रकारे विविध कोर्सेस, योगवर्ग, वाचनालय या सर्व गोष्टींकरता विविध संस्थांची मदत घ्यावी लागते.

इंदूरकर यांनी कोल्हापूर कारागृहाबाहेर अशोकस्तंभाची प्रतिकृती उभारली आहे. ते म्हणाले, “अशोकस्तंभ हा प्रेरणादायी आहे. ते भारत देशाचे सन्मानचिन्ह आहे. त्याच्यावरील जे चार सिंह आहेत ते सदैव गतिमान राहण्याचा संदेश देतात. अशोकचक्र जे शौर्य पुरस्कार दिले जातात त्यावर विराजमान असते. अशोकस्तंभ हे वीरतेचे प्रतीक आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य शौर्याने, निर्भयपणे पार पाडा अशी प्रेरणा अशोकस्तंभामधून मिळते.” येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहासमोर अशोकस्तंभाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे ती मला फार आवडली.

तो अशोकस्तंभ कारागृह कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या देणगीतून तसेच बंद्यांच्या श्रमातून उभा राहिला आहे. कोल्हापूर कारागृहामध्ये काही विदेशी बंदी आहेत. ते लाकडावरील कोरीव कामामध्ये, सुतारकामामध्ये तरबेज आहेत. त्यांचीही मदत झाली. या प्रतिकृतीमुळे कारागृहाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल; त्याची समाजात फार आवश्यकता आहे. कारागृह म्हणजे जेथे गुन्हेगार राहतात, तेथे सर्व नकारात्मक वातावरण असते. तेथे चांगल्या मनुष्यांनी जाऊ नये ही सर्वसामान्य लोकांच्या मनात भावना असते. ती या अशोकस्तंभाच्या प्रतिकृतीसारख्या कलाकृतीनी, बंद्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाने बदलण्यास नक्कीच मदत होईल.

शालेय वयापासून मुलांना जर या गोष्टीची जाणीव करून दिली, नैतिकतेचे महत्त्व त्यांच्या मनामध्ये रुजवले तर मला विश्वास वाटतो, की देशातील कारागृहे जवळपास नष्ट होण्यास व सुधारगृहांची संख्या देखील कमी होण्यास मदत होईल !

शिल्पा जितेंद्र खेर  9819752524 khersj@rediffmail.com

संयोजक, शिक्षक व्यासपीठ

———————————————————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here