वैभव गणेश मोडक

  0
  39

  वैभव गणेश मोडक हे मंगळवेढ्यातील प्रगतिशील, संशोधक वृत्तीचे शेतकरी. त्यांची वीस एकरांची जमीन असून ते शेतात ज्वारी, करडई, हरभरा, कापूस, सूर्यफूल अशी पिके घेतात. जमीन कोरडवाहू असल्याने, त्यांनी संशोधक वृत्तीने पिके जास्त कशी येतील याचे विविध प्रयोग केले आहेत. त्यांचे संशोधन म्हणजे ‘मोडक कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर टेक्नॉलॉजी’ म्हणजेच ‘सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान’. ते शेतकऱ्यांना वरदानच ठरले आहे. ती कल्पना त्यांना सुचली ती अशी शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी खटाटोप करावा लागे, दुकानात रांग लावणे, ज्या खतांची शेतातील पिकांना जरुरी आहे ती न मिळणे, बनावट खते पदरात पडणे, आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय खतेही पुरेशा प्रमाणात न मिळणे, खतांच्या पोत्यांची शेतावर वाहतूक करणे इत्यादी.

  शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातच खते तयार करता येतील का? हा प्रश्न घेऊन त्यांनी संशोधन केले. मंगळवेढ्यात कडुनिंबाची झाडे जागोजागी बघावयास मिळतात. त्यांची फळे म्हणजे निंबोणी/लिंबोळी. ती किडनाशक असते. शेळ्या-मेंढ्यांच्या लेंड्या, निंबोळी वा लिंबोळी, गुरांचे शेण, वाया गेलेले अन्न व झाडाखाली  गुरे बांधलेली असतात, तेथील माती असे घटक पाण्यात व गुरांच्या मूत्रात भिजवून चांगले मळून, एकजीव करतात. ओलावा 30-35 टक्के. हवा. मोडक यांनी बनवलेल्या एका दाब यंत्रात हे मिश्रण भरून आत लावलेल्या अनेक अर्धा इंच व्यासाच्या पाइपांतून पाडलेल्या या खताच्या छोट्या गोळ्या उन्हात सुकवतात. एका एकराला दीडशे किलो खताच्या गोळ्या दिल्यास रासायनिक खताचा वीस ते तीस टक्के वापर कमी होतो. पाण्याचीही चाळीस टक्के बचत होते. पैसे तर वाचतातच पण जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमताही वाढते. निरनिराळ्या पिकांसाठी या खताचे ठरावीक डोसही ठरवता येतात. पेरणी यंत्रात या खताच्या गोळ्या ठेवण्याची वेगळी सोय केल्यास बियाण्याच्या बाजूलाच या गोळ्या पडतात. खताची (गोळ्यांची) पाणी धारण करण्याची क्षमता उत्तम असल्याने हळुहळू त्यातील घटक पिकाला मिळतात व पीक जोरदार येते. ज्वारीचे ताट/रोप सात फुटांहून अधिक उंच वाढलेले दिसते व त्याला लागलेली कणसेही भरगच्च दिसून आली.

  मोडक यांना समाजसेवेची आवडही आहे. लग्नसमारंभात जेवणानंतर थर्माकोलच्या डिशेस व पेले इतस्तत: टाकून दिले जातात व गाईगुरे ती खातात व आजारी पडतात. त्यासाठी मोडक यांनी साधा उपाय शोधला आहे. एक सळई खोचलेले स्टँड हा त्यांचा उपाय आहे. त्या सळईत प्रत्येकाने वापरलेली डिश (उरलेले अन्न वेगळ्या डब्यात टोपलीत टाकून) खोचली तर कचरा पसरत नाही. पेल्यांसाठीही तसा छोटा स्टँड बनवला आहे. जमा झालेले थर्माकोल वा प्लॅस्टिक परत वितळवून वा अन्य संस्कार करून वापरल्यास (Re-use) देशाचा फायदाच होणार आहे.

  वैभव मोडक 94209 16858

  -प्रमोद शेंडे  

  About Post Author