वीणा गोखले – देणे समाजाचे

2
30
carasole

वीणा गोखलेआयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना, त्यावर मार्ग शोधत असताना, उपाय करत असताना, अगदी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते! पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे? तिच्यावर काय उपचार करायचे? कसे करायचे? कुठे करायचे? यासाठी वीणा व तिचे यजमान दिलीप हे वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणा-या संस्थांमध्ये जाऊन येत असत. पुण्यातील, पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील ठिकाणी जात असत. संस्था पाहून आल्यावर, त्यांविषयी आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्यांच्या कार्याविषयी सांगत असत. त्यावेळी वीणा व दिलीप यांच्या असे लक्षात आले, की आपल्या मित्रमैत्रिणींना चांगले सामाजिक काम करणा-या अशा संस्थांविषयी काहीच माहीत नाही!

वीणा व दिलीप या दोघांनाही असे वाटले, की चांगले सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांची माहिती लोकांना द्यायला हवी. त्यांचे चांगले काम लोकांपर्यंत पोचवायला हवे. या दांपत्‍याच्‍या मनात, काय केले की आपला हा हेतू साध्य होईल याविषयी विचार चालू असे. अशातच, ते दोघे एक प्रदर्शन पाहायला गेले. प्रदर्शनात अनेक स्टॉल्स असतात. तिथे विविध प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. खरेदी केल्या जातात. आणि अचानक दिलीपना असे वाटले, की प्रदर्शन हे माध्यम चांगले आहे. मग तो विचार पक्का झाला. ही घटना आहे २००५ सालची. सर्व सामाजिक संस्थांचे चांगले काम एका प्रदर्शनातून लोकांच्या समोर मांडावे. अशा प्रदर्शनाचे नाव ‘देणे समाजाचे’ असे असावे.

गोखले दांपत्याकडून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील एक दृश्य‘कल्पना दिलीपची व त्याची अंमलबजावणी माझी’. वीणा माहिती देताना सांगत होती. ती म्हणाली, की २००५ साली म्हणजे पहिल्या वर्षी, जेव्हा प्रदर्शन भरवायचे होते, तेव्हा आम्ही दोघे – मी व दिलीप – आमच्या सोसायटीत, नातेवाईक, मित्रमंडळी, सर्वांशी या प्रदर्शनाविषयी बोललो व प्रत्येक परिवाराने किमान पाच हजार रुपये द्यावेत असे आवाहन केले. ब-यापैकी पैसे जमा झाले. कमी पडत असलेले पस्तीस हजार रुपये आम्ही घातले.

हे प्रदर्शन पितृपंधरवड्यात भरवायचे असे ठरले. वीणा म्हणाली, की एकतर पितृपंधरवड्यात दान करण्याची संकल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पितृपंधरवड्यात हॉल मिळणे सोपे जाते. त्याचे भाडेही, लग्नमुंजीच्या सिझनच्या मानाने, थोडे कमी असते. वीणाने मनोहर मंगल कार्यालयाच्या मालकांविषयी आदराने सांगितले, ते, आम्हाला हॉल देत व अमूक इतके पैसे दे असे चुकूनही सांगत नसत. ही सामाजिक बांधिलकीचीच जाणीव. परंतु मीही योग्य तेवढेच पैसे त्यांना देते.

पितृपंधरवड्यात शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस ‘देणे समाजाचे’ प्रदर्शन असते. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत असते. वीस संस्थांना प्रत्येक वर्षी बोलावले जाते. तिथे प्रोजेक्टरच्या सहाय्याने वा ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने, संस्था कशा प्रकारचे काम करते ही माहिती त्या त्या संस्थेद्वारा दिली जाते. संस्थांना असे आवर्जून सांगितले जाते, की तुम्हाला लोकांकडून कशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे ते तुम्ही हायलाईट करा. कारण प्रत्येक वेळी पैशाचीच मदत हवी असते असे नाही. तर कधी कपडे हवे असतात – कधी भांडी हवी असतात – कधी कार्यकर्ते हवे असतात वगैरे, वगैरे.

प्रदर्शनातील संस्थेची माहिती घेताना यमाजी मालकरआम्ही प्रदर्शनासाठी संस्थांची निवड करताना संपू्र्ण महाराष्ट्रभरच्या संस्थांचे काम पाहतो. ज्या संस्था ग्रास रुट लेव्हलवर काम करतात अशांची आम्ही निवड करतो. प्रदर्शनास अंदाजे तीन ते साडेतीन हजार लोक भेट देतात. मात्र २०१२ला झालेल्‍या कार्यक्रमात सुमारे सहा हजार व्‍यक्‍तींनी या प्रदर्शनास भेट दिली. हा कार्यक्रम सुरू करण्‍यात आल्‍यापासून प्रदर्शनास भेट देणा-या व्‍यक्‍तींचा हा सर्वाधिक आकडा असल्‍याचे वीणा म्‍हणाल्‍या.

एका संस्थेला आपले काम फक्त दोन वर्षेच प्रदर्शनाद्वारे लोकांसमोर मांडता येते. त्यामुळे – मागीलवर्षी येऊन गेलेल्या संस्था एका बाजूला व नव्या संस्था एका बाजूला अशी प्रदर्शनाची मांडणी असते. यंदा २०१२ साली वीस ऐवजी पंचावन्‍न संस्‍थांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्‍यात आले होते. यापैकी सात संस्‍था नवीन होत्‍या.

दुस-या वर्षीपासून – २००६ – प्रायोजक मिळाल्यामुळे, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा असतो. वीणाने २००७ सालचा एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, की उद्घाटन सोहळा संपण्याच्या तीन-चार मिनिटे आधी, एका गृहस्थांनी मला चिठ्ठी पाठवली व मला बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ द्यावा अशी त्यात विनंती केली. वीणा म्हणाली, की त्या गृहस्थांनी सांगितले की मी येथून जात होतो. काय कार्यक्रम आहे म्हणून थांबलो. येथील संस्थाच्या कामाविषयी ऐकून भारावून गेलो. मी एक लाख वीस हजार रुपयांचा हा चेक देत आहे. ती रक्कम सर्व संस्थांनां सारख्या प्रमाणात वाटण्यात यावी अशी माझी इच्छा आहे.

वीणा म्हणाली, मी पाहातच राहिले त्यांच्याकडे! नुकतेच बॅंकेतून रिटायर झालेले ते गृहस्थ, त्यांनी दिलेली अशी उत्स्फूर्त दाद!

प्रदर्शनातील स्टॉलची मांडणीवीणा यांना २००८ साली मोठाच धक्का बसला. ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनापूर्वी, पितृपंधरवड्यातील पहिल्याच दिवशी दिलीप यांना काळाने हिरावून नेले. वीणावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण तरीही, त्याही वर्षी प्रदर्शन नेहमीप्रमाणे भरवले गेले. वीणाच्या मित्रमैत्रिणींनी तिला खंबीरपणे साथ दिली. वीणानेही स्वत:चे वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून, आपले सामाजिक कार्य केले. वीणा म्हणाली, की आता प्रदर्शन पितृपंधरवड्यातच करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कै. दिलीप यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रेरणेने चालू केलेले हे काम करून त्यांना श्रद्धांजली वाहायची. हा कार्यक्रम त्यांनाच समर्पित!

वीणा ही एम.एस.सी. (न्यूट्रिशन) आहे. ती पुण्याच्या चैतन्य हेल्थ क्लबमध्ये डाएट कन्सल्टंट म्हणून काम करते. त्याचप्रमाणे, तिच्या मुलीच्या आजारपणामुळे –स्पेशल चाईल्ड असल्यामुळे, तिला पू्र्वी घरातून बाहेर पडणे अशक्य असायचे. फार कठीण, मानसिक ताणाखाली राहावे लागत असे. पण तिला बोलण्याची, लोकांशी संपर्क ठेवण्याची खूप आवड. त्यांचे डॉक्टर व पती, दिलीप यांच्या प्रोत्साहनामुळे तिने ‘गिरीसागर टूर्स’ची सुरुवात पंधरा वर्षांपूर्वी केली. व ती कोकणात सहली नेऊ लागली. दिलीप हे उत्तम तबलावादक होते. त्यामुळे व तिला स्वत:लाही संगीत आवडत असल्यामुळे ‘गिरीसागर टूर्स – स्वरांबरोबर विहार’ ही संकल्पना राबवली. सहलीत उत्तमोत्तम कलाकारांचे सांगीतिक कार्यक्रमही सुरु केले.

समाजऋण फेडण्याचा हा अनोखा उपक्रम आहे.

 

यंदाचा कार्यक्रम – 23, 24 आणि 25 सप्‍टेंबर 2016
स्‍थळ – हर्षल हॉल, बापट पेट्रोल पंपाजवळ, कर्वेरोड, पुणे
वेळ – सकाळी 10 वाजल्‍यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत

वीणा गोखले,
९८२२०६४१२९
gokhaleveena@yahoo.co.in

– पद्मा क-हाडे

2 COMMENTS

  1. आमच्या विश्व हिंदू परिषद सेवा
    आमच्या विश्व हिंदू परिषद सेवा कार्य प्रकल्प सहभागी करावा

Comments are closed.