विस्मृतीत गेलेला स्वतंत्र पक्ष (Forgotten Political Party Swatantra & Its Founder Masani)

 

स्वतंत्र पक्ष नावाचा एक पक्ष भारतात होता. तो जून 1959 साली स्थापन झाला आणि 1974 साली विसर्जितही झाला. तरी त्याचा प्रभाव जाणवतो, कारण त्या पक्षात तशीच मोठी प्रभावशाली माणसे गुंतली गेली होती. त्या विस्मृतीत गेलेल्या पक्षाची आठवण जागी झाली, ती त्याच पक्षाच्या संस्थापकांपैकी एक, मिनू मसानी यांच्या ‘सोव्हिएट साईडलाईट्सया पुस्तकामुळे. ते पुस्तक गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकनॉमिक्स या संस्थेच्या डिजिटल लायब्ररीत उपलब्ध झाले.
मिनू (मिनोचर) मसानी हे स्वतंत्र पक्षाचे एक मान्यवर पुढारी होते. त्यांचा जन्म 1905 साली झाला. मिनू मसानी यांना ब्याण्णव वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यात त्यांनी अनेक चढउतार बघितले आणि भारताच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे वडील सर रुस्तमजी मसानी हे मुंबई महापालिकेचे कमिशनर आणि मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. मिनू मसानी यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि नंतर ब्रिटनमध्येच कायदा शाखेत झाले. ते मुंबईत वकिली केल्यावर काँग्रेसच्या असहकार चळवळीत सामील झाले. पुढे मुंबई महापालिकेत निवडून आले आणि मुंबईचे महापौरही झाले. ते ब्राझीलमध्ये भारताचे राजदूत 1948-49 या काळात होते. तेथपर्यंतचा त्यांचा प्रवास सुसंगत दिसतो.
मिनू मसानी नेहरूंसोबत चर्चा करताना
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा लौकिक तेथील डाव्या वळणासाठी आहे. तेथून पदवीधर झालेले मसानी पुढे काँग्रेसमध्ये गेले. तो काळ जवाहरलाल नेहरू यांच्या वर्धिष्णू प्रभावाचा आहे. त्यामुळे मसानी हेही डाव्या विचारसरणीकडे झुकले हे स्वाभाविक होते. त्याच प्रभावातून मिनू मसानी यांनी सोव्हिएट संघराज्याला दोन वेळा भेट दिली. 1927 व 1935 या वर्षी . सोव्हिएट साईडलाईट्स हे 1935 च्या प्रवासाचे वृत्त आहे. त्याच पुस्तकात मसानी यांनी 1927 साली सोव्हिएट संघराज्याला भेट दिली होती त्याचा उल्लेख आला आहे. सोव्हिएट साईडलाईट्स या पुस्तकाला पंडित नेहरू यांची प्रस्तावना आहे.
मी पुस्तक डाउनलोड केले ते प्रवासवर्णन असावे या अंदाजाने. ते तसे आहेहीकाही अंशी, पण त्याशिवाय अधिक काही तरी आहे. मसानी यांनी लंडन ते लेनिनग्राड हा प्रवास रशियन बोटीने केला होता. पुस्तकाला सुरुवात होते ती त्या प्रवासाच्या तपशिलांनी. बोटीचे वर्णन, प्रवाशांचे वर्ग – म्हणजे पहिला, दुसरा वगैरे; त्यातील सुखसोयी, बोटीवरील प्रवासी इत्यादी. नंतर त्यांनी मॉस्को, पेट्रोग्राड, बाकू, अर्मेनिया इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. तो त्यांचा प्रवास व ठिकाणे बघणे यांची व्यवस्था Intourist या सोव्हिएट ट्रॅव्हल एजन्सिने केली होती. मात्र, मसानी यांनी त्या प्रवासात केवळ प्रेक्षणीय स्थळे व निसर्गसौंदर्य बघितले नाही तर रशियन क्रांतीनंतरचे तेथील सामान्य लोकांचे जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामागे अर्थात राज्यक्रांतीनंतर तेथील गरीब अशा वर्गाची आर्थिक स्थिती सुधारली आहे का हे बघणे हा प्रधान हेतू होता. त्याबरोबरच साक्षरता वाढली आहे का, विषमता अजून किती आहे, कोर्ट केसेस कशा चालतात – इतकेच काय पण लग्न आणि घटस्फोट कसे व किती होतात, सामायिक शेतीचा प्रयोग, धार्मिक व्यवहार, गुन्हेगारांचे परिवर्तन अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी करून घेतली आणि ती या पुस्तकात सांगितली. त्यामुळेच त्या पुस्तकातील प्रकरणांची शीर्षके वेगळी आहेत.
एका सोव्हिएट बोटीवर, लेनिनग्राड, नवे मॉस्को उभे राहत आहे, मॉस्कोवासी काय खातात, सोविएट न्यायालये आणि वकील, गुन्हेगार होणे किती छान आहे, विवाह आणि फारकत,रोमँटिक बाकू, मी कमीसारला भेटतो, (कमीसार- राजकीय सत्तेतील अधिकारी), अर्मेनियातील सामुदायिक शेती… सारांश, त्या साऱ्या गोष्टी त्यांनी जेमतेम नव्वद पानांत सांगितल्या आहेत. त्यात बरीच आकडेवारी आहे आणि ती सर्व क्रांतीनंतर गोष्टी किती सुधारल्या आहेत हे दाखवणारी आहे. मसानी यांनी भेट दिली तेव्हा रशियन राज्यक्रांतीला अठरा वर्षे झाली होती आणि त्यांची भेट रशियन सरकारच्या ट्रॅव्हल एजन्सीने आखली होती हे लक्षात घेतले, की सामान्य प्रवाशापेक्षा मसानी यांनी वेगळ्या गोष्टी बघितल्या त्याचा उगम समजतो. त्यातील काही विधाने अचंबित करतात.
प्रत्येक आरोपीला मोफत वकील मिळू शकतो. त्यासाठी त्याची पसंती विचारात घेतली जाते. वकिलांच्या फी इतर ( भांडवलशाही ) देशातल्यासारख्या अवास्तवआणि अवाढव्यनसतात. बऱ्याचशा प्रकरणांत पक्षकार स्वतःच बाजू मांडतात. वकील घेत नाहीत. न्यायाधीश हा व्यावसायिक वकील असतो. त्याने कायद्याची पदवी घेणे आवश्यक असते. तो पगारी नोकर असतो. त्याच्याबरोबर दोन assessor असतात. ते जनसामान्यांचे प्रतिनिधी असतात. “‘लग्न आणि फारकत या प्रकरणात ते सांगतात लग्न आणि विवाहविच्छेद, जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी रजिस्ट्रीया कचेरीत होतात. एका विभागात लग्न आणि फारकत, दुसऱ्यात जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी. एका दिवसात सात ते आठ घटस्फोट आणि पंधरा ते पंचवीस लग्ने यांची नोंद होते. घटस्फोट अगदी तातडीने हवाच आहे असे सांगितले तर तो लगेच दिला जातो. एरवी विवाहविच्छेद टाळण्याचा प्रयत्न केला जातो. स्त्रिया घटस्फोट बहुदा नवऱ्यांच्या अतिरिक्त मद्यपानामुळे मागतात. तर पुरुष बायकोचा व्यभिचार हे कारण सांगतात.”
विवाहप्रसंगी तरुण-तरुणी, दोघांचे वय अठरा वर्षे असले पाहिजे असा नियम होता. पुढे, मसानी असेही सांगतात, की त्यांनी टर्किश वूमेन क्लबची संचालिका कादिरबेकोवा हिच्याशी हिंदुस्तानातील शारदा अॅक्ट व त्याच्या निष्प्रभतेबाबत चर्चा केली (Romance in Baku). मात्र येथे ते त्यांच्या पूर्वीच्या माहितीशी विसंगत माहिती (विवाहसमयीचे किमान वय) देतात.
बाकू येथील इस्लामी लोक, त्यांचे मशिदीत जाण्याचे कमी झालेले प्रमाण, बुरखा घालण्याची पद्धत… त्यावरही ते निरीक्षणे नोंदवतात.
सर्व प्रकरणांतून विविध प्रश्नांची तत्कालीन स्थिती ही राज्यक्रांतीपूर्वीच्या स्थितीपेक्षा खूप प्रगतीपथावरील होती असे मसानी आकडेवारीनिशी सांगतात. तरीही संपूर्ण प्रशस्ती ते करत नाहीत, काही मर्यादाही सांगतात.
सारांशया प्रकरणात ते म्हणतात, “जगाच्या पृष्ठभागाचा सहावा हिस्सा व्यापणाऱ्या त्या देशात गेल्या अठरा वर्षांत जे घडले आहे ते एक प्रयोग एवढेच मर्यादित नाही. मानवी वंशाच्या इतिहासात आत्तापर्यंत कधी नव्हता इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते साध्य झाले आहे. अर्थात त्यामुळे सोविएट युनियनमध्ये स्वर्ग आला आहे असे म्हणता येणार नाही. कारण भांडवलशाही जगात संपूर्ण समाजवादी समाजरचना करता येईल का नाही याची शंका आहे. काही लोक म्हणतात, कीरशियात विषमता आहे. रशियाने सरकारी भांडवलशाही स्वीकारली आहे.”विषमता आहे हे मान्य आहे आणि ती तशी नजरेत भरण्यासारखीही आहेत. मात्र जगातील इतर देशांपेक्षा ती कमी आहे . ”  तशीच काही अन्य विधानेही ते करतात.
त्यांना एका समारंभात गॅलरीत ट्रॉटस्कीचे चित्र नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटले . ते म्हणतात ” सर्व चित्रांत ट्रॉटस्की कोठे होता? Red Army चा संस्थापक कोठे होता? मी माझ्या एका बुद्धिजीवी मित्राला विचारले, हा असा क्षुल्लक पद्धतीने सूड घेणे कशासाठी? तो म्हणाला, ट्रॉट्स्की हा क्रांतिकारी विरोधक झाला. क्रांतीबाबत केलेल्या सर्व कामावर त्याने पाणी फिरवले . म्हणून वस्तुनिष्ठपणे तो कधीच अस्तित्वात नव्हता.
मला वाटते, वस्तुनिष्ठपणे तो शब्द इतका विपर्यस्त पद्धतीने कधीच वापरला गेला नव्हता. इतक्या डाव्या वळणाचे मिनू मसानी उजवीकडे वळले ते स्टॅलिनच्या शुद्धिकरणाच्या मोहिमेनंतर. ती बातमीच जगाला उशिरा समजली. त्यांनी टीका 1938 मध्ये केली – जनसामान्यांची एकाधिकारशाही संपली व व्यक्तीची एकाधिकारशाही सुरू झाली. त्यावर काँग्रेस वर्तुळात निषेध झाला. परंतु मसानी उजवीकडे झुकले ते झुकलेच. त्यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि प्रा. रंगा यांच्या बरोबर स्वतंत्र पक्षाची स्थापना 1959 मध्ये केली. स्वतंत्र पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मानही 1967 च्या निवडणुकीनंतर मिळाला. पक्षाला ओहोटी 1971 नंतर लागली आणि तो भारतीय लोक दलात विलीन 1974 मध्ये झाला. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एकदोन गोष्टी नोंदण्यास हव्यात.
पंडित नेहरू यांनीसुद्धा सोव्हिएट संघराज्याला भेट 1927 साली दिली होती. निमित्त रशियान क्रांतीला दहा वर्षे पुरे झाल्याचे. नेहरूंच्या बरोबर त्यांची पत्नी व बहीण (विजयालक्ष्मी?) याही होत्या. त्यांनी त्या दौऱ्यानंतर एक पुस्तकही लिहिले आहे “Soviet Russia – Some Random Sketches and Impressions “ते प्रसिद्ध 1929 साली झाले. तो एक लेखसंग्रह आहे. त्यात त्यांनी काही निरीक्षणे दिली आहेत, ”मॉस्कोमध्ये सोळाशे चर्चेस होती. तेथे जरी धर्माविरुद्ध प्रचार हिरीरीने करणाऱ्या संस्था आहेत, तरी चर्चला जाणाऱ्या लोकांच्या आड कोणी येत नाही. फक्त चर्चच्या दाराशी भिंतीवर लिहून ठेवले होते – धर्म ही लोकांसाठी अफू आहे ते आणखीही सांगतात, की रस्त्यांवर खासगी गाड्या नव्हत्या. त्याशिवाय त्यांनी एक चित्रपट बघितला. ते लिहितात –  ”आम्ही चित्रपट बघितला, The last days of Petrograd हिंदुस्तानात आम्हाला सुंदर आणि कलात्मक चित्रपट बघण्यास मिळत नाहीत. आम्हाला खात्रीपूर्वक बघण्यास मिळतात ते भपकेदार पण मूर्ख आणि निरर्थक असे हॉलिवूडचे चित्रपट. येथे लक्षात घ्यायला हवे, की नेहरू 1927 सालच्या चित्रपटांबद्दल आणि परकीय सत्तेच्या खाली भरडलेल्या लोकांनी बनवलेल्या चित्रपटांबद्दल / न बनू शकणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलत आहेत. तेव्हा तो शेरा पूर्वग्रहामुळे आला असे म्हणण्यास हवे. म्हणजे काही एका मर्यादेपर्यंत मसानी आणि पंडितजी यांच्या लेखनाची प्रेरणा समान दिसते. मसानी यांनी जशी काही निरीक्षणे राज्यक्रांतीच्या मर्यादा दाखवणारी नोंदवली आहेत, तसे एक विधान पंडितजीही करतात – कम्युनिस्ट त्यांचा उपदेश करण्याची एकही संधी चुकवत नाहीत.
पंडितजींच्या पुस्तकाच्या एका प्रकरणात ते म्हणतात – व्यक्तीच्या मनावर उमटलेला ठसा हा चित्रणाचा विश्वासू साथीदार कधीच नसतो.मात्र त्या वैशिष्ट्याचा वावर – म्हणजे वैयक्तिक ठशांचा – त्यांच्याही लिखाणात आहेच. उलट, मसानी यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना ते म्हणतात – अभ्यासकांना बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु सर्वसामान्यांना सोव्हिएट रशियामधील दैनंदिन जीवन पाहून लिहिलेले हलकेफुलके पुस्तक अधिक विचारप्रवृत्त करेल. पंडितजी आणि मसानी दोघांचा अधिक परिचय करून घेण्यास ही दोन्ही पुस्तके प्रवृत्त करून घेतील असे निश्चित वाटते.
रामचंद्र वझे 9820946547
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. मुकुंद वझे यांची शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडलेआणि टिळक ते गांधी मार्गे खाडीलकरही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
——————————————————————————————————–