विसावे साहित्य संमेलन (Twentyth Marathi Literary Meet 1934)

विसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर हे होते. संमेलन बडोदे येथे 1934 साली भरले होते. त्या संमेलनातच कृष्णराव मराठे यांनी अश्लीलतेविरुद्धचा ठराव आणला होता.

चापेकर प्रथम वकिली करत होते, पुढे न्यायाधीश झाले. निवृत्तीपर्यंत त्यांचे कोठलेही लेखन प्रसिद्ध झाले नव्हते. निवृत्तीनंतर मात्र, त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. चापेकर यांनी साहित्य व संस्कृती या क्षेत्रांत लक्षणीय स्वरूपाचे कार्य केले. ते कुशल संघटक होते. त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ‘, ‘मराठी ग्रंथोत्तेजक सभा‘, ‘राजवाडे संशोधन मंडळ‘, ‘धर्मनिर्णय मंडळआदी अनेक संस्थांमधून काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेस उर्जितावस्थेला आणले. त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मुंबईत जिचे संगोपन झाले त्या साहित्य परिषदेला पुण्यात नेले.

त्यांची वृत्ती संशोधकाची होती. त्यांनी अरुणोदय, ग्रंथमाला, विश्ववृत्त, विविधज्ञानविस्तार, लोकशिक्षण, पुरुषार्थ आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिका इत्यादी नियतकालिकांतून लेखन केले. ते मराठीतील ऐतिहासिक विषयावर लेखन करणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित झाले. त्यांनी पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण यांसारख्या विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी लोकमान्य या वृत्तपत्रात गच्चीवरील गप्पा ही लेखमाला लिहिली. त्यांची एकूण चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची आमचा गाव बदलापूर’, ‘एडमंड बर्कचे चरित्र’, ‘चित्पावन’, ‘वैदिक निबंध’, ‘पेशवाईच्या सावलीत’, ‘समाज नियंत्रण’, ‘शिवाजी निबंधावली’ (न. चिं. केळकर व वा.गो. काळे यांच्यासह) ही काही गाजलेली पुस्तके. त्यांनी समीक्षण केलेल्या पुस्तक परीक्षणांचे संकलन साहित्य समीक्षणया ग्रंथात आहे.

          त्यांनी त्यांचा लेखनविषयक दृष्टिकोन असा व्यक्त केलेला आहे : “मराठी ग्रंथरचना करण्याचा उद्देश मनात धरला म्हणजे विषयाध्ययन विशेष काळजीपूर्वक करावे लागते व फुरसतीचा काळ आळशीपणात न घालवता योग्य कामाकडे खर्च होऊन लेखकाची स्वत:ची मन:संस्कृती तयार होते.” 

 

            चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट 1869 रोजी मुंबईमध्ये झाला. चापेकर यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. ते पुण्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये एक वर्ष होते. तेथे त्यांना वा.गो. आपटे, आगरकर, गोखले, गोळे आणि धारप या नामवंत शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. देशाभिमान जागृत होण्यासाठी, बहुश्रुतता येण्यासाठी आणि विचारशक्तीला चालना मिळण्यासाठी तो अल्पकाळ त्यांना पोषक ठरला. त्यांनी हायस्कूलमधील शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले. तेथे त्यांना स्कॉट, प्रा. गार्डनर आणि प्रा. जिनसीवाले हे नामवंत प्राध्यापक लाभले. त्यांनी मुंबईतून 1894 साली कायद्याची पदवी घेतली. त्यांना न्यायखात्यात काम करत असताना मुंबई इलाख्यात अनेक ठिकाणी त्यांना भ्रमंती करावी लागली. ते 1925 साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर ते औंध संस्थानचे मुख्य न्यायाधीश झाले. त्यांनी औंध संस्थानातील न्यायव्यवस्थेत अनेक सुधारणा घडवल्या. ना. गो. चापेकर यांची कार्यकुशल आणि नि:स्पृह न्यायाधीश म्हणून ख्याती होती. ते 1925 साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे कायम वास्तव्यास गेले. ते पुणे विद्यापीठातून पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत. त्यांना संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांनी सूक्ष्मावलोक ही पदवी अर्पण केली. पुणे विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी अर्पण केली.

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की वाङ्मय ही समाजाची नाडी आहे. कोणत्याही समाजाच्या वाङ्मयीन स्वरूपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे ते समजते. ह्या वाङ्मयावरून सरकार, लोक व विद्यापीठ या तिन्ही संस्था परीक्षिल्या जातात. सरकार आणि विद्यापीठ यांच्या सहकार्याच्या अभावी देशी भाषेतील वाङ्मयाला ठेचा खात त्याचे मार्गक्रमण करावे लागत आहे.

ना. गो. चापेकर यांचे निधन 5 मार्च 1968 रोजी बदलापूर येथे झाले. ते साहित्य संमेलनाचे दीर्घायुषी लेखक ठरले. त्यांचे निधन नव्याण्णव्या वर्षी वयाची शंभरी गाठण्यास पाच महिने असताना झाले.

वामन देशपांडे 91676 86695,अर्कचित्र सुरेश लोटलीकर99200 89488

—————————————————————————————————————