वासा कन्सेप्ट – परावलंबनातून स्वावलंबनाकडे!

0
36
_Rajul_Vasa_1.jpg

डॉ. राजुल वासा यांची ‘वासा कन्सेप्ट’ ही अनोखी उपचार पद्धत आहे. ती पॅरेलिसीस, सेरेब्रल पाल्सी, स्पायनल इन्ज्युरी व ब्रेन इन्ज्युरी अशा कारणांमुळे परावलंबी जीवन वाट्याला आलेल्या रूग्णांसाठी वरदान ठरली आहे. ‘वासा उपचार पद्धत’ हे न्यूरोफिजिओथेरपीच्या क्षेत्रातील एकविसाव्या शतकातील महान संशोधन आहे. डॉ. राजुल वासा यांनी पाश्चिमात्य डॉक्टरांना जी गोष्ट गेल्या शंभर वर्षांत जमली नाही ती साध्य करून दाखवली आहे.

त्याचा प्रत्यक्ष प्रयोग नाशिकमध्ये सहज पाहता येतो. तेथे सेरेब्रल पाल्सी किंवा पॅरेलिसिस असलेल्या रूग्णांना त्यांचे नातेवार्इक सातपूर कॉलनीतील ‘संत शिरोमणी नामदेव महाराज हॉल’ ह्मा ठिकाणी दररोज सकाळी साडेनऊ वाजता घेऊन येतात आणि स्वत:च त्यांच्या रूग्णांवर व्यायामाच्या स्वरूपात असलेले उपचार सुरू करतात, तेही कुशल आणि हुशार फिजिओथेरपिस्ट प्रमाणे. तेथे कोणी डॉक्टर दिसत नाही, कोणतीही आधुनिक उपकरणे नाहीत; नंबर लावून बसलेले रूग्ण किंवा त्यांचे नातेवार्इक दिसत नाहीत, नैराश्याने ग्रासलेले चिंताग्रस्त चेहरे दिसत नाहीत… दिसतात ते फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास हे गुण. उपचारांसाठी डॉक्टरांवर अवलंबून न राहता पालकांनीच डॉक्टर होणे हे रुग्णाचे स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल ठरते. पालकत्व म्हणजे काय ते तेथे आल्यावर पाहण्यास मिळते. तेथे उपचार चालतात ते डॉ. राजुल वासा यांच्या मार्गदर्शनानुसार. मात्र वासा यांना तेथे उपस्थित असण्याची गरज नसते. त्यांनी प्रशिक्षित केलेले दोन सहाय्यक तेथे सल्लामसलतीसाठी उपस्थित असतात.

डॉ. राजुल वासा या व्यवसायाने फिजियोथेरपिस्ट आहेत. त्या मुंबईत राहतात. त्या वर्षातील काही महिने उत्तर युरोपातील स्वीडन, फिनलँड, नॉर्वे या देशांत कार्यशाळा घेतात. तेथे त्यांची उपचारपद्धत अधिक रुग्णप्रिय आहे. त्याखेरीज इमेलवरून जगभरचे रुग्णपालक वासा यांचा सल्ला घेत असतातच (office@rvfindia.org).

डॉ. वासा रोग्याला उपचार सुचवण्यापूर्वी रुग्णाचे मेडिकल रिपोर्ट्स आणि चित्रफित अभ्यासतात. गरजेप्रमाणे रूग्णाला त्यांच्या कार्यशाळेत बोलावतात. तेथे रूग्णाने कोणकोणते व्यायाम कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यासाठी डॉ. वासा यांचे प्रशिक्षित प्रशिक्षक रूग्णांच्या नातेवार्इकांना मदत करतात. चार तासांच्या त्या कार्यशाळेत रूग्णाला देण्याच्या संतुलित आहाराबाबतीतही मार्गदर्शन केले जाते आणि शेवटी, रूग्णास शिकवलेले सर्व व्यायाम घरी नियमितपणे करण्यास सांगितले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रूग्णाकडून एक रूपयादेखील शुल्क म्हणून घेतला जात नाही- ना भारतात ना युरोपात! डॉ. वासा यांनी त्यांच्या संशोधनापासून ‘पैशांअभावी कोणीही रूग्ण उपचारांपासून वंचित राहू नये’ या प्रगल्भ भावनेने ती पद्धत अनुसरली आहे.

_Rajul_Vasa_2.jpgनाशिकचे उपचारकेंद्र हे वास्तवात Empowering Centre म्हणून ओळखले जाते. कारण रोग्याला तेथे सक्षम बनवले जाते. तशा प्रकारच्या सेंटर्सना जगभर  Rehabilitation Centres अर्थात पुनर्वसन केंद्रे असे म्हटले जाते, पण डॉ. राजुल वासा यांना पुनर्वसन हा शब्द मान्य नाही. कारण पुनर्वसनाच्या नावाखाली तशा रूग्णांना फक्त व्हिल चेअर्स, ट्रायसिकल्स, स्प्लिंट, कुबडया, काठ्या अशा वस्तूंच्या स्वाधीन केले जाते. तेथे रुग्ण अधिक परावलंबी होतात. बिचाऱ्या रुग्णांनाही ते मान्य करण्यावाचून पर्याय नसतो. आता तर, तो एक मोठा फायदेशीर उद्योग बनला आहे. डॉ. वासा त्या रूग्णांना व्हिल चेअर्स, ट्रायसिकल्स यांमधून बाहेर काढतात; कुबडया-काठ्यांचा आधार न घेता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याइतपत शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम बनवतात, म्हणून ते Empowering Centre! तशा प्रकारचे जगातील पहिले केंद्र आहे. ते  नाशिकला सातपूर कॉलनीत नगरसेवक सलिम शेख यांच्या सहकार्याने 15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू झाले. ते सेंटर जगभरातील डॉक्टर्स आणि रूग्ण यांच्यासाठी आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरले आहे. फिनलॅण्ड व स्वीडन येथून सहा डॉक्टरांचे एक पथक सात दिवसांचा अभ्यासदौरा करण्यासाठी जानेवारी 2017 मध्ये तेथे आले होते. त्यांच्या बरोबर सात स्ट्रोक पेशंटसदेखील होते. डॉ. वासा यांनी त्यांच्यासाठी चार दिवसांची कार्यशाळा नाशिक येथे घेतली होती. त्यानंतर आणखी दोन डॉक्टर्स एक महिन्यासाठी नाशिकला मार्च 2018 मध्ये येऊन गेले. इतकेच नव्हे तर फिनलॅण्ड, स्वीडन, स्वित्झर्लंड, रशिया, युक्रेन या पाश्चात्त्य देशांमधून पॅरेलिसिस आणि सेरेब्रल पाल्सीचे रूग्ण नाशिक सेंटरवर उपचार घेण्यासाठी येत असतात. ते सगळे बघितले की जाणवते, West is looking towards East!

डॉ. राजुल वासा या अप्लाइड मोटर कंट्रोल सायंटिस्ट म्हणून मान्यताप्राप्त उपचारतज्ज्ञ आहेत.त्यांनी मुंबर्इ विद्यापीठाच्या जी एस मेडिकल कॉलेजमधून फिजिकल थेरपिस्ट झाल्यानंतर स्वीत्झर्लंडमधील व्हॅलेन्सच्या रिहॅबिलिटेशन क्लिनिक येथील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी स्वीत्झर्लंडमध्येच पदव्युत्तर संशोधन केले. डॉ. राजुल वासा म्हणतात, की पक्षाघात आणि रूग्णाचे पुनर्वसन हे असे क्षेत्र आहे, की त्यात निदान आणि प्राथमिक उपचार यांत आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यांनी बरीच प्रगती केलेली आहे. तरीही नंतरचे उपचार मात्र अजूनही अंधारात आहेत. जी पुनर्वसन पद्धत वापरली जाते तिच्यात अनेक त्रुटी आहेत. अवयवांच्या अनियंत्रित हालचाली आणि स्नायूंतील टणकपणा हे तशा रूग्णांवरील उपचारात एक आव्हान असते व जगभर त्या संबंधात हतबलता आहे.

डॉ. राजुल वासा म्हणतात, की “पारंपरिक उपचार पद्धतीत आजाराच्या मुळावर उपचार होत नाहीत. त्यामुळे भरमसाठ पैसा खर्च करूनसुद्धा रूग्णांच्या वाट्याला येते ते फक्त अपंगत्व आणि परावलंबन.” डॉ. राजुल वासा यांनी मानवनिर्मित उपकरणांऐवजी मेंदू व शरीर ह्मा निसर्गदत्त मानवी ‘हाय टेक’ उपकरणांचा वापर करून पक्षाघाताने गेलेले शारीरिक नियंत्रण पूर्णपणे परत मिळवण्यासाठी उपचार पद्धत विकसित केली. तिला स्वीडिश लोकांनी नाव दिले आहे ‘वासा कन्सेप्ट’. डॉ. वासा सांगतात, “पक्षाघाताने शरीराच्या नियंत्रण गेलेल्या बाजूचा गुरुत्वमध्य साधण्यात येणारी मर्यादा दूर करण्यासाठी ‘वासा कन्सेप्ट’ ही अनोखी व अत्यावश्यक उपचार पद्धत आहे.” कोठल्याही प्रकारची औषधे न देता, कोणतीही उपकरणे न वापरता दिसण्यास साध्या वाटत असलेल्या व्यायामप्रकारांमधून देशविदेशातील हजारो पेशंट्स स्वावलंबी बनून सन्मानाचे जीवन जगत आहेत.

_Rajul_Vasa_3.jpgसेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा जीवन सुरू होण्यापूर्वीच नियतीने केलेला आघात असतो. विकसनशील अवस्थेत असलेल्या मेंदूच्या काही पेशी काही कारणास्तव मृत पावल्यामुळे मेंदूचे अवयवांवर नियंत्रण राहत नाही. बाळ विशिष्ट वयात आल्यानंतर त्याचा मेंदू आणि गुरूत्वाकर्षण बल यांचा संबंध प्रस्थापित होऊन बाळ जो गुरूत्वमध्य साधते ते तशा मुलांमध्ये घडत नाही. परिणामी बाळ मान धरत नाही, बसू शकत नाही, उभे राहणे तर खूप दूर! तेवढेच नव्हे, तर बाळाचे नियंत्रण डोळ्यांच्या हालचालींवर आणि तोंडातील लाळेवरदेखील राहत नाही. जे बाळ पहिल्या वाढदिवसाला चालण्यास हवे ते बसूसुद्धा शकत नाही. बाळाच्या त्या अवस्थेला ‘सेरेब्रल पाल्सी’ असे म्हणतात हे समजते, तोपर्यंत पालकांचे काही वर्षे व काही लाख रुपये खर्च झालेले असतात! आणि सुरू असतो एक न संपणारा प्रवास – एका डॉक्टरकडून दुसऱ्याकडे, या तज्ज्ञाकडून त्या तज्ज्ञाकडे! आर्इवडील त्यांच्या अपंग बाळाला त्यांना परवडत नसतानाही वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने बाळावर बोटॉक्स, स्टेमसेल सर्जरी यांसारखे महागडे उपचार करतात, परंतु पदरी काहीही पडत नाही.

असे निराश झालेले आईवडील त्यांच्या बाळाला घेऊन मोठ्या आशेने डॉ. वासा यांच्याकडे येतात. डॉ. राजुल वासा त्यांच्याकडून एकही रुपया घेत नाहीत हाच त्यांच्यासाठी मोठा दिलासा असतो. शिवाय, त्याच वेळी त्यांना एक विश्वास वाटतो, की तेथे ते फसवले किंवा लुटले जाणार नाहीत! डॉ. वासा त्यांना निराशेच्या गर्तेतून अलगदपणे बाहेर काढतात आणि सक्षमीकरणाच्या वाटेवर आणून सोडतात. त्या त्यांना एक विश्वास देतात, की तुमच्या बाळावर उपचार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही समर्थ आहात, फक्त योग्य प्रकारे मेहनत करण्याची गरज आहे.

बाळाचे आईवडील स्वत: बाळासाठी डॉ. वासा यांनी सांगितलेले व शिकवलेले व्यायाम त्याच्याकडून करवून घेतात. त्यातून तीन गोष्टी घडतात – एक म्हणजे त्यांना बाळाच्या उपचारांसाठी डॉक्टरवर अवलंबून राहवे लागत नाही. डॉक्टरकडे जाण्यायेण्याचा वेळ व त्यावर होणारा खर्च वाचतो. दुसरे म्हणजे बाळ आर्इवडिलांबरोबर सुरक्षित भावनेने सुखरूप राहते. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्इवडील आणि बाळ यांच्यातील नाते दृढ होते आणि त्या तिन्हींचा एकत्रित परिणाम थक्क करणारा असतो. ज्या गोष्टी बाळाच्या बाबतीत पाच-पाच, दहा-दहा वर्षे घडल्या नाहीत, त्या पाच-पाच, दहा-दहा दिवसांत पाहण्यास मिळतात. जी आई बाळाला चार वर्षे नळीने भरवत असे ती तिच्या बाळाला एकाच आठवड्यात चमच्याने खाऊ घालू लागते. औषध दिले तरच शौच अशी सतत आठ वर्षे सवय झालेला मुलगा तीन आठवड्यांच्या व्यायामानंतर व सुयोग्य आहारामुळे दररोज नियमितपणे शौचास जाऊ लागतो. अकरा वर्षांच्या फिजिओथेरपीनंतर वयाच्या तेराव्या वर्षी गुढघ्यावर उभा राहण्यास असमर्थ असलेला आलोक दोन आठवड्यांत गुढघ्यावर उभा राहू लागतो व पुढील तीन आठवड्यांत गुढघ्यावर चालू लागतो. आधाराशिवाय उभा राहू न शकणारा तेवीस वर्षीय साहिल तीन वर्षांत आधाराशिवाय चालू लागतो; एवढेच नव्हे, तर यथाकाल तो नोकरी करून स्वावलंबी जीवन जगू लागतो. ह्मा आणि अशा शेकडो मुलांना डॉ. राजुल वासा यांनी स्वावलंबी बनवून जणू पुनर्जन्मच दिला आहे!

आयुष्य माणसाला कधी कोठल्या वळणावर आणून उभे करील याचा भरवसा नाही. सर्वकाही व्यवस्थित चाललेले असताना दुर्दैव दार ठोठावते. एकाद्या शारीरिक किंवा मनोकायिक कारणामुळे अथवा एखाद्या अपघातामुळे मेंदूला इजा पोचून मेंदूचे अवयवांवरील नियंत्रण सुटते. पक्षाघात किंवा अपघात झालेल्या अशा व्यक्तीच्या वाट्याला मग येते ते नको असलेले परावलंबन. माणूस स्वत:च्या शरीराचा कैदी बनतो. पक्षाघाताचा (Paralysis) झटका येऊन गेल्यानंतर जे प्राथमिक उपचार केले जातात त्यात आधुनिक वैद्यक शास्त्राने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे, पण त्यानंतरच्या भौतिकोपचारात म्हणजेच फिजिओथेरपीमध्ये मात्र तशा रूग्णांसाठी मागील शंभर वर्षांत विशेष काही प्रगती झालेली नाही. 1919 साली अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन आणि त्यानंतर त्र्याण्णव वर्षांनी म्हणजेच 2012 साली सिनेटर मार्क कर्क या दोघांनाही पॅरेलिसीसनंतर काठीच्या आधाराशिवाय उभे राहणे अशक्य होते; म्हणजे शंभर वर्षांच्या कालावधीनंतर परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

_Rajul_Vasa_4.jpgउपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत असलेल्या विकसित देशांतील ‘स्ट्रोक पेशंट’ आणि विकसनशील देशांतील ‘स्ट्रोक पेशंट’ यांना सतावणारा प्रश्न सारखाच आहे. आणि तो म्हणजे “मी पूर्वीसारखा कधी चालू शकेन आणि मला माझ्या हाताचा वापर कधी करता येईल?” तो अजूनही अनुत्तरीत आहे. संपूर्ण जगातील स्ट्रोक पेशंट्स आजही त्यांच्या नियंत्रण गमावलेल्या अवयवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत आहेत. डॉ. राजुल वासा यांनी त्यावर उपाय शोधण्याचा दृढनिश्चय करून चाकोरीपलीकडे जाऊन विचार केला. त्यांनी सहा महिने ते दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पक्षाघाताने ग्रस्त असलेल्या व त्यातून बाहेर येण्याची तीव्र इच्छा असलेल्या रूग्णांच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग निवडला. डॉ. राजुल वासा त्यांच्या या रोगोपचाराच्या कार्यापलीकडे आणखी एक महत्त्वाचे काम करत आहेत. शिक्षणापासून वंचित असलेल्या तरुणांना त्या रोजगार उपलब्ध करून देत आहेत. त्या तरुणांना स्ट्रोक आणि सेरेब्रल पाल्सी पेशंटसबरोबर काम करण्याचे प्रशिक्षण देतात. असे प्रशिक्षित तरूण डॉ. राजुल वासा यांच्या सक्षमीकरणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका तर बजावतातच; शिवाय, स्वत:सुद्धा सन्मानाचे जीवन जगतात. नाशिकचा योगेश चौधरी आणि ओरिसाचा सुनील जाली हे असेच प्रशिक्षित तरुण 2017 मध्ये फिनलँडला जाऊन आले. तेथे त्यांनी डॉ. वासा यांच्या मार्गदर्शनाने मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून पेशंट्सवर ‘वासा कन्सेप्ट’नुसार उपचार केले.

‘राजुल वासा फाउंडेशन’ची स्थापना Motor Control Disorder ने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्यासाठी 2006 मध्ये करण्यात आली. त्यांचा मनोदय नाशिक आणि पुण्याप्रमाणे संपूर्ण भारतात अशा Empowering Centres ची उभारणी करण्याचा आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यात अठरा ते बावीस वयोगटांतील शिक्षणापासून वंचित असलेले पण तंदुरूस्त व सक्षम तरूण त्यांना मदत करून स्वत:चे भवितव्य उज्ज्वल करून घेऊ शकतात. ज्यांना डॉ. राजुल वासा यांच्या कार्यात सहभागी व्हावे असे वाटत असेल त्यांनी पुढील इमेल आयडीवर संपर्क करावा.

office@rvfindia.org

डॉ. वासा यांनी भारतात व भारताबाहेर अनेक कार्यशाळा घेतल्या आणि घेत आहेत. त्यांनी स्वीडनमध्ये उप्पसाला, स्टॉकहोम, ओरेब्रो, गोथेन्वर्ग, सॅत्राब्रून्न व लूंड या ठिकाणी 1995 ते 2002 या काळात, फ्रान्समध्ये नान्सी येथे 2004 ते 2007, फिनलॅण्डमधील अॅलंड आयलँड येथे 2016 मध्ये तर फिनलॅण्डमधीलच सॅव्होन्लीन्न व तुर्कू येथे जुलै-ऑगस्ट 2015 व 2016 मध्ये आणि नाशिक येथे जानेवारी 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेतलेल्या आहेत.

डॉ. वासा यांनी 2004 मध्ये फ्रान्सला ‘GAMEA Congress’ मध्ये New pathophysiologic hypothesis of the motor disorder displayed by cerebral palsy children : Interest for rehabilitation या विषयावर व्याख्याने दिलेली आहेत.

डॉ. वासा यांना 2012 आणि 2013 मध्ये संशोधन सहकार्यासाठी मॅकगिल विद्यापीठ (कॅनडा) व स्वीडनमधील स्ट्रोक सेंटर (उमाव विद्यापीठ) येथून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सेरेब्रल पाल्सी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद व्लेड स्लेव्हेनिया येथे घेतली होती. त्यांना 1991 मध्ये टोकियो (जपान) येथे ‘आठव्या आशियाई व ओशियन काँग्रेस ऑफ युरॉलॉजी’मध्ये ‘मेंदूबाधित रुग्णांवरील नवी उपचारपद्धत’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्या टोकियो येथेच भरलेल्या ‘सोळाव्या जागतिक पुनर्वसन परिषदे’मध्ये निमंत्रित म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन डी सी येथे आंतरराष्ट्रीय स्ट्रोक सोसायटीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ‘मेंदूबाधित रुग्णांचे पुनर्वसन – नवा विचार!’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले होते. त्यांना जर्मनीमध्ये बर्लिन येथे ‘स्ट्रोक रिहॅबिलिटेशन’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेस निमंत्रित करण्यात आले. तेथे त्यांनी ‘स्ट्रोक रिहॅबिलिटेशन इन इंडिया’ ह्मा विषयावर प्रबंध सादर केला.

राजुल वासा यांचे ‘वासा कन्सेप्ट’वरील लेख आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा ‘न्यूरोप्लास्टीसिटी इन अॅक्शन पोस्ट स्ट्रोक’ या विषयावरील लेख 20 जुलै 2015 च्या ‘युरोपियन जर्नल ऑफ फिजिओथेरपी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता व बराच गाजला.

About Post Author