वाडवळ समाज व संस्कृती

8
93
carasole

सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे वाडवळ शब्दाची उपपत्ती ‘वाडवडील’ या शब्दातून शोधू पाहतात. ‘वाड’ म्हणजे मोठे-महान-कीर्तिवंत आणि ‘वडील’ म्हणजे पूर्वज. म्हणजे वाडवळांचे पूर्वज महान कीर्तिवंत असले पाहिजेत.

संक्षिप्त इतिहास

‘महिकावतीची बखर’ (लेखक – केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’(लेखक रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक रा.ब. पु. बा. जोशी), ‘ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (लेखक डॉ.. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.

या ग्रंथातील माहितीनुसार इसवी सन 1138 मध्ये सोळंकी घराण्यातील चौलुक्यवंशी राजा प्रतापबिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करून उत्तरेकडील दीवदमणपासून दक्षिणेकडील वाळकेश्वरपर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. प्रतापबिंब सूर्यवंशी राजा होता व बाळकृष्ण सोमवंशी हा त्याचा प्रधान अमात्य होता. सूर्यवंशी व सोमवंशी ही दोन राजघराणी असून त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत असे. प्रतापबिंबाच्या वंशजांनी सुमारे एकशेएक वर्षे राज्य केले. त्यानंतर सुमारे दीडशे वर्षांनी देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा एक पुत्र राजा भिमदेव ऊर्फ बिंबदेव यादव याने 1296 च्या सुमारास उत्तर कोकणचा मुलुख त्याच्या अधिपत्याखाली घेतला. बिंबदेव यादव हा सोमवंशी राजा होता. त्या दोन्ही राजांनी त्यांच्याबरोबर जी कुळे आणली त्यात सोमवंशीयांची संख्या सर्वात जास्त (सत्तावीस कुळे) होती. सोमवंशी क्षत्रिय कुळातील अनेकांनी तलवारबाजीबरोबरीने अधिकारपदेही गाजवली. काही क्षत्रियांनी रयत बनून राहणे पसंत केले. त्यांनी स्त्रियांच्या मदतीने शेती-बागायती केली. वस्ती समुद्रकिनारी असल्यामुळे त्या राजांनी आरमाराकडे खास लक्ष दिले. त्यांनी जहाजबांधणींच्या कामाला प्रोत्साहन दिले, तेव्हा अनेकांनी सुतारकी आत्मसात केली. ब-याच लोकांची उपजीविका शेती-बागायतीवर अवलंबून आहे. मात्र त्यांचा सुतारकीकडील अलिकडे ओढा कमी झालेला दिसून येतो.

सोमवंशी क्षत्रियांची क्षात्रवृत्ती लोप पावलेली नाही. पोर्तुगीजांविरुद्ध तसेच इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यचळवळीत अनेक वाडवळांनी त्यांचे कर्तव्य बजावण्यात पुढाकार घेतलेला आहे. स्वातंत्र्यासाठी तुरूंगवासही आनंदाने स्वीकारला. लेफ्टनंट कर्नल प्रताप सावे, कर्नल सदाशिव वर्तक यांनी 1965 व 1971 च्या युद्धात कामगिरी बजावली. लेफ्टनंट कर्नल संग्राम वर्तक, कॅप्टन समीर राऊत, कमांडर अनिल सावे यांसारखे वाडवळ तरुण सैन्यात कार्यरत आहेत.

वाडवळांची वस्ती असलेल्या केळवे, तारापूर, चिंचणी, आगाशी, विरार, दातिवरे या सर्व गावांचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत त्याच नावांनी येतो. त्याचा अर्थ ती गावे तशीच हजार वर्षांपूर्वीपासून आहेत. बखरीत सोमवंशी क्षत्रियांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यात वर्णन केलेल्या सावे, चौधरी, वर्तक, म्हात्रे, चुरी, राऊत इत्यादी उपनामांनी ओळखली जाणारी क्षत्रिय कुळे त्या परिसरात वस्ती करून आहेत. प्रतापबिंबाने राजधानी म्हणून केळवे माहीम या ठिकाणाची निवड केली. त्या परिसरातील महिकावती देवीवरून त्याने त्याच्या राज्याला ‘महिकावतीचे राज्य’ असे नाव दिले. त्याची त्या परिसरावरील हुकूमत संपुष्टात आल्यामुळे त्याला मुंबई बेटात अडकून पडावे लागले, तेव्हा तेथे नवीन परिसर वसवताना त्याने केळवे-माहीम परिसरातील गावांची व आळ्यांची नावे नव्या भागांसाठी योजली. केळव्याला शितळादेवीचे मंदिर आहे, तसेच मंदिर त्याने मुंबई-माहीम परिसरात बांधून घेतले.

सोमवंशी क्षत्रिय कुळे उत्तर कोकणात येण्यापूर्वीपासून त्यांची संस्कृती प्रगत होती. त्या कुळांची स्वतंत्र गोत्रे, प्रवर यासह बखरीत माहिती येते. त्यांच्या कुलदेवता आहेत. ते देवतांची विधिवत पूजाअर्चा करत असत. पौरोहित्य करण्यासाठी माध्यंदिन शुक्ल यजुर्वेदी वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मणांना ते त्यांच्याबरोबर घेऊन आले. मुलांच्या जन्मापासून बारसे, मुंज, लग्नसोहळा अथवा मृत्यू अशा मानवी जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगी मंत्रांसह संस्कारविधी करण्याची प्रथा त्यांच्यात होती. ते जानवे वापरत. महत्त्वाचे प्रसंग साजरे करताना स्त्रिया गाणी गात असत. तेव्हाची काही गाणी मौखिक परंपरेने चालत आली आहेत. बारशाच्या अथवा लग्नसोहळ्याच्या वेळी ती गाणी गायली जातात. त्या गाण्यांतील काही शब्द जे भाषेतून लुप्त झाले आहेत. मात्र ते बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या तसेच एकनाथ-तुकारामादि संतांचे साहित्य, शाहिरी काव्य, मौखिक परंपरेने जपल्या गेलेल्या स्त्रियांच्या ओव्या यांमध्ये आढळतात. त्यावरून वाडवळी गाण्यांची प्राचीनता सिद्ध होते.

वाडवळ समाज दिवाळी, होळी यांसारखे सण, ग्रामदेवतांच्या यात्रा अशा उत्सवांमध्ये आग्रहाने सहभागी होतो. शतकभरापूर्वीपर्यंत वाडवळ समाजातील प्रतिष्ठित मंडळी होळीत रंगांचा सण साजरा करत. त्यात वाडवळांमधील प्रमुख पुरूषाला प्रथम रंग उडवण्याचा मान मिळत असे. वाडवळ समाजाची वस्ती असलेल्या गावांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळण्याकडे वाडवळांचा कल दिसून येतो.

लग्नात हुंडा देणे-घेणे वाडवळ समाजात पूर्वीपासून निषिद्ध मानले जाते. लग्नप्रसंगी नवरदेव वधुगृही वरात घेऊन जातो तेव्हा त्याला चंदनी सिंहासनावर बसवून मिरवत नेण्याचा मान खुद्द बिंबराजाने दिला होता. अशा प्रकारचा मान फक्त सोमवंशीयांना दिला गेला होता. लग्न लागल्यानंतर वधूला त्याच सिंहासनावर बसवून नव-याच्या घरी आणले जात असे. ऋतुमती न झालेल्या वधूलाच सिंहासनावर बसण्याचा अधिकार होता. पूर्वी बालविवाहाची पद्धत होती. ‘शारदा कायदा’ 1930 मध्ये लागू झाल्यानंतर बालविवाहावर बंदी आली. मुलींच्या लग्नाचे वय वाढले आणि ती प्रथा हळुहळू बंद पडली. वाडवळांच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी गावोगावच्या आप्तांना व समाजबांधवांना आदरपूर्वक निमंत्रण देऊन बोलावले जाई. यजमानगृही पाहुण्यांचा सत्कार केला जाई. गावोगावच्या प्रमुखांचा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांच्या कपाळावर सन्मानाचा टिळा लावून त्यांना विडा देण्याची पद्धत होती, ती लुप्त झाली आहे.

वाडवळांमध्ये पूर्वीपासून विधवाविवाहाला मान्यता होती. त्यामुळे बालविधवा व तिचे शोषण या दुष्ट रूढीला वाडवळ समाजात थारा मिळू शकला नाही. सपुत्रिक विधवेचा तिच्या मुलासह स्वीकार करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणारा वाडवळ समाज आहे. प्रथम पतीपासून झालेल्या पत्नीच्या अपत्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न नवीन घरी कसोशीने केला जाई. कारण त्या गोष्टीचा संबंध सामाजिक प्रतिष्ठेशी जोडला जात असे. निपुत्रिक दांपत्य त्यांच्या नात्यागोत्यातील मुलाला दत्तक घेई, अथवा पत्नी स्वतःच तिच्या पतीचा विवाह पुढाकार घेऊन एखाद्या परिचित स्त्रीबरोबर घडवून आणी. वंशसातत्यासाठी स्वेच्छेने सवतीला स्वीकारणारी, सवतीला बहिणीप्रमाणे वागवणारी; तसेच, सवतीची मुले प्रेमाने वाढवणारी प्रथम पत्नी ‘मोठी आई’ म्हणून सन्मानाने कुटुंबात वावरत असे.

वाडवळांमध्ये नृत्य करण्याला फारशी प्रतिष्ठा मिळालेली नाही. सोमवंश हा प्रशासन करणा-यांचा राजवंश असल्यामुळे असेल कदाचित, इतरांचे मनोरंजन करण्याला त्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकली नसावी. स्त्रिया लग्नप्रसंगी किंवा होळीची गाणी गाताना क्वचित प्रसंगी नृत्य करत, मात्र तो परिसर स्त्रियांसाठी केवळ राखीव असे. सार्वजनिक ठिकाणी नाचणे वाडवळांना मानवत नसे. नव्या बदलत्या जमान्यात वाडवळांची मानसिकता बदलत असल्याचा अनुभव येत आहे.

वाडवळ समाजात निरक्षरांची संख्या गेल्या शतकापर्यंत मोठी होती. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास-साठ वर्षात हा समाज शंभर टक्के साक्षरतेपर्यंत पोचला आहे. मुंबईलगत वस्ती असल्याचा फायदा समाजाला मिळाला आहे. मागच्या शतकापर्यंत गरिबीत जगणारा समाज शेतीबरोबर शिक्षणाच्या आधाराने नोकरी करू लागला. त्यातून त्याने स्थैर्य मिळवले. तरुणांनी उद्योगाची विविध क्षेत्रे आपलीशी करावी यासाठी आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. वसई व पालघर तालुक्यांतील वाडवळ पानवेलीच्या शेतीत तर डहाणू तालुक्यातील वाडवळ चिकूच्या शेती व्यवसायात अग्रेसर आहेत. पानवेलीची शेती करत असल्यामुळे वाडवळांना ‘पानमाळी’ असेही म्हटले जाते. नवीन पिढी उद्योग, पर्यटन, पत्रकारिता, कॅटरिंग व रिसॉर्ट व्यवसायात उतरली आहे.

घरात आणि गावात असताना वाडवळ स्वतःच्या बोलीतून संवाद साधतो. स्वतःची अशी संथ व सौम्य लय असलेल्या वाडवळी बोलीचा तिचा असा वेगळा लहेजा आहे. ती मूळ मराठीशी नाते बांधून आहे. मौखिक परंपरेने चालत आलेली अनेक लोकगीते व कहाण्या यांचा वाडवळी बोलीतील साठा वर्तमानापर्यंत चालत आला आहे. त्यातील काही लोकगीतांचा संग्रह ‘ठेवा वाडवळी लोकगीतांचा’ (संग्राहिकाः नूतन पाटील, प्रकाशकः कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी) या पुस्तकात केला गेला आहे.

सोमवंशी क्षत्रिय समाजाचे एकूण पाच पोटभेद आहेत. त्यातील पाचकळशी व चौकळशी या दोन उपजातींना ‘वाडवळ’ असे म्हटले जाते. बिंबराजाने दिलेल्या सिंहासनाशी त्याचा संबंध सांगितला जातो. ज्यांच्या सिंहासनाला पाच कळस जोडण्याचा मान मिळाला त्यांना ‘पाचकळशी’ तर ज्यांच्या सिंहासनाला चार कळस जोडण्याचा मान होता, त्यांना ‘चौकळशी’ असे म्हटले जाऊ लागले. युद्धात गाजवलेल्या पराक्रमाशी त्याचा संबंध असल्याचे सांगितले जाते. ‘क्षात्रैक्य परिषदे’च्या व्यासपीठावरून सोमवंशी क्षत्रियांच्या पाचही शाखांच्या एकीकरणाचे प्रयत्न चालू आहेत.

पोर्तुगीजांच्या काळात वसई परिसरात धर्मांतराच्या घटना घडल्या. त्यावेळी काही वाडवळ कुटुंबे धर्मांतरित झाली. त्यांना वसई परिसरात ‘वाडवळ ख्रिश्चन’ म्हणून ओळखले जाते. ख्रिश्चन धर्मगुरू फादर दिब्रिटो, इतिहाससंशोधक रजीन डिसिल्वा, कवयित्री सिसिलिया कार्हाम्लो, ज्येष्ठ पत्रकार रॉक कार्हाोंलो हे सर्व वाडवळ ख्रिश्चन आहेत.

वाडवळ समाजातील लोकोत्तर व्यक्ती –

राजकारण व समाजकारण: –

गोविंद धर्माजी तथा अण्णासाहेब वर्तकः (1894-1953) महात्मा गांधीप्रणित असहकाराच्या चळवळीतील सत्याग्रही व ठाणे जिल्ह्याचे प्रभावी नेते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. ते 1923 पासून ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद होते, नंतर 1930 साली बोर्डाचे अध्यक्ष झाले. मुंबई राज्याच्या बाळासाहेब खेर मंत्रिमंडळात स्थानिक स्वराज्य खात्याचे मंत्री (1946 ते 1952) होते.

शामराव पाटीलः (15 ऑगस्ट 1902-10 जून 1975) दांडी येथील मीठाच्या सत्याग्रहातील (1930) सत्याग्रही. त्यांना सविनय कायदेभंगात (1932) अटक झाली. सलग तीनदा निवडून आलेले कोकणचे लोकप्रिय प्रतिनिधी (1952, 1957, 1962) महाराष्ट्र मंत्रिमंडळात ग्रामपंचायत, खारजमिन, सर्वोदय खात्याचे उपमंत्री (1957-1962)

मुकुंदराव सावेः (13 डिसेंबर 1879-16 सप्टेंबर 1967) महात्मा गांधीप्रणीत असहकाराच्या चळवळीतील सत्याग्रही, दांडी मीठाच्या सत्याग्रहातील सत्याग्रही. सविनय कायदेभंगात (1932) अटक व स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. स्त्रियांच्या सुधारणांसाठी विशेष कार्य केले.

पद्मश्री हरी गोविंद तथा भाऊसाहेब वर्तक: ( 9 फेब्रुवारी 1914 – 7 ऑक्टोबर 1998) ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष (1955), महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री (1962), महाराष्ट्र राज्याचे नागरी पुरवठा व खारभूमी – मच्छिमार खात्याचे मंत्री (1967), महसूलमंत्री (1970)

तारामाई वर्तकः राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मोरेश्वर सावे, हितेश ठाकूर, कपिल पाटील, शुभा राऊळ, मनीषा चैधरी, राजीव पाटील, क्षितिज ठाकूर ही मंडळी वर्तमानकालीन राजकारणात सक्रिय आहेत.

डॉ. सखाराम अर्जुन राऊतः (14 मार्च 1839 – 18 एप्रिल 1885) यांना ‘सर्जन ऑफ व्हॉतइसरॉय’ म्हटले जात असे. ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक, वैद्यकीय विषयांवर पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट. जे. जे. हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करणारे पहिले भारतीय डॉक्टर. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे संस्थापक सदस्य. व्हिक्टोरिया गार्डन (जिजामाता उद्यान) या बागेची संरचना राऊत यांच्या कल्पनेतून तयार झालेली आहे. ‘प्रार्थना समाजा’चे संस्थापक सदस्य व जडणघडणीमधील प्रभावी कार्यकर्ते.

डॉ. रखमाबाई राऊतः ( 22 नोव्हेंबर 1864 – 25 डिसेंबर 1955) स्वातंत्र्यापूर्वीच्या कर्मठ काळात निरुद्योगी पतीला नाकारण्याचे धाडस करणारी स्त्री. त्यावेळी समाजातून झालेल्या विरोधावर मात करण्यासाठी परदेशी जाऊन ‘लंडन स्कूल ऑफ मेडिकल फॉर विमेन्स’ या संस्थेतून वैद्यकीय शिक्षण घेऊन 1895मध्ये स्वदेशी परतल्या. वैद्यकीय पदवी प्राप्त करून निवृत्तीपर्यंत वैद्यकीय व्यवसाय करणा-या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या महिला डॉक्टर. प्रसिद्धीपासून दूर राहून 1895 ते 1930 पर्यंत सलग पस्तीस वर्षे रूग्णांची निरलसपणे सेवा केली.

पद्मश्री हरिश्चंद्र गोपाळराव पाटीलः ‘कृषिशास्त्र विशारद’ महाराष्ट्राच्या पहिल्या कृषीविद्यापीठाचे कुलगुरू. जपानला जाऊन जपानी भातशेतीचे तंत्र आत्मसात करून त्यांनी महाराष्ट्रात त्याचा यशस्वी प्रयोग केला आणि महाराष्ट्रातील भातशेतीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.

जयंतराव पाटीलः केंद्रीय नियोजन मंडळाचे माजी सदस्य

भास्करराव सावेः ‘निसर्गशेतीतज्ज्ञ’, यांच्या निसर्गशेती प्रयोगाची जागतिक स्तरावर दखल घेतली आहे.

कला व इतरः

हरिश्चंद्र दाजी भाटवडेकर ऊर्फ सावेदादाः (मृत्यू 1958), 1901 मध्ये हिंदुस्थानातील फिल्मवर पहिला वार्तापट बनवला. लॉर्ड कर्झन यांनी भरवलेल्या दिल्ली दरबारचे चित्रण (1903), रॅंग्लर परांजपे यांच्या सत्कार समारंभाचे चित्रण त्यांनी केले होते.

दीपक चौधरीः चित्रपटनिर्मिती व उद्योग, ‘श्वास’,‘आम्ही चमकते तारे’ चित्रपटांच्या निर्मितीत  सहभाग

सचित पाटीलः चित्रपटव्यवसायात निर्माता व अभिनेता म्हणून काम
.
अरविंद राऊतः ‘चालना’ मासिकाचे संस्थापक व संपादक, ‘जीवनगुंजी’ व इतर पुस्तकांचे लेखक

रघुनाथ माधव पाटील तथा कवी आरेमः ‘पालघर तालुका साहित्य मंडळा’चे संस्थापक. कोकण मराठी साहित्य मंडळाचे खंदे कार्यकर्ते. ‘मातीत मिळालं मोती’ (कादंबरी), ‘केळफुल’, ‘वणव्यातल्या वेली’ (कथासंग्रह), ‘मळा’,‘कलंदर’(कवितासंग्रह) व इतर पुस्तके. पहिल्या वाडवळ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
]
केसरी पाटीलः
पर्यटनक्षेत्रात भारताचे नाव परदेशात उज्ज्वल करणारे ‘पर्यटनकेसरी’. केसरीभाऊंच्या आधी श्री. राजा पाटील यांनी भारतीय पर्यटनक्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांनी व्यवसायाला देशभक्तीची जोड दिली होती. वीणा पाटील व त्यांचे कुटुंबीय या क्षेत्रात भरारी घेत आहेत.

– प्रा. स्मिता पाटील

8 COMMENTS

 1. अही हाय माही वाडवळी बोली ह्या
  अही हाय माही वाडवळी बोली ह्या लेखाद्वारे आपण माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आजच्या आपल्या तरुण पिढीला ह्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक असून आपल्या समाजातील थोर व्यक्तींची ओळख असणे जरुरीचे आहे.

 2. कै.भाऊसाहेब वर्तक हे सिकाॅमचे
  कै.भाऊसाहेब वर्तक हे सिकाॅमचे अध्यक्ष होते व कै.तारामाई वर्तक ह्या सरपंच होत्या. त्याचा उल्लेख लेखात हवा होता. पाटीलकी वरुन पाटील आडनावे कशी झाली त्याचा पण उल्लेख झाला असता तर बरे झाले असते. जसे कोशिंबे येथील कै.भाऊ पाटील, विरारचे कै.दामोदर पाटील, आगाशीचे कै. भालचंद्र पाटील वगैरे…

 3. वाडवळ समाजाच्या कुलदेवता
  वाडवळ समाजाच्या कुलदेवता—एकविरा,वज्रेश्वरी, सितला देवी,महालक्ष्मी ह्या आहेत. वाडवळ समाजाचा कुलदेव—खंडोबा देव आहे हे लेखामध्ये आले असते तर चांगले झाले असते. तसेच बिंब राजा बरोबर येण्या अगोदर वाडवळ समाजाचे मुळ स्थान जिल्हा—औरंगाबाद,तालुका—पैठण, गाव —मुगी हे सांगतात ते हवे होते.

 4. स्वतःचाच इतिहास जेव्हा आपल्या
  स्वतःचाच इतिहास जेव्हा आपल्या आई बाबांना सुद्धा केव्हा केव्हा माहिती नसतो तेव्हा तुमच्या लेखाची खूप मदत होते.Thank you!

 5. pradhyapika Smita patil yani
  pradhyapika Smita patil yani lihilela lekh samajik itihaschya abhayasasathi upuktta tharel. Adhik abhyasasathi shubhechha!

 6. खुपच सूंदर लेख आहे

  खुपच सूंदर लेख आहे
  ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
  आभारी आहे

 7. सोमवंशीय क्षत्रिय समाज वाडवळ…
  सोमवंशीय क्षत्रिय समाज वाडवळ ह्या सामाज्याती आडनावे माझ्या मते पाटील हे आडनाव समाजात पूर्वी नव्हतं माझ्या माहिती बोर्डी येथे पाटील यांचे पूर्वीचे आडनाव चुरी होते आणि चिंचणी येथे पाटील यांचे पूर्वीचे आडनाव सावे होते. केळवा माहीम सफाळे विरार वसई या विभागात काय होते हे मला माहित नाही तेथे सुद्धा सावे, चौधरी, वर्तक, म्हात्रे, चुरी अशी असावी यांची नोंद समाज्याच्या कार्यकारी मंडळाने घ्यावी

 8. लोकोत्तर व्यक्तिंमधे काका…
  लोकोत्तर व्यक्तिंमधे काका बॅप्टिस्टा यांचेही नाव यायला हवे होते. ते टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील सहकारी होते.ते ख्रिस्थी वडवळ समाजातील होते व पेशाने वकीलही होते.

Comments are closed.