वसईची सुकेळी अस्तंगत? (Sukeli – Vasai’s Speciality is Vanishing)

वसईची सुकेळी हा एके काळी आकर्षणाचा बिंदू होता. वसई हे पालघर जिल्ह्यातील मुंबई शहराजवळचे जुने गाव. वसईत भातशेतीच्या जोडीला फुलांच्या आणि केळीच्या बागा होत्या. वसईवर त्या काळी हिरव्यागर्द केळींचे अधिराज्य होते; दूरवर नजरेच्या टप्प्यात केळ्यांच्या विस्तीर्ण बागा दृष्टीस पडत. अगदी नव्वद सालापर्यंत. खोलगट, पाणथळ जमिनीत, किनारपट्टीवर भातशेती आणि थोड्या उथळ, सखल भागावर केळी, फुलांच्या बागा अशी वर्गवारी असे. काळीशार, मऊसूत माती, मुबलक पाणी, योग्य हवामान आणि शेतात राबणारे असंख्य हात… त्यामुळे केळ्यांचा व्यापार भरभराटीचा होता. वसईकरांच्या केळ्यांच्या वखारी मुंबईत मुख्यत: मस्जिद बंदर भागात होत्या. केळ्यांचे लोंगर ट्रकमध्ये भरून वसईतून वखारीत आणले जात. तेथे ते पिकवून मग त्यांचे सर्वत्र वितरण केले जाई. ती माणसे, त्या वखारी आणि बागा काळाबरोबर गुडूप झाल्या!

विविध जातींच्या केळींची लागवड केली जात असे – बनकेळ, भुरकेळ, सफेद वेलची, आंबट वेलची, राजेळी, बसराई हे प्रकार. लागवड साधारण एप्रिल-मे मध्ये होई. ऊन्हामुळे जमीन खरपूस भाजलेली आणि सुकून टणटणीत झालेली असते. तशा जमिनीत प्रत्येकी मीटरभर अंतरावर आळी तयार करून त्यात केळीच्या छोट्या रोपांची लागवड केली जात असे. काही ठिकाणी, कलम पद्धतीने एकाच ठिकाणी रोपे जतन केली जात व पावसाळा सुरू झाल्यानंतर त्या कलमातील एकेक रोप निवडून त्याची अंतरा अंतरावर लागवड केली जाई. उन्हाळ्याच्या दिवसांत रोज डोक्यावरून पाणी आणून पाऊस पडेपर्यंत रोप जिवंत ठेवणे, ते कष्टाचे काम स्त्रिया-मुले करत असत. रोपांनी एकदा का जीव धरला, की मग पावसाळ्यात ती सरसर वाढत. रोपे पावसाळ्यातील वीज, वारा, पाऊस, वादळात तगून राहिली तर शेतकऱ्यांची दिवाळी, नाहीतर दिवाळखोरी! साठ-सत्तरच्या दशकांत अनेक वारमोडी (वादळे) झाल्या. त्यात केळीच्या बागांच्या बागा भुईसपाट झाल्या. केळी हे नगदी पीक, एकरकमी घसघशीत पैसा देणारे किंवा फुटकी कर्दपी न देता भिकेला लावणारे! वारमोडीमुळे शेतकरी हवालदिल होतो, पण त्यामुळे वैफल्यग्रस्त, निराश होऊन कोणी आत्महत्या केल्याची नोंद इतिहासात नाही. शरीराने आणि मनानेही चिवट, कणखर, तो वसईकर!

केळींना खतपाणी जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबरच्या आसपास दिले जाते. ती साधारण नोव्हेंबरमध्ये निसवते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत टच्च केळ्यांनी भरलेले गच्च हिरवेगार लोंगर तयार होतात. खाण तशी माती! केळफूल जेवढे मोठे त्या प्रमाणात लोंगराची लांबी.

वसई सुकेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुकेळी तयार करण्यासाठी राजेळी केळ्यांची लागवड केली जात असे. राजेळी म्हणजे केळ्यांचा राजवंश. त्यांची सुकेळी बनतात. झाडावरील लोंगर पिकण्याइतपत तयार झाले, की ते काढून त्याचे घड सुटे केले जातात. ते मातीच्या एका मोठ्या रांजणात एकावर एक असे रचून ठेवले जातात. मातीच्या मोठ्या रांजणाला स्थानिक भाषेत पराडाव छोट्या रांजणाला मुजीअसे म्हणतात. पराड्याचे तोंड खोलगट मातीच्या झाकणाने बंद करतात. त्याला नांदम्हणतात, केळ्यांना वाफ मिळावी म्हणून झाकण चोहो बाजूंनी शेणाने लिंपले जाते. खोलगट झाकणात भाताचा तूस भरतात व त्यावर चुलीतील आगीचे तीन-चार जळते निखारे खडे ठेवले, की भट्टी छान जमून जाते. जाळ न होता दोन-तीन दिवस तूस नुसता धुमसत राहतो. त्या ऊबेने पराड्यातील केळी पिवळीजर्द अशी छान होतात. मस्त पिकतात. पिकलेली राजेळी केळी मग बाहेर काढून तीन-चार दिवस मोकळ्या हवेत ठेवतात. तेव्हा त्यांची साल काळी पडते. त्यानंतर ती केळी सावकाश सोलली जातात. तेव्हा केळ्याचा आतून लालसर रंगाचा लुसलुशीत, मऊ गर बाहेर येतो. केळे सोलण्याचीही पद्धत आहे. केळे सोलताना टोकावरचा भाग म्हणजे ज्या टोकावर फूल येते तो भाग तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अखंड केळे सोलणे ही कौशल्याची बाब असते. फुलाकडील त्या केळ्याच्या टोकाला बोथीअसे म्हणतात. व्यालेल्या म्हशीचे रेडकू मेल्यावर जशी बाजारात म्हशीची विक्री किंमत कमी होते, तद्वत बोथी तुटलेल्या केळ्याची गत होते. त्या सुकेळींना बाजारभाव कमी मिळतो. त्यांची आकर्षकता नष्ट होते.

सुकेळ्यांना आधुनिक टच मिळण्यापूर्वी सुकेळी बनवण्याची, त्यांचे पॅकिंग करण्याची एक पद्धत होती. झाडावरून लोंगर उतरवल्यानंतर उरलेल्या केळीच्या खोडाला लोदम्हणतात. केळीच्या लोदाचे फूट-दीड फूट लांबीचे तुकडे केले जात. त्यावरील खोलगट हाताच्या पसाप्रमाणे दिसणारे पिवळसर, हिरवेगार पापुद्रे काढून ते उन्हात वाळत घालत. त्यांचा वापर सुकेळ्यांचे पॅकिंग करण्यासाठी केला जाई. त्या पापुद्र्यांना हॉपेम्हणतात. त्या सालींचा उपयोग केळ्यांचा नैसर्गिक स्वाद, रंग, दर्जा कायम ठेवण्यासाठी होत असे. वसईच्या राजेळीच्या सुकेळ्यांना कोठलाही कृत्रिम रंग, केमिकल्स किंवा परिरक्षकांच्या वापराशिवाय पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने वाढवलेली आणि बनवलेली म्हणून त्या काळी देशविदेशांतून मागणी असे.

केळीचे खांब म्हणजे लोद पाडून झाल्यावर शेतजमीन मोकळी होत असे. त्या शेतजमिनीच्या एका भागावर साधारण दहा फूट उंचीवर बांबूंचा छोटा मांडव तयार केला जात असे. त्यावर कारवी पसरून, त्या सुतळीने किंवा सुंभाने बांधून त्याचा कूड तयार करत. मांडवावर वरखाली करण्यासाठी शिडीची व्यवस्थाही केलेली असे. केळीच्या सुकलेल्या पानांना वावळीम्हणतात. वावळी मांडवावर पसरून मग त्यावर सोललेले एकेक केळे ऊन लागेल अशा बेताने सरळ मांडून ठेवत. मांडवाच्या उंचीमुळे धूळ, माती, किडे-मुंग्या, रहाटाच्या बाजूने वाहणारे पाणी यांपासून केळी सुरक्षित व स्वच्छ राहत. रोज संध्याकाळी दव पडण्यापूर्वी मांडवावर चढून सर्व केळी टोपलीत स्वच्छ फडक्यात गोळा करून ठेवली जात असत. दवाचा परिणाम केळ्यांचा नैसर्गिक स्वाद, रंग, गंध व दर्जा यांवर होतो. ती कसरत सलग पाच-सहा दिवस करावी लागत असे. केळ्यांना रोज आलटूनपालटून ऊन लागल्यामुळे छान, काळपट, पिवळसर, तांबूस रंग चढत असे. बोथी तुटण्याचा धोकाही टळलेला असे. चोर, पोरे आणि पाखरे यांपासून बचाव करण्यासाठी दिवसभर शेतात बसून रखवाली करण्याचे काम कुटुंबातील मुलांकडे असे.

केळी सुकवण्याची प्रक्रिया सुरू असताना मांडवावरून मध वारंवार खाली ठिबकत असे. तो पिण्यासाठी किडे-मुंग्या, पाखरे यांची गर्दी होत असे. त्या मधाला औषधी गुण असतो. केळे जरी प्रकृतीसाठी सीताफळाप्रमाणे थंड मानले जात असले तरी केळ्यापासून बनवलेली सुकेळी मात्र उष्ण मानली जातात. त्यामुळे ती खाण्याची पद्धतही पूर्वजांनी ठरवून दिलेली होती. गाईच्या किंवा म्हशीच्या साजूक तुपात खसखस घालून सुकेळ्यांचे काप घोळवून, तळून ते बरणीत भरून ठेवायचे आणि मग थोडे थोडे चवीचवीने जातायेता खात राहायचे. त्यामुळे सुकेळी शरीराला बाधत नाहीत.

पुरी वसई जरी सुकेळ्यांसाठी प्रसिद्ध असली तरी वसईतील सुकेळी बनवणारी गावे केवळ दोन – एक आगाशी आणि दुसरे नंदाखालजवळील परसाव. त्या गावातील केवळ हाताच्या बोटांवर मोजता येणारी कुटुंबे पूर्वापार त्या व्यवसायात होती. सद्य काळात सुकेळी परसावमधील केवळ दोन-तीन कुटुंबांत बनतात. रिचर्ड रॉड्रिग्ज, मिल्टन रॉड्रिग्ज व आलेक्स रॉड्रिग्ज ही कुटुंबेच काय ती पिढीजात व्यवसायाला धरून आहेत.


पूर्वी पंचक्रोशीत आणि मुंबईच्या आसपास जत्रा भरत. निर्मळची यात्रा, कर्जत यात्रा, मंडपेश्वरची यात्रा, काशिमिरा यात्रा या काही प्रमुख यात्रांत वसईच्या सुकेळ्यांचे मार्केटिंग होई. वसईच्या सुकेळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात त्या जत्रांमध्ये होत असे. सुकेळ्यांची ती मौज बदलते हवामान, पर्यावरणातील बदल, कृत्रिम रासायनिक खतांचा अमर्याद वापर, कीटकनाशके-जंतुनाशके यांमुळे मातीचा बदललेला पोत, भूगर्भातील जलसाठ्यांचे प्रदूषण या सगळ्यांमुळे कमी झाली आहे. हिरव्या केळीच्या बागा पर्णगुच्छ रोगांनी खाऊन टाकल्या, त्यामुळे सुकून गेल्या. धंदा चौपट झाला. वखारी बंद पडल्या. भारताच्या नकाशावर सुकेळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले वसई गाव वेगळ्याच कारणाने गाजू लागले. राजेळी केळी वसईच्या मातीतून हद्दपार होऊन काही वर्षे लोटली आहेत. सुकेळ्यांचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. आजमितीस सुकेळी निर्यात करणाऱ्या देशांत श्रीलंका वरच्या क्रमांकावर आहे. रॉड्रिग्ज कुटुंबांनी तो लघुउद्योग गोवा, म्हैसूर, केरळमधून कच्च्या केळ्यांची आयात करून घरगुती स्वरूपात जिवंत ठेवला आहे.

आम्ही लहान मुले असताना वर्षभर पै-पैसा गोळा करत असू. त्या जमलेल्या चिमूटभर पैशांत कार्तिकात भरणाऱ्या आठ दिवसांच्या निर्मळच्या यात्रेमध्ये काय काय खरेदी करावे याची तीन-तीन वेळा यादी तयार करत असू. त्यात खजूर, कुरमुरे, सुरेशची मिठाई, पाण्याचा रबरी चेंडू, प्लास्टिकच्या रंगीबेरंगी वळेसर बांगड्या आणि केसांत घालण्यासाठी स्प्रिंगवर डुलणारे कागदी फूल यांचा समावेश हमखास असे. यात्रेत दोन-चार ठिकाणी काचेच्या छोट्या छोट्या पेटीत सुकेळी व्यवस्थित मांडून ठेवलेली दिसायची. काचेच्या पेटीत व्यवस्थित मांडून ठेवलेली सुकेळी फक्त लांबून बघण्यापुरती होती. त्या काळी इटुकल्या पैशांत सुकेळी खरेदी करण्याची ऐश परवडणारी नव्हती. आता तर ती वसईतील अन्य जुन्या व्यवसायांप्रमाणे इतिहासजमा होऊन गेली आहेत.

(लोंगर – केळीचे सर्व घड ज्या दांड्यावर लगडलेले असतात. आळी – लहान  खोलगट खड्डा ज्यात केळीचे छोटे रोप लावले जाते.)

(बय पुस्तकावरून उद्धृत, संस्कारित)

बेर्नादेत रुमाव 9869694566 bernadetterumao@gmail.com

बेर्नादेत रूमाव या वाकोला मनपा मराठी शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांना महापौर पुरस्काराने 2012 मध्ये गौरवण्यात आले आहे. त्यांची बयआणि चिमण्यांचे झाडही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे बी एससी, एम एड पर्यंतचे शिक्षण झाले आहे.  ———————————————————————————————————————

About Post Author

9 COMMENTS

  1. फार सुंदर लेख आहे. अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद.सौ.अनुराधा म्हात्रे पुणे

  2. वसईची सुकेळी ख्यातकीर्त का आहेत,यावर प्रकाश टाकणारा विस्तृत माहितीपूर्ण नि अभ्यासपूर्ण लेख.लेखिकेचं अभिनंदन!-शाम वसईकर

  3. सुकेळी आवडले.आम्हाला फक्त जळगाव कडची केळी माहीती होती.केळीचे शिखरण माहीत होते.वसईच्या केळी विषयी सविस्तर माहिती मिळाली.केळीसारख्याच गोड भाषेत लिहिलेला लेख आवडला.

  4. अस्तंगत होत चाललेल्या सुकेळी व्यवसायाबद्दलची तपशीलवार माहिती, खूप आभार.

  5. वसईच्या सुकेळी विषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आपण दिली आहे. वसईच्या लोकसंस्कृती विषयी लिहीलत तर आम्हाला वाचायला नक्की आवडेल.

  6. वसईच्या सुकेळी विषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आपण दिली आहे. वसईच्या लोकसंस्कृती विषयी लिहीलत तर आम्हाला वाचायला नक्की आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here