लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

0
186

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होतेपरंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावेअशी दादांची कार्यशैली असे…

‘लोकनेते’ या अभिधानाने ज्यांचा यथार्थ गौरव होतो, ते वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी (जन्म 13 नोव्हेंबर 1917) महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरी व्हायला हवी होती; तसे झाले नाही. देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे बदललेले रंग हे त्याचे एक कारण असू शकते. पक्षीय तीव्र अभिनिवेशामुळे राष्ट्र आणि राज्य यांबाबतच्या आदर्शवादी संकल्पना मोडीत निघत आहेत. देशाच्या अखंड इतिहासाची पक्षीय फाळणी होत आहे. भारतीय समाजाचे दीर्घकालीन स्थैर्य आणि ऐक्य यांना निर्माण होणारा हा अंतर्गत धोका भारत-पाकिस्तान फाळणीइतकाच धोकादायक आणि दुर्दैवी आहे.

भारताच्या आधुनिक इतिहासातील कर्तृत्ववान आणि दीर्घ काळ पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दीही (जन्म 19 नोव्हेंबर 1917) देशाच्या विस्मृतीत अशीच गेली. दादांनी स्वातंत्र्यसंग्रामात छातीवर गोळ्या झेलल्या आणि इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हौतात्म्य पत्करलेयाचा विसर पडलेल्या समाजाचे भवितव्य काळ त्याच्या हाताने अधोरेखित करत असतो. पक्षीय आणि शासकीय आदेश पाळण्याचे बंधन त्याच्यावर नसते. दादांनी 1942 च्या भारत छोडो’ आंदोलनात छातीवर गोळ्या झेलल्यातर इंदिरा गांधी यांनी तेरा महिने तुरुंगवास पत्करला. दादा महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेइंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान पंधरा वर्षे होत्या. महाराष्ट्रीय व भारतीय जनतेने त्यांची घटनात्मक जबाबदारीचा भाग म्हणून संविधानिक मार्गाने निवड केली होती. ते लोकेच्छा म्हणून त्या पदावर होते. त्यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करणे हे विद्यमान सरकारचे लोकशाहीतील दायित्व होते. सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेतर निदान पक्षाने तरी काही करावे ! काँग्रेसच्या सव्वाशे वर्षांच्या सलग प्रवासात इंदिरा गांधी आणि वसंतदादा या भक्कम कड्या होत्या. त्यांच्या आश्रयाने सत्ता भोगलेल्यांनाही त्यांची आठवण न राहवी किंवा त्यांची स्मृती हे संकट वाटावेहा मोठाच दैवदुर्विलास म्हणायचा. या पृष्ठभूमीवर दक्षिण महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार दशरथ पारेकर यांनी वसंतदादा पाटील यांचे स्मरण जागवणारात्यांना आदरांजली अर्पण करणारा आणि त्यांच्या कार्याचे यथायोग्य मूल्यमापन करणारा ग्रंथ प्रकल्प स्वयंस्फूर्तीने साकार करावाही प्रशंसनीय सामाजिक- वैचारिक कृती आहे.

वास्तविकदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे साधारसमग्र आणि चिकित्सक चरित्र प्रसिद्ध होण्याची गरज होती. दादांचे चरित्र समकालीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे आकलन समृद्ध करणारे मौलिक साधन ठरले असते. दादामुंळे सांगलीकोल्हापूरमधील अनेक संस्थांची भरभराट झाली. त्यांनी एकत्रित येऊन संस्थात्मक पातळीवर संसाधनांची जुळवाजुळव करून असा प्रकल्प तडीस नेण्यास हवा.

दादांच्या चरित्रातील विविध पैलूंचा धांडोळा घेतल्यावर दादांचे जे व्यक्तिमत्त्व संक्षिप्तपणे सामोरे येतेत्यांची प्रतिमा मनात तयार होतेती साधारणपणे अशी : शिक्षणाची परंपरा नसलेल्यालहानशा खेड्यातीलशेतकरी कुटुंबातील एक तरुण मुलगा देशाच्या स्वातंत्र्यसमरात उडी घेतो, 1942 च्या चले जाव आंदोलनात स्वत:च्या ऐन पंचविशीत भूमिगत राहून इंग्रजांच्या विरोधात हातात शस्त्र घेतोअटकेनंतर सांगलीच्या तुरुंगातून धाडसी पलायन करतोसाथीदारांच्या सुटकेसाठी पोलिसांच्या गोळ्या छातीवर झेलतोस्वातंत्र्यानंतर विधायक कामात अग्रेसर राहतोसहकार आणि कृषी-औद्योगिक क्रांतीद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट करतोसामूहिक आर्थिक विकासाचे प्रारूप सिद्ध करतोसहकारमहर्षी म्हणून सन्मानित होतोसंघटनकौशल्याच्या जोरावर तळागाळापासून पक्षबांधणी करत काँग्रेसचा अध्यक्ष होतोसहकारातील सर्व शिखर संस्थांचे नेतृत्व करतो आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा एक-दोनदा नव्हे तर चार वेळा मुख्यमंत्री होतो. हा एका महाकादंबरीचा नायकच शोभतो !

दादा स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय क्षेत्रातील उत्क्रांतीचे प्रतीक आहेत. प्रतिमान आहेत. सनदशीरविधायक व लोकशाही मार्गाने फुलेशाहूआंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक स्थित्यंतराच्या राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रात कशा घडत गेल्याहे तपासून पाहण्यासाठी दादांचा केस स्टडी’ नमुनेदार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असे अनेक दादा’ निर्माण झाले आणि विकासाचे विकेंद्रीकरण झालेलोकशाहीकरण झालेते समावेशक पुष्कळ प्रमाणात झालेयाचे कारण महाराष्ट्राचे क्रांतदर्शी नेते यशवंतराव चव्हाण यांनी दादांसारख्या अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना बळ दिलेयात आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मुख्यमंत्री म्हणून ज्यांचे भरीव योगदान आहे, त्यांत यशवंतरावांनंतर आवर्जून उल्लेख केला जातो तो वसंतराव नाईकशरद पवार आणि वसंतदादा पाटील यांचा.

दादा चार वेळा मुख्यमंत्री झालेपरंतु कारभारासाठी त्यांना सलग चार वर्षेही मिळू शकली नाहीत. एक मात्र खरे- सत्तेत असोत-नसोतदादा कायम महाराष्ट्राचे नेतेच राहिले. त्यांचे हे नेतेपण दिल्लीला त्यांच्यापासून हिरावून घेता आले नाही.

दादांचा- वसंत बंडूजी पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पद्माळे या लहानशा खेड्यात 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला आणि त्यांचे निधन मार्च 1989 रोजी वयाच्या बहात्तराव्या वर्षी झाले. दादांचे औपचारिक शिक्षण प्राथमिक शिक्षणापलीकडे झाले नाहीपरंतु शिक्षणाच्या मर्यादा दादांच्या कर्तृत्वाला रोखू शकल्या नाहीत. किंबहुनाती त्यांची ताकदच ठरली खेडूत माणसाकडे जीवनाकडे पाहण्याचे जे उपजत शहाणपण असतेते दादांकडे पुरेपूर होते. सर्वसामान्य माणसांबद्दल अंतर्यामी असणारा मायेचा कळवळाविलक्षण कणवतळमळ हे दादांचे उसने अवसान नव्हतेती त्यांच्या हृदयाची भाषा होती. ते व्यवस्थापकीय कौशल्य माणसे जोडण्याचे नव्हते. दादा सगळ्यांना आपलेच वाटत.

दादांनी महाराष्ट्रात काँग्रेसची संघटना अभेद्य बांधलीगावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत. त्याचे कारण दादा स्वभावानेच संघटक होते. सरळ मनाचानिगर्वीअहंकाराचा स्पर्श नसलेलासत्तेची हाव नसलेलासत्ता म्हणजे केवळ लोकसेवेचे साधन मानणारा माणूस ‘लोकनेता’ झालातर ते स्वाभाविकच म्हणायचे. दादा लोकसंघटक होतेलोकसंग्राहक होते. त्यांनी स्वत:भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले. दादांना लोकांचे प्रेम मिळाले. दादांनीही कार्यकर्त्यांची कदर केली. दादा स्वत: मोठे झालेचपण त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना मोठे केले. दादांची वृत्ती सर्वसंग्राहक होती. त्यांचा दरबार कायम भरलेला असे. ते कार्यकर्त्यांचे गुण ओळखून प्रत्येकाला योग्य कामयोग्य संधी देत असत. शांत व प्रेमळसरळ व सुस्वभावी दादा आपल्या वागण्यानेवर्तनाने माणसे जोडत. दादांचा पोषाख लोकांना आपलेपणा वाटावा असा साधा असे- धोतरनेहरुशर्ट आणि पायांत चपला. दादा कोटही कधी घालत. त्यांच्या राहण्या-वागण्यात छानछोकी नव्हती. स्वभावात सत्तेचा अहंकार नव्हता. दादा मातीतील माणूस होता. त्यांची जाणीव शेतकऱ्याचीग्रामीण होती. दादांच्या वेळचा बहुसंख्य समाज तसाच होता. जागतिकीकरणानंतर नव्वदच्या दशकात उदयाला आलेला बाजारकेंद्रीचंगळवादी मध्यमवर्ग तेव्हा अस्तित्वात नव्हता. भाषा आणि देहबोली ही संवादाची प्रभावी माध्यमे होती

दादांची चाल कृष्णाकाठच्या मातीतील पैलवानासारखी डौलदार असे. दादा राजधानी मुंबईच्या उच्चभ्रू वातावरणाने कधी दबून गेले नाहीत की त्यांनी वसंत साठेरजनी पटेल वगैरेंच्या दरबारी राजकारणापुढे कधी नमते घेतले नाही. त्यांची प्रत्येक कृती आत्मविश्वासपूर्वक असे. त्यांची भाषात्यांचा संवाद मात्र समोरच्या माणसाला भुरळ पाडणारा असे. तो फार नितळपारदर्शीअकृत्रिम आणि देशी असे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ग.प्र. प्रधान यांनी दादांवर लिहिलेल्या लेखातील एक संवाद येथे दादांच्या मराठी भाषेतील देशीपणासाठी आवर्जून उद्‌धृत करावासा वाटतो. प्रधान लिहितात : एकदा दुपारी तीन वाजता मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो. तेव्हा ते म्हणाले, ‘प्रधानथोडे थांबा. भाकरी खाऊन घेतो. जेवायला वेळच झाला नाही.’ मी म्हणालो, ‘आपण शांतपणे जेवा. मी एक तासाने येईन.’ तेव्हा दादा हसून म्हणाले, ‘तुम्ही इथंच बसाम्हणजे दुसरं कुणी आत येणार नाही.’ ‘भाकरी खाऊन घेतो’ अशी शब्दकळा मुखातून स्वाभाविकपणे उमटणाऱ्या दादांची शेतीशेतकरीखेडीपाडीग्रामजीवनसहकार यांच्याशी किती घट्ट नाळ जोडलेली असेल याची कल्पना आपण करू शकतो. दादांना शेतकरी आणि शेतमजूर यांच्याबद्दल अतिशय जिव्हाळा होता. दादांनी स्वत:चे स्थान त्यांच्या जीवावर महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात अढळ निर्माण केले. एके काळी दादांना विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातील पान हलत नव्हतेएवढी दादांची ताकद होती. सगळा ग्रामीण महाराष्ट्र दादांबरोबर होता. त्यासाठी दादांनी अफाट कष्ट उपसले होते.

दादांनी 1956-57 मध्ये सांगलीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारला. ते कारखान्याच्या साईटवर रोज बारा-चौदा तास असत. ते तेथे हातावर चटणी-भाकरी घेऊनवाळूच्या ढिगाऱ्यावर बसून खात असताना लोकांनी त्यांना पाहिले आहे. जनसामान्यांची निष्ठा मिळते आणि कार्यकर्त्याचे नेत्यात रूपांतर होतेत्यामागे असे कष्ट असतात. दादांचे चरित्र राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहेमूल्यभान देणारे आहे ते यासाठी. दादांसाठी लोकनेते हे संबोधन वापरले जाते तसेच स्वातंत्र्यसैनिकसहकारमहर्षीकृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तकविकासपुरुष या विशेषणांनीही त्यांचा गौरव केला जातो. संघटनकौशल्य हा दादांचा विशेष गुण असल्याचे दाखले वारंवार दिले जातात. दादांनी त्यांचे आयुष्य लोकसेवालोककल्याण यांसाठी समर्पित केले होते. दादांमधील स्वातंत्र्यसैनिकाचे रूपांतर विधायक कार्यकर्त्यात स्वातंत्र्यानंतर झाले. दादांनी स्वातंत्र्यसैनिकाच्याक्रांतिकारकाच्या मोहमयीआकर्षक प्रतिमेत अडकून न पडता राष्ट्र आणि समाज उभारणीच्या कामासाठी विधायक-सकारात्मक मार्ग पत्करलाहे दादांच्या आयुष्याला मिळालेले निर्णायक वळण म्हणता येईल. अनेकांना त्यागाचीक्रांतिकारकत्वाची ती बेडी तोडता आली नाही. ते स्मरणरंजनात मश्गुल राहिल्याने नवी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम राहिले नाहीत. लवकरच ते वंदनीय परंतु अप्रस्तुत ठरले. दादांचे तसे झाले नाहीकारण ते हाडाचे कार्यकर्ते आणि संघटक होते.

दादांनी स्वानुभवाने अविकसित शेती’ हे दारिद्र्याचे महत्त्वाचे कारण आहेहे जाणले होते. आर्थिक व सामाजिक विकासासाठी कृषी-औद्योगिक क्रांती हा तत्कालीन विचारविेश्वातील अग्रक्रमाचा मुद्दा होता. ती क्रांती यशस्वी व लोकाभिमुख होण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाहीत्यात जातीपातीच्या मर्यादा ओलांडून सर्वांचा सहभाग आवश्यक आहे याची जाणीव महाराष्ट्रातील नेतृत्वाला होती. मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते यशवंतराव चव्हाण त्या विचाराभोवती राज्यामध्ये मोठेच जनजागरण करत होते. ते त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिकसामजिकशैक्षणिक व सांस्कृतिक विकासाच्या पायाभरणीसाठी प्रेरणा देत होतेकार्यासाठी प्रवृत्त करत होतेसंस्थात्मक उभारणी करत होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर तर त्या प्रक्रियेला वादळाचा वेग आला होता. एक मन्वंतरच घडत होते. विकसनशील देशाच्या अर्थकारणात पुरेशा भांडवलसंचयाअभावी सहकारी तत्त्वावर भांडवल उभे करणेहा आकर्षक पर्याय होता. सहकार हा मार्ग आर्थिक दृष्ट्या दुबळ्या शेतकऱ्यांना संघटित रीत्या सुधारण्याचा होता. परंतु सहकाराचे तत्त्व मुख्यत: सामाजिक-आर्थिक आहेकेवळ आर्थिक नाही. ते सामाजिक पुनर्रचनेसाठीही महत्त्वाचे आहे. सहकाराने आर्थिक क्षेत्रात सामाजिक मूल्यांची प्रतिष्ठापना केली. सामान्य शेतकऱ्याला त्यामुळे पत मिळाली. सहकाराचे तत्त्वज्ञान हा सामाजिक व आर्थिक न्यायाचाआर्थिक विकेंद्रीकरणाचा आणि लोकशाही वृत्तीला अवसर देणारा मार्ग म्हणून महाराष्ट्रात स्वाभाविकपणे स्वीकारले गेले आणि त्यातून व्यापक चळवळ उभी राहिली. महाराष्ट्रात लोकशाहीचा व्यवहार व तत्त्व रुजवण्याचे आणि कार्यकर्ते व नेतृत्व विकसित करण्याचे फार मोठे ईप्सित सहकारी चळवळीने साध्य झाले. त्रिस्तरीय पंचायतराज्याचीराजकीय अधिकारांच्या व संस्थांच्या विकेंद्रीकरणाची जोड त्याला मिळाली आणि दोन-अडीच दशकांत महाराष्ट्राने अनेक आघाड्यांवर देशात सातत्याने पहिला क्रमांक राखला. दादा विकासाच्या त्या लढाईत यशवंतरावांच्या सोबत होते. दादांनी सांगलीच्या माळरानावर कष्टाने उभारलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याची कथा प्रेरक आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाने नगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याने दादांना जणू दृष्टांत दिला दादांना कारखान्याची परवानगी आधी कारखाना आणि नंतर ऊस’ अशा स्थितीत 1956 च्या ऑक्टोबरमध्ये मिळाली आणि दादांनी अवघ्या दोन वर्षांत डिसेंबर 1958 मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते शुभारंभाची उसाची मोळी गव्हाणीत टाकली ! एक हजार टन क्षमतेचा तो कारखाना दादांनी साडेसात हजार टनांपर्यंत वाढवला आणि एके काळी आशियातील सर्वांत मोठा कारखाना म्हणून लौकिक मिळवला. दादांच्या कार्यकुशलतेचासंघटनकौशल्याचा आणि उत्तुंग ध्येयासक्तीचा तो आविष्कार होता. दादांचा कारखाना हे कृषी-औद्योगिकसहकारी विकासाचे केंद्र झाले. त्यांनी ग्रामीण भागाचा सर्वंकष कायापालट करण्याचे कारखान्याचे सामर्थ्य ओळखले होतेप्रत्यक्ष अनुभवले होते. दादा म्हणत, ‘कारखान्यात साखर तयार होत नाहीशेतात होते. ऊस हा कच्चा माल. साखर उद्योगात साखरेहून कितीतरी अधिक मोलाचीउपयोगाचीवरदान ठरू शकतील अशी उत्पादने मिळू शकतात. खरे तरत्यांची गणना करणे कठीण. साखर हेच उपउत्पादन ठरावेएवढे ऊस हे पीक विलक्षण आणि बहुविध उपयोगांचे आहे.’’

 दादा म्हणत त्याचा प्रत्यय नंतर येत गेला. दादा स्वत:चा कारखाना काढून स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. ते काम इतरांचे कारखाने स्वत:चेच आहेत असे समजून केले. दादांचा पुढाकार ऊस आणि साखर उद्योगासंबंधीचे सर्वंकष संशोधन व विकास यासाठी पुण्याजवळ डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची आणि साखर कारखान्यांचे व साखर उद्योगाचे देशपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची स्थापना करण्यात होता.

डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटला दादांच्या निधनानंतर त्यांचेच नाव देण्यात आले आहे. त्या संस्थेत साखर उद्योगाशी संबंधित तंत्रवैज्ञानिक शिक्षणप्रशिक्षण व संशोधन चालते. संस्था पुण्याजवळील मांजरी येथे एकशेचाळीस एकर परिसरात आहे. देशातील आघाडीची संस्था म्हणून तिचा लौकिक आहे. आज देशातील साखरेचे निम्मे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. या उद्योगाचे सुरुवातीचे वातावरण बदलून नंतर तो साखरसम्राटांच्या आणि शुगर लॉबीच्या आहारी गेल्याने पुष्कळ बदनाम झाला. त्यात सहकाराऐवजी राजकारण आले. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सिंचनसुविधांचा उपयोग केवळ उसासाठी होऊ लागला. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागलेल्या राज्यात वारेमाप पाणी पिणाऱ्या ऊसाला आणि साखर कारखान्यांना विरोध वाढू लागला. पण हमखास आणि खात्रीचे उत्पन्न देणारा पर्याय नसल्याने साखर कारखाने वाढत राहिले. मी स्वत: ऊस आणि साखर यांवर सातत्याने टीका करत आलो. एवढ्या साखरेची देशाला गरजच नाही आणि सब्बसिडी देऊन साखर निर्यात करणे म्हणजे दुर्मीळ पाणी व सकस जमिनीची मातीमोल किमतीने निर्यात करण्यासारखे आहे असे माझे प्रतिपादन होते. मी सत्ता साखरेतून येते’ हा लेख 1983 मध्ये लिहिला. ऊस हे राजकीय पीक’ आहे आणि राजकीय प्रक्रियेत तुम्हाला प्रवेश करणे असेल तर तुमच्या शेतात ऊस हवा असे समीकरणच त्या वेळी तयार झाले होतेपरंतु ऊस आणि साखर यांनी हे सगळे हल्ले परतावून लावले. शेती आतबट्ट्याची झाली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही पर्यायी पिकातून खात्रीशीर परतावा मिळण्याची शक्यता नसल्याने ऊस टिकून आहे.

साखर कारखान्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदललेविकासाची पुष्कळ बेटे तयार झाली. त्यातून शिक्षणाच्याआरोग्याच्या सोयी उपलब्ध झाल्याअर्थकारण बदललेरोजगार वाढलेत्या भागातील भांडवल इतरत्र परागंदा झाले असते ते तेथेच जिरलेग्रामीण भागाच्या नागरीकरणाला चालना मिळाली. सहकाराच्या नावाने केवळ बोटे मोडणाऱ्यांनी त्याचे इतर परिणाम लक्षात घेऊनसाधकबाधक विचार करून या चळवळीचे मूल्यमापन करण्यास हवे. दादांनी त्या चळवळीच्या विस्तारात कळीची भूमिका निभावली. सांगली जिल्हा हा जणू त्यांची प्रयोगशाळा होती. सहकारातील एकही असा उपक्रम नाहीज्याचे रोपण सांगली जिल्ह्यात झालेले नाही. दादांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे दृष्टिस्वप्न चुकीचे होतेअसे म्हणता येणार नाही. दादांचा गौरव सहकारमहर्षी’ असा केला जातो, ‘सहकारसम्राट’ नव्हेहेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. ऊस नसता तर ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण नागवली गेली असती याचा विसर न व्हावा.

दादांचा पिंड कार्यकर्त्याचासंघटकाचा. दादांनी 1952 पासूनच्या सगळ्या निवडणुका जिंकल्यापरंतु त्यांना मंत्रिपद फार उशिरा मिळाले. त्यांचे राजकारण विधायक स्वरूपाचे. समाजसेवा हे त्यांचे व्रत. त्यांना सरकारला समाजसेवा करता येणार नाहीम्हणून सामाजिक संस्था व समाज कार्यकर्ते यांचे महत्त्व वाटत असे. त्यांच्या दृष्टीने सत्ता म्हणजे लोकसेवेचे साधन.

दादांनी त्यांचे पद आणि पक्ष विसरून शेकडो नव्हेहजारो लोकांची लहानमोठी कामे केली. दादांचा दरबार ते सत्तेवर असोत-नसोतकायम भरलेला असे. त्यांच्या कोपरीचा खिसा गोरगरिबांच्या मालकीचा असे. त्यांनी कोणाला कधी विन्मुख पाठवले नाही. शिक्षणासाठी अनेकांना आर्थिक मदत केली. त्यांचा निकष काम कोणाचे ’ यापेक्षा काम कोणते हा असे. दादांनी चांगले समाजोपयोगी काम करणाऱ्या सगळ्यांना मदत केली- त्यांचा जातधर्म वा पक्ष पाहिला नाही. त्यांची वागणूक सर्वांशी सौजन्यपूर्ण असे. ते त्यांचे म्हणणे ऐकून घेत. लोकांना त्यामुळेही दिलासा मिळे. आश्वासने देऊन लोकांना झुलवत ठेवणे त्यांच्या स्वभावात नव्हते. ते होण्यासारखी कामे करतअन्यथा स्पष्टपणे नाही म्हणत. मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावेअशी दादांची कार्यशैली असे.

दादांचा कारभार ते एका राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत असा असे. सत्तेला मानवी चेहरा असावा’ असे वारंवार म्हटले जाते. दादांनी मराठी जनतेला त्याचा प्रत्यय दिला. त्यांना हे राज्य ‘लोकांचे’ आहे याचा विसर कधी पडला नाही. दादांनी राजकीय विरोधकांचा सन्मान केला. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली. त्यांची राजनीती विरोधकांना विेश्वासात घेऊन काम करण्याचीराज्यशकट हाकण्याची होती. त्यांनी दप्तर दिरंगाई केली नाही- लोककल्याणासाठी लाल फितीचे अडसर धुडकावून लावले. दादांनी त्यांचे आयुष्य सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी समर्पित केले होते. दादांना लोकांचे एवढे प्रेम मिळालेते लोकप्रिय झालेत्यामागे दादांचे हे निखालस माणूसपण आहे. ते कवचकुंडलांसारखे दादांना जन्मत: मिळाले होतेतो त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा भाग नव्हता. असे काही शिकण्यास दादा थोडेच कॉलेजात आणि विद्यापीठात गेले होतेतो संस्कार कृषी संस्कृतीचा होता.

महात्मा फुले कृषिविद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ यांनी  या निरक्षर किंवा अल्पशिक्षित माणसाला मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केलातो दादांधील तथाकथित अडाणी माणसाच्या शहाणपणाचा गौरव होता. दादा पद्मभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित होते. दादांना तो पुरस्कार वयाच्या पन्नासाव्या वर्षीच, 1967 मध्ये मिळाला तेव्हा ते सत्तेवरही नव्हते.

दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झालेतरी त्यांना सलगपणे चार वर्षेही त्या स्थानावर राहता आले नाही. दादांना राजकीय तडजोडी तरी कराव्या लागल्या किंवा हायकमांडला’ नाइलाज म्हणून त्यांच्या हाती सत्ता सोपवावी लागलीतरीही दादांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या सत्ताकाळात काही धाडसी निर्णय घेतले. मुलींना मोफत शालेय शिक्षणाचा निर्णय दादांच्या काळात झाला. मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णयही त्यांचाच होता. विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये काढण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आणि त्यांचा प्रभाव अद्यापही टिकून आहे. ती शिक्षणाच्या खासगीकरणाचीच सुरुवात होय. दादांना अनेकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले. त्याच प्रक्रियेतून साखरसम्राटांच्या बरोबरीने शिक्षणसम्राट तयार झालेपरंतु सरकारला कधीही जमले नसते एवढ्या शैक्षणिक सोयी – विशेषत: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या- महाराष्ट्रात निर्माण झाल्या आणि त्यासाठी इतर राज्यांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ थांबला. पुणे-मुंबईच्या तोडीची व्यावसायिक महाविद्यालये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उभी राहिली. ज्यांना कधी कॉलेजची पायरी चढता आली नसतीती खेड्यातील मुले देशा-परदेशात नाव कमावत आहेत. दादांनी पाणी अडवा-पाणी जिरवा’ हा कार्यक्रम महाराष्ट्राला दिला याची आठवण जलयुक्त शिवाराच्या गदारोळात किती जणांना आहेमिरजेच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना दादांच्या हस्तक्षेपाशिवाय होऊ शकली असती काय?

यशवंतराव चव्हाणवसंतदादा पाटील आणि शरद पवार या त्रयीतील परस्परसंबंधांबाबत समकालीन राजकीय विश्लेषकांनी समजूतदारपणे फार काही लिहिल्याचे ऐकिवात नाही. वास्तविक तिघांचेही राजकीय आणि सामाजिक हितसंबंध सारखे होते; मतदारसंघही एकच होता. त्यांची व्यक्तिमत्त्वे वेगवेगळी होती. त्यात भिन्नता होती आणि परस्परपूरकताही होती. त्यांचे राजकारणही परस्परावलंबी होते. सर्वसाधारण  त्यांचे मतैक्य सामाजिकआर्थिक विकासाबाबत आणि त्यासाठी स्वीकारण्याच्या मार्गांबाबत होतेएकवाक्यता होती. दृष्टिकोन समान होते. कृषी-औद्योगिक क्रांतीसहकारसामाजिक न्यायसर्वसमावेक राजकारण ही उद्दिष्टे समान होती. तो काँग्रेसचाच अजेंडा होता.

यशवंतराव व दादा यांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभागत्यासाठी घडलेला तुरुंगवास आणि त्यातून विकसित झालेला विचारव्यूह यांत एकवाक्यता होती. दादांना यशवंतरावांचे आणि पवारांना त्या दोघांचे नेतृत्व मान्य होते. विशेषत: दादा आणि यशवंतराव यांचे संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून, 1942 च्या चले जाव आंदोलनापासूनचे. प्रगाढ स्नेहआपुलकी आणि विेश्वासाचे. दादांनी पद्ममाळ्याच्या छोट्या लिफ्ट इरिगेशनपासून सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटनापर्यंत यशवंतरावांना वेळोवेळी आवर्जून आमंत्रित केले आहे. त्या दोघांच्या संबंधांत बिघाड झाला तो देशपातळीवरील काँग्रेसच्या राजकारणात गुणात्मक बदल झाला तेव्हा. इंदिरा गांधी आणि त्यांच्या कोटरीने सर्व सत्ता एका हाती केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली 1969 मध्येदुसरी जानेवारी 1978 मध्ये. संघटनेचे राजकारण मागे पडून दरबारी राजकारण प्रभावी झाले. जनाधार असलेल्या नेतृत्वाला जाणीवपूर्वक नेस्तनाबूत करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. इंदिराबाई पक्ष संघटनेला डावलून लोकांशी थेट संवाद साधू लागल्या.

दिल्लीचे उद्दिष्ट महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांचा प्रभाव कमी करणे हे होते. तिरपुडेआदिकअंतुले यांचा झालेला उदय अपघाताने नव्हतातो एक व्यवस्थित आखलेला व्यूह होतायोजना होती. यशवंतरावांना संपवण्याच्या कार्यक्रमात दिल्लीला वसंतराव नाईक आणि वसंतदादा यांची साथ हवी होती. ती मिळत नाही म्हटल्यानंतर दादांचेच खच्चीकरण करण्यात आले.

दादांना 1976मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक वगळण्यात आले. दादा राजकारण संन्यास घेऊन सांगलीला परतले. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुत मिळाले नाही. दादांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलेतेव्हा तिरपुडे वगैरे मंडळींनी दादांचा अपमान आणि अवहेलना करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यातूनच पुलोदचा जन्म झाला आणि पवार यांनी दादांचे सरकार पाडले. पाठीत खंजीर खुपसण्याची नवी राजकीय परिभाषा उगम पावली. पण तो उठाव दादांविरुद्ध वैयक्तिक नव्हतातो दिल्लीविरुद्ध होता. यशवंतराव तो थांबवू शकत नव्हते. कोणी त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ती परिणती दिल्लीतील सत्तासंघर्षाची महाराष्ट्रावर पडलेल्या सावलीचीप्रभावाची होती. शरद पवार यांनी उचललेले ते पाऊल वैयक्तिक सत्ताकांक्षेसाठी असण्याची शक्यताच नव्हती. यशवंतरावांना संपवण्याच्या दिल्लीच्या कारस्थानाची किंमत दादांना महाराष्ट्रात द्यावी लागली.

दादांनी यशवंतरावांच्या विरूद्ध सातारा मतदारसंघातून डिसेंबर 1979 ची लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी दिल्लीने दादांवर दबाव आणला होता. दादांनी स्वत:ची सुटका त्यासाठी शालिनीतार्इंना पुढे करून घेतली. शालिनीताई ती निवडणूक अवघ्या पन्नास हजार मतांनी हरल्या. महाराष्ट्रातील राजकारणात दिल्लीच्या खेळी किती निर्घृण होत्या याची कल्पना त्यावरून येते. दादांना ते वापरले’ जात आहेत याची कल्पना तोपर्यंत आली होतीपण त्याला उशीर झाला होता ! महाराष्ट्राच्या एकसंध राजकारणाचे दूध नासणार होते ते नासलेच. दादांना महाराष्ट्राच्या राजकारणातून सक्तीने निवृत्त करण्यात आले. अंतुले यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपवण्यात आली आणि दादांना राज्यपाल म्हणून राजस्थानात पाठवण्यात आले.

दादांनी राज्यपालपद हे कधी गौरवाचे चिन्ह मानले नाही. दादांच्या स्वाभिमानाला डंख मारण्यात आला होता. राजकारणात असे चालतेच, म्हणून ते सोडून देता आले असते. पण दादांसारख्या मनस्वी माणसाने ते मनाला लावून घेतले. मराठी माणसांचा, महाराष्ट्राचा भरभक्कम पाठिंबा असतानाही, महाराष्ट्राचे शिल्पकार असे ज्यांचे कर्तृत्व त्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांना त्यांच्या अखेरच्या कालखंडात दिल्लीश्वरांच्या राजकारणात सन्मानाची वागणूक मिळाली नाही. महाराष्ट्राच्या सामूहिक मनात ही जखम नेहमी सलत राहील.

– सदा डुम्बरे

(वसंतदादा पाटील यांच्यावरील दशरथ पारेकर यांनी संपादन केलेले पुस्तक ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाले आहे, त्याला लिहिलेली ही प्रस्तावना आहे.)

———————————————————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here