लवथवती

‘लवथवती’ हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वतःची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले गेले तरी ती लय जाणवते. ‘लवथवती’ हा शब्ददेखील तसाच. शंकराच्या आरतीत तो येतो. शंकराच्या आरतीची सुरुवातच मुळी ‘लवथवती’ने होते. शंकराची ती आरती रामदासांनी लिहिली आहे. रामदासांनी प्रेतवत पडलेल्या समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी अनेक आरत्या लिहिल्या. त्यांनीच मारुतीची आरती पण लिहिली. मारुतीच्या आरतीचा नादच असा आहे, की ती म्हणताना अंगात बळ संचारते! शंकराच्या आरतीतही त्यांनी शंकराचे तसेच वर्णन केले आहे.

शंकर ही सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीन अवस्थांपैकी लयाची देवता मानली जाते. शंकराने रुद्रावतार धारण केला, की सृष्टीचा लय होतो असा समज आहे. ह्या ब्रह्मांडाच्या अक्राळविक्राळ माळा त्याच्या नियंत्रणाखाली लवथवतात, डोलतात हे ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ या ओळीत वर्णले आहे.

परंतु ह्या ‘लवथवती’ शब्दाबद्दल पुलंनी एक वेगळी तक्रार केली आहे. पुलं त्यांच्या ‘मी नाही विसरलो’ ह्या लेखात म्हणतात, “ ‘लवथवती’ विक्राळातला ‘लवथवती’ फक्त गणपतीच्या दिवसांत भेटतो. ‘लवथवती’ला त्या आरतीखेरीज लवथवायला का मिळाले नाही? का ही उपेक्षा?”

पण खरे म्हणजे शंकराच्या आरतीखेरीज आणखी एका काव्यात ‘लवथवती’ लवथवलाय आणि तेही साध्यासुध्या नव्हे तर अनिलांसारख्या श्रेष्ठ कवीच्या सर्वांत शेवटच्या ‘तुझ्याविना’ ह्या अत्यंत गाजलेल्या दशपदीत!

‘दशपदी’ हा काव्यप्रकार अनिलांनी मराठीत रूढ केला. त्यांच्या ‘दशपदी’ ह्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दशपदी काव्यसंग्रहात एकूण चाळीस दशपदींचा समावेश आहे. परंतु चाळिसावी ‘आता आनंदाचा दीस’ ही दशपदी अपूर्ण आहे. तीत नऊ पदे आहेत. त्यामुळे एकूण दशपदी एकोणचाळीस आणि ही एकोणचाळिसावी दशपदी आहे ‘तुझ्याविना’.

कवी अनिल म्हणजेच आ.रा. देशपांडे. त्यांच्या पत्नी कुसुमावती ह्याही मोठ्या साहित्यिक. ते दाम्पत्य प्रत्यक्ष जीवनात एकमेकांशी अगदी एकरूप झाले होते. मराठी साहित्यात कुसुमावती आणि अनिल यांचे सुंदर सहजीवन अजोड समजले जाते. कुसुमावतींच्या निधनानंतर अनिल एकटेपणामुळे कोळपत गेले. त्यातूनच त्यांना ‘तुझ्याविना’ ही दशपदी सुचली. त्यातील एकेक ओळ म्हणजे अगदी खणखणीत नाणे आहे. त्या दशपदीत ‘लवथवती’ हा शब्द कसा आला आहे ते पाहा –

लवथवत्या पानावर गहिवरते भर दुपार

ज्वर भरला दिवस ढळे कसा तुझ्याविना.

या ओळींबद्दल अनिल लिहितात, ‘ही दुपार पानांना ‘लवथवती’ करणारी – हा शब्द ‘लवथवती’ विक्राळा या आरतीतील – पण तीच तेव्हा गहिवरते. तिच्या तोडीची दुसरी ओळ सुचणे कठीण वाटले. पण ती गळाला लागली. ज्वर का? तर these were days of feverish activity.

दिवस ढळला अंधार आला.’

हे वाचल्यानंतर एक विचार डोक्यात आला. पुलंनी मांडलेली ‘लवथवती’ शब्दाची कैफियत तर अनिलांच्या कानांवर गेली नसेल? कोणास ठाऊक. पण ‘लवथवती’ शब्दाचे भाग्य मात्र निश्चितच उजळले, एका अप्रतिम काव्याचा अविभाज्य भाग बनून, एवढे मात्र खरे.

– उमेश करंबेळकर

About Post Author

1 COMMENT

  1. Very good.article..very nice…
    Very good.article..very nice write up on tuzyavina .in dashpadi..

Comments are closed.