राम पटवर्धन – साक्षेपी संपादक

4
22
carasole

राम पटवर्धन म्हटले, की आधी ‘सत्यकथा’ मासिक समोर येते. ‘सत्यकथा’ मासिक बंद होऊन बराच काळ निघून गेला. तरीही त्या मासिकाचा आणि राम यांचा वाचकांना विसर पडला नाही. राम गेले त्यानंतर अनेक वर्तमानपत्रे आणि माध्यमे यांनी त्यांच्याविषयी भरभरून लिहिले. वास्तविक त्यांचे व्यक्तित्व त्याला स्वत:ला मागे ठेवणारे आणि प्रसिद्धीपरांङमुख असे होते. कदाचित त्यामुळेच संधी मिळताच त्यांच्या चाहत्यांनी उट्टे भरून काढले असावे.

पटवर्धन हे प्रामुख्याने मराठी साहित्याचे अभ्यासक – श्री.पु. भागवत यांच्या तालमीत तयार झालेले. वाङ्मयाची गोडी इतकी की सरकारी नोकरी न घेता अल्प पगाराच्या संपादकीय कामाचा त्यांनी स्वीकार केला. ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘सत्यकथा’ मासिक यांच्यामुळे मौज प्रेसला एका अड्ड्याचे किंवा विद्यापीठाचे रूप लाभले होते. ‘प्रभात’ दैनिक नुकतेच बंद झाले होते. तरी त्याचे संपादक श्री.शं. नवरे आणि पुढे मौज साप्ताहिकात गुंतलेले वि.घं. देशपांडे यांच्यामुळे निरनिराळ्या राजकीय-सामाजिक मतांतरांचा प्रभाव त्या वास्तूत होता. श्री.पु. भागवत स्वत: एके काळी संघाचे स्वयंसेवक, पुढे काहीसे समाजवादाकडे झुकलेले. मौज प्रेसमध्ये मुद्रणाच्या कामासाठी ए.डी. गोरवाला, भाऊसाहेब नेवाळकर अशा निरनिराळ्या विचारांच्या लोकांचा राबता असायचा. राम प्रामुख्याने साहित्याचा अभ्यास करणारा. ते नवसाहित्याच्या बहराचे दिवस होते. गाडगीळ-गोखले-माडगूळकर-भावे-मोकाशी-शांताराम-पानवलकर-सदानंद रेगे हे सर्व नियमित लिहणारे. अनेकांच्या फेऱ्याही तेथे असायच्या. त्या साऱ्यांचे राम यांच्यावर संस्कार कसे झाले असतील हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे.

‘मौज-सत्यकथा’ यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील स्थान असे काही होते की त्यांनी वाचकांवर संस्कार करावेत अशी अपेक्षाही निर्माण झाली होती. त्या नियतकालिकांचा खप कमी असला आणि ती चालवणे व्यावहारिक पातळीवर अधिकाधिक कठीण होत गेले तरी त्यांचा वाचकांच्या मनावर खोलवर पगडा होता.

मी माझ्या लेखनाची सुरुवात रामच्या प्रोत्साहनाने केली. सांस्कृतिक विषयांवर लिहिण्यासाठी मौजेला फौज उभी करणे आवश्यक होते. मला नाटकात विशेष रस होता. तेवढ्यात रामचे लग्न झाले. तो स्वत: रात्रीची नाटके पाहू शकत नव्हता. मी नाटक-सिनेमांवर परीक्षणे लिहू लागलो. मला तो स्वातंत्र्य तर द्यायचाच आणि लागेल ते मार्गदर्शनही करायचा. हळुहळू, मी मोठ्या योजनांतही भाग घेऊ लागलो. त्या किंचित पत्रकारितेतून मी मराठी लिहायला शिकलो.

राम यांनी सुरुवात मुद्रितशोधक म्हणून केली असणार. परंतु संपादक म्हणजे फक्त लाल पेन्सिल घेऊन शुद्धलेखन तपासणारा नव्हे हे ज्या थोड्या संपादकांनी जाणवून दिले त्यांत राम हे महत्त्वाचे आहेत. ‘मौज’ साप्ताहिकाची एकूण जबाबदारी सांभाळताना लेखक आणि विषय शोधून काढणे, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यातील उत्कृष्ट ते लेखन काढून घेणे हे गुण रामने वाढवले. ‘मौज’ साप्ताहिक लवकरच बंद झाले; ते फक्त दिवाळी अंकाच्या रूपात जिवंत आहे.

त्यानंतर राम ‘सत्यकथा’ मासिकासाठी साहित्याची निवड हे महत्त्वाचे काम निष्ठेने करत राहिले. गंमतीची गोष्ट म्हणजे मला पत्रकारितेतून लेखक-समीक्षक वर्गात बढती मिळाली नाही. मी निव्वळ वाचक राहिलो. तेव्हा अनेक नवकथाकार आणि नवकवी जोमात होते. अनेक कारणांमुळे ‘सत्यकथा’ मासिकाकडे एका विशिष्ट साहित्यिक दृष्टीचे नायकत्व आले आणि काही प्रमाणात त्यांची दृष्टी ‘आग्रही’ झाली. त्या सुमारास मराठी साहित्यात नवीन प्रवाह दिसत होते. एका विशिष्ट आवर्तात गुंतल्यावर नवीन प्रवाह सामावून घेणे किती कठीण असते याचा मला पॉप्युलर प्रकाशनाच्या कामात अनुभव आहे. नवकथाकार आणि नवकवी यांच्यात ‘सत्यकथा’ मासिक गुंतून पडले होते. नंतर ग्रामीण-दलित-स्त्री साहित्य असे नवीन प्रवाह येऊ लागले. ‘मौजे’च्या पठडीतील काही लेखकांना श्रीपु-राम यांनी नेटाने समोर आणले. काही ग्रामीण लेखक त्या पूर्वीच लिहीत होते. त्यांत नवीन लेखक त्यांच्यापर्यंत पोचू शकल नाहीत. त्यांचे दलित लेखकांशी मात्र निष्कारण वाकडे आले. त्यातून काही चांगली अनियतकालिके निर्माण झाली हा त्याचा अप्रत्यक्ष फायदा.

ज्या लेखकांना ‘मौजे’चे धोरण पोषक वाटले ते लेखक राम यांनी आम्हाला घडवले असे प्रौढीने सांगू लागले; तर काही आपण फार एककल्ली लिहू लागू या भीतीने पळ काढत. एके काळी छोटे जी.ए. समजले जाणारे प्रभाकर लक्ष्मण मयेकर हे ‘त्यामुळेच ते पुढे नाटकांकडे वळले’ असे मला सांगत. राम यांच्या संपादकीय कौशल्याच्या अशा दोन्ही बाजू आहेत.

माझा लेखक म्हणून ‘सत्यकथा’ मासिकाशी संबंध आला तो आमच्या ‘पॉप्युलर’च्या मराठी विभागाला पंचवीस वर्षे झाली त्या निमित्ताने. व्यवहारत: आम्ही मराठी पुस्तकांवर मुळीच अवलंबून नव्हतो. आमचा खरा व्यवसाय इंग्रजी पुस्तकांचा. मराठीतील माझ्या लेखकांची गुणवत्ता आणि त्यांचा दरारा यांमुळे माझ्या इंग्रजीतील पुस्तकप्रकाशनाकडे मराठी वाचकांचे फारसे लक्ष नाही. व्यवसायाच्या मानाने मराठी पुस्तकांच्या कामात माझा वेळ खूप जायचा आणि दूषणे मात्र भरपूर मिळायची. मी लेख लिहून राम यांच्याकडे पाठवला तो बराच कडवट होता. रामने मला पटवले की माझा वैताग प्रामाणिक असेलही, तरी ज्या रजतजयंतीच्या निमित्ताने मी लिहीत होतो त्या प्रसंगाला तो लेख शोभण्यासारखा नाही. एकदा, माझ्या मनातील खवखव निघून गेल्यावर मी तो लेख फाडून नव्याने व्यवस्थित लिहू शकलो. माझ्या मर्यादा राम यांच्या लक्षात आल्या असणार. नंतर त्याने मला काही लिहायला सांगितले नाही. तरी माझ्या लेखनप्रवासातील राम यांचे ऋण मी विसरू शकत नाही.

पटवर्धनांनी स्वत:च्या अखत्यारीत ‘सत्यकथा’सारख्या वाङ्मयीन मासिकात ‘परिक्रमा’ हे माहितीपर सदर सुरू केले. कदाचित त्यांना ‘सत्यकथा’ मासिक फारच कलावादी भूमिकेकडे वळत आहे याची जाणीव झाली असावी. त्या सदरातून साहित्याच्या आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील देशापरदेशांतील महत्त्वाच्या घडामोडींची नोंद घेतली जाई. चिरंतन साहित्याचा शोध घेणाऱ्या ‘सत्यकथा’ मासिकात त्या प्रासंगिक घडामोडींना कितपत स्थान दिले जावे हा एक कूटप्रश्न होता. एकूण सर्वसमावेशक विचार करणे आवश्यक आहे ही त्यामागील राम यांची भावना असावी. परंतु तो मार्ग त्या मासिकाच्या दृष्टीने कदाचित योग्य नसावा.

त्या सर्वसमावेशक दृष्टीचे मराठी समाजात गंमतीदार नमुने आहेत. एका बाजूने आधुनिक युगातील उदारमतवाद, यंत्रावतार, लोकशाही अशा मूल्यांचे आकर्षण वाटत असताना काही भारतीय सरंजामी मूल्ये, भारतीय संस्कृती, गाव-भाषा-जात यांवर आधारलेल्या जवळिकीची ओढ मराठी समाजाला वाटत असते. ज्या थोर लेखकांचा परिणाम माझ्यावर झालेला आहे अशा कुसुमाग्रज, विंदा करंदीकर अशांविषयीदेखील मला ते कोडे आहे. गंगाधर गाडगीळ किंवा जी.ए. कुलकर्णी यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाविषयी मराठी वाचकांना उत्सुकता आहे पण त्यांना त्यासाठी कोणत्याही लेबलांची आवश्यकता वाटत नाही. या उलट वि.दा. सावरकर किंवा पु.भा. भावे यांची हिंदुत्वनिष्ठा स्पष्ट आहे. अण्णाभाऊ साठे किंवा नारायण सुर्वे मार्क्सवादी शिक्का नाकारणार नाहीत. कुसुमाग्रज-विंदा यांनी खूप काळ विविध प्रकारचे वाङ्मय लिहिले आहे. त्यावर विविध संस्कार मधूनमधून दिसत असतात. परंतु त्यांची निष्ठा कोठे आहे ते नीटसे कळत नाही. मार्क्स, फ्रॉईड आणि आईनस्टाईन यांचा नावानिशी उदोउदो करणारे करंदीकर मधूनच तुळशीवृंदावनाची आठवण गहिवरून काढतात आणि प्रत्यक्ष आयुष्यात गांधींची अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि साधेपणा यांचे पालन करत!

राम पटवर्धन यांच्या बाबतींतीलही ते कोडे मला कधीच सुटले नाही. मी माझ्या तरुण वयात सुरुवातीला भालचंद्र देसाई आणि नंतर राम पटवर्धन यांच्या वाङ्मयीन विचारांनी घडत गेलो. पुढे माझ्यावरही वा.ल. कुलकुर्णी, श्री.पु. भागवत यांचे साहित्यिक आणि नानासाहेब गोरे, जयप्रकाश नारायण अशांचे समाजवादी संस्कार होत गेले. त्या काळात माझा राम यांच्याशी संपर्क तुटला होता. तो स्वत:चे कलावादी संस्कार आणि जीवनाची सर्वसमावेशक दृष्टी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे हे मी लांबून पाहत होतो. तरी लोकशाही समाजवाद, सर्वधर्मसमभाव, सर्ववंशसमभाव, सर्वभाषा आणि सर्वजातिसमभाव या उदारमतवादी गांधीवादी विचारांविषयी रामला काय वाटते ते मला कधी कळले नाही! त्याच्याशी ज्यांचा अधिक सातत्याने संबंध होता त्यांनाही याची कल्पना कधी आल्याचे दिसत नाही.

माझ्या आयुष्यात मी अनेक प्रतिभावंतांच्या जवळ आलो. त्यांना समजून घेताना एक जाणीव सातत्याने झाली. प्रत्येक व्यक्ती हे एक जिगसॉ चित्रकूट आहे. त्या कोड्यामधील एखादा तुकडा हरवतो तो मला स्वत:ला पुरवावा लागतो. तो पुरवण्याची ताकद नसेल तर ते चित्र पूर्ण करण्याचा अधिकार मला नसतोआणि तशी शक्यताही निर्माण होत नाही. श्री.पु. भागवत यांनी राम पटवर्धन यांना ‘त्यांचा अभिन्नजीव सहकारी’ म्हटले आहे. तरी ते एकमेकांना किती समजले असतील? माझा राम पटवर्धन यांच्याशी संबंध १९५१ पासूनचा, पण पुढे काहीसा विरलेला, तरी परस्पर प्रेमाच्या साक्षीने. मला राम पूर्णत्वाने समजणे कठीणच खरे. या नामुष्कीचा विचार करताना लक्षात आले की मीही त्याच्याच पिढीतील बहुसंस्कारी. मला मी तरी कितपत समजलो आहे?

– रामदास भटकळ

Previous articleगंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू
Next articleआर.के. लक्ष्मण – राजकीय व्यंगचित्रकलेचे शिखर
रामदास भटकळ यांचा जन्म 5 जानेवारी 1935 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एलएल. बीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून एम.ए. पूर्ण केले. पॉप्युलर या मराठी पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. त्यांनी प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या ‘इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस’मध्ये तीन महिन्याची नोकरी केली. त्यांनी यु.एस.स्टेट डिपार्टमेंटच्या निमंत्रणावरुन 1965 साली अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला. रामदास भटकळ यांनी ‘बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन’ व ‘कॅपेक्सिल’ या निर्यातदारांच्या संस्थेच्या ‘बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल’चे अध्यक्षपद भुषविले आहे. त्यांनी ’द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया’, ‘जिगसॉ’, ‘मोहनमाया’, ‘जगदंबा’, ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. भटकळ हे महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9820871408

4 COMMENTS

 1. रामदास भटकळ यांनी रामभाऊ
  रामदास भटकळ यांनी रामभाऊ पटवर्धन यांच्या जागवलेल्या आठवणी खूप बोलक्या, संपादन व्यवहाराच्या नैतिकतेला स्पर्श करणा-या. राम पटवर्धन हे अनेकांचे सुप्त शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रयोगशील साहित्याचे नि:सिम पुरस्कर्ते. शुभेच्छा. कमलाकर सोनटक्के.

 2. रामभाऊ भटकळांवर रामदास भटकळ
  रामभाऊ, भटकळांवर रामदास भटकळ यांचं विस्तृत टिपण खूप प्रत्ययकारी, संपादन प्रांतातील व्यवहार आणि नैतिकतेच्या सीमारेषा स्पष्ट करणारं.
  विविध क्षेत्रातील प्रसिध्दी पराण्मुख पथप्रदर्शकांविषयी अधिक सामग्री आल्यास उपकारक ठरेल. शुभेच्छा, कमलाकर सोनटक्के.

 3. भटकळांचं माणसांविषयीचं लिखाण
  भटकळांचं माणसांविषयीचं लिखाण चांगलंच असतं. त्यांनी पाडगावकरांवरही छान लिहिलं आहे. तसंच हेसुद्धा छान, पटवर्धनांच्या अनेकांगांना स्पर्श करणारं झालं आहे. पण शेवटी ’कुणीच कुणाला – अगदी स्वतःलाही – पूर्णपणे ओळखत नसतो,’ या गोलमाल विधानामागे ते विनाकारण दडतात. १९५१ पासूनची ओळख काही एक ठोस विधान करण्यास पुरेशी आहे!

Comments are closed.