राजुल वासा यांची ‘वासा कन्‍सेप्‍ट’ गाजतेय फिनलँड’मध्‍ये!

carasole1

मुंबईच्या एका महिलेचा येत्या ८ मार्चला जागतिक महिलादिनी मोठा गौरव होणार आहे. तिच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर युरोपातील फिनलँडमधील तुर्कु येथील उपचार केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी प्रत्यक्ष केंद्रस्थानी टुरकूचे महापौर, पालकमंत्री व अन्य मान्यवर असा मोठा लवाजमा हजर असणार आहे. मुंबईच्या त्या महिलेचे नाव डॉ. राजुल वासा असे आहे. तिने गेल्या दोन –तीन वर्षांत उत्तर युरोपात फिनलँड, स्वीडन या देशांमध्ये चमत्कार घडवून आणला आहे. अनेक मेंदुबाधित रुग्णांवर तिने मुख्यत: व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार सुचवून क्रांतिकारी सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामुळे त्या भागात डॉ. राजुल वासा हे नाव कौतुकादराने घेतले जाते.

राजूल वासा हिची उपचार पद्धत तिच्या ‘वासा’ या नावाने ओळखली जाते. तिचा लाभ झालेल्या रुग्णांमध्ये एक आहे ‘पेक्का हुसालो’. तो फ्री स्किइंग खेळाचा बादशहा! फिनलँडमधील सर्वांत लोकप्रिय खेळ तोच. त्यामुळे त्या देशात पेक्काला आपल्याकडील सचिन तेंडुलकरसारखे उच्चतम स्थान होते. परंतु पेक्का पाच वर्षांपूर्वी २६ एप्रिल २०१० रोजी झालेल्या एका अपघातात जबर जायबंदी झाला. त्याच्या मेंदूस दुखापत झाली आणि त्याला हालचालच करता येईना. जगातील सर्व तऱ्हेचे उपाय झाले. परंतु गुण आला नाही. तेव्हा फिनलँडमधील डॉ. राजुल वासा यांच्या एका रुग्णाने (मारकू) पेक्‍काला ‘वासा कन्सेप्ट’ने उपचार घेण्याचे सुचवले. पेक्‍काने लगेच डॉ. वासा यांच्याशी संपर्क साधला व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार चालू केले आणि जे पाच वर्षांत झाले नव्हते ते सहा महिन्यांच्या उपचाराने साध्य केले. पेक्काच्या प्रकृतीत झपाझप सुधारणा होऊ लागली. पेक्का तोल सांभाळू लागला. त्याला मधून मधून भोवळ येईल असे वाटे, ती भावना नष्ट झाली. तो उठून बसू लागला, उभा राहू लागला, पावले टाकू लागला, दौडू लागला. हा त्याच्यासाठी चमत्कारच होता. परंतु डॉ. राजुल वासासाठी ती सर्वसाधारण गोष्ट आहे. शरीराचा गुरुत्वमध्य पकडून, त्याच्या आधारे, मेंदूच्या साहाय्याने रुग्णावर उपचार सुरू केल्यास रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. हे तिने भारतात दोन-अडीचशे मुलांवर सिद्ध केले आहे. विशेषत: सेरिब्रल पाल्सी मुलांसाठी ती उपाय योजना प्रभावी ठरली आहे.

डॉ. राजुल वासा म्हणतात, की वैद्यकीय क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांत बरीच प्रगती झाली असली तरी मेंदुबाधित रोगांवर (सी.पी. व पॅरालिसिस) काहीही निश्चित उपाय योजना निर्माण झालेली नाही. रोग्याला आहे त्या अवस्थेत सुखाने ठेवण्याचा प्रयत्न करणे व त्यासाठी नवनवीन साधने संशोधून ती विकणे हाच वैद्यकिय उद्योगाचा फायदेशीर व्यवहार ठरत आलेला आहे. त्यामुळे ‘वासा उपचार पद्धती’ समोर येताच सारे जग त्या पद्धतीकडे कुतूहलाने पाहू लागले. डॉ. राजुल वासा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपचार सुचवून बरे केलेले रुग्ण अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, काही आफ्रिकी देश, अशा ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे डॉ. राजुल वासा उपचार पूर्णपणे विनामूल्य करतात. त्यांचे क्लिनिक नाही. त्या स्वत: दर रविवारी मुंबईत भाड्याने हॉल घेतात. तेथे रुग्णांना अपॉइंटमेंटनुसार बघतात. त्यांच्या जोडीला त्यांनी स्वत: प्रशिक्षित केलेले दहा-बारा तरुण असिस्टंट व त्यांच्या साथीदार तृप्ती सिंघाला असतात. राजूल वासा दर रविवारी किमान चाळीस रुग्ण बघतात. त्या रुग्णांशी ऑनलाइन संपर्क करतात व त्यांना व्यायाम प्रकार देऊन आपल्या असिस्टंटकडून करवून घेतात. तसेच, रुग्णाच्या नातेवाईकांना व्यायामप्रकार शिकवतात, जे घरी जाऊन रोज रुग्णाकडून ते नातेवाईक करवून घेतात. ते कसोशीने केले जातील यावर डॉ. राजुल वासा यांचे लक्ष असते.

सहा महिन्यांपूर्वी नाशिक महानगरपालिकेचे सभाध्यक्ष सलीमभाई शेख आणि रामबंधु मसालेफेम हेमंत व अपर्णा राठी यांच्या पुढाकाराने ‘वासा उपचार पद्धती’चे केंद्र नाशिकमध्ये सुरू झाले. तेथे सध्या शंभराहून अधिक रुग्ण या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन बरे होत आहेत.

नाशिकच्या या केंद्रानंतर ‘वासा उपचार पद्धती’ने एकदम हनुमान उडी मारली आहे ती उत्तर युरोपात!

स्वीडनमधील ‘उमीयो स्टोक सेंटर’ हे मेंदुबाधित रुग्णांसाठी उत्तर युरोपातील सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यांनी ‘वासा उपचार पद्धती’ची दखल घेतली असून तेथेही ‘वासा कन्सेप्ट’ वापरली जाते. तेथे ‘वासा कन्सेप्ट’वर सशोधनही होत आहे. तसेच, फ्रान्समधील शास्त्रज्ञ क्रिश्चन बेयट हे ‘वासा उपचार पद्धती’बद्दल संशोधन प्रबंध लिहीत आहेत.

राजुल वासा
rajul@brainstrokes.com

– आशुतोष गोडबोले

डॉ. राजुल वासा यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा फिनलँडमधील तुर्की येथे सत्कार!

मुंबई:  मेंदुबाधित रोग्यांवरील ‘वासा संकल्पने’वर आधारित उपचार पद्धतीचे शिक्षण महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दिले जाईल अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांनी केली. ते फिनलँडमधील तुर्कू येथील उपचार केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. त्यांच्या हस्ते महिला दिनी डॉ. राजुल वासा यांचा सत्कार करण्यात आला. तुर्कू येथील कार्यक्रमात तेथील महापौर अॅलेक्सी रँडेल जगप्रसिद्ध स्की खेळाडू पेक्का हुसाला उपस्थित होते. पेक्का एका अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना पांगळेपणा आला होता. जगभरातून पाच वर्षे उत्तम उपचार घेऊन सुधारणा नव्हती, ती त्यांना काही महिन्यांच्या अवधीत ‘वासा उपचारपद्धती’मुळे लाभली. त्यामुळे अशा रुग्णांसाठी त्यांनी ‘फाइट बँक’ नावाची संस्था सुरू केली. संस्थेतर्फे तुर्कू येथे ‘वासा उपचार केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले, त्यावेळी तावडे व डॉ. राजुल वासा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाषणे केली.

तावडे म्हणाले, की महिला दिनी डॉ. राजुल वासा यांचा असा सन्मान व्हावा ही मोठी गौरवाची गोष्ट आहे, त्यामुळे मला या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा विशेष आनंद वाटतो.

तिकडे तुर्कूचे महापौर अॅलेक्सी रँडेल यांनी उद्घाटन करताना सांगितले, की ‘वासा उपचार पद्धत’ मेंदुबाधित रुग्णांसाठी गेले वर्षभर वापरली जाते व ती परिणामकारक आहे हे लक्षात आल्यामुळे लोक ती अवलंबतात आणि म्हणूनच या नियमित केंद्राची गरज वाटली. या केंद्राच्या यशस्वीतेनंतर तशी केंद्रे गावोगाव सुरू होतील अशी आशा आहे.

तावडे यांनी महापौरांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. तेव्हा तुर्कूमधील श्रोतृवृंद व मुंबईतील श्रोतृवृंद यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

याचबरोबर भारतीय महिलेने संशोधिलेल्या उपचारपद्धतीस पाश्चात्य जगात प्रथमच मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्रात नासिक महापालिकेचे सभाध्यक्ष सलीम शेख यांच्या पुढाकाराने तेथे वर्षभरापूर्वी ‘वासा उपचारकेंद्र’ नियमित सुरू झाले आहे. मुंबईमध्ये तशी सोय दर रविवारी असते. राजुल वासा विनामूल्य उपचार सुचवतात. मेंदूमधील ज्या बिघाडाने रोग्याला अपंगत्व येते व ज्यावर कोठलीही उपचार पद्धत काम करत नाही. तेथे व्यायामांद्वारा हस्तक्षेप सुचवणारी पद्धत डॉ. राजुल वासा यांनी संशोधिली आहे. त्यांनी समारंभात त्यांच्या संशोधनाची कहाणी सांगितली व त्याला पूरक असे दृक्श्राव्य सादरीकरण नीतिन सिंघाला यांनी केले.

‘राजुल वासा फाउंडेशन’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ यांच्या वतीने मुंबईतील समारंभ संयोजित करण्यात आला होता व तंत्रसहाय्याने तुर्कू समारंभाशी जोडण्यात आला होता.

Last Updated On – 10th Mar 2016

3 COMMENTS

  1. आपली माहिती खूप अभ्यास पूर्ण
    आपली माहिती खूप अभ्यासपूर्ण असते. आपल्या या उपक्रमास शुभेच्‍छा.

  2. उजवी मांडी ते sholer पर्यंत…
    उजवी मांडी ते sholer पर्यंत मुग्या व बधिर पणा आलेला आहेत . दिनांक 26।09।16 रोजी मेंदूत रक्तची cloat झाले होते उपचार दर म्यां mir केले होते . या नंतर बधीरपण गेलेला नाही . कृपया मार्गदर्शन वाहवे

  3. नमस्कार, …
    नमस्कार, माझी मुलगी प्रचिती योगेश ठाकरे 2.7वर्षाची आहे. मात्र ती आजून बसत नाही. आमची रेग्युलर थेरपी चालू आहे.ती सर्वाना ओळखते बोलते, मात्र शारीरिक हालचाल योग्य होत नाहीत. तरी आम्हाला मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.*योगेश ठाकरे*

Comments are closed.