‘रक्ताचं नातं’

0
14

‘रक्ताचं नातं’ ही अनेकदा अतिशय सहजपणे वापरली जाणारी संज्ञा आहे! त्यामुळे वास्तवात ती मर्यादित; खरंतर संकुचित अर्थाने वापरली जाते. मात्र ‘रक्ताच्या नात्या’ला मोठा अर्थ प्राप्त करून देणारी एक संस्था पुण्यात मोलाचं काम करते. संस्थेचं नावच आहे ‘रक्ताचे नाते’ ट्रस्ट!

आजारपण, शस्त्रक्रिया, अपघात अशा विविध कारणांसाठी गरज पडते ती रक्ताची. कधी विशिष्ट गटाच्या साठवलेल्या रक्ताने काम होऊन जाते तर कधी ताज्या रक्ताची आवश्यकता असते. विशेषत:, रुग्ण अत्यवस्थ असताना रक्त मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ रुग्णाच्या नातेवाईकांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यातून रक्तगट दुर्मीळ असेल किंवा ताज्या रक्ताची व विशिष्ट गटाच्या रक्तदात्याची आवश्यकता असेल तर अवस्था खूपंच बिकट होऊन जाते. रुग्णाच्या देखभालीत आणि त्याच्याबद्दलच्या काळजीत आधीच व्यग्र असलेल्या नातेवाईकांना
ब-याचदा अक्षरश: हतबल व्हायची पाळी येते. विशेषत:, ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी गेलेल्यांची अवस्था तर विचारातही घेऊ शकत नाही.

‘रक्ताचे नाते ट्रस्ट’ ही अशा लोकांसाठी उभी राहिलेली संस्था आहे. कोणत्याही रुग्णाला रक्ताची आवश्यकता असेल तर संस्थेचे कार्यकर्ते ते उपलब्ध करून देतात. संस्थेचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे दहा हजारांहून अधिक रक्तदात्यांची फौज!. या रक्तदात्यांची नावं, पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, रक्तगट, वैद्यकीय इतिहास अशी सुसज्ज माहिती संस्थेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे गरजेप्रमाणे आवश्यक त्या रक्तदात्यांशी अल्पावधीत संपर्क साधता येऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत हाकेसरशी धावून येतील अशा किमान पन्नास रक्तदात्यांना काही मिनिटांत एकत्र करण्याची यंत्रणा संस्थेकडे आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या जर्मन बेकरी बाँबस्फोटासारख्या दुर्घटनांच्या वेळी संस्थेचा हा ‘रॅपिड ऐक्शन फोर्स’ उपयुक्त ठरत आला आहे.

ट्रस्टचे संस्थापक आणि मुख्य विश्वस्त राम बांगड हे आहेत. ते पुण्याच्या पूर्व भागात, जुन्या पुण्यातल्या खडकमाळ आळी या भागात लहानाचे मोठे झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण करून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरीला नुकतीच सुरुवात केली त्या काळात; म्हणजे 1977 मध्ये त्या भागात दुर्घटना घडली. एका इमारतीची भिंत कोसळून त्या
ढिगा-याखाली बारा वर्षांची मुलगी गाडली गेली. स्थानिक नागरिकांनी ढिगारा उपसून तिला बाहेर काढलं तेव्हा ती गंभीर जखमी अवस्थेत होती. थोडी धुगधुगी शिल्लक होती! तिला ताबडतोब ससून रुग्णालयात नेले गेले. त्यावेळी तिला तातडीनं रक्ताची आवश्यकता होती. तिच्या पालकांची रक्त मिळवण्यासाठी झालेली कुतरओढ बांगड यांचं काळीज हेलावून गेली.

काही वर्षांनंतर; 1997 मधे बांगड यांच्या अनिल बिहाणी या मित्राच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रम करायचा म्हणून त्यांच्या मित्रांनी मॉडर्न प्रशालेत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात रक्ताच्या तीनशेपासष्ट पिशव्यांचं संकलन झालं. बांगड या शिबिराच्या आयोजकांपैकी एक होते. या शिबिरापासून त्यांना प्रेरणा मिळाली आणि ‘रक्ताच्या नात्या’ची रुजवात झाली.

सार्वजनिक जीवनात विविध संस्था-संघटनांमधे काम करताना भेटलेले संवेदनशील कार्यकर्ते; बँकेतले सहकारी आणि कामगार संघटनेचं काम करताना मिळालेले सहकारी यांच्या मनात त्यांनी रक्तदानाचं महत्त्व बिंबवलं आणि ‘रक्ताचे नाते’च्या रोपटयाचा आधारवड झाला.

संस्थेनं आणखी एक पाऊल पुढे टाकून नेत्रदानाबद्दल जाणीवजागृतीचं काम हातात घेतलं आहे. रक्तदात्यांना नेत्रदानाचं महत्त्वं पटवून दिलं जातं आणि त्यांच्याकडून मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जातात.

– श्रीकांत टिळक

Previous articleलेकास निरोप
Next articleगझल तरुणाईची
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.