यजुर्वेंद्र महाजन – स्पर्धेला साथ मानवी जिव्हाळ्याची!

1
54
_YajurvendraMhajan_SpardhelaSathaManviJivhalyachi_1.jpg

जळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या कार्याचा मूळ गाभा ग्रामीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे हा आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांपैकी मनाला स्पर्श करणारे काम आहे ते अंध-अपंगांना तशा परीक्षांसाठी तयारी करून घेण्याचे. त्याकरता भारतातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात व त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. तयारीच्या काळात त्यांची राहण्या-जेवण्याची सोय तशीच विनामूल्य केली जाते. यजुर्वेंद्र यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे. त्यांचे आजोबा मुख्याध्यापक होते आणि वडील अनिल महाजन डॉक्टर होते. आजोबा शिस्तप्रिय. ते रविवारीसुद्धा शाळेत जाऊन काम करत असत. वडील केवळ एक रुपया घेऊन रुग्णांना औषधोपचार करत असत. यजुर्वेंद्र महाजन म्हणतात, “त्या दोघांकडून समाजसेवेचा वारसा आपसुकच माझ्याकडे आला.” त्यांनी बारावीच्या परीक्षेनंतर डॉक्टर व्हावे असा घरच्यांचा आग्रह होता, पण त्यांना स्वतःला त्यांचा पिंड भाषेचा असल्याचे जाणवत होते.

यजुर्वेंद्रांनी वेगळा मार्ग निवडला. ते स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी, बी.ए.चा अभ्यास करत असताना प्रेरित झाले. त्यांच्या मनीमानसी ‘जे इतरांसाठी जगतात ते ख-या अर्थाने जगतात आणि जे स्वतःसाठी जगतात ते मृत असतात’ हा विवेकानंदांचा विचार भिनला आणि पुढील वाटचाल स्वच्छ दिसू लागली. त्यांनी पदवी मिळवल्यावर ते पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता आले. नंतर ते  समुपदेशक झाले. परंतु त्यांना अधिकारी होऊन केवळ एकट्याच्या आयुष्याला आकार देण्यात रस वाटत नव्हता, म्हणून ते उच्च अधिकारपदांचे मोह सोडून खानदेशात परतले.

ग्रामीण भागातील फार थोडी मुले उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न बघत असतात आणि त्यांनाही योग्य व अर्थपूर्ण मार्गदर्शन मिळतेच असे नाही. शिवाय, बौद्धिक कसरत आणि बौद्धिक मेहनत यांतील फरक मुलांना समजावून देण्यात येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे ठिकठिकाणी दिसत असली तरी यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या अल्प असते. यजुर्वेंद्र महाजन यांनी खानदेशाच्या भूमीतून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी घडवण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी काही सहका-याच्या सोबतीने ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ची स्थापना २००५ साली केली. सक्षम अधिकारी निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवून काम सुरू झाले. त्यांनी प्रारंभिक कामासाठी लागणारा पैसा वडिलोपार्जित शेतजमीन आणि घर विकून उभा केला. तेव्हा कुटुंबात साहजिकच थोडीफार खळबळ उडाली. मात्र यजुर्वेंद्रांची जिद्द, हट्ट आणि दुराग्रह यांमुळे त्या काळजीचे रूपांतर विश्वास आणि प्रोत्साहन यांत झाले. त्यांची आई सुमती महाजन सार्थ अभिमानाने आणि कौतुकाने सांगते, “यजुर्वेंद्रच्या मनात प्रेमाचा साठा अफाट आहे. तो संपतच नाही. तो कोठून एवढा प्रेमभाव घेऊन आला आहे तेच समजत नाही. त्याच्या मनात सर्वांप्रती आपलेपणा असतो. तो अफाट काम करतो.” सुमती यांचे माहेर रावेर तालुक्यात बनवाडीला. त्यांना माहेर-सासर, दोन्हीकडे सुसंस्कृत वातावरण लाभले. त्या म्हणतात, “यजुर्वेंद्र आठवी-नववीत होता तेव्हापासून तो दुसर्यावच्या उपयोगी पडत आला आहे. जाता-येता, त्याची कोणाचेतरी  काहीतरी काम करण्याची सवय विकसित झाली आहे. त्या सवयीचेच मूर्त स्वरूप म्हणजे ‘दीपस्तंभ’.”

यजुर्वेंद्र महाजन यांच्या पत्नी मानसी ‘दीपस्तंभ’च्या कामात सक्रिय सहभागी असतात. त्यांची दोन छोटी मुले – ओवी आणि श्लोक हीदेखील त्याच वातावरणात घडत आहेत.

‘दीपस्तंभ’साठी महाजन यांना सुरेश पांडे, भरत अमळकर यांसह अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रयत्नांनी ग्रामीण, आदिवासी, शेतमजुरांची मुले UPSC/ MPSC परीक्षा देऊन अधिकारी होऊ लागली आहेत. ती संख्या सहाशेच्या वर पोचली आहे. महाजन यांचे काम शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचा हेतू बाळगत चालू आहे. आजवर ‘दीपस्तंभ’तर्फे एक लाख आठशे व्याख्यानांतून सहा लाख तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यांचे सत्तावीस विद्यार्थी मागील दोन वर्षांत अधिकारी होऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत. यजुर्वेंद्र महाजन यांनी स्वतःला आता मात्र दिव्यांगांना आत्मग्लानीतून बाहेर काढून त्यांना आनंदी जीवन देणे या कार्यासाठी वाहून घेतले आहे. ‘दीपस्तंभ’ ही सेवाभावी संस्था समाजातील अंध, अपंग, अनाथ, आदिवासी, ग्रामीण युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असते. त्यांच्या पाठीशी शेकडो  माणसे वेगवेगळ्या माध्यमांतून उभी राहिली आहेत. राजेंद्र भारुड (मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद) हे त्या चळवळीचे बिनीचे शिलेदार. त्यांनी महाजन यांची व्याख्याने सोलापूर जिल्ह्यातील अकराशे शिक्षक आणि बाराशे ग्रामसेविका यांच्यासाठी आयोजित केली. व्याख्यानांचे विषय ‘आनंदी यशस्वी जीवन आणि प्रभावी कार्यसंस्कृती’ या संदर्भात होते. महाजन यांची व्याख्याने व्यक्तिगत विकासाबरोबर सामाजिक जाणीव विकसित करण्याचे काम करतात. काही ग्रामसेविकांनी एकत्र येऊन पन्नास हजार रुपयांचा निधी ‘दीपस्तंभ’साठी महाजनांच्या सुपूर्द केला! महाजन यांच्या मते, ती प्रशासकीय क्षेत्रातील अभूतपूर्व अशी घटना आहे. महाजन स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी व्याख्याने देतात. ती ध्वनिमुद्रित आहेत. तसेच, त्यांची मार्गदर्शनपर अशी नऊ पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

महाजन यांचे वाक्चातुर्य कौतुकास्पद आहे, पण त्याला जोड कार्यकर्तृत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी अफाट माणसे जोडली आहेत. पुन्हा अधिकार पदावरील माणसे असल्याने त्यांचे संपर्क दांडगे असतात. प्रत्येक वेळी यजुर्वेंद्र महाजन म्हणतात, “एक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी संस्थेशी जोडले गेले. ‘चला आपण सर्व मिळून हे जग आणि आपले जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण करूया’ या वाटेवरून अनेकांना घेऊन जाताना ‘दीपस्तंभ’ने विविध प्रकल्प उभारले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गरीब दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा निवासी प्रशिक्षण केंद्र ‘गुरुकुल’ या नावाने सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात बिकट परिस्थितीवर आणि इतर संकटांवर मात करून काही विद्यार्थी उत्तम गुणांसह पदवीधर होतात. अशा विद्यार्थ्यांना ‘गुरुकुल’ या प्रकल्पामध्ये प्रवेश दिला जातो. स्पर्धा परीक्षांसाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा व मुलाखती यांद्वारे गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांची मुले, व्यसनग्रस्त किंवा आजारी कुटुंबांतील मुले, घटस्फोटीत तरुण महिला, वडिलांचा मृत्यू झाला असेल अशा घरातील मुले, देवदासी भगिनींची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांझची मुले अशांतून कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत मार्गदर्शन करण्यात येते. तसे सत्तरच्या वर विद्यार्थी ‘दीपस्तंभ’मध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांपैकीच निर्मला प्रेमसिंग पावरा (एस.टी.आय.) म्हणते, “मी चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या उमरटी या आदिवासी पाड्यावर राहते. माझ्या वडिलांना दिसत नाही, आई शेतात काम करते. ‘दीपस्तंभ’च्या या योजनेमध्ये माझी एक वर्ष निवास, भोजन आणि प्रशिक्षण यांची व्यवस्था झाल्याने मी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर निरीक्षक झाले आहे. माझ्या आईवडिलांना मी काय यश मिळवले आहे हेही समजत नाही.” वझर (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील आणखी एक विद्यार्थिनी म्हणते, “’दीपस्तंभ’ सदस्य आणि सगळे देणगीदार यांचे मनापासून आभार. ही संस्था नसती तर मी माझ्या आयुष्यातील खूप मोठ्या धक्क्यातून सावरले नसते, शिक्षण घेऊ शकले नसते. एक एकर जमिनीच्या वादातून माझ्या आईला गावातील काही लोकांनी जिवंत जाळून टाकले! त्या धक्क्यामुळे माझे वडील कोणतेही काम करू शकत नाहीत. अशा अत्यंत विचित्र आणि बिकट परिस्थितीत ‘दीपस्तंभ’ मला मार्ग दाखवत आहे.”

अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठीचे ‘मनोबल’ हे देशातील पहिले मोफत निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्ये प्रशिक्षण केंद्र 2015 मध्ये सुरू झाले. त्या प्रकल्पात जिल्हानिहाय करियर समुपदेशन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांकरता कार्यशाळा व व्याख्याने आयोजित केली जातात. राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेऊन प्रज्ञाचक्षू व दिव्यांग विद्यार्थी/विद्यार्थिनींची निवड केली जाते. त्यांना ब्रेल लायब्ररी, ऑडियो लायब्ररी इत्यादी आधुनिक सुविधा दिल्या जातात. UPSC, Staff Selection, Bank, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. व्यक्तिमत्त्व विकास व करियर कौन्सिलिंग यांबाबतचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. संगणक, इंटरनेट, एंजेल, डेझी यांसारखे तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे. ऐंशीच्यावर विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. किनवट येथून आलेल्या आदिवासी पाड्यावरचा पांडुरंग राठोड याच्या मते, तो छोट्या कुटुंबातून मोठ्या कुटुंबात आला आहे. यजुर्वेंद्र महाजन यांना तेथे सगळी मुले पप्पा म्हणतात. खरे तर त्यातच सगळे काही येते. जन्मतः दोन्ही हातपाय नसणारा आणि उंची अतिशय कमी असणारा पांडुरंग त्या सगळ्या अभावांवर मात करून, MPSC ची परीक्षा देत आहे. पांडुरंग म्हणतो, “अनंत अडचणींवर मात करून पदवीधर झालो, पण मी काही करू शकेन असे कोणालाच वाटत नव्हते. मलाही मार्ग सापडत नव्हता. मात्र ‘मनोबल’च्या सहवासात माझ्या स्वप्नांची उंची वाढली आहे. मी येथे मिळणा-या मार्गदर्शनामुळे अधिकारी बनून आकाश माझ्यापुढे ठेंगणे करणारच.” समीर खोब्रागडे, लीना बारेला अशांसारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही काही वेगळ्या नाहीत. मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगावचे असलेले राजेंद्र चव्हाण अंध आहेत. ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुख्यत्वे राज्यघटना हा विषय ‘मनोबल’ची स्थापना 2015मध्ये झाल्यापासून शिकवत आहेत. ते प्रवक्ता म्हणूनही काम बघतात. त्यांनी मुंबईच्या ‘रुईया महाविद्यालया’तून मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर एम.ए.बी.एड. केले. मात्र त्यांच्या मते खर्या’ अर्थी आयुष्याला आकार मिळाला तो ‘मनोबल’मुळे. ते ‘दीपस्तंभ’बद्दल आणि ‘मनोबल’बद्दल; तसेच, यजुर्वेंद्र महाजन यांच्याबद्दल भरभरून बोलतात, “महाजनसर एक उत्तम शिक्षक आहेत. ते समाजाला आमच्यापर्यंत घेऊन येतात आणि आम्हाला समाजामध्ये मिसळायला लावतात. आम्हाला अनेक प्रगल्भ माणसे येथे भेटतात. त्यांच्याकडून खूप काही शिकता येते. सरांचा प्रत्येकाशी व्यक्तिगत पातळीवर संपर्क असतो. ते प्रत्येकाच्या वाढदिवशी आवर्जून शुभेच्छा देतात. त्यांचे विद्यार्थ्यांची दुखणीखुपणी, अडचणी, त्यांचा अभ्यास, त्यांची प्रगती यांच्याकडे बारकाईने लक्ष असते. सरांना आमच्या समस्या, आमच्या मर्यादा यांची आधी काही माहिती आणि सवय नव्हती. ते सर्व त्यांच्यासाठीही नवीन होते. मात्र त्यांनी आम्हाला आमच्या अगदी आतमध्ये जात जात जाणून घेतले आणि ते आमचे सहप्रवासी झाले. त्यामुळे आम्ही वेगळे पडत नाही. ‘जागतिक अपंग दिन’ साजरा केला जातो. माझ्या मते, ‘जागतिक अपंगत्व मुक्तिदिन’ साजरा व्हायला हवा. कारण ‘मनोबल’ तसे सामर्थ्य आम्हाला निश्चित मिळवून देते.”  

‘संजीवन’ हे स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र अठरा वर्षांवरील अनाथ बारावी उत्तीर्ण मुलामुलींसाठी मोफत आहे. अनाथ मुलांना अठरा वर्षें पूर्ण झाल्यावर अनाथ गृहातून बाहेर पडावे लागते. त्यांना आयुष्याची दिशा त्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने सापडत नाही. ‘दीपस्तंभ’ने ‘संजीवन’ प्रकल्प तशा युवक-युवतींना आयुष्यात सन्मानाने उभे करण्यासाठी सुरू केला आहे. सैन्यभरती, पोलिसभरती, सुरक्षारक्षक, रुग्णालय व्यवस्थापन यांसाठी तेथे प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला एका परिवाराशी जोडून देऊन, त्या परिवाराला त्याचे पालकत्व दिले जाते. अशा प्रकारे प्रेम, आधार आणि नाते या गरजांची पूर्तता होते.

शुभम देवानंद खरतडे हा ‘संजीवन’चा विद्यार्थी म्हणतो, “मी तिवसाळा, तालुका घांतजी, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे. मला दृष्टी जन्मतः पंचाहत्तर टक्के नाही. मी लहान असतानाच वडील माझ्या आईला आणि मला सोडून निघून गेले. मी नववीत 2008 मध्ये असताना, माझ्या आईची हत्या झाली. मी अनाथ झालो. मी बी.ए. पूर्ण केले असून, माझ्या जीवनात सर्वदूर अंधार असताना ‘संजीवन’मध्ये आलो. मी माझी स्वप्ने पूर्ण होतील या जिद्दीने अभ्यासाला लागलो असून, नक्की अधिकारी होईन आणि माझ्यासारख्या अनाथ-अपंगांच्या कल्याणासाठी काम करीन. Read India Lead India हे ध्येय समोर ठेवून, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांसाठी ‘आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान’ हा अभिनव प्रकल्प योजला आहे. सामुहिक वाचन, वैयक्तिक वाचन यांवर अभियानात भर दिला जातो. वाचलेल्या पुस्तकातील उताऱ्यांवर व सामान्य ज्ञानावर आधारित ताणमुक्त लेखी परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यांतील एक हजार छप्पन माध्यमिक शाळांमधील एक लाख वीस हजार नऊशे शहाऐंशी शिक्षक व पालक यांच्यापर्यंत दोन लाख चार हजार दोनशेतेवीस पुस्तके 2010 ते 2016 या काळात पोचली. त्यामध्ये सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुले वाचत नाहीत असे म्हणणाऱ्या अनेकांसाठी ते कृतिशील उदाहरण ठरले. अभियानाच्या अनुषंगाने दिल्ली, पुणे, मुंबई, आनंदवन, हेमलकसा, अहमदाबाद, हैदराबाद, मसुरी येथे शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. तसेच, मुलांचा नरेंद्र जाधव, रघुनाथ माशेलकर, आनंदीबेन पटेल अशा मान्यवरांशी संवाद घडवून आणण्यात आला आहे. अभियानासंदर्भांत जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक रामचंद्र काळे यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. “शिक्षक जेव्हा नोकरीत रुजू होतो तेव्हा त्याला नवीन काहीतरी करण्याचा उत्साह असतो. नंतर तो काळाच्या ओघात आणि परिस्थितीच्या रेट्याने मावळून जातो. मला वाचन अभियानामुळे प्रेरणादायी पुस्तके वाचून पुन्हा नवा जोम प्राप्त झाल्याचा आणि शिक्षक म्हणून माझा जन्म पुन्हा झाल्याचा अनुभव मिळाला.” 

‘उजळूया अंतरीचा दिवा’ असे म्हणत अपंग बहुउद्देशीय संस्था आणि दीपस्तंभ बहुद्देशीय संस्था यांचा संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आला आहे – ‘स्वयंदीप’ शारीरिक व्यंगांचे दु:ख आणि मनातील अंधकार बाजूला झटकण्याची जिद्द आणि धाडस असणार्याि भगिनींसाठी तो प्रकल्प आहे. वीस महिला त्यात कार्यरत आहेत. त्या महिला युनिफॉर्म्स, फॅन्सी ड्रेसेस, पिशव्या, नऊवारी साड्या इत्यादी कपडे उत्तम शिवतात. त्यांना Orders आणि शिलाई मशिन्स मिळवून देणे गरजेचे आहे. प्रकल्प टप्प्याटप्प्याने विस्तारायचा आहे.

‘दीपस्तंभ’तर्फे ‘ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. भारतात सहा लाख खेडी आहेत. त्या खेड्यांमध्ये अनेक आधुनिक गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु पुस्तके, बौद्धिक संस्कार आणि योग्य मार्गदर्शन यांचा अभाव आहे. तो भरून काढण्यासाठी ‘दीपस्तंभ’ सज्ज होत आहे. सुरुवात करण्यात आली आहे. ते काम शिरसाळे (ता. अमळनेर), वायगाव (ता.जि. वर्धा), धडगाव (जि. नंदूरबार) येथे चालू आहे. त्यामध्ये तीन महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साधता येतो. प्रकल्प गावाच्या प्रत्यक्ष सहभागाने उभारला जातो. तसेच, शासकीय योजना आणि उद्योग व्यवसाय यांचे सहकार्य घेतले जाते. केंद्रासाठी पूर्णवेळ व्यक्तीची मानधनावर नेमणूक केली जाते.

त्या सगळ्या प्रकल्पांमध्ये संबंधितांना सामावून घेत मार्गक्रमण करताना, दमछाक होऊ न देता अखंड काम करण्याचे सामर्थ्य यजुर्वेंद्र महाजन यांनी अभ्यास आणि व्यासंग यांतून मिळवले आहे. संयत, शांत आणि उत्साही राहणे ही त्या कामाची गरज आहे. महाजन ती गरज सभोवतीचे वातावरण आणि सातत्याने केले जाणारे आत्मपरीक्षण यांतून भागवताना दिसतात.

‘दीपस्तंभ’च्या कार्याचा सन्मान म्हणून संस्थेला व यजुर्वेंद्र महाजन यांना मिळालेले पुरस्कार- रोटरी क्लब दोंडाईचा ‘श्रमसाफल्य पुरस्कार’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार, क्षमता विकास प्रबोधिनी यांच्यातर्फे ‘व्याख्यान वाचस्पती पुरस्कार’, जे.सी.आय. जळगाव यांच्यातर्फे Outstanding Young Indian Award 2012, रोटरी क्लब ऑफ संगम, चाळीसगाव यांच्यातर्फे ‘Vocational Excellence Award’, स्नेहालय परिवार, अहमदनगर यांच्यातर्फे ‘शहीद क्रांती पुरस्कार’, ‘गिरणा गौरव पुरस्कार 2014’, भाग्यलक्ष्मी स्टीलतर्फे आयकॉन्स म्हणून विशेष गौरव 2014, अपंग मित्र पुरस्कार-हेल्पर्स ऑफ हॅण्डिकॅप संस्था, कोल्हापूर, 2016, मिती क्रिएशन-मुंबई तर्फे ‘गगनाला पंख नवे’ पुरस्कार 2017.

‘दीपस्तंभ’

42, हौसिंग सोसायटी,सहयोग क्रिटीकल जवळ,जळगाव- 425001

(0257) 6522299,2242299

deepstambh27@gmail.com

– अलका आगरकर

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.