मुंबईतील चायना टेम्पल – चिनी परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिक

0
17
carasole

मुंबई ज्या सात बेटांनी बनली आहे, त्यापैकी माझगाव हे एक बेट. मोठमोठी जहाजे, प्रशस्त बंदर आणि कायम व्यापारी हालचालींनी गजबजलेल्या माझगाव डॉकजवळच्या लाकडी इमारतीत चायना टेम्पल (चिनी मंदिर) आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकापासून किंवा हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड स्थानकावर उतरुन काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नवाब टँक मार्गावरील त्‍या चिनी बौद्ध मंदिरापर्यंत पोचता येते. त्या मंदिरात ‘क्वॉन-टाइ-कोन’ नावाचा चिनी देव विराजमान आहे. मात्र बहुतांश मुंबईकरांना ते मंदिर अस्तित्वात असल्याचे ठाऊक नाही. भारतात कलकत्ता आणि मुंबई या दोनच ठिकाणी चिनी मंदिरे आहेत. माझगावचे ते चिनी मंदिर सुमारे दीडशे वर्षें जुने असून ते मुंबईतील चिनी परंपरा आणि चिनी संस्कृती यांचे प्रतीक बनले आहे.

माझगाव डॉकच्या किना-यालगतची खारट हवा, माशांचा विशिष्ट वास आणि मंदिराच्‍या गल्लीतील शांत वातावरण यामुळे त्या ठिकाणी एखादे मंदिर असेल याची कल्पना येत नाही. बाहेरुन निरखून पाहिले तरी त्या वास्तूत मंदिर असल्याचे वाटत नाही. ते गडद लाल रंगाची बाल्कनी असलेले एक जुने घर वाटते. वास्तविक तेच चिनी प्रार्थनास्थळ आहे. मंदिर दुस-या मजल्‍यावर असून आकाराने लहान आहे. मात्र तिथे असलेली शांतता मनाला भिडते. लाल रंग चिनी लोकांमध्ये शुभ मानला जातो. त्यामुळे मंदिराचा रंगही लाल आहे. त्या मंदिरात कोणतीही सजावट किंवा नक्षीकाम आढळत नाही. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच उजव्या बाजूला चिनी लोकांच्या ‘क्वॉन-टाइ-कोन’ या देवाची त्याच्या दोन भावांसह असलेली सुवर्णजडित चौकटीची तसबीर आहे. शांतता, समृद्धी आणि भरभराट यांची प्राप्ती होण्याच्या उद्देशाने त्या देवाची पूजा केली जाते. क्वॉन-टाइ-कोन हा सदाचरणी व पराक्रमी योद्धा होता. तो उत्तम मार्गदर्शक म्हणून ओळखला जायचा. त्याचे मार्गदर्शन मिळावे यासाठीच ईस्ट इंडिया कंपनीत काम करणा-या कॅन्ट्रोनिज हाँगकाँग खलाशांनी १९१९ साली मुंबईत ते मंदिर उभारले. त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांसाठी ते मंदिर म्हणजे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे.

मंदिरात लाफिंग (हसणारा) बुद्ध आणि इतर देवदूतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाजूच्या भिंतीवर एका रेषेत कार्डे लावलेली दिसतात. चिनी लोकांच्या दृष्टीने त्या कार्डांना खूप महत्त्व आहे. प्राचीन चिनी संशोधकांनी खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्या आधारे त्‍या कार्डांची रचना केली. देवळातल्या फोटोसमोरच्या टेबलावर एक पेटी आहे. त्यात ‘फ्युचर स्टिक’ ठेवलेल्या आहेत. त्‍यावर सांकेतिक भाषेत मजकूर लिहिलेला असतो. भाविकांना त्यातील हवी ती स्टिक निवडून ती सांकेतिक भाषा ओळखणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने स्वतःचे भविष्य जाणून घेता येते. चिनी लोकांच्या श्रद्धेनुसार, विश्वातील ‘शक्ती’ म्हणून ओळखली जाणारी गूढ अशी यिन आणि यांग यांची जोडी तिथे आहे. त्यांना प्रश्न विचारा आणि ते जमिनीवर फेका. जर ते विरुद्ध बाजूला पडले तर त्या शक्ती तुमच्या बाजूने आहेत, असा त्याचा अर्थ होतो.

मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला मोठा नगारा आहे. हिंदूंच्या मंदिरात आरतीसमयी घंटानाद केला जातो, त्याप्रमाणे त्या चिनी मंदिरात पूजा-आरतीनंतर तो नगारा वाजवला जातो. चिनी लोकांची पूजाअर्चा हिंदू पद्धतीशी मेळ खाणारी आहे. चिनी लोक देवापुढे अगरबत्ती लावतात आणि मिठाईचा नैवेद्य दाखवतात. चिनी देवळात निरांजनाप्रमाणे मेणबत्तीने देवाला ओवाळले जाते.

चायना टेम्पल आणि त्याचा परिसर शांत आहे. त्या वातावरणात ध्यानधारणा करता येते. ते मंदिर सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत खुले असते. त्याशिवाय मंदिर बंद असताना तिथे गेल्यास पहिल्या मजल्यावर राहणा-या रहिवाशांशी संपर्क साधल्‍यास ते मंदिर उघडून देतात.

ज्या इमारतीत चिनी मंदिर आहे, त्या इमारतीच्या तळमजल्यावर पूर्वी चिनी शवागार होते. १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी चिनी लोकांची मोठी वस्ती मुंबईत होती. गोदीत काम करणाऱ्या चिनी लोकांनी माझगावमध्ये छोटेसे चायना टाऊनच वसवले होते. त्यांची तिथे स्मशानभूमीही होती. सूर्यास्तानंतर मृतदेहाचे दफन करायचे नाही, असा चिनी रिवाज आहे. त्या‍मुळे एखाद्या व्यक्तीचा रात्री मृत्यू झाल्यास त्याचा देह त्या इमारतीच्या तळमजल्यावरील शवागारात रात्रभर ठेवला जात असे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर शहरातील चिनी माणसांकडे विश्वासघातकी म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यामुळे अनेक चिनी लोकांनी मुंबई सोडली. काहीजण शहरात इतरत्र रहायला गेले. आता नवाब टँक मार्गावर चिनी मंदिर असलेल्या गल्लीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच चिनी घरे उरली आहेत. मात्र प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि चिनी नववर्षदिनी मुंबईत राहणारे चिनी भाविक त्या देवळात न चुकता येतात. चिनी लोक वसंतऋतूचा आरंभ उत्साहाने साजरा करतात. त्या उत्सवाच्या निमित्ताने आतषबाजी केली जाते. त्यावेळी ते संपूर्ण मंदिर दिव्यांच्या रोषणाईसोबत मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात पहाटेपर्यंत उजळून निघते.

मंदिरापासून जवळच खरेखुरे ‘चायना टाऊन’ आहे. तिथे राहणारे बहुतांश नागरिक चिनी आहेत. ते लोक कसे राहतात? ते त्यांची धार्मिक पूजाअर्चा, उपासना कशी करतात? याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चायना टेम्पलबरोबर इथल्या चायना टाऊनला तुम्ही आवर्जून भेट द्या. मुंबईतील पर्यटनस्थळांच्या यादीत त्या ठिकाणाचा फार गाजावाजा नसला तरी ती प्रेक्षणीय अशी जागा आहे.

(‘अफलातून मुंबई’ या पुस्‍तकातून)

– सविता अमर

Last Updated On – 19th May 2016