मी वृध्द नाही! – सेनापती बापट

0
14

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्राला लाभलेले नेतृत्व म्हणजे शंकरराव देव, असे सगळे समजत होते पण शंकरराव देव जनतेचा तो विश्वास सार्थ ठरवू शकले नाहीत.

विधानसभेवर जनतेचा विराट मोर्चा जाणार हे समजताच, शंकरराव देवांनी हा मोर्चा नेऊ नका, संप करू नका, नाही तर 'आपल्या कार्याचा घात होईल' असे सांगायला सुरुवात केली. त्यांनी 'संपाचा विचार डाव्या पक्षांनी सोडला आहे' अशी लोणकढी थापही ठोकून दिली, पण तसे काही नव्हते. मुंबई ट्रेड युनियनच्या नेत्यांनी संपाचा निर्णय निश्चित केला होता. जनतेला शंकरराव देव एक समर्थ नेतृत्व देतील असा जो विश्वास वाटत होता तो फोल ठरला.

संयुक्त महाराष्ट्राचे सत्याग्रही 18 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता चर्चगेट स्टेशनसमोर जमा झाले. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. सत्याग्रहात सेनापतींसोबत आचार्य अत्रे, कॉ. मिरजकरही सामील झाले होते. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' अशी गर्जना करत पाच-सहाशे सत्याग्रहींचा मोर्चा विधानसभेच्या दिशेने जाऊ लागला.

मोर्चा जेमतेम फर्लांगभर अंतरावर गेला असेल-नसेल, मोर्चाभोवती शस्त्रधारी पोलिसांनी गराडा घातला. सगळ्यांना गिरफ्तार करून क्रॉस मैदानावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीत कोंबून तुरूंगाकडे रवाना केले.

सगळ्या सत्याग्रहींना 'भायखळा हाऊस ऑफ करेक्शन'मध्ये नेण्यात आले. तुरूंगात शिरतानासुध्दा सत्याग्रहींनी 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय!' अशा गगनभेदी घोषणा दिल्या. तुरूंगाधिका-यांना सेनापती बापट यांच्याबद्दल आदरच वाटत होता. अधिका-यांनी त्यांना बसायला खुर्ची दिली. सेनापती हसून म्हणाले, 'मला वृध्द समजून जर तुम्ही खुर्ची देत असाल तर ती मला नको. मी वृध्द नाही!'

दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी पावणेसहापर्यंत दर दहा मिनिटांनी सत्याग्रहींना भरून पोलिसांच्या गाड्या तुरूंगात आणल्या जात होत्या. प्रत्येक तुकडी आली की घोषणांनी तुरूंगाचा परिसर दणाणून जात होता. आचार्य अत्रे आणि कॉ. मिरजकर येणा-या सत्याग्रहींचे स्वागत करत होते. 'तुरूंगाच्या अधिका-यांशी सर्व सत्याग्रही जास्तीत जास्त सहकार्य करतील आणि शिस्तीचा व नियमांचा भंग करणार नाहीत' असे आश्वासन सेनापती बापटांनी दिले.

त्यांतल्या काही सत्याग्रहींना पोलिसांच्या लाठयांचा प्रसाद खावा लागला. काहींना जबर जखमा झाल्या होत्या. कोणाचे डोळे फुटले होते. शिवडीच्या रामभाऊ जाधवांच्या डाव्या डोळ्यांच्या वर फटका लागून जखम झाली होती. रक्त वाहून अंगावरचा सदरा रक्ताने माखला होता, तरीसुध्दा एकाही सत्याग्रह्याने माराची तक्रार केली नव्हती. महिला सत्याग्रह्यांची व्यवस्था आर्थर रोड तुरूंगात केली गेली होती.

सत्याग्रहातले प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे बिगरमराठी सत्याग्रह्यांचा सहभाग! या सत्याग्रहात चार बंगाली, आठ उत्तर भारतीय, तीन गुजराती मंडळी होती.

क-हाड-साता-याहून सव्वीस शेतकरी 11 मार्चपासून चालत निघाले होते. तेही या सत्याग्रह्यांना येऊन मिळाले.

या शेतकरी मंडळींना आचार्य अत्र्यांनी विचारले, 'इतक्या लांब तुम्ही कशाला आलात?' या प्रश्नावर त्या शेतक-यांनी जे उत्तर दिले त्यावरून खेडोपाडीसुध्दा त्रिराज्य कल्पनेविरूध्द लोकांची डोकी कशी भडकली होती व संयुक्त महाराष्ट्राचा विषय किती संवेदनशील होता याची कल्पना येते. शेतकरी उत्तरला, 'आम्ही नाही येणार तर कोण येणार? आमची ममई यो मोरारजी कशापायी घेतो?'

पोलिसांनी सत्याग्रह्यांना अटक करताना मिळेल त्याला धरले होते. पन्नास-साठ माणसे अशी होती, की ज्यांचा सत्याग्रहाशी काहीही संबंध नव्हता. त्यांत बरेच सरकारी कर्मचारी होते. दहा वर्षांच्या आतली मुलेही होती, काही मंडळी मधल्या सुट्टीत जेवणासाठी जात असतानाच पकडली गेली होती. जे सत्याग्रही नव्हते ते आपण 'संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी आहोत' असे ओरडून सांगत होते. त्या गोंधळात वार्तांकन करण्यासाठी कोलकात्याहून आलेला एक बातमीदारही अडकला होता. एवढ्या प्रमाणात सत्याग्रही असताना अवघ्या शंभर लोकांचे जेवण अधिका-यांनी दिले. सेनापती बापट यावर संतापले. त्यांनी तुरुंगाधिका-यांना निक्षून सांगितले, 'एक तर सगळे तरी जेवतील नाहीतर सर्व उपाशी राहतील.'

सत्याग्रही जाम भडकले. 'आमच्यासाठी अश्रुधुराची व्यवस्था अगोदरपासून करता आली, पण जेवणाची सोय मात्र मोरारजीला करता आली नाही!' अशी चर्चा तुरूंगात चालू झाली. शेवटी, दूध आणि पावाचे तुकडे एवढ्यावरच सत्याग्रह्यांना समाधान मानावे लागले. दुस-या दिवशी दुपारी दीड वाजता सगळ्यांना जामिनावर सोडण्यात आले.

– नरेंद्र काळे

narendra.granthali@gmail.com
 

Last Updated On – 1 May 2016