‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ – बाळ कुडतरकर

4
24

‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’त अनुभव कथन करताना बाळ कुडतरकर‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्‍य मानत आलो. त्‍यामुळे सांस्‍कृतिक क्षेत्रातील इतर आकर्षणे समोर आल्‍यानंतरही मी रेडियोची साथ सोडली नाही.’’ या शब्‍दांत आकाशवाणीवरील आवाजाचे जादूगार म्‍हणून ओळखले जाणारे बाळ कुडतरकर यांनी त्‍यांच्‍या जीवनप्रवासाचे सुत्र स्‍पष्‍ट केले. ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’, ‘सानेकेअर ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या विद्यमाने आयोजित ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’त दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात १८ डिसेंबर २०१३ रोजी बाळ कुडतरकर यांची मुलाखत झाली. ज्‍योत्‍स्ना आपटे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत म्‍हणजे आकाशवाणीच्‍या सुवर्णकाळाचा मागोवाच ठरली.

ज्‍योत्‍स्ना आपटे यांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देताना बाळ कुडतरकरांनी त्‍यांचा रेडियो क्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला त्याची कहाणी उपस्थितांना कथन केली. ते म्‍हणाले, ‘‘१९३० च्‍या दशकात रेडियो नवखा होता. हे काहीतरी नवलाईचे घडत असल्‍याचा भाव समाजात होता. घरात रेडियो असणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जात असे. त्‍या काळी भारतात केवळ पाच रेडियो केंद्रे होती. अशावेळी मला रेडियोत नोकरी मिळेल असे स्‍वप्‍नातही वाटले नव्‍हते. मी तेव्‍हा गिरगावातील ‘राममोहन इंग्‍लीश स्‍कूल’मध्‍ये शिकत होतो. त्‍यावेळच्‍या एका प्रदशर्नात मी काढलेल्‍या चित्रास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्‍यामुळे माझ्या चित्रकलेच्‍या शिक्षकांनी मला जे. जे. स्‍कूल ऑफ आर्टमध्‍ये जाण्‍याचा सल्‍ला दिला. मी १९३९ साली मॅट्रिक पास झाल्‍यानंतर जे. जे.त प्रवेश घेतला. मी एक दिवस जे. जे.तून परतताना माझे शाळेतील शिक्षक मोहन नगरकर, यांना आकाशवाणीत भेटायला गेले. मी शाळेत असताना नाटके-एकांकिका करत असे याची नगरकर यांना आठवण होती. त्‍यांनी मला ऑल इंडिया रेडियोच्‍या स्‍टुडिओत नेले. तो स्‍टुडिओ पाहून स्‍वर्ग कसा असतो याची मला कल्‍पना आली. त्‍यानंतर नगरकर यांनी मला श्रृतिकांच्‍या तालमींना येण्‍यास सांगितले. मग मला ‘सभापती’ नावाच्‍या श्रृतिकेत काम करण्‍याची संधी मिळाली. त्यांच्‍यासोबत विमल घैसास, नारायण देसाई अशी मंडळी होती. त्‍या श्रृतिकेसाठी मला दहा रुपये मानधन मिळाले.’’

बाळ कुडतरकर यांचे तरुणपणातील छायाचित्रबाळ कुडतरकर पुढे म्‍हणाले, की ‘‘मला ऑल इंडिया रेडियोत झेड. ए. बुखारी हे केंद्र संचालक भेटले. त्‍यांनी मला ऑल इंडिया रेडियोत महिना पंचेचाळीस रुपयांवर नोकरीवर ठेवले. बुखारी म्‍हणत, की मला उत्‍तम वादक, लेखक, कलाकार, रेडियोत नकोत. या सर्वांना इथे आणून त्‍यांच्‍याकडून कार्यक्रम करून घेऊ शकेल अशी व्‍यक्‍ती मला पाहिजे. मला फॅक्‍टरी नको, सेल्समन हवा. ते मला पटले. मग माझ्याकडे नाट्यविभाग देण्‍यात आला. मी तिथे राहून रेडियोचा सर्व कारभार जाणून घेतला. ही नोकरी म्‍हणजे आयती चालून आलेली संधी होती. तिचे सोने करायचे आणि इथे काहीतरी करून दाखवायचे असा मी मनाशी पक्‍का निश्‍चय केला.’’ त्‍यानंतर बाळ कुडतरकरांनी आकाशवाणीवर अनेक उत्‍तमोत्‍तम लेखक-कलावंत आणून चांगल्‍या प्रतीचे कार्यक्रम निर्माण केले.  त्‍यांनी त्‍या आठवणी अभिमानाने सांगितल्या.

दुस-या महायुद्धाच्‍या काळात युद्धविषयक माहितीपट तयार होत होते. त्‍यांना बाळ कुडतरकर आवाज देत. त्‍यावेळी खांडेकर नावाच्‍या गृहस्‍थाने त्‍यांना जयवंत दळवी यांची ‘सारे प्रवासी घडीचे’ ही कादंबरी आणून दिली. कुडतरकर म्‍हणतात, की ‘‘कोकणाच्‍या पार्श्‍वभूमीवर लिहिलेली ती कादंबरी वाचून मी गलबलून गेलो. ही कादंबरी म्‍हणजे ‘मी’ आहे अशी मला जाणिव झाली. त्‍यानंतर मी ती कादंबरी क्रमशः आकाशवाणीवरून ध्‍वनीक्षेपीत केली. त्‍यानंतर जयवंत दळवी यांनी कुडतरकरांची भेट घेतली.ते म्‍हणाले, की मा‍झी ही कादंबरी आतापर्यंत इतरांना ठाऊक नव्‍हती. आकाशवाणीवरील प्रसारणानंतर त्‍या कादंबरीच्‍या पाच आवृत्‍त्‍या निघाल्‍या आहेत. आता माझ्या ‘महानंदा’कडेही थोडं लक्ष ठेव ना! त्‍यानंतर मी महानंदा वाचली. महानंदा म्‍हणजे दुसरे कोकण! मी त्‍या कादंबरीच्‍या प्रेमात पडलो. मी शं. ना. नवरे यांच्‍याकडून पाच भागात त्या कादंबरीच्‍या श्रृतीका लिहून घेतल्‍या आकाशवाणीवरून प्रसारित केल्या. त्‍यानंतर त्‍या कादंबरीवर हिंदी-मराठी भाषांत चित्रपट तयार झाले. तसेच’गुंतता ह्रदय हे’ नावाचे नाटक रंगभूमीवर आले.’’ विशेष म्‍हणजे, कुडतरकर महानंदाची आठवण सांगत असताना ‘महानंदा’ या मराठी चित्रपटात महानंदाची भूमिका करणा-या आशालता प्रेक्षकांत बसलेल्‍या होत्‍या. कुडतरकर यांनी त्‍या दोन कादंब-यांसोबत हरी नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो?’ तसेच मामा वरेरकर यांची ‘विधवा कुमारी’ इत्‍यादी कादंब-या आकाशवाणीवरून ध्‍वनीक्षेपीत केल्‍या असल्‍याचे सांगितले.

कुडतरकर यांनी रेडियोच्‍या आठवणी सांगताना म्‍हटले, की ‘‘त्‍या काळी आजच्‍या सारखे मुद्रित कार्यक्रम होत नसत. सर्व कार्यक्रम थेट प्रसारित होत. त्‍यामुळे त्‍या कार्यकमांची वेळ तंतोतंत पाळावी लागत असे.’’ कुडतकर रेडियोत असलेल्‍या वक्‍तशीरपणाचे उदाहरण देताना म्‍हणाले, की ‘‘आताही तुम्‍ही मला सव्‍वा पाच वाजता इथे बोलावलंत आणि मी सव्‍वा पाच वाजता इथे हजर. कारण ही रेडियोची सवय.’’ त्‍यांच्‍या या वाक्‍यांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

रेडियोवरून प्रसारित होणा-या शब्‍दांतून श्रोत्‍याच्‍या डोळ्यांसमोर चित्र उभे करण्‍यासाठी शब्दांना साऊंड इफेक्‍टची तेवढीच महत्‍त्वाची जोड लागत असे. बाळ कुडतरकर यांनी ते साऊंड इफेक्‍ट स्‍वतःच्‍या कल्‍पनाशक्‍तीने अधिक ‘इफेक्टिव्‍ह’ कसे केले याचे काही किस्‍से सांगितले. ते सांगताना रेडियोमध्‍ये त्‍यांनी दिलेल्‍या योगदानाचा अभिमान त्‍यांच्‍या बोलण्‍यातून ठायी ठायी जाणवत होता.

कुडतरकरांच्‍या बोलण्‍यात विविध संदर्भ येत गेले. ते त्यावेळचे रेडियोचे अधिकारी, मंत्री, पु.ल. देशपांडे, शं. ना. नवरे यांच्‍यासारखे साहित्यीक, करुणा देव यांच्‍यासारखे सहकर्मचारी, काशिनाथ घाणेकरांसारखे कलाकार अशा ब-याच व्‍यक्‍तींबद्दल बोलत होते. त्यातून एकाचवेळी रेडियोचा आणि बाळ कुडतरकरांचा प्रवास समजत होता. कुडतकरांनी सादर केलेल्‍या कार्यक्रमांमध्‍ये कल्‍पकता होती. मग त्या श्रृतिका असोत, त्‍यांचे साऊंड इफेक्‍ट असोत वा इतर कार्यक्रम. कुडतरकरांच्‍या कल्‍पकतेमुळे त्‍या कार्यक्रमांनी अफाट प्रसिद्धी मिळवली. त्‍यांनी ‘गम्‍मत-जम्‍मत’ या कार्यक्रमात लहान मुलांचा सक्रिय सहभाग वाढवत तो कार्यक्रम राणीची बाग, गिरगाव चौपाटी यांसारख्‍या जागांवरून थेट प्रक्षेपित केला. कुडतरकरांकडे ‘कामगार सभा’ हा कार्यक्रम देण्‍यात आला; त्‍याच दिवशी त्‍यांनी मुंबईतील अठ्ठावीस कामगार कल्‍याण केंद्रांना भेटी दिल्‍या. तिथल्‍या कामगारांशी संवाद साधून त्‍यांना रेडियोवर कार्यक्रम करण्‍यास उद्युक्‍त केले आणि ‘‘ती सगळी कामगार कल्‍याण केंद्रे मी आकाशवाणीवर आणली’’ असे त्यांनी अभिमानाने म्‍हटले. ‘पुन्‍हा प्रपंच’ या कार्यक्रमासाठी त्‍यांनी शं. ना. नवरे यांना गाठून त्‍यांच्‍याकडून त्‍यांना डोंबिवली ते मंत्रालय अशा रोजच्‍या प्रवासात लोकांच्‍या बोलण्‍यातील विषय, शब्द हेरून त्‍यावर लेखन करण्‍यास सांगितले. ते लेखन, त्‍यातील विषय लोकांच्‍या रोजच्‍या जीवनाशी निगडीत असावे, त्‍यातील संवाद लोकांना जवळचे वाटावेत याकडे कुडतरकरांचा कटाक्ष होता. शंन्‍नांनी तसे लेखन केले. कुडतरकरांनी ‘पुन्‍हा प्रपंच’साठी प्रभाकर पंत, टेकाडे भाऊजी आणि मीना वहिनी अशी तीन पात्र तयार केली. त्‍या कार्यक्रमाला मोठे यश मिळाले. शंन्‍नांकडून आलेली कार्यक्रमांची संहिता त्‍याच दिवशी विनातालिम सादर होत असे. ती सादर करताना अनेक चुका होत, मात्र थेट प्रक्षेपणात इतर पात्रे ते सावरून घेत असत. त्‍यामुळे कार्यक्रमाला अनौपचारिक रूप प्राप्‍त झाले.

कुडतरकरांनी ‘पुन्‍हा प्रपंच’ कार्यक्रमाचा एक किस्‍सा सांगितला. ते म्‍हणाले, ‘‘पुन्‍हा प्रपंच या कार्यक्रमाचे मूळ नाव ‘प्रपंच’असे होते. मात्र त्‍यास प्रसिद्धी मिळू लागल्‍यानंतर आमच्‍या कानेटकर नावाच्‍या वरिष्‍ठ अधिका-याकडून तो कार्यक्रम बंद करण्‍याचा आदेश देण्‍यात आला. कार्यक्रम बंद झाल्‍यानंतर लोकांची विचारणा करणारी पत्रे येऊ लागली. मग केंद्र संचालकांनी तो कार्यक्रम पुन्‍हा सुरू करण्‍याचा आदेश दिला. त्‍यावेळी मी त्‍या कार्यक्रमाचे नाव ‘पुन्‍हा प्रपंच’ असे ठेवले.’’

कुडतरकर आकाशवाणीत काम करत असताना माहितीपटांना आवाज देत असत. त्‍यांनी आतापर्यंत सुमारे साडेतीनशे माहितीपटांना आणि दीड हजार जाहिरातींना आवाज दिला आहे. तसेच इतर भाषेतील अनेक चित्रपटांचे डबींगही केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बाळ कुडतरकरांकडे किस्‍से-कहाण्‍यांचा खजिनाच होता. सुशीलकुमार शिंदे हे कुडतरकरांचे घनिष्‍ट मित्र. त्‍यांचा किस्‍सा सांगताना कुडतरकर म्‍हणाले, ‘‘एकदा सुशीलकुमार शिंदे यांनी मला महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सांस्‍कृतिक खात्‍याचे संचालक पद देऊ केले. मात्र मी त्‍यांना स्‍पष्‍ट नकार देत मी ऑल इंडिया रेडियो सोडणार नाही असे निक्षून सांगितले.’’ अशाचप्रकारे आचार्य अत्र्यांनी कुडतरकरांना बोलावल्यानंतर त्‍यांनी दिलेला नकार आणि अत्र्यांचा ओढावून घेतलेला रोष हा किस्‍साही मनोरंजक होता. अशा अनेक प्रस्‍तावांना नकार देण्‍याबद्दल कुडतरकर म्‍हणाले, की ‘‘मला हे ठाऊक होते, की ती सर्व मंडळी मी रेडियोमध्‍ये आहे म्‍हणून मला बोलावत आहेत. एकदा का हा मायक्रोफोन माझ्या हातून गेला, की मी कुणीच नाही. आणि इथे माझे साम्राज्‍य आहे. ते सोडून मी का जाऊ?’’

कुडतरकरांनी त्यांच्‍या यशात त्‍यांचे गुरू पार्श्‍वनाथ आळतेकर यांचा सर्वात मोठा वाटा असल्‍याचे सांगितले. त्‍यांनी त्‍यांच्‍या नावाची ‘पार्श्‍वनाथ आळतेकर’ एकांकिका स्‍पर्धा अकरा वर्षे आयोजित केली होती. त्‍यांनी ‘अभिनय’ ही नाट्यसंस्‍था सुरू करून नाट्यस्‍पर्धाही आयोजित केल्‍या. सोबत अनेक नाटकेही निर्माण केली. त्या नाटकांचे बरेचसे लेखन आपणच करत असून असे कुडतरकरांनी सांगितले. त्‍यापैकी ‘अमृत मोहिनी’ या तेव्‍हाच्‍या ‘बि बजेट’ नाटकाला घवघवीत यश मिळाले. त्या नाटकाला जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले होते.

बाळ कुडतरकरांनी १९३९ ते १९७० या काळात आकाशवाणीवर काम केले. त्यांच्‍या मुलाखतीतून आकाशवाणीच्‍या सिग्‍नेचर ट्यूनपासून तिथे काम करणा-या व्‍यक्‍तींपर्यंत सगळ्यांशी त्‍यांचे जोडले गेलेले बंध जाणून घेता आले. बाळ कुडतकर स्‍वतःच्‍या कुटुंबाविषयीही भरभरून बोलले. त्यांच्‍या पत्‍नी माणक या लग्‍नापूर्वी बाळ कुडतरकरांसोबत आकाशवाणीच्‍या श्रृतिकांमध्‍ये सहभागी होत असत. त्या शास्‍त्रीय गायिका आणि भरतनाट्यम नृत्‍यांगना होत्या. मात्र लग्‍नानंतर त्‍यांनी श्रृतिका किंवा इतर कार्यक्रम केले नाहीत. कुडतरकरांनी  माणक यांच्‍याबद्दल बोलताना ‘‘प्रत्येक पुरूषाला माझ्या पत्‍नीसारखी पत्‍नी मिळो’’ अशी इच्‍छा व्‍यक्‍त केली. कुडतरकर यांची दोन्‍ही मुले अमेरिकेत स्‍थायिक आहेत. त्‍यापैकी चेतन कुडतरकर हे एक्‍स ओ टेलिकम्‍युनिकेशनध्‍ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तर कार्तिक कुडतरकर हे एच. एल. इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्‍ये कामाला आहे. बाळ कुडतरकर यांची नात अनिशा ही भरतनाट्यम करते. तसेच ती ब्रॉडवेला नाट्यदिग्‍दर्शिका म्‍हणून काम करते.

बाळ कुडतरकर यांच्‍या मुलाखतीतून त्‍यांच्‍या स्वतःच्‍या जीवनप्रवासासोबत आकाशवाणीचा सुवर्णकाळ उपस्थितांसमोर उभा राहिला. त्‍यावेळी ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या राजीव जोशी लिखित ‘जीवनदान’ या पुस्‍तकाचे बाळ कुडतरकर यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

आशुतोष गोडबोले
thinkm2010@gmail.com

4 COMMENTS

  1. एकेकाली आकाशवाणीवरील आवाजाचे
    एकेकाळी आकाशवाणीवरील आवाजाच्‍या जादूगाराची मुलाखात वाचून स्मृतींना उजाळा मिळाला. कृतार्थ आयुष्य जगल्याबद्दल कुरतडकरांचे अभिनंदन व निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.

  2. Lahanpani amhi ashyach
    Lahanpani amhi ashyach karyakramanvar vadhalo tyamule ajun amchi aavad shabutahe.

  3. तुम्ही मातेविन बाळ ह्यात काम…
    तुम्ही मातेविन बाळ ह्यात काम केल होत का?

Comments are closed.