मी, अण्णांचा कार्यकर्ता

0
21

     ‘अण्णा हजारे आँधी है, देशके दुसरे गांधी है’ ह्या घोषणेने ऊर्जावान झालेले, भ्रष्टाचाराविरुद्धचे नव्या तंत्रयुगातले नवे आंदोलन स्वातंत्र्यानंतर चौसष्ट वर्षांनी, एप्रिल 2011 पासून सुरू झाले. मरगळ आलेली, उदासीन–हतबल झालेली, आत्मविश्वास आणि आत्मशक्ती गमावलेली भारतीय जनता अचंबित होऊन ढवळून निघाली; दिशा आणि मार्ग सापडल्याच्या आनंदाने आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाली. संवेदना हरवलेल्या, निगरगट्ट झालेल्या शासनाला हलवू शकली.

     अण्णा हजारे यांच्या रूपाने ‘बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले’ अशी व्यक्ती जनतेसमोर आली. सदविचार, सदाचार, निष्कलंक चारित्र्य, त्याग आणि सहनशीलता अंगीकारून पंचवीस वर्षे जनसामान्यांकरता झटण्याव्यतिरिक्त अण्णांच्या आयुष्यात दुसरे काहीही नाही. निष्पाप मन, बोलण्यात भाबडेपणा आणि देशबांधवांसाठी देह झिजवणे ह्या गुणांनी जनता दिड.मूढ झाली, प्रभावित झाली. यंत्र-मंत्र युग येवो, चंगळवाद येवो, पश्चिमात्य संस्कार होवोत; अखेर, भारतीयांचे मन आध्यात्मिक बैठकीवरच उभे आहे हे ह्या आंदोलनामुळे सिद्ध झाले.

 

सरकारी कर्मचार्‍यांची शपथ !

     सतीश राजमाचीकर हे व्यवसायाने डेण्टिस्ट, पण त्यांनी प्रॅक्टिस फार थोडा काळ केली. आरंभी त्यांनी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका या क्षेत्रात काम केले. ते ‘रावसाहेब’ सिनेमासाठी विजया मेहता यांचे निर्मिती सहाय्यक होते. त्यांनी दूरदर्शन मालिका मात्र (कुछ खोया कुछ पाया, गोष्टीवेल्हाळ, महापर्व, कल्पांत) स्वतंत्रपणे निर्माण केल्या व त्या लोकांच्या आठवणीत राहिल्या आहेत. त्यांनी दहा वर्षांपूर्वी व्यावसयिक निवृत्ती पत्करून पुण्याला स्थलांतर केले आणि त्यांचे तरुणांना हाकारे घालण्याचे काम चालत असते. हजारे यांच्या आंदोलनात सामील झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना टोक लाभल्यासारखे झाले.

     राजमाचीकर पुण्यातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामध्ये जोमाने काम करतात. राजमाचीकर व त्यांचे साथीदार यांनी अण्णा दिल्लीतून विजयी होऊन आल्यानंतर महाराष्ट्र यात्रा काढण्याचा संकल्प सोडला होता. अण्णांच्या देशभराच्या व्यग्रतेने तो मागे पडला आहे. परंतु पुण्याच्या भ्रष्टाचारविरोधी मंडळींनी झकास उपक्रम चालवला आहे. ते ठरवून सरकारी कचेर्‍यांत जातात व तेथील सर्व कर्मचार्‍यांकडून ‘मी पैसे खाणार नाही’ अशी शपथ घेववतात. इन्कम टॅक्स, पासपोर्ट आणि आरटीओ या तीन कचेर्‍यांमध्ये शपथग्रहणाचे कार्यक्रम झाले असे त्यांनी सांगितले.

     गांधीमार्गाने चालणार्‍या अण्णांनी जनसामान्यांना चैतन्य दिले, आत्मविश्वास दिला. देशभर लाखोंच्या संख्येने सर्व स्तरांतील भारतीय नागरिक आपल्या मनातील खदखदणार्‍या असंतोषाला वाट देण्यासाठी म्हणून अण्णांना पाठिंबा देत अहिंसक मार्गाने आंदोलनात सामील झाला. हे फक्त भारतीय करू जाणोत! जगातील असंतोष आणि त्याचे हिंस्ररूप आपण सतत पाहात, अनुभवत असताना, एकविसाव्या शतकात भारतीय नागरिक मात्र साधा दगडदेखील हातात न घेता, लाठी-काठी-बंदुका न घेता, दंगाधोपा-जाळपोळ न करता आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांतपणे घोषणा देत आपल्या मनातला उद्रेक व्यक्त करत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाच्या संस्कारात असलेली आध्यात्मिकता. दुसरे काय असू शकते?

     भारतीय जनतेचा हा राष्ट्रीय धर्म महात्मा गांधींनी प्रथम ओळखला आणि त्या ताकदीवर ब्रिटिश राजसत्तेला शह दिला. अण्णांनीदेखील त्याच सुप्त शक्तीला जागे केले. आपण भारतीय गलितगात्र, दिशाहीन झालो असू, पण जीवनमूल्ये विसरलो नाही; आपणाला त्यांचे मोल प्राणापेक्षाही जास्त आहे आणि त्यातच आपली खरी ताकद आहे हे जाणणारा व आचरणात आणणारा भारतीय समाज मूर्ख नाही हेच पुन्हा सिद्ध झाले.

     अण्णांच्या आंदोलनाचे खरे गमक, यश ह्यात सामावलेले आहे. जनलोकपाल कायदा होईल किंवा नाही, सुधारणा होतील किंवा नाही, पण आंदोलनामुळे भारतीय जनतेच्या मनात अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, सत्याची बूज राखण्याची, योग्य हक्कांसाठी संघटितपणे झगडण्याची ऊर्जा चेतावली गेली आहे.

     आम्ही पुण्यामध्ये 9 ऑगस्ट ह्या क्रांतिदिनापासून प्रभातफेर्‍या आणि प्रकाशफेर्‍या सुरू केल्या. फेर्‍या पाच-पंचवीस जणांनी सुरू होत, पण फेरीच्या अखेरीस किमान तीनशे लोक त्यात सामील झालेले असत, अगदी आपणहून, उत्स्फूर्तपणे. सर्वांच्या मनांत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जबरदस्त इच्छा आणि भारतावरची निष्ठा असल्यामुळे खारीचा वाटा म्हणून प्रत्येक जण मोर्चात सामील झालेला असे. शांतता आणि अहिंसक मार्गाचा वापर करण्याची वृत्तीही प्रत्येकाच्या साथीला होती. युवाशक्तीच्या उधाणाला सुरुवातीच्या काळात आवर घालावा लागला; पण अगदी अल्पकाळच! आम्ही अण्णांनी सांगितलेली पथ्ये उच्चारली मात्र; ती त्यांनीच काय, समस्त जनतेने आचरणात आणली. उदाहरणार्थ, ठरवून दिलेल्या सहाच घोषणा द्यायच्या, इतर कुठच्याही नाही, कुणाचा धिक्कार करायचा नाही, ‘मुर्दाबाद’ म्हणायचे नाही. व्यक्तिगत अथवा पक्षाच्या, संघटनेच्या, शासनाच्या विरुद्ध अपशब्द वापरायचे नाहीत, मोर्चामध्ये दोघा-दोघांच्या जोडीने चालायचे, जेणेकरून रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, हुल्लडबाजी करून नाचायचे नाही, अचकट-विचकट पोस्टर्स-बॅनर्स मिरवायचे नाहीत. सर्व स्तरांवरच्या लोकांनी हे अवधान बाळगले, एवढा आत्मसंयम आचरणात आणला. हे अण्णांच्या पारदर्शक जीवनाचे यश!

 

     पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीत (2010) होत आहेत. त्यामध्ये समाजसेवी कार्यकर्ते निवडून यावेत यासाठी पुण्यातील एनजीओंचा महासंघ (नागरी आघाडी) निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. त्यातदेखील सतीश राजमाचीकर यांचा पुढाकार आहे.

     16 ऑगस्ट. आम्ही बालगंधर्व नाट्यगृहाच्या समोरच्या पदपथावर मांडव उभारला आणि चक्री उपोषणाला सुरुवात केली. सकाळी 8 वाजता आम्हा पाच-सहा जणांखेरीज पंचेचाळीस जण तेथे जमले. आम्ही त्यांना ओळखतही नव्हतो. सर्वांनी उपोषण सुरू केले. दिवस जसजसा पुढे जाऊ लागला आणि दूरदर्शनवर दिल्लीच्या बातम्या दिसत गेल्या, तसतसे लोक मंडपात जमा होऊ लागले. विद्यार्थ्यांचे, विविध संघटनांचे लहानमोठे मोर्चे धडकू लागले. आम्ही पण सर्वांचे भरघोस स्वागत आणि आभिनंदन करत गेलो. प्रत्येकाला प्रोत्साहन देत गेलो. रामलीला मैदानावर जाण्यापूर्वी महात्मा गांधींच्या समाधीसमोर दोन तास ध्यानस्थ बसून अण्णांनी कळस चढवला आणि प्रत्येक संवेदनाशील नागरिकाच्या मनातले स्फुल्लिंग पेटले. सायंकाळी आमच्या मंडपाभोवती न भूतो न भविष्यती असा जनसमुदाय लोटला. नारे-घोषणांनी आसमंत दणाणून गेला. जनतेला आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना काय करू अन् काय नको असे झाले होते! इतके असूनही कुणीही रस्ते अडवले नाहीत वा वाहतुकीला अडथळा केला नाही. घोषणा, गाणी आणि टाळ्यांचा गजर सतत होत राहिला. पहिल्या चक्री उपोषणाची सांगता रात्री 8 वाजता झाली, तेव्हा तर जनसागराला प्रचंड उधाण आले, अगदी प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहण्याइतके. रात्री 10 वाजता, अखेरीस आम्ही सर्वांना विनंती केली, की कृपा करून आपापल्या घरी परता!

     उपोषणाच्या एके दिवशी, ‘बालगंधर्व’मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला येणार असे पोलिसांनी आम्हाला सांगितले; ‘त्यावेळी मांडव रिकामा करा अथवा अटक करून घ्या’ असेही बजावले. तरुण वर्गामध्ये उत्साहाची प्रचंड लाट आली आणि सगळ्यांनी एकमुखाने उत्तर दिले की ‘आम्हाला पकडा’. अक्षरश: हजारोंच्या वर लोकांनी अटक करून घेतली, पोलिसांनीही अचंबा व्यक्त केला. पोलिसांनी सर्वांना शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात दिवसभर ठेवून, नाव-पत्ते इत्यादी गोष्टी निपटून चहा-बिस्किटे दिली. पोलिस कमिशनर मीरा बोरवणकर यांनी स्वत: भेट देऊन, पाहणी करून, दोन शब्द दिलाशाचे बोलून गेल्या. अटक करून घेणारा नव्वद टक्के वर्ग तरुणांचा होता!

     पुढचे तेरा दिवस मंतरलेले होते. रात्रीचे उपोषण सकाळी आठ वाजता संपायचे, तेव्हा तेराही दिवस एक महिला मसालादूध घेऊन यायची, बाणेरहून, अगदी न चुकता, न सांगता. सायंकाळी सुटणार्‍या उपोषणाला रोज नवीन नागरिक ज्यूस पॅक, ज्यूस बॉटल, अमूल दूध बॉटल, ऊसाचा रस असे काहीना काही द्यायला पुढे यायचा. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आम जनतेसाठी केली. कित्येक नागरिक स्वत:हून पैसे घेऊन पुढे झाले, नागरिक आंदोलनाला रोज या ना त्या रूपाने पुढे येऊन पाठिंबा देत राहिले.

     लोकांच्या अंगच्या गुणांचा असा उत्स्फूर्त उत्सव पुन्हा होणे नाही! तरुणांनी कविता, गाणी, पोवाडे, पथनाट्य, भाषणे, चित्रकला, कॅलिग्राफी, पोस्टर पेंटिंग्ज, चेहरे रंगवणे, शंखनाद, ढोलताशे, जादूचे प्रयोग अशा अनेक अंगांनी तळमळीने आंदोलनात भाग घेतला. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत चैतन्याचा, ऊर्जेचा दूधसागर आमच्या मंडपात उसळलेला असायचा. ‘दूधसागर’ म्हणायचे कारण, त्यात विध्वंसक आग नव्हती तर शक्ती पुनर्प्रस्थापित करणारी चेतना होती.

     तरुण पिढीला तर माझा अक्षरश: साष्टांग दंडवत! दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळचा तरूण ऊर्जेचा महापूर पाहून मला खंत वाटायची, की ह्या ऊर्जेचा आम्हाला देशाच्या विकासासाठी वापर का करता येऊ नये? मी युवा पिढीला सदैव प्रोत्साहित करत आलो. त्यांच्या कृतींचा गर्भितार्थ शोधत फिरलो. सामाजिक विषयावरचे लघुपट शाळा-कॉलेजांत दाखवून, चर्चा करून त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आलो. परंतु माझ्यापाशी असा मुद्दा नव्हता, कार्यक्रम नव्हता की जिथे ही ऊर्जा सत्कारणी लागू शकते.

     चौर्‍याहत्तर वर्षांच्या अण्णांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन तरुण ऊर्जा रस्त्यावर उतरवली, एकत्र आणली. किमानपक्षी पन्नास हजारांच्यावर युवक-युवतींनी आमच्या मंडपात हजेरी लावली. हजारोंनी कार्यकर्ते म्हणून नावे नोंदवली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वदूर संघटन बांधले गेले. सिंपली ग्रेट! तो अनुभव घेऊन मला व्यक्तिश: कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. पुढच्या पिढीवरचा माझा विश्वास शतपटींनी वाढला.

     केवळ तरुण आले का? तर नाही! समाजातल्या सर्वच्या सर्व स्तरांवरचे नागरिक वयाची कुठचीही मर्यादा न बाळगता आंदोलनात सामील झाले. हातांचा आधार घेऊन आले, काठ्या टेकत आले, अंध आले, कर्णबधिर आले, आया-बहिणी आल्या, रिक्षावाले आले, महानगर पालिका कर्मचारी आले, वीज मंडळाचे कर्मचारी आले, वारकरी आले, नागरी वस्त्यांतून आले, तसेच आयटीतील सुशिक्षित, श्रीमंत वर्गातले लोक आले, हे सगळे जण भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायला आमच्या मंडपात खांद्याला खांदा लावून अगदी पावसातदेखील उभे राहिले, बसले, गायले, त्यांनी घोषणा दिल्या, जयजयकार केला, ज्यांनी जसे जमले तसे आपापल्या विभागात, संस्थांत रॅली काढल्या, सभा घेतल्या, स्पर्धा घेतल्या. प्रत्येकाने आम्हाला मोठ्या अभिमानाने, उत्साहाने येऊन सांगितले आणि आम्हीही जाहीरपणे त्यांचे अभिनंदन केले! प्रत्येकाला वाटत होते, की काय करू-काय नको असे!

     अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण आपला भारत, आपला समाज, आपले आयुष्य सुखी, समाधानी, संपन्न आणि विकसित करू शकू अशी प्रेरणा एकेका नागरिकाच्या हृदयात होती आणि म्हणूनच प्रत्येकजण आंदोलनात सहभागी होण्यासाठी धडपडत होता.

     दिल्लीत काय चाललेय हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढत गेल्यामुळे आम्ही तिसर्‍या दिवसापासून मंडपात दूरदर्शन संच आणि प्रोजेक्टर ठेवला. त्यानंतर जनसमुदाय एवढा वाढत गेला आणि सहभागी होत गेला, की पुछो मत! आमचा मंडप म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाचे पुणे शहरातले मुख्य केंद्र केव्हा व कसे बनले ते आम्हालाही कळले नाही.

     आम्ही बालगंधर्व ते सारसबाग अशी जी प्रकाशफेरी आयोजित केली तिचे एक टोक बालगंधर्व चौकात होते तर दुसरे सारसबागेत! यात अतिशयोक्ती नाही. जनता सामील होत गेली. अन् तीही अतिशय शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध. पन्नास हजारांच्यावर नागरिक सामील होते, तरीही! पोलिसांनीच खुद्द आमचे अभिनंदन करून सांगितले, की पुणे शहराच्या आणि पुणे पोलिसांच्या इतिहासात इतकी प्रभावी पण तितकीच शांत आणि संयमी रॅली झालेली नाही!

     दिल्लीत बुद्धिबळाच्या पटावरची प्यादी सरकत होती. डावपेच चालू होते. बातम्या थडकत होत्या. मोहरे नामोहरम होत गेले, चेकमेट झाले! आणि अण्णांनी 29 ऑगस्टला उपोषण संपवले.

     पुढे काय? एक समर्पित कार्यकर्ता म्हणून माझे निरीक्षण –

     उपोषणानंतर पाचव्या दिवशी रात्री अण्णा पुण्याच्या विमानतळावर उतरले लोकांनी गर्दी करून स्वागत केले, तसेच ते राळेगणलाही झाले, राळेगणच्या चौकात ओ.बी. व्हॅन्सचा ताफा उभा राहिला, पुढे कित्येक दिवस! अण्णा यादवबाबा मंदिरातून उठून पद्मावती मंदिराच्या गेस्ट हाऊसमध्ये राहू लागले. मंदिराचे मोठे आवारसुद्धा गर्दीला कमी पडू लागले. आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना अण्णांना भेटणे तर दूर, पण दर्शन मिळणेही दुरापास्त झाले.

 

     जनतेमध्येही जाणीव निश्चित रुजली आहे, ती म्हणजे आपण केवळ मतदार नसून भागीदार आहोत, प्रजा नसून राजा आहोत. आपण चुकीचे का होईना पण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, ते राजे नाहीत. जनतेचे कल्याण हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि शासनाने त्यासाठी झटले पाहिजे, कामे केली पाहिजेत, मुळात म्हणजे लोकशाहीचे विडंबन थांबवलेच पाहिजे!

     ज्या प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या आंदोलनाची ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून सुरुवात केली, त्या माध्यमांचा प्रभाव वाढला होता. चॅनेलच्या लोकांची भिंत उभी राहिली. थोरामोठ्यांचीही गर्दी वाढली. थकलेले अण्णा सर्वांसमोर यायचा प्रयत्न करत राहिले. बंद खोलीतल्या बैठका वाढल्या. त्यांत तळमळीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांची वर्णी लागलीच असे नाही. जनता किंचित का होईना पण पाठीमागे ढकलली गेली. ‘अण्णा राळेगणचे राहिले नाहीत तर ते देशाचे झाले’ असे स्वत:चे समाधान करून कार्यकर्त्यांनी आनंद मानला आहे. असे ऐकिवात आले, की मेधा पाटकरांनासुद्धा अण्णांना भेटण्यासाठी दहा-बारा मिनिटे बाहेर थांबावे लागले. त्या कोअर कमिटीच्या सदस्य असूनही. अण्णांकडून मोबाईलवरून बोलणे, मेल्स, एसएमएस यांना उत्तर येणे मुष्कील झाले.

     दुसरे म्हणजे उत्स्फूर्तपणे एकत्र आलेले आबालवृद्ध आणि पेटलेला युवावर्ग हळुहळू विखुरला गेला. हिंदूधर्म जसा प्रत्येकाने आपापल्या सोयीने समजायचा, अंगीकारायचा त्याच पद्धतीने हे आंदोलन घडले. त्याला अजून तरी संघटित रूप दिले गेलेले नाही. ते द्यायला हवे आहे. पुढे काय करायचे याचा सर्वांनाच संभ्रम आहे. नाही म्हणायला ठिकठिकाणचे कार्यकर्ते आपापल्या बुद्धीनुसार, कुवतीनुसार काही ना काही कार्यक्रमांची अंमलबजावणी करताहेत. महात्मा गांधींनी ज्या प्रमाणे छोटे छोटे कार्यक्रम रुजवले होते तशा काहीही सूचना ‘टीमअण्णा’कडून आल्या नाहीत. जनता सतत आंदोलन करू शकणार नाही, मात्र समाजाचे प्रश्न सोडवण्याचे छोटे छोटे उपक्रम नक्कीच करू शकते. अशा ठोस उपक्रमांची आखणी ‘टीमअण्णा’ने करुन द्यायला हवी आहे. तरच ह्या आंदोलनातून उत्पन्न झालेली चेतना संघटित मार्गाने वाटचाल करून परिवर्तन घडवू शकेल.

     आजही, माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते दिल्ली, अजमेर, धारवाड, बेंगळुरू, उज्जैन, लखनौ, मुंबई या ठिकाणच्या अनोळखी कार्यकर्त्यांशी फेसबुकमार्गे संपर्क ठेवून आहेत. विचारांची देवाण-घेवाण करत आहेत, कार्यकर्त्यांचे आदानप्रदान होत आहे.

     आणि ह्या जाणिवेने जनता शांततामय, अहिंसक मार्गाने आपापल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरायला एकवटली आहे. जवळ असो वा दूर, एकत्र असो वा नसो, कार्यक्रम करो वा न करो, पण, मै भी अण्णा, तू भी अण्णा l अब तो सारा देश है अण्णा l है एक स्वयंप्रकाशित सत्य आहे.

सतीश राजमाचीकर,
भ्रमणध्वनी : 9823117434,
इमेल : smrajmachikar@gmail.com

{jcomments on}