मिस्टर बिडी – किसनलाल सारडा

‘मिस्टर बिडी’ हे किसनलाल सारडा यांचे आत्मकथन भारती संजय प्रधान यांनी प्रथम इंग्रजी भाषेत लिहिले. त्याचा मराठी अनुवाद उषा तांबे यांनी केला आहे. बस्तीराम बाबा सारडा यांनी विडी व्यवसाय 1922 मध्ये सुरू केला. तो व्यवसाय सिन्नरसारख्या दुष्काळाचे चटके सतत बसणाऱ्या तालुक्यात फळला, फुलला आणि सारडा विडी कारखानदार नावारूपाला आले. त्यांचे प्रतिनिधी म्हणजे किसनलाल सारडा. सारडा यांनी विडीला संशोधनाची जोड दिली. विडी उद्योगात विविध प्रयोग केले. विडीची जाहिरात करणारी सर्वात पहिली व्हॅन सारडा यांनी रस्त्यावर आणली. त्यांनी विडीचा प्रचार-प्रसार खेड्यापाड्यांत जाऊन केला. विडी सातासमुद्रापार नेली.

सारडा यांनी विडीच्या जाहिरातीसाठी विनयशील विडी कामगार स्त्रीच्या चित्राचे कॅलेंडर प्रसिद्ध केले होते. ते अनेकांच्या घरांतील भिंतींवर विराजमान झाले होते. किसनलाल सारडा यांचा आधुनिक दृष्टिकोन त्या व्यवसायामध्ये लागला होता, ते ‘मिस्टर बिडी’ वाचताना लक्षात येते. त्यांनी सर्वात स्वस्त असणाऱ्या विडीत स्ट्रॉबेरी, बनाना (केळी), क्लोव्ह (लवंग) असे किमान सहा सुगंध आणले होते. विडी म्हणजे उच्च दर्ज्याच्या सिगारेटची दरिद्री, गावरान आवृत्ती समजली जाई. तिला किसनलाल सारडा यांनी नवा स्वाद, नवा लूक देऊन ती ग्राहकांना पेश केली. त्यांनी ती जिनिव्हातील एका तंबाखू प्रदर्शनात मांडली. लोक तेथे किसनलाल सारडा यांना मिस्टर बीडी, मिस्टर बिडी असे म्हणू लागले. त्यामुळे या आत्मकथेचे ‘मिस्टर बिडी’ हे शीर्षक समर्पक ठरते. त्यांनी त्यांच्या काळात आधुनिक दृष्टिकोनाच्या बळावर विडीला जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियमपर्यंत बाजारपेठ मिळवून दिली. दरिद्री विडीला फॅशनेबल लूक देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अनुमान शासनाच्या तंबाखूविषयक धोरणाने विडी व्यवसायाला फटका बसल्याचे आहे.

विडी व्यवसाय जेथे पाऊस पडतो, शेती पिकते तेथे बहरला नाही तर जेथे नापिकी आहे अशा दुष्काळग्रस्त भागात वाढला. सिन्नर तालुक्यात त्या व्यवसायाला गती मिळाली. कारण तो एका जागी बसून करता येणारा उद्योग होता. त्या व्यवसायात स्त्रियांचे प्रमाण अधिक भारतभर सापडते. सिन्नर त्याला अपवाद नव्हते. रोजगार हमीसारखी योजना नसल्याने विडी कारखानदारांनी कामगारांच्या हाताला काम दिले. विडीधंद्यासाठी मनुष्यबळ सिन्नर परिसरात उपलब्ध झाले तरी विडीसाठी लागणारा तेंदुपत्ता भंडारा- गोंदिया (विदर्भ) येथून आणावा लागत असे, तर तंबाखू निपाणी (कर्नाटक) येथून आणावा लागत असे. कारखानदारांनी तशा आव्हानात्मक परिस्थितीत विडी कारखाने सिन्नर येथे उभारले. त्यांचा विस्तार संगमनेर, अकोला, अहमदनगरपर्यंत झाला. विडी व्यवसायात प्रचंड वाढ दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात झाली. आठवड्याला एक कोटी विडीचे उत्पादन करावे लागले! किसनलाल सारडा यांनी उंट छाप विडी 1990 च्या सुमारास दिवसाला एक कोटी विडीचे उत्पादन करत असल्याचे म्हटले आहे. सिन्नरचे विडी कारखानदार सर्वाधिक कर सरकारी तिजोरीत 1970 च्या दशकात भरत असत असे नमूद केले गेले आहे.

विडी उद्योगात सिन्नर अग्रेसर होते. तो व्यवसाय बाळाजी गणपत वाजे यांनी प्रथम केला. त्या व्यवसायात नंतर भिकुसा यमासा क्षत्रिय होते. त्यांच्या पाठोपाठ, सारडा यांनी त्या व्यवसायात पाऊल ठेवले. सारडा यांच्यासोबत चांडकही त्या व्यवसायात आले. निंबाळकर, चोथवे असे काही उद्योजकही त्या व्यवसायात होते. नाशिकहून पिंजारी हे सुद्धा सिन्नरमध्ये विडी उत्पादन करत होते. विडी उद्योगात ब्रँडला महत्त्व आरंभी नसावे. कारखानदार वाढले आणि त्याबरोबर ब्रँडिंगला महत्त्व आले. सारडा यांचा ‘उंट’ हा छाप योगायोगाने झाला. सारडा यांनी खेळण्यांतील तो प्राणी आबालवृद्धांचा परिचित असल्याने तो रजिस्टर करून घेतला. चांडक यांनी ‘कोंबडा’ हा ब्रँड रजिस्टर केला. ‘गाय’ नावाची चोथव्यांची विडी आल्यावर निंबाळकर यांनी ‘वासरू’ हा ब्रँड वापरला. सुसर, मगर, मोर असेही ब्रँड सिन्नरमध्ये होते. भिकुसा यांनी त्यासाठी स्वतःचा फोटो छाप म्हणून वापरला. वाजे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजां’चा छाप सुरुवातीला वापरला. राष्ट्रपुरुषांचे छाप वापरण्यास बंदी आल्यावर शिवाजी, संभाजी हे छाप बाजूला गेले. वाजे यांची विडी ‘शिलेदार’ ब्रँडने प्रसिद्ध झाली.

किसनलाल सारडा यांनी वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय नेकीने चालवला. दरिद्री विडीला ऐश्वर्य देण्याचा प्रयत्न केला. किसनलाल सारडा यांची आत्मकथा ही अंशतः विडीचीही आत्मकथा आहे. त्या पुस्तकात विडी धंद्याचा विकास व क्षय यांचे चित्रण वाचण्यास मिळते. मात्र विडी कामगारांच्या हलाखीचे चित्रण येत नाही. कारण ती आत्मकथा कलंदर तरीही मस्तीत जगलेल्या कारखानदाराची आहे.

आत्मचरित्र हा कथनात्म साहित्यप्रकार आहे. आत्मचरित्राची मूलभूत गरज चरित्रनायकाने मूल्यगर्भ दृष्टीने घेतलेला आत्मशोध ही असते. किसनलाल सारडा यांनी त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन ‘मिस्टर बिडी’मधील विविध विभागांतून मांडला आहे. ती आत्मकथा दरिद्री विडी धंद्यात ऐश्वर्यसंपन्न जीवन जगलेल्या कारखानदाराच्या जीवनाचे विविध पैलू मांडते. वडील बस्तीराम सारडा यांनी विडी व्यवसाय सुरू केला, पण विडी तोंडात कधी धरली नाही. त्यांचे बंधूही विडीच्या झुरक्यापासून दूर होते. मात्र त्यांनी शाळकरी वयातच विडीचे झुरके घेतल्याची कबुली दिली आहे. ते त्यातच पत्त्यांच्या खेळातून येणाऱ्या एकाग्रतेविषयी सांगतात. किसनलाल सारडा यांनी शालेय शिक्षण फार गांभीर्याने घेतले नाही, मात्र त्यांनी शालेय शिक्षणातील उणिवांवर बोट नेमके ठेवले आहे. त्यांनी सूतकताईसारखा विषय शालेय शिक्षणात आल्याने इंग्रजी भाषा विषयाची आबाळ कशी झाली ते सहजपणे सांगितले आहे.

किसनलाल तरुण वयात मस्तीत जगले, त्यांना जीवनशिक्षण अनुभवातून मिळाले. भावाने त्यांना एअरगन घेऊन दिली. ते तिचा स्वछंद, स्वैर वापर करत. त्यांनी पक्ष्यांना लक्ष्य करणे, पदपथावरील दिव्यांचे नुकसान करणे असे प्रयोग केल्यावर, वडिलांना त्यांना वर्तणुकीबाबत समज द्यावी लागली व हमी घ्यावी लागली. असे प्रसंगचित्रण पानापानावर वाचण्यास मिळते. त्यातून घरातील मानवी मूल्यांचा आग्रह स्पष्ट होत जातो. निवेदकाने काही गोष्टी सहज सांगितल्या आहेत. घर बांधताना बांधकामाच्या जागेत असणाऱ्या पिंपळाला हातही न लावणाऱ्या वडिलांचा ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरी’ हा दृष्टिकोन, ‘भोसला मिलिटरी स्कूल’च्या प्रशिक्षणानंतर घरातील म्हाताऱ्या घोड्यावर मारलेली रपेट आणि तिचा परिणाम असे प्रसंगचित्रण म्हणजे बोधकथाच वाटतात. त्यातून ‘भुता परस्परे जडो’चा विचार आपोआप स्पष्ट होतो. पत्ते खेळणाऱ्या मुलाला अशिक्षित आई ‘महाभारतामध्ये सर्व शक्तिमान पांडवांनीही त्यांचे सर्व काही द्यूतात घालवले होते’ याची आठवण करून देते आणि त्याचा परिणाम कसा झाला हे स्पष्ट होते. किसनलाल सारडा यांची जडणघडण अशा प्रकारे होत गेली.

किसनलाल यांनी, त्यांच्या हातात 1922 मध्ये सुरू झालेल्या विडीधंद्याची धुरा 1965 मध्ये घेतल्यावर त्यातील वाटचालीचे परीक्षण वाचण्यास मिळते. भागीदारीतील अनुभव, वाटणी यांतील कटुता सूचक पद्धतीने मांडली आहे. ते संगणकीय प्रणालीचा वापर सर्वप्रथम करणारे कारखानदार असावेत.

सारडा यांच्या घरात वारकरी परंपरा होती. मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज देगलुरकर यांच्यासारखे लोक त्यांच्या घरी येत असत. त्यांच्या घरच्यांच्या देहू, आळंदी, पंढरपूर यात्रा घडत. त्यांचा आध्यात्मिक पिंड त्यातून पोसला. ते पुढे विपश्यनेकडे वळले. ते तेथेही विश्वस्त झाले तरी त्यांनी त्यांचा मतभेद गोयंका यांच्यासमोरही मांडला. पुढे, त्यांनी स्वामी गंगेश्वरानंद यांचे शिष्यत्व पत्करले; स्वामींच्या नावे न्यासही उभारला. नाशिकमधील वेद मंदिर हे त्याचे ठळक उदाहरण. तेथे ब्राह्मणेतराला वेदाध्ययन करण्याची परवानगी आहे.

‘मिस्टर बिडी’ या आत्मकथेत अनेक व्यक्ती वाचकाला भेटतात. बन्सीबाबा करवांसारखा साधू पुरुषही भेटतो आणि एम.आर. पै यांच्यासारखा प्रशिक्षणासाठी ताज हॉटेलला जेवण्यास घेऊन जाणारा प्रशिक्षकही भेटतो. कथन त्यातील परिचित माणसांमुळे वाचनीय झाले आहे. पुस्तकात पानापानावर कृष्णधवल छायाचित्रे येतात. त्यामुळे ते आकर्षक बनले आहे. ‘मिस्टर बिडी’ ही आत्मकथा किसनलाल सारडा यांनी कथन केली. तिचे शब्दांकन भारती प्रधान यांनी केल्याने निवेदनाची पद्धत तृतीयपुरुषी वापरली गेली आहे. ती कथा एका उद्योगाच्या विकासाची असल्याने वाचकाला विचारप्रवृत्त करते.

शंकर बोऱ्हाडे 9226573791, shankarborhade@gmail.com
 

 

Previous articleविहीर आणि मोट
Next articleआरोग्यदायी कडुनिंब
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791