महाविद्यालये – हरपले अवकाश आणि सृजनाच्या संधी!

1
34
-mahavidyalay-

‘स्टाफ-रूम’ नावाचा ‘संवादवर्ग’ महाविद्यालयांमधून हरवत चालल्याची विषण्ण जाणीव ज्येष्ठ प्राध्यापकांमध्ये आहे. स्टाफरूममधील प्राध्यापकांची चैतन्यमय उपस्थिती, गप्पांचे अनौपचारिक (शैक्षणिक) फड, वादविवाद, चर्चा या गोष्टी नवोदित प्राध्यापकांसाठी कार्यशाळा असत. स्टाफरूम, वाचनालय, कँटीन, जिमखाना यांसारख्या अनौपचारिक जागा शिक्षणक्षेत्रात आक्रसत चालल्या आहेत. त्या जागा म्हणजे सिनियर्सच्या ज्ञानाचे-अनुभवाचे आदानप्रदान असे. पण सध्या हातातील पुस्तके जाऊन तेथे आलेल्या मोबाईलशी चाळा करत महाविद्यालयांमधील अरुंद जागांमध्ये होणाऱ्या प्राध्यापकवर्गाच्या जुजबी गप्पा या बहुतांश वेळा निरर्थक विषयांवर सुरू होऊन आर्थिक विषयांवर संपतात. रोडावलेली वाचनसंस्कृती, महाविद्यालयांमधील एकजातीय, एकधर्मीय, एकवर्गीय यांचे अध्यापकवर्गातील वाढते संख्याबाहुल्य, व्यवस्थापनामधील मंडळींचा नियमित हस्तक्षेप आणि प्राचार्यांची हरवलेली (त्यांनी घालवलेली) स्वायत्तता यांसारख्या अनेक गोष्टींच्या परिपाकातून महाविद्यालयांमधील ज्ञानव्यवहार हा एकरेषीय होत चालला आहे. संवादाची माध्यमे आणि गती वाढलेली आहे; मात्र महाविद्यालयांमधील विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाचे शिक्षणपूरक उपक्रम शेवटच्या घटका मोजत आहेत किंवा त्यांचे स्वरूप अनाकलनीय रीत्या बदलत चालले आहे. 

महाविद्यालयांतील ‘वर्ग’ भित्तिपत्रके (वॉल मॅगेझीन), वार्षिक अनियतकालिके, वक्तृत्व-वादविवाद स्पर्धा, गीतगायन, एकपात्री अभिनय, स्वरचित काव्यवाचन, कथा-कथन, पथनाट्य, एकांकिका यांसारख्या अनेक उपक्रमांमुळे पूर्वी तरुणांच्या स्पंदनांनी भारलेले दिसत. उपक्रमांची सांगता वार्षिक स्नेहसंमेलनांत होई. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि त्या वेळचे प्रमुख पाहुणे यांबद्दलची उत्सुकता वर्षभर लागलेली असे. महाविद्यालयातील अनेक उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षक स्वत:च्या खिशास तोषीस लावून अनेकदा तुटपुंज्या साधनांनिशी करत. इतिहास-भूगोल अशा विषयांच्या अभ्याससहली असत. पालक अमुक-तमुक सर-मॅडम सोबत असल्यास निर्धास्तपणे विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनींना हवाली करत. वाड्मय मंडळ, भाषा मंडळ, क्रीडा संघ यांना महाविद्यालयांत विशिष्ट स्थान असे. प्रत्येक उपक्रमात शिक्षकांची उपस्थिती जातीने आणि निरीक्षण खात्रीचे आढळे. महाविद्यालयांतील अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व आकाराला येण्यास संवादाचा आणि संधीचा अवकाश कामी येई.

सिनेसृष्टीतील, माध्यम जगतातील बहुतांश प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे ही महाविद्यालयीन, आंतर-महाविद्यालयीन, विद्यापीठीय पातळीवरील छोट्यामोठ्या स्पर्धांमधून आकाराला आलेली ‘माणके’ आहेत. शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे परस्पर संवादाचे आणि निरोगी संबंधांचे नातेही विकसित होण्यास महाविद्यालयीन उपक्रमांतून मदत होते. प्रत्येक क्षेत्रात अपवाद आणि अपघात होत असतात. विद्यार्थीकेंद्रित आणि विद्यार्थी सहभाग असलेले उपक्रम गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे निरीक्षण अनेकांचे आहे. उपक्रमांच्या शृंखलेपेक्षा एखाद-दुसरा मोठा सेलिब्रेटी बोलावण्याकडे, संगीत रजनी वा हास्यकवी संमेलन यांसारखे ‘इव्हेंट’ घडवून आणण्याकडे व्यवस्थापनाचा आणि शिक्षकांचा कल आहे. 

हे ही लेख वाचा –
एम.डी. केणी विद्यालय – थेंबे थेंबे तळे साठे
मातीत रुजलेल्या शिक्षणाची सुरुवात

 

महाविद्यालयांमध्ये एनएसएस आणि एनसीसी हे उपक्रम चालतात. पूर्वी ज्या विषयांत विद्यार्थी कमी असत त्या विषयशिक्षकांकडे त्या उपक्रमाची जबाबदारी आपसूक दिली जाई. एनसीसी विषयशिक्षक हा कामठी (नागपूर) येथून सैनिकी प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती असते. एनसीसी हा विभाग भारतीय सैन्यदलाशी जोडलेला आहे. त्यामुळे त्या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण अनिवार्य असते. त्या उपक्रमात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य/राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अनेक शिबिरांमध्ये (कॅम्प) सहभागी होण्याच्या संधीसोबत सैन्यदलातील संधीही उपलब्ध होऊ शकतात. अनेक विद्यार्थी एनसीसीकडे अधिक गांभीर्याने पाहू लागले आहेत ही बाब समाधानाची आहे. त्या तुलनेत ‘राष्ट्रीय सेवा योजने’मध्ये गांभीर्याचा अभाव आहे. ‘शिका’, ‘एक तरी झाड लावा’ ‘एक तरी…’ यांसारख्या घोषणांनी, उपक्रमांनी तो विभाग महाविद्यालयीन तरुणींनी गजबजलेला असे. तारुण्यसुलभ उर्मींनी विद्यार्थ्यांचीही गर्दी असे. काही विद्यापीठांच्या कल्पक कुलगुरूंनी तरुणांच्या विधायक शक्तीचा योग्य उपयोग करून दृष्ट लागण्याजोगे जलसंधारणाचे, वृक्षलागवडीचे काम करून घेतले आहे. झालेल्या कामाची शाश्वतताही त्याचा योग्य पाठपुरावा करून आणि पूरक कामांनी टिकवून ठेवलेली आढळते (बहिणाबाई विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ ही उदाहरणे या संबंधात नमूद करता येतील). बहिणाबाई विद्यापीठात प्रथम कुलगुरू निं.कृ.ठाकरे, त्यांच्यानंतरचे एस. एफ. पाटील या जोडगोळीने ‘राष्ट्रीय सेवा योजने’चा कल्पक उपयोग करून वृक्षसंवर्धनाचे मोठे काम केले आहे. त्यांना त्या कामासाठी शासकीय ‘प्रियदर्शनी’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. तीच गोष्ट शिवाजी विद्यापीठाबाबत माणिकराव साळुंखे आणि देवानंद शिंदे या कुलगुरूंनी विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनवले आहे. ते  विद्यापीठ महानगरपालिकेकडून पाणी घेत नाही. लाखो रुपयांची बचत होत आहे. ही किमया झाली विद्यार्थी- शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून. नरेंद्र जाधव यांच्या काळात, पुणे विद्यापीठाचा ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागात कल्पकतेने कार्यक्रम आखला गेला. सध्या ते उपक्रम योग्य नेतृत्व, इष्टांकपूर्ती (मँडेट), प्रोत्साहन आणि नियंत्रण नसल्यामुळे अनेक महाविद्यालयांत फक्त नावापुरते आहेत.

-manthanपाश्चात्य देशांत युनिर्व्हसिटी कम्युनिटी एंगेजमेंट म्हणजेच शिक्षणसंस्थांनी समाजासोबत समाजहितैषी काम, संशोधन केले पाहिजे असा दंडक आहे. तेथे ते नियम-परंपरा, दोन्ही कसोशीने पाळले जातात. भारतात मात्र त्या दोहोंचीही खिल्ली उडवली जाते. भारतात जल, वन, मृदा संवर्धनाचे कितीतरी चांगले पायंडे शास्त्रीय संशोधन आणि दस्तऐवजीकरण यांच्या अभावी अस्तंगत होत आहेत. शिक्षणक्षेत्रातील दूरदृष्टी, चिकाटी, संयम आणि प्राधान्य या गोष्टी महत्त्वाच्या कामी लागण्यामध्ये कमी पडत आहेत. समाज हा ज्ञानकेंद्राशी जोडला जाण्यास हवा असे देशातील धुरीणांना वाटते.

प्रत्यक्षात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे गावां-शहरांमध्ये आहेत, मात्र ती त्या गावांची नाहीत; इतके कोरडेपण, वरपांगीपण व्यवहारात उतरले आहे! ‘मानव संसाधन विकास मंत्रालया’च्या अलिकडील ‘समुदाय विकास केंद्र’ अथवा ‘उन्नत भारत अभियान’ यांसारख्या योजनाही उचित प्रयत्नांअभावी उपचार बनून राहिल्या आहेत.

– जगदीश जाधव jagdishjadhav20@gmail.com
(‘तरुण भारत ’, 23 जुलै 2019 वरून उद्धृत, सुधारित-संस्कारित)

1 COMMENT

Comments are closed.