महाराष्ट्राबाहेरील ग्रंथनिर्मिती

बाळशास्त्री जांभेकर व त्यांचे सहकारी यांनी मराठी ग्रंथांचीही निर्मिती केली (1832 ते 1846). मराठी भाषेच्या अध्ययन-अध्यापनाची सुरुवात महाराष्ट्राबाहेर मराठी राज्य अस्तंगत होण्यापूर्वीच झाली होती. इंग्लंडमधून हिंदुस्थानात नोकरीसाठी येणार्‍या पाश्चिमात्यांना राज्यकारभारास योग्य अधिकारी व कर्मचारी बनवणारे शिक्षण देण्यासाठी कोलकाता येथे 4 मे 1800 रोजी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झाली. त्यावेळी हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली हे होते. ते कॉलेज 24 जानेवारी 1854 पर्यंत चालू राहिले. तेथील अभ्यासक्रमात राज्यकारभारासाठी आवश्यक असणारे ज्ञान, देशभाषांचा परिचय, एतद्देशीय लोकांचे आचारविचार, चालीरीती, वाङ्मय, कायदे इत्यादी विषयांच्या माहितीचा अंतर्भाव असे. अभ्यासक्रम तीन वर्षांत पूर्ण होई. देशभाषांची माहिती भावी सनदी अधिकार्‍यांना व्हावी या उद्देशाने त्या अभ्यासक्रमात फारशी, अरबी, संस्कृत, बंगाली, मराठी, कन्नड, तेलगू अशा भाषांचा समावेश होता. कोलकात्याप्रमाणे मद्रास येथेही तसेच कॉलेज स्थापन केले गेले होते. विल्यम कॅरे हे मिशनरी म्हणून भारतात आले होते. त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती कोलकात्याच्या विल्यम कॉलेजमध्ये बंगाली, मराठी आणि संस्कृत या तीन भाषांसाठी झाली होती. त्यांना सहाय्य करण्याकरता तीन पंडितांची नियुक्ती भाषातज्ज्ञ म्हणून केली गेली होती. त्यामध्ये वैजनाथ शर्मा व रंगनाथ नावाचे मुनशी होते. विल्यम कॅरे यांनी त्यांच्या सहाय्याने मराठी भाषेचे व्याकरण (1805), मराठी भाषेचा कोष (1810), सिंहासन बत्तिशी (1814), हितोपदेश (1815) अशी पुस्तके तयार केली. व्याकरणाचे पुस्तक देवनागरीत तर अन्य पुस्तके मोडी लिपीत छापली गेली होती. महाराष्ट्राबाहेर झालेली ही आरंभकालीन मराठी ग्रंथनिर्मिती होय.

—————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here