महागाव – रांगोळी कलेचे गाव

4
60
_rangoli

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की खूप जुना इतिहास वाटावा! ‘रांगोळी’ ही कला प्रथा म्हणून त्या गावामध्ये जपली जाते. रांगोळी कलेचा पाया महागाव गावामध्ये 1980 साली घातला गेला. व्ही.बी. पाटील, आनंद सुतार, महंमद बागवान या कलावंतांची ती किमया. व्ही.बी. पाटील यांनी गावातील ‘बंड्या’ या व्यक्तीची रांगोळी साकारली, तर सुतार यांनी ‘सरस्वती देवी’ आणि बागवान यांनी ‘लँडस्केप’! पण ते त्यात विशेषज्ञ झाले आणि रांगोळी कलेच्या नव्या माध्यमाची महागावाला ओळख झाली. ही गोष्ट फक्त चाळीस वर्षांपूर्वीची – समकालात गोष्ट! आता आनंद सुतार हे निवृत्त शिक्षक आहेत. महंमद बागवान यांचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. व्ही. बी. पाटील हे शिक्षक आहेत.

गडहिंग्लजला लहान लहान अशा बारा-तेरा गल्ल्या होत्या – कुंभार गल्ली, मराठा गल्ली वगैरे. त्या सर्व गल्ल्या एकत्र होऊन मोठे गाव वसले. त्या गावाला ‘महागाव’ हे नाव पडले. गावाची लोकसंख्या वीस हजारांपर्यंत आहे. 

तिघे कलाकार रंग तयार करण्यापासून मेहनत घेत असत. ते कोळशापासून काळा, हळदीपासून पिवळा, कुंकवापासून लाल अशा पद्धतीचे रंग तयार करत. नैसर्गिकतेतून उजळणारी ती रांगोळी पाहताच डोळ्यांचे पारणे फिटून जात असे. रांगोळीचा आकार आरंभी लहान होता. नंतर तो वाढत जाऊन, संपूर्ण सभागृह भरून जाणारी भव्यदिव्य रांगोळी काढली जात आहे! सारे गाव त्या कलेने भारले गेले आहे. अनेक मंडळे विविध रांगोळी उपक्रम, मुख्यत: गणेशोत्सव काळात राबवतात.

रांगोळी हे एक समाजप्रबोधन करणारे माध्यम ठरले आहे. रांगोळीच्या माध्यमातून समाजातील यातना, सुखदुःखे दाखवता येतात. गावातील लोकांचे सणाविषयी असणारे औत्सुक्य म्हणजे येणारी नवीन प्रकारची रांगोळी हे असते. आजूबाजूच्या गावांतील गावकरीही मोठ्या संख्येने रांगोळ्या पाहण्यासाठी जमा होत असतात. ‘आकार आर्ट ग्रूप’ नावाची संस्था प्रथम सुरू झाली. सचिन सुतार, सुभाष सुतार, बाळासाहेब परीटकर, _mandirधनाजी सुतार यांनी ती कला महाविद्यालयांमध्ये नेली. महंमद बागवान यांची मुले जमीर आणि समीर बागवान यांनी माध्यमातून ‘फ्रेंड्स सर्कल ग्रूप’ सुरू केला व शाळा-महाविद्यालयांबाहेरील मुलांना त्यांच्या अंगातील कौशल्याचे सोने करण्याची संधी मिळाली. तो ग्रूप बावीस वर्षें चालू आहे. मुले शाळांचे वर्ग, मंदिरे अशा ठिकाणी जमत आणि तेथे रांगोळी कलेची साधना सुरू होई.

बाळासाहेब परीटकर आणि धनाजी सुतार यांनी कोल्हापूरच्या महापुराचे भीषण चित्र रांगोळीतून साकारले. स्वप्नील शिंदे आणि नवीन सुतार यांनी स्त्री-शिक्षणाची प्रेरणा घेऊन येणारी ‘आनंदी गोपाळ’ ही रांगोळी भव्यदिव्य स्वरुपात साकारली. रांगोळीमधील उठावदार रंग जणू ते पेंटिंग असल्याचा भास निर्माण करत होते. सचिन सुतार यांनी ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ ही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी रांगोळी काढली. अनिल सुतार यांनी केरळमधील पुराचे चित्रण केले. 

 

हे ही लेख वाचा – 
शिदोबाचे नायगाव (Naigaon of Shidoba)

पळून चाललेय गाव, आचरे त्याचे नाव! (Aachre)

‘महागाव’ हे कोकण प्रदेश आणि कर्नाटक प्रांत यांना जवळ असल्याने तेथे सर्व प्रकारची शेती केली जाते. मात्र ऊस आणि भात ही पिके प्रामुख्याने आहेत.  तेथे पाऊस मुबलक प्रमाणात पडतो. गावात घराघरासमोर बोअर आणि विहिरी आहेत. 

गावात मोठ्या प्रमाणात वीरगळ सापडतात. त्यावरून तेथे शौर्याची परंपरा आहे, लढायांचा इतिहास आहे हे जाणवते. मात्र गावात पुरातन वास्तू नाहीत. गावात विठ्ठल, महादेव, भैरवनाथ, यल्लमादेवी, साईबाबा अशी मंदिरे आहेत. त्यांचे बांधकाम हल्लीच्या काळात झाले आहे. सिद्धिविनायकाचे मंदिर परशुराम तलावाच्या मध्यभागी उभारले गेले आहे. गणेशोत्सव आणि दिवाळी हे गावातील मोठे सण आहेत. दिवाळीमध्ये यल्लमा दे_mahalakshmi_yatraवीची यात्रा असते. त्यावेळी माहेरवाशिणी देवीच्या दर्शनासाठी येतात. ती यात्रा भाऊबीजेला असल्याने माहेरवाशिणींना यात्रा आणि भाऊबीज, दोन्ही एकत्र साजरे करता येतात. गावाची ग्रामदेवता महाकाली लक्ष्मीदेवी आहे. तिची यात्रा मात्र अकरा-बारा वर्षांतून एकदाच होते. गावात राज्यस्तरीय कबड्डीचे सामने होतात.

गावात चार अंगणवाडी, एक प्राथमिक आणि दोन माध्यमिक शाळा आहेत. माध्यमिक शाळेत बारावीपर्यंतचे विज्ञान, कला, वाणिज्य या तिन्ही शाखांचे शिक्षण दिले जाते. गावात ‘संत गजानन महाराज’ ही पॉलिटेक्निक, इंजिनीयरिंग, फार्मसी, बी एड आणि डी एडचे शिक्षण देणारी संस्था आहे. गावामध्ये सरकारी दवाखानाही आहे. गावाचा कारभार ग्रामपंचायतीमधून चालतो. गावापासून आठ किलोमीटर अंतरावर समानगड आहे; तेथून वीस किलोमीटर अंतरावर नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची समाधी आहे. प्रतापराव गुजर यांनी सहा मावळ्यांसोबत बहालोलखानाविरूद्ध नेसरी येथे चुरशीची लढत केली होती. ती लढाई ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ म्हणून प्रसिद्ध आहे.

व्ही.बी. पाटील – 9689209710
आनंद सुतार- 9673529964
 

– निकिता बोलके 9168417032
vijayalaxmibolke@gmail.com

4 COMMENTS

 1. Excellant rongali
  In…

  Excellant rongali
  In kolhapur district mahagaon is very good to stay
  Thanks for detail explanation

 2. महागाव ची संपूर्ण माहित…
  महागाव ची संपूर्ण माहित पाहुन समाधान वाटले पण रांगोळी मध्ये ज्या कलाकारांनी खुप मोठ योगदान दिले त्या सई आर्ट सदा पताडे यांच नाव नाही आहे.याची खंत आहे

Comments are closed.