मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद

1
61

मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद हे देशातील उत्कृष्ट बारा उद्योजकांत नाव असलेले व्यापारी सोलापूरात होऊन गेले. व्यापार, उद्योग, दानधर्म व धार्मिक अधिष्ठान या क्षेत्रांत चतुरस्र कामगिरी करणारे आप्पासाहेब 1851 साली जन्मले. तरुणपणी, ते पुण्याला वास्तव्यास असताना त्यांचा परिचय वैद्य मेहेंदळे, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, नामजोशी, चिपळूणकर या अग्रणींशी झाला. त्यांनी त्यांच्या पिढीजात व्यापारात लक्ष घालून दोन पेढ्या असलेला उद्योग भारतभर चाळीस पेढ्यांपर्यंत वाढवला. त्या पेढ्यांमधील हिशोब लिहिण्याची पद्धत ब्रिटिशांनीही अंगिकारली.

आप्‍पासाहेब वारद 1895 साली यांनी सोलापूरातील संस्थानिक धनंजय गिरजी यांच्या मदतीने प्रसिद्ध नरसिंग गिरजी मिल स्थापन केली. वारद यांनी गिरणीसाठी भैय्या चौक परिसरातील स्वत:ची सुमारे दोन एकर जमीन दिली. त्यामुळे ती गिरणी पुढे वारद गिरणी म्हणून ओळखली गेली. सामाजिक दृष्टिकोन असलेल्या वारदांनी त्यांच्या विवाहाच्या वेळी एकशे एक गरीब जोडप्यांचे विवाह लावले. त्‍यांची अनेक शहरांत ‘अडत दुकाने’ होती. या सर्वांवर कळस म्हणजे 1880 च्या दशकात त्यांनी सोलापूर परिसरातील सतरा हजार एकर जमिनीवर शेती केली. त्यातील पाच हजार तीनशे एकर शेती त्यांची स्वत:ची होती. उर्वरित इतर शेतकऱ्यांची सहकारी तत्त्वावर केली होती. त्या शेतीची जगभर चर्चा झाली व इंग्लंडच्या राजाने त्यांचा गौरव केला. त्यांनी परदेशातून भुईमुगाचे उत्कृष्ट बियाणे आणले. त्यांच्या शेतावर एक हजार गडी व आठशे बैलांचा ताफा असे. शेतीचे उत्पन्न लाखाच्या घरात होते. त्यांची गिरणीपण चोवीस तास चालत असे. तिलाही अडीच लाखांचा फायदा होत होता. वारद त्यांच्या उत्पन्नातील चाळीस टक्के रक्कम दानधर्मासाठी देत.

– प्रमोद शेंडे

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.