मराठी मित्र मंडळ – विलेपार्ले

1
34
carasole

मराठी मित्र मंडळाच्या शुभारंभप्रसंगी दीपप्रज्वलन करताना डॉ. आजगावकर महिन्याभरापूर्वीची गोष्ट. मी माझ्या पार्ल्यातील मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारत होते; तिच्या यजमानांच्या तब्येतीविषयीही विचारले. त्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर, त्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. त्यांनी निदान घरातल्या घरात फिरणे आवश्यक आहे. पण ते त्याचाही थोडा कंटाळा करतात असे मैत्रीण म्हणाली. तिने पुढे सांगितले, की पासष्ट वर्षांचे गृहस्थ अंधेरीहून आठवड्यातून दोन दिवस, प्रत्येक दिवशी एक तास सकाळी दहा वाजता आमच्याकडे येतात व माझ्या मिस्टरांना त्यांचा हात धरून चालवतात. त्याचप्रमाणे, अठ्ठ्याऐंशी वर्षांचे आजोबा रोज दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळात आमच्याकडे येतात. माझ्या मिस्टरांशी जनरल गप्पा मारतात, त्यांना एखाद्या पुस्तकातील काही चांगला भाग वाचून दाखवतात आणि जातात. ते ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. त्या अनोख्या कार्याचे कौतुकही वाटले.

मी मैत्रिणीकडे दिवस पक्का करून आजोबांना भेटण्यास गेले. त्यांचे नाव अनंत कर्वे. टापटीपीची राहणी, प्रसन्न चेहरा. त्यातून मला कळले ते पार्ल्यातील ‘मराठी मित्र मंडळ’ आणि त्याचे प्रमुख कार्यकर्ते शरद पटवर्धन यांच्याविषयी.

‘एकाकी वृद्धत्व’ या सामाजिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी म्हणून, समाजऋण फेडण्याचे भान असणारी विलेपार्ले परिसरातील सुसंस्कृत, सुजाण, समविचारी मंडळी एकत्र आली. सर्वश्री विनायक देवधर, सुभाष पेठे, अप्पा जोगळेकर , शरद पटवर्धन, माधव खाडिलकर, सुहास पिंगळे, मेधा शेटे… त्या सर्वांनी मिळून ४ एप्रिल २०११ ला, चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर ‘मराठी मित्र मंडळा’ची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे ‘मराठी मित्र मंडळा’चे घोषवाक्य आहे. त्यांच्याकडून जात, धर्म, भाषा यांचा विचार न करता गरजू व्यक्तींना सेवा देण्यात येते. संस्थेची धर्मादाय संस्था विषयक कायद्यानुसार नोंदणीही केली गेली आहे.

विलेपार्ले-अंधेरी भागातील नागरिकांच्या काही समस्या आहेत. त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांतून नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने ‘मराठी मित्र मंडळा’ची स्थापना झाली. मंडळाच्या विचाराधीन अनेक उपक्रम आहेत. परंतु सद्यस्थितीत भेडसावणा-या दोन महत्त्वाच्या समस्या हाती घेऊन, त्या संदर्भात दोन उपक्रम सुरू केले गेले आहेत.

मराठी मित्र मंडळातर्फे आयोजित आरोग्य चिकित्सा शिबिर १. वाढत्या महागाईत भरडल्या जाणा-या दारिद्र्य रेषेखालील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मोफत देणे. ज्या पती-पत्नींचे मिळून उत्पन्न दर महिना दहा हजार रुपयेपर्यंत आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना नाममात्र वार्षिक पंचवीस रुपये भरून त्या सेवेचा लाभ घेता येतो. आवश्यक तेव्हा, फॅमिली डॉक्टरतर्फे प्राथमिक वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार विनामूल्य करण्यात येतो. त्याचप्रमाणे, पुढे गरज निर्माण झाली तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य चिकित्सा व सल्ला अशी व्यवस्था करण्यात येते. या सेवांमध्ये रक्त व इतर तपासण्या; तसेच, एक्स रे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, मंडळातर्फे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या लहान मुलांच्या विनामूल्य वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रमही केला जातो.

२. दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे एकाकी वृद्धांना मानवतेचा हात देणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा केंद्र –  परावलंबी वृद्धांसाठी ‘आधार’  सेवा. त्या अंतर्गत मंडळाचे स्वयंसेवक एकाकी वृद्धांच्या घरी जाऊन त्यांची अनेक कामे करतात. सर्व प्रकारची बिले भरणे, बँकेत वा डॉक्टरांकडे घेऊन जाणे, विमा हप्ते भरणे, पॅथॉलॉजी लॅबमधून रिपोर्ट आणणे, विरंगुळा म्हणून त्यांच्या घरी येऊन गप्पा मारणे… अशी कामे. विलेपार्ले येथील सुमारे शंभर नागरिक या सेवेचा लाभ घेतात. मंडळ सभासद होण्यासाठी वार्षिक वर्गणी शंभर रुपये घेते.

३. परिचारिका सेवा (Community Nursing) हा एक नवीन उपक्रम चालू केला गेला आहे – ११ एप्रिल२०१३ रोजी.  त्या अंतर्गत गरजूंसाठी अनुभवी परिचारिकांतर्फे सेवा पुरवल्या जातात. उदाहरणार्थ, इंजेक्शन देणे, ड्रेसिंग करणे, इन्शुलिन देणे, कॅथेटर लावणे, I.V., रक्ततपासणीसाठी रक्त घेणे, बी.पी. तपासणे या व अशा महत्त्वाच्या इतर सेवा नर्सेसद्वारे घरात बसून मिळतात. डॉक्टरांकडे जाण्याचा त्रास नाही, रिक्षाचा खर्च नाही. नर्सेस वाजवी दरात वृद्धांच्या घरी ठरावीक वेळी येऊन आवश्यक सेवा देतात.

आरोग्य शिबिर४. जेनेरिक औषध पुरवठा – मंडळ हा उपक्रम राबवते. गरजू रुग्णांना, दर महिन्यातून तीन वेळा – १०, २० व ३० तारखांना – त्यांच्या डॉक्टरांनी प्रमाणित वा शिफारस केलेली जेनेरिक औषधांची यादी मंडळाकडे द्यायची. मंडळातर्फे ‘प्रबोधन’ गोरेगाव या संस्थेकडून औषधे वाजवी दरात आणून दिली जातात. मंडळ ही सेवा विनामूल्य पुरवते. अर्थातच औषधांचा खर्च रुग्णाचा. सेवेसाठी अनामत तीनशे रुपये रक्कम घेण्यात येते. सेवा बंद केल्यावर ती रक्कम रुग्णास परत करण्यात येते. शंभर गरजू मंडळी त्याही सेवेचा लाभ घेत आहेत.

शरद पटवर्धन यांनी, या सेवांव्यतिरिक्त अगदी वेगळ्या गोष्टीचा पाठपुरावा मार्च २०१० पासून चालवला आहे. तो म्हणजे पार्सी वाड्यातील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी यावी यासाठी त्यांनी मोहीम आरंभली आहे. लाकडे जाळल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. ती टाळणे गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे. त्यासाठी शरद पटवर्धन स्मशानभूमीत गेले. तेथे असणा-या कच्छी व्यवस्थापक लोकांशी बोलले, विचारविनिमय केला. असे करणारे शरद पटवर्धन पहिलेच! त्यानंतर पटवर्धनांनी पत्रके छापली, लोकमान्य सेवा संघाच्या हॉलमध्ये पार्लेकर मंडळींची सभा घेतली. त्यांना विद्युतदाहिनीविषयी सांगितले. लोकांना देणगी देण्याचे आवाहन केले. लोकांनी त्या आवाहनाला  चांगला प्रतिसाद दिला. अप्पा जोगळेकर यांनी ताबडतोब एक लाख रुपये देणगी दिली. कच्छी लोकांचा सहभाग असलेल्या ‘श्री व्यापारी मित्रमंडळा’ने स्मशानभूमी चालवायला घेतली आहे. या मंडळाच्या लोकांनी पण आधीच मोठी रक्कम जमा केली होती. स्मशानभूमीत क्रियाकर्म करणा-या मोडक गुरुजींनीही देणग्या मिळवून दिल्या. हिंदू देवालयाकडून पाच लाख रुपये देणगीरूपाने मिळाले. लोकमान्य सेवा संघ संस्थेनेही मदतीचा हात पुढे केला. बाकी सरकारी कागदपत्रांची पूर्तता करणे वगैरे जिकिरीची कामेही पूर्ण करून, स्मशानभूमीत गॅसचलित शवदाहिनीची यंत्रे बसवली गेली आहेत.

‘मराठी मित्र मंडळा’च्या कामाचा पसारा तीन वर्षांत वाढला आहे. पण चांगल्या कामासाठी चांगले लोक पुढे येतात. त्यानुसार सर्वांत प्रथम सुभाष पेठे यांनी त्यांच्या ऑफिसची जागा मंडळाला वापरण्यासाठी दिली. काही नामवंत डॉक्टर्स या योजनेत सामील झाले. ते रुग्णांना विनामूल्य सेवा देतात. पार्ले परिसरातील पन्नास महिला-पुरुषांनी त्यांची नावे स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यासाठी नोंदवली आहेत. त्यांनी दर आठवड्याला दोन-तीन वेळा, प्रत्येक दिवशी किमान दोन तास समाजसेवेसाठी देण्याची तयारी दाखवली व ती सर्व त्यानुसार आनंदाने कार्य करत आहेत.

मराठी मित्र मंडळ
(०२२)२६१००९००
कार्यालयाची वेळ – सकाळी १०.०० ते १२.०० दुपारी २.०० ते ६.००. रविवारी संपूर्ण दिवस बंद.
संपर्क : ९८२०९५७२४५/ ९८२०२१६३२४ / ९८६७००५९८०

– पद्मा क-हाडे

1 COMMENT

Comments are closed.