मराठी-उर्दू यांची नाळ जुळावी म्हणून…

_MarathiUrdu_YanchiNalJulaviMhanun_1.jpg

“शिक्षकाला धर्माचे, भाषेचे, जातीचे, पंथाचे बंधन नसते. किंबहुना, भाषा या सर्वांच्या परे आहे. ते संप्रेषणाचे एक उत्तम साधन आहे. व्यावहारिक उपयोगात येणाऱ्या भाषा तर शिकल्याच पाहिजेत. मराठी तर राजभाषा आहे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला ती बोलता, लिहिता व वाचता आली पाहिजे,” हे मत आहे एजाज शेख या अकोला जिल्ह्यातील तरुण शिक्षकाचे. मुस्लिम समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांना मराठी भाषा योग्य रितीने येत नाही आणि ती मुले स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुंटतात. एजाज शेख मुस्लिम समाजातील मुलांना मराठीत लेखन, भाषण, संभाषण व सहजपणे व्यवहार करता यावेत, यासाठी धडपडत आहेत.

एजाज शेख बाळापूर तालुक्यातील लोहारा या गावी ‘हव्वाबाई उर्दू गर्ल्स हायस्कूल’ येथे मराठी विषयाचे शिक्षक म्हणून 2008 सालापासून कार्यरत आहेत. त्यांनी त्या शाळेला प्रथम भेट दिली, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. त्यामध्ये त्यांना लक्षात आले, की त्या विद्यार्थ्यांना मराठीचे स्वर, व्यंजन, शब्दांच्या जाती यांची माहिती नाही. मात्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी समास, अलंकार यांनी युक्त असलेला अभ्यासक्रम योजला आहे. एजाज यांच्यासमोर ज्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा पाया कच्चा आहे, त्यांना मराठीची समग्र अोळख कशी करून द्यावी? असा प्रश्न उभा राहिला. एजाज यांनी विद्यार्थ्यांना प्रथम स्वर, व्यंजने व शब्द यांची ओळख झाली पाहिजे, हे मनाशी ठरवले. त्यांना त्यासाठी मुलांना समजेल-उमजेल अशा सोप्या अभ्यास पद्धतीची गरज भासली. एजाज यांनी पुढाकार घेऊन तसा अभ्यासक्रम स्वत: लिहिण्याचे ठरवले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांची परवानगी मिळवली आणि ‘मराठी भाषा फाउंडेशन वर्ग’ ही हस्तपुस्तिका लिहिली. एजाज यांनी त्या पुस्तिकेची छपाई स्वत:च्या खर्चाने केली.

एजाज उर्दू भाषिकांना मराठी शिकताना कोणत्या अडचणी येतात हे जाणून होते. त्यांनी त्याआधारे मराठी शिकवण्यास कोठून सुरुवात करावी याची रूपरेषा ठरवली. त्यांनी त्यानुसार पुस्तिकेची मांडणी केली. त्यांनी त्यामध्ये वर्णमाला, बाराखडी, स्वर चिन्हांचा उपयोग, दोन-तीन-चार अक्षरी शब्द, जोडाक्षरे, संख्या अक्षरी लिहिणे, वाक्यरचना, व्याकरण, निबंध व पत्रलेखन, त्याचबरोबर सात धडे, पाच कविता, एक एकांकिका व विरामचिन्हे असा चढत्या क्रमाने अभ्यासक्रम समाविष्ट केला. पुस्तिकेत वर्गाचे नियोजन, विद्यार्थी निवड यादी, पायाभूत चाचणी नमुना प्रश्नपत्रिका, घटक चाचणी प्रश्नपत्रिका यांचादेखील समावेश करण्यात आला. मुलांना त्या पुस्तिकेच्या आधारे उर्दूचे मराठीत व मराठीचे उर्दूत भाषांतर करून शिकवले जाते. एजाज यांच्या त्या प्रयत्नाचे जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.

एजाज  सांगतात, की त्यांना त्या कामात शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे प्रभारी अधिकारी प्रकाश अंधारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ‘मराठी भाषा फाउंडेशन वर्ग’ ही पुस्तिका आकारास आली व जिल्ह्यातील शाळांपर्यंत पोचली. ती पुस्तिका अकोलामधील एक्याण्णव शाळांमध्ये शिकवले जाते. एजाज त्यांच्या त्या उपक्रमात अकोल्यातील अनेक अधिकाऱ्यांना जोडून घेतले आहे. एजाज सांगतात, की उर्दू व हिंदी भाषेत व्यवहार करणाऱ्या लोकांना मराठी भाषा क्लिष्ट वाटते. ती पुस्तिका तशा लोकांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल.

एजाज म्हणतात, की ‘’अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्री प्रक्रिया आहे. शिक्षक झोकून देऊन काम करत असेल तर विद्यार्थीदेखील त्याला तसा प्रतिसाद देतात. जसा शिक्षक वागतो, तसे विद्यार्थी वागतात. त्यामुळे प्रथम शिक्षकाने स्वत: चांगली कृती करावी, म्हणजे विद्यार्थीदेखील कृतीशील होतील. शिक्षकाला विद्यार्थ्याने केलेली चूक सुद्धा प्रेमाने समजावून सांगता आली पाहिजे. बरेचदा शिक्षकही विद्यार्थ्यांकडून चांगल्या गोष्टी शिकतात. खरेतर प्रत्येक व्यक्ती फायद्या-तोट्याचे आर्थिक गणित मांडत असते. पण स्वत:च्या अपेक्षांना नियंत्रणात ठेवतो तो खरा शिक्षक. शिक्षकासाठी मानधन गौण व शिक्षण ही बाजू प्रधान असते.’’

महाराष्ट्रात लोकांचा व्यवहार इंग्रजी व्यतिरिक्त मराठी भाषेत अधिक चालतो. अल्पसंख्याक समूहांना मराठी भाषेचे ज्ञान व्हावे, तसेच मराठी भाषा बळकट करावी या उद्देशाने ‘महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगा’ने उर्दू भाषिक शाळांमध्ये मराठी औपचारिक वर्गाची सुरुवात 2008 सालापासून केली. त्यासाठी मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली. त्या शिक्षकांना दरमहा पाच हजार मानधन दिले जाते. एजाज शेख उर्दू शाळेमध्ये अध्यापनाचे काम 2008 पासून करतात. ते काही शाळांवर गेस्ट लेक्चरर म्हणून जातात. त्या कामाच्या अनुभवातून त्यांच्या असे लक्षात आले, की उर्दू शाळांमध्ये धडे देणाऱ्या शिक्षकांचे मराठीचे शब्दोच्चार योग्य नाहीत. मराठीचे वाचन योग्य पद्धतीने होत नाही. शिवाय, शिक्षकांना उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणतेही पुस्तक उपलब्ध नव्हते. शिक्षकांना उर्दू भाषिक विद्यार्थ्यांना कसे शिकवावे ते समजत नव्हते. शिक्षक गोंधळलेले असल्याने साहजिकच विद्यार्थी मराठी भाषेबाबत संभ्रमित होतात. त्यांना मराठीमध्ये संभाषण करता येत नाही. अपुरे मार्गदर्शन, नियोजनाचा अभाव, शिकवताना निर्माण होणाऱ्या अडचणी यांमुळे ‘मराठी भाषा फाउंडेशन वर्ग’ औपचारिक राहिले. एजाज यांना ती स्थिती बदलण्याची इच्छा आहे. ते म्हणतात, “मला मराठी भाषेची बीजे मुस्लिम समाजामध्ये रुजवायची आहेत. मी ज्या समाजामध्ये जन्मलो त्याचे ऋण फेडायचे आहे. मराठी भाषेच्या अज्ञानामुळे माझा समाज मागे पडू नये म्हणून मराठी भाषा विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोचवायची आहे. विद्यार्थी मला शिक्षक म्हणून जीव लावतात. मला त्यांच्यासाठी काहीतरी करावे वाटते. शिक्षकाने विद्यार्थ्यांबाबत एका गोष्टीचे भान ठेवले पाहिजे – एक इंजिनीयर चुकला तर एक बिल्डिंग पडेल, एक डॉक्टर चुकला तर रुग्ण मरेल; पण जर एक शिक्षक चुकला तर एक पूर्ण पिढी वाया जाईल.”

एजाज शेख यांचे गाव पाथर्डी. त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. वडील गुराखी. त्यामुळे एजाज यांनी शाळा शिकण्यापेक्षा काम करून वडिलांना आर्थिक मदत करावी असे नातेवाईक त्यांना सुचवत. ‘‘शिकून काय शेतातच काम करणार’’, अशी हेटाळणी करत. पण एजाज यांना त्यांच्या आईचा पाठिंबा होता. आईने त्यांना “कमाओं और पढ़ो भी।” असा सल्ला दिला. एजाज यांनी लोकांच्या बोलण्याने नाउमेद न होता स्वत:चे शिक्षण सुरू ठेवले. एजाज यांनी शाळेचा वेळ सोडून उरलेल्या वेळात बेकरीवर काम करण्यास सुरूवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे कॉलेजचा युनिफॉर्म देखील नव्हता. मात्र एजाज यांना मदत करणारी भली माणसे भेटत गेली. त्या आधारे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. एजाज बी.ए.ला कॉलेजमधून प्रथम आले. ते साल 2005. एजाज यांनी एम.ए.ची पदवी ‘बी प्लस’ श्रेणीत मिळवली. त्यांची एम.ए.चा रिझल्ट लागण्याच्या आधीच‘गोपाळराव खेडकर सीनिअर कॉलेज, तेलोरा’ येथे तासिका शिक्षक म्हणून निवड झाली. त्यांनी तेथे सहा महिने काम केले. एजाज यांनी स्व. उत्तमराव देशमुख अध्यापक महाविद्यालय, शेगाव येथून बी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. अध्यापक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला गेस्ट लेक्चरर म्हणून‘हव्वाबाई एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी’च्या अध्यक्ष सारा अब्दुल सत्तार देशमुख आल्या होत्या. एजाज यांनी स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘शोधिसी मानवा, राऊळी मंदिरीऽऽऽ’ हे मोहम्मद रफींनी गायलेले गीत सादर केले. एक मुस्लिम तरुण आणि त्याचे मराठीचे सच्चे सूर, स्पष्ट उच्चार ऐकून सारा देशमुख प्रभावित झाल्या. त्यांनी एजाज यांना म्हटले, की ‘‘हम मुस्लिम बच्चीयों को मदरसा मे पढ़ाते है। आप वहाँ पें मराठी पढ़ाने का काम करों। रहने-खाने का इंतजाम हम करेंगे।” एजाज यांना त्यांच्या नियोजित कामासाठी चांगली संधी मिळाली. ते आजही त्या शाळेशी जोडलेले आहेत. “आपले कार्य विधायक असेल, आपल्या कामावर प्रेम व जीवनात शिस्त असेल, प्रयत्न प्रामाणिक असतील तर परिस्थिती कितीही बिकट असली, तरी त्या व्यक्तीचे काही अडत नाही. त्याला यश मिळतेच,” असा आशावाद एजाज शेख बोलून दाखवतात.

एजाज शेख यांच्या त्या उपक्रमाची दखल राज्याचे तत्कालिन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी घेतली होती. त्यांनी एजाज यांची पुस्तक राज्यस्तरावर वितरीत करण्यात पुढाकार घेतला होता. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी देखील या उपक्रमाचा गौरव केला आहे. एजाज शेख महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्रालयाच्या ‘मराठी भाषा फाउंडेशन वर्ग’ योजनेत 2009 सालापासून कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर अकोल्याच्या वेगवेगळ्या शाळांतील पंचावन्न शिक्षकांची टीम कार्यरत आहे. सरकारने फक्त योजना सुरू केली, पण त्या योजनेच्या प्रगतीचा आराखडा असणे गरजेचे होते. त्याचे काहीच नियोजन केले गेले नाही. त्यासाठी शेख यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना सुचवून कार्यशाळा आयोजित केल्या. जिल्हाधिकारीही त्या कार्यात मदत करतात. अध्यापन तंत्र कळावे व ठरवता यावे यासाठी दोन महिन्यातून एकदा सर्व शिक्षक एकत्र येतात. तिथे शैक्षणिक नियोजनावर चर्चा केली जाते.

शाळांमध्ये मराठी शिकवताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दिले जाते. विद्यार्थ्यांना सुट्टीचा अर्ज मराठीत करायला लावणे, प्रत्यक्ष बँकांमध्ये नेऊन तेथे मराठीत स्लिप भरायला लावणे असे प्रयत्न केले जातात.

एजाज शेख मराठीच्या उपक्रमापलिकडे इतर सामाजिक कार्यात सहभागी असतात. ते रोगनिदान शिबिरे, गरिबांना कपडे-धान्य वाटप, वॉटर फिल्टर प्लॅन अंतर्गत लोकांना दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, वारकरी लोकांसाठी मदरशाकडून पाणी, चहा व नाश्त्याची सोय करणे, सरकारच्या आदर्श ग्राम व स्वच्छ भारत योजना, निराधार योजनेसाठी मदत अशा कामांत सहभागी असतात. एजाज यांना गायनाची आवड आहे.

एजाज म्हणतात, “जन्मत: कुणाच्या माथ्यावर धर्म लिहिलेला नसतो. तो माणूस म्हणून जन्माला येतो. आपण सर्व भारतीय आहोत ही वैश्विक भावना प्रत्येकात रुजली पाहिजे. मला दैवयोगाने ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिष्य प्रा. तांबटकर गुरू म्हणून लाभले. त्यांचे संस्कार मिळाले. गाडगे बाबांच्या, “जे का रंजले गांजले, त्यासी जो म्हणे आपुले…” या वचनातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. माझा मराठी भाषेचा विकास व वैचारिकदृष्ट्या सुदृढ पिढी निर्माण करणे हा उद्देश आहे.”

एजाज शेख – 9822813423

– वृंदा राकेश परब

1 COMMENT

  1. Article vachun dolyat pani…
    Article vachun dolyat pani ale..apn nustach marathicha temba miravto….khara Kam TR sheikh sirsarkhe Lok karat ahet….Salam ahe ya shikshakala….khup chan lekh lihilay…

Comments are closed.