मराठा समाजाचा आक्रोश मराठी साहित्याला का ऐकू येत नाही?

4
12

मराठी साहित्याची सदाशिवपेठी म्हणून कठोर समीक्षा झाली. ती कोंडी दलित साहित्याने फोडली. मागोमाग ग्रामीण साहित्याचा प्रवाह खळाळता झाला. पुढे भटक्या-विमुक्तांनी एल्गार पुकारला. आदिवासी लेखकांनी हातात लेखणी घेऊन उलगुलान मांडले. स्त्रीवादी लेखिका लिहित्या झाल्या. मराठी साहित्याच्या वाटा खुल्या झाल्या. पण, तरीही मराठी साहित्य पुरोगामी दाबाखालीच राहिले.

एकदा अरुण साधू भेटले. सोबत दया पवार होते. साहित्यविषयक चर्चा सुरू झाली. साधू तेव्हा एका मराठा लेखकाची कादंबरी वाचत होते. ते म्हणाले, मराठा लेखक खूप रोमँटिक लिहितात. ते मराठा समाजाचे वर्तमानकालीन जगणे मांडत नाहीत. दलित लेखकांच्या आत्मकथा त्या काळात गाजत होत्या. दरम्यान, सदानंद मोरे, नागनाथ कोत्तापल्ले यांना ते निरीक्षण बोलून दाखवले. त्यांनाही ते पटते. मराठी साहित्यात कृषीविषयक जाणीव असली तरी ती लेखनाची पार्श्वभूमी म्हणून येते. ग्रामीण लेखकांनी मराठा समाज गृहीत धरून त्यांच्या कथा-कादंबऱ्या बेतल्या, पण निखळ मराठा समाजमन मांडले नाही. गावगाड्याचे चित्रण ग्रामीण लेखकाच्या लेखनात प्रकटते, पण मराठा नायकाचे चित्रण गावचा पाटील, सरपंच, शोषण करणारा, सोसायटी किंवा एखाद्या सहकारी संस्थेचा चेअरमन म्हणून येते. त्यातही, गावगुंड, सत्तेसाठी वाटेल ते करणारा किंवा गुन्हेगारीकडे कल असलेला मराठा नायक रंगवला जातो. शंकर पाटील यांच्या ‘धिंड’, ‘मीटिंग’ या कथांतील नायक पाहिले, की ते लक्षात येईल. स्वातंत्र्योत्तर काळात मराठा समाज सत्तेत राहिला तरी विकासाच्या प्रकियेत त्याला सातबाराच्या बाहेरही फेकले गेले.

मराठा समाजात भूमिहीनांची संख्या वाढली आहे. भूमिहीन मराठा काही ठिकाणी सालदार म्हणूनही राबत आहे. नोकरीच्या जागी चतुर्थ श्रेणीत रोजगार मिळवताना त्याच्या नाकी नऊ येतात. नोकरीतील आरक्षणावर तो प्रतिकूल भूमिका घेऊन बोलत आहे, तसा विचार करत आहे. प्रकल्पात दलित, आदिवासी यांच्यासोबत मराठा समाजाच्या जमिनीही गेल्या, पण त्याची ना कोणाला खंत ना खेद ! मराठा समाजाची जमीन कमाल धारणेच्या कायद्यात गेली. वाटेहिश्यांत तिचे तुकडे पडले. विकासाच्या प्रकल्पांत इतरांप्रमाणे मराठयांचाही जमिनीवरील सातबारा कोरा झाला. काही जमिनी शहरीकरणाच्या विळख्यात विकासकांच्या घशात गेल्या. जमिनींचे फार मोठ्या प्रमाणात हस्तांतरण झाले. काहींनी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्या. आत्महत्या शेतकऱ्यांच्या म्हणून नोंदल्या हेल्या, पण त्यातील मराठा समाजाची नोंद ना समाजधुरिणांनी घेतली ना मराठी लेखकांनी घेतली.

साहित्यात शोषण करणारी जमात म्हणूनच मराठा समाजाचे चित्रण झाले. अपवाद असेल तर तो फक्त विश्वास पाटील यांच्या ‘झाडाझडती’ आणि ‘पांगिरा’ या कादंबऱ्यांचा. आनंद यादव यांच्या कथा-कादंबऱ्या कृषक समाजाचे चित्रण करतात. त्यातून त्यांची ‘संत तुकाराम’सारखी कादंबरी फसते. त्यांना ती नामुष्कीचे स्वगत म्हणून मागे घ्यावी लागते. त्यांना तुकारामाचे कुणबी असणे लक्षात येत नाही. त्यांना कलेचे कातडे पुरत नाही. फुले यांच्या साहित्यात कुणबी शब्द येतो. तो मराठा अर्थाचे सूचन करतो.  फुले यांच्या साहित्यातील कुणबी हा माळी या अर्थाने येत नाही. पण फुले यांचे अभ्यासक धीटपणे त्याची मांडणी करत नाहीत. एकाही मराठा समाजाच्या लेखकाला त्याचा समाज मांडता आलेला नाही. एकही मराठा व्यक्तीने आत्मकथा लिहून मराठा समाजाची सांस्कृतिक समृद्धी आणि पडझड मांडलेली नाही. ‘जू’ लिहिणारा तरुण लेखक ऐश्वर्य पाटेकर याचा अपवाद मानावा लागतो. त्याची कुटूंब कथा ही त्याची व्यक्तिगत जशी आहे तशी समष्टीचीही आहे. मराठा नायकाचे चित्रण र. वा दिघे यांच्या ‘पड रे पाण्या’ या कादंबरीत येते. मराठा वारकरी शेतकरी त्या कादंबरीचा नायक आहे. मराठा समाजाचा एक्सरे काढून मांडण्याचे धाडस मराठी आणि मराठाही लेखकांना झाले नाही. ‘तहान’, ‘बारोमास’ लिहिणाऱ्या सदानंद देशमुखांनाही ते साधले नाही. रंगनाथ पठारे, राजन गवस यांनी ‘ताम्रपट’, ‘तणकट’मध्ये पार्श्वभूमी म्हणून काही अंशी तसे चित्रण केले. भालचंद्र नेमाडे यांचा पांडुरंग सांगवीकर मराठा नायक म्हणून त्याची मांडणी झाली नाही. तो बहुजन नायक ठरला. नेमाडे यांचा चांगदेव, खंडेराव हे बहुजनांचे प्रतिनिधी म्हणूनच साहित्यात येतात, पण  त्यांचे जातवास्तव समोर येत नाही. नेमाडे यांनाही मराठा जातवास्तव मांडता आलेले नाही. मात्र ती क्षमता नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन गवस यांच्या लेखनात आहे. दलित लेखकांनी त्यांचे दलितपण जपले. लपवले नाही. आदिवासी लेखकांनीही ते मांडले, पण मराठा लेखक तेथे उणे पडले. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ हा मराठा अस्मितेचा हुंकार होता. त्याचे नेतृत्व मराठा समाजधुरिणांकडे होते. त्याचा धांडोळा घेऊन साहित्य निर्मितीचा प्रयत्न करता आला असता. केशवराव जेधे ‘शिवाजी आमचा राणा’ असेच म्हणत होते. त्यातील अतिरेकी ब्राह्मणविरोध वगळला तर त्या चळवळीतून मराठा नेतृत्वाची उभारणी झाली हे कोणीही नाकारणार नाही .

मराठी लेखकांचे नायक-नायिका विठ्ठल रामजी शिंदे, ताराबाई शिंदे व्हायला काही हरकत नव्हती. विठ्ठल रामजींना महाराष्ट्र का विसरला? असा सदानंद मोरे यांना प्रश्न पडला आहे. मराठा समाजाने समाज परिवर्तनात आणि जातिअंताच्या चळवळीतही योगदान दिले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचा मिश्रविवाह त्या काळात गाजला. मधुकरराव चौधरी हे अलिकडील काळातील महत्त्वाचे उदाहरण. पण त्यांचा कृतिशील विचारव्यूह ललित साहित्यातूनही मांडला गेला नाही. मराठा समाजात मिश्रविवाह काही कमी झाले नाहीत. यशवंतराव चव्हाण यांनी लक्ष्मण माने यांना जाहीर मान्यता दिल्याचे दुसरे उदाहरण पुरेसे बोलके आहे. पुरोगामी मांडणी करताना ही उदाहरणे सांगितली जातात. त्यातील ताणेबाणे मांडणारा समर्थ लेखक मराठीत आणि मराठा समाजात नाही हे दुखणे आहे.

मराठी लेखकांसाठी विषय नव्हते असे नाही. आयडेंटिटी क्रायसिस मधून मराठा लेखकांना मार्ग काढता आला नाही. पंजाबराव देशमुखांवर मराठीत कादंबरी का लिहिली गेली नाही? पंजाबराव घटना समितीचे सभासद होते. त्यांनी विदर्भातील मराठयांना कुणबी म्हणून आधीच तरतूदही करून घेतली. पण मराठी सारस्वतांनी पंजाबराव देशमुखांची उपेक्षा केली. कृष्णाजी अर्जून केळुस्कर यांनी शिवचरित्र लिहिले. संत तुकारामांचे चरित्र लिहिले. मराठी आणि मराठा अस्मितेचे केळुस्कर पुढे-मागे कोठेच दिसत नाहीत.

ग.त्र्यं. माडखोलकर यांनी यशवंतराव चव्हाण यांना साहित्य संमेलनात प्रश्न विचारला होता, ‘हे राज्य मराठ्यांचे असेल का मराठी?’ साहेबांनी ‘मराठी’ असेच उत्तर दिले. ते उत्तर राज्यकर्त्याला साजेसे होते. पण काळ बदलला. राज्य करण्यासाठी मराठा नेतृत्वाने पुरोगामी आणि प्रागतिक निर्णय घेऊन गाडा चालवला. काळाच्या ओघात मराठा नेतृत्वही प्रभावहीन होत गेले. अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर 1981 मध्ये आ.ह. साळुंखे यांनी किर्लोस्कर मासिकात लेख लिहिला – ‘बरे झाले मराठयांची सत्ता गेली !’ देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. विधानसभेत मराठा आमदारांची संख्या अधिक असूनही निर्णय फडणवीसांच्या हातात आहेत. मराठीत ‘सिंहासन’नंतर चांगली राजकीय कादंबरी लिहिली गेली नाही. मराठी लेखकांना जमिनीवरचे हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदल का टिपता येत नाहीत? मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन, कुणबीकरणाची प्रकिया का मांडता येत नाही? हे विषय साहित्याचे का होत नाहीत?

महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनात मराठा समाजाचा वाटा निःसंशय मोठा आहे. सहकार चळवळ, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांत मराठा समाज पुढे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विठ्ठलराव विखे, शरदराव पवार, राजारामबापू पाटील, कर्मवीर काकासाहेब वाघ, भाऊसाहेब संतुजी थोरात अशी नेतृत्वाची मालिकाच दिसून येते. ती यादी स्थानिक पातळीवर आणखी वाढवता येईल. त्यांचे कार्यकर्तृत्व फक्त गौरव ग्रंथापुरते नाही. मराठा नेतृत्वाचा विकासक्रम त्यातून मांडता येतो. पण मराठी विद्वानांनी डोळयांवर गांधारीची पट्टी बांधून सांस्कृतिक व्यवहार चालवला. परिणामी मराठा समाजाचे जातवास्तव मराठी लेखकांना मांडता आलेले नाही. मराठा समाजाचा आक्रोश लेखकांपर्यंत पोचला नाही. चूल विझली, धूर डोळयांत गेला हे फक्त दलित, आदिवासी यांच्यापुरते वास्तव नाही. तर ग्रामीण भागातील मुलामुलींच्या बाबतीतही ते घडत आहे. मराठा स्त्री उपेक्षित आणि शोषित आहे. मराठा स्त्रीची उपेक्षा मराठी साहित्यात येत नाही. तिच्या डोळयांतील धूर साहित्यात व्यक्त होत नाही. मराठा समाजातील स्त्रियांच्या दुःखावर महाकादंबरी होऊ शकते. मातीमोल भावाने खपणाऱ्या बळीराजावर महाकाव्य लिहिले जाऊ शकते. फासावर लटकणाऱ्या मराठा शेतकऱ्यावर करूणेची कविता लिहिता येऊ शकते. आमची स्थिती ‘पण लक्षात कोण घेतो’ अशीच आहे. कृषिकेंद्री मराठा समाजाला प्रचंड संघर्ष करावा लागत आहे.

पाटलाने गावकारभार करताना गाव विस्कटू दिले नाही. गावात खूनखराबा होऊ दिला नाही. लेकीबाळींना नांदते ठेवले. प्रसंगी गावासाठी त्याच्या काळजाचा तुकडा असणारी काळी आई त्याने गावाला रस्त्यासाठी, शाळेसाठी, सरकारी दवाखान्यासाठी दिली याची दखल तेथील लेखकांनी का घेतली नाही? परभणीचे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोणाच्या जागेवर उभे आहे? तेथील मराठयांना भूमिहीन म्हणून जगताना काय यातना होत असतील? गावचा सत्त्वशील पाटील साहित्याचा विषय का झाला नाही? मराठयांच्या राजकीय कर्तृत्वावर लेखन का झाले नाही? शोषित मराठा शेतमजूर लेखकांना का दिसला नाही? शहरात स्थलांतरित झालेल्या मराठा माणसांचे मानस का टिपले गेले नाही? मुंबईत माथाडी कामगार, गिरणी कामगार, रेल्वे प्लॅटफॉर्मवर राबणारे… या माणसांचे सर्वेक्षण करून त्याच्या जगण्यावर ललित साहित्य का लिहिले गेले नाही? का त्याला फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन लेखकराव म्हणून मिरवायचे होते? पुरोगामी चळवळीच्या दबावाखाली मराठी लेखक मराठा समाजाचे वास्तव चित्रण का मांडू शकला नाही? मराठा लेखकांनी त्यांची आयडेंटिटी का मांडली नाही? मराठी साहित्य खऱ्या अर्थाने आजही समृद्ध नाही.

कोपर्डीच्या निमित्ताने मला मराठा समाजाचा आक्रोश ऐकू येत आहे. मराठी लेखकांनी आतातरी डोळ्यांवरची गांधारीची पट्टी काढून मराठा समाजाचा एक्सरे, एमआरआय मांडून साहित्याला समृद्ध करावे. मराठयाविण महाराष्ट्र गाडा कसा चालेल? महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन कसे होईल? हे आमच्या लेखकरावांनी
लक्षात घ्यावे.

– शंकर बोऱ्हाडे

Previous articleऑर्गन निर्माते उमाशंकर दाते
Next articleमराठ्यांचे मोर्चे आणि मराठा समाज
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

4 COMMENTS

 1. अगदी योग्य लेखाजोखा मांडलाय
  अगदी योग्य लेखाजोखा मांडलाय शंकररावांनी. खरंच आजवर मराठा समाजाचे वास्तव का मांडले गेले नाही? सामान्य मराठा माणसाचे चित्रण होणे खरंच खूप आवश्यक आणि महत्वाचे आहे. त्या विना मराठी साहित्य खरंच अपुरे आहे, हे म्हणणे पटते. लेखाबद्दल लेखकाचे आणि थिंक महाराष्ट्रचे मन:पूर्वक आभार!

 2. आजपर्यंत साहित्याची आवड वाचन
  आजपर्यंत साहित्याची आवड वाचन लेखन याचा संबंध्द तथाकथीत शांत सुसंस्कृत समाजाशी जोडला गेला .
  आम्हाला मराठ्यानी लढाव पराक्रम गाजवावेत आणि कुण्या कवीने त्याच्यावर पोवाडे रचावेत शाहिरांनी ऐकवावेत हेच परिचित. पूर्वी त्यांच्या स्रिया घोषात असायच्या म्हणे, आता घोषा बंद झाला पण त्यांच्या वेदना तशाच राहिल्या. यावर मुक्तपणे लेखन व्हाव मराठा समाजाचा चांगुलपणा साहित्यात दिसावा हे लेखकाचे म्हणणे अगदी पटले

 3. डॉ शंकरजी आपले मन:पुर्वक आभार
  डॉ शंकरजी आपले मन:पुर्वक आभार
  मराठा लेखक जातवास्तव मांडतांना अपूर्ण पडतात हे खरेच आहे.आपली व आपल्या समाजाची विपन्नता मांडतांना त्यांना संकाेच वाटताे दुसरे ते अजूनही भुतकाळातील या समाजाची feudal मनोवृत्तितून जाग न आल्याचे चित्रण करता आले नाही. पण नवीन पिढी मात्र आश्वासक आहे.

 4. artical is very nice . this
  artical is very nice . this artical is help to me or anyone who face the problem of complex or guild of upper caste .last 50 years middle caste educated people suffer of this problem . hope this artical solve and help the overcame the guilty .

Comments are closed.