मन्मनचे निरागस कर्मयोगी मधुकर गोखले (Madhukar Gokhale)

_Madhukar_Gokhale_1.jpg

माझा सुहृद कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा, “श्रीकांत, तू ‘तळवलकर ट्रस्ट’च्या ‘अनुकरणीय उद्योजक’ पारितोषिकासाठी ‘मन्मन’च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. ‘मन्मन’ उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावे स्कूलसमोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ, एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.”

माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. परंतु दिलीपने पुन्हा आठवण करून दिली आणि आग्रहदेखील केला. तेव्हा मी ठरवले, जाऊयात एकदा. मी दिलीपला विचारले, ‘तुझी ओळख देऊ का?’ तर दिलीप म्हणाला, ‘छे छे. मी त्यांना दहा-बारा वर्षांपूर्वी भेटलोय. ते मला ओळखणारदेखील नाहीत.’

मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे, आम्ही तिघे ‘मन्मन’च्या ऑफिसमध्ये धडकलो; स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले- माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि ‘दहा मिनिटांत बोलावतील’ असे सांगितले. आम्ही ‘रिसेप्शन’मध्ये वाट पाहत बसलो. तेवढ्यात एक कुरियरवाला आला. त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले, बिल दिले आणि निघाला. तोच स्वागतिकेने त्याला परत बोलावले आणि ऑक्ट्रॉयची रिसीट विचारली. तो म्हणाला, “ऑक्ट्रॉय भरला नाही, मटेरियल तसेच आणले. मॅडम, ऑक्ट्रॉय भरला नाही म्हणून त्याचे पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. स्वागतिकेने त्याला जरबेने बोलवून घेतले आणि सुनावले. “हे बघा, ऑक्ट्रॉय भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते, की ह्या कुरियरने पुन्हा पार्सल पाठवू नका. हे पार्सल घेऊन जा आणि ऑक्ट्रॉय भरून आणा.” कुरियरवाल्याला ते नवीन होते. तो बार्इंना पटवू लागला.

“बाई, तुमचे काहीतरी वेगळेच. आता, मी कोठे भरू ऑक्ट्रॉय? घ्या ना ह्यावेळी, पुढे बघू.”

“हे बघा, हे चालायचे नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना” आणि त्यांनी फोन लावलादेखील. शेवटी, होय-नाही म्हणता, कुरियरवाला ते पार्सल परत घेऊन गेला. बार्इंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायरला त्याची खबर दिली व ‘असे परत होऊ नये’ याची तंबी दिली.

स्वागतिकेने पार्सल परत देताना ‘मन्मन’मधील कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले. मी ते सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे ‘एथिकल’ वेगळेपण तेथे बघण्यास मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले. स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत, मधुकर गोखले यांचे दर्शन झाले. वय सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्त्विक, शांत भाव. गोखले प्रथमदर्शनीच आवडले. स्वागतिकेने ऑक्ट्रॉय न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. त्यांनी ‘उत्तम केलेस’ असे बार्इंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले, मला बसण्याची खूण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला, की “आम्ही तुमच्याविषयी खूप ऐकले आहे. एक उत्सुकता म्हणून तुम्ही काय करता हे जाणून घेण्यासाठी आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. त्यांना असे कोणी काही उत्सुकतेपोटी येईल अशी कल्पना नसल्याने आश्चर्यमिश्रित कौतुकाने ते मला म्हणाले, “बोला, काय माहिती हवी.”

“हेच की तुम्ही काय करता? प्रॉडक्ट काय?”

“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग माझ्यासमोर ठेवला. मला मी इंजिनीयर असूनही त्याचे फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच तो प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरुवात केली. “आम्ही orthopedic सर्जरी पासून मेंदूच्या सर्जरीपर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही शंभर-सव्वाशे प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात, तसेच परदेशातदेखील वितरीत करतो.”

एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात वेगवेगळ्या प्रकारची टूल्स वापरली जातात तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशनकरता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ते ठरावीक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीयरला बंधन नसते. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदू यांची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. तो महत्त्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातील आहे. तसाच इंजिनीयर आणि सर्जन यांमधीलही आहे. त्यामुळे शल्यक्रियेची उपकरणे बनवताना अजून एक महत्त्वाची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले, की गोखलेसाहेब सर्वसामान्य माणसाच्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतात.

“तुम्ही इकडे कसे वळलात?” असे मी विचारले.

“अहो, त्याची मोठी गंमतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते. “वीस वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला, “अरे, मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेदू मोकळा करून कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि काही चुकले तर? ही मोठी भीती सतत वाटत राहते. तर तू अशी काही वस्तू कर, की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात तशी उपकरणे मिळतात, पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही वाढतो. तो रुग्णास परवडत नाही.” मी म्हटले, “मला तू ऑपरेशन करत असताना एकदा बघावे लागेल.”

“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ चार तास ऑपरेशन चालले. मी तो काय करतो ते शांतपणे बघत होतो. तेव्हा काही मोबाईलवर व्हिडिओ घेण्याची सोय नव्हती. मोजमापदेखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि दोन महिन्यांच्या प्रयत्नानी मेंदूची कवटी पकडून ठेवणारे एक साधे उपकरण बनवले. ते भावास दिले. त्याने ते पुढील ऑपरेशनसाठी वापरले. त्याला ते आवडले आणि उपयुक्तदेखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त दहा टक्के किंमतीत ते उपकरण उपलब्ध होऊ शकत होते. त्यात आमचा प्रॉफिट देखील आला.”

“ती बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मींपर्यंत पोचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे माझ्याकडून बनवून घेऊ लागले. त्यात ऑर्थोपेडिक आले, मी पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालिस्टना वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला. कोणतेही ऑपरेशन चालू असताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉपमध्ये उपकरण बनवायचे. मी शेकडो शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन बघत असे. त्यातून मी तशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि कोणताही सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो, हल्ली मेंदूतील ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जेथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि ती जागा शस्त्रक्रिया करून पुन्हा बंद करतात. आम्ही मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे ते मशीन बनवतो. आता एक विचार करा, कुलकर्णी, ते ड्रील मेंदूत एक मायक्रॉनदेखील घुसले नाही पाहिजे आणि ड्रील अर्धवट करूनदेखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि ते अनेक शस्त्रक्रियांत वापरले जाते.”

माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब ते अगदी सहज सांगत होते.

गोखलेसाहेब त्या व्यवसायात पडले, तेदेखील वयाच्या पन्नाशीत. त्यांनी पुण्याच्या ‘कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट’मधून draftsman चा कोर्स करून भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या ‘टाटा मोटर्स’मध्ये (तेव्हाची टेल्को) आले. तेथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जे.आर.डी. जेव्हा जेव्हा पुण्याला येत तेव्हा ते प्रथम त्या विभागास भेट देऊन मगच पुढील कामास जात. जेआडींच्या त्या सवयीमुळे तो विभाग कायम व्यवस्थित ठेवला जाई. जेआरडी गोखल्यांना त्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे नेहमी विचारत, ‘गोखले यावेळी नवीन काय?’ गोखले त्यांना नवीन केलेली एखादी गोष्ट दाखवत. त्यांना नवीन काही शोधण्याचा ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. पुढे, ते विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. त्यांनी ‘टेल्को’ची आरामाची नोकरी सोडून व्यवसायात पूर्णपणे झोकून दिले. सदाशिवपेठेतील जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरू केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले, ‘समीरचे वर्कशॉप’! घरचे इतर सर्व देखील त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधूंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊदेखील अकाली गेला. पण गोखलेसाहेब त्या आघातांतून सावरले.

“गोखले, हे ‘मन्मन’ ही काय भानगड आहे? नुसते मन का नाही?” मी मला सतावणारा प्रश्न शेवटी विचारलाच.

“त्याचे काय आहे, कुलकर्णी, मी असे समजतो, की माणसाला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते; सारखे सुख, दु:ख, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवे-ते हवे असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत आणखी एक मन असते. ते निरागस असते- क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तेथे चांगले विचार निर्माण होतात. तेथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते ‘मन्मन’. हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा मला माझे ‘मन्मन’ ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते मला माहीत नाही, पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली ती देणगी आहे. मी निमित्तमात्र. करता करविता तोच, विधाता.” गोखल्यांमधील निगर्वी उद्योजक बोलत होता. त्यांना मीपणाचा स्पर्शही नाही. मी पेशाने इंजिनीयर असलेले गोखले किती कविमनाचे तत्त्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे प्रत्यंतर घेत होतो.

त्या वर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता! गोखले यांच्याकडे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनीयर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्त्वचिंतक, सेवाभावी, शिवाय ‘एथिकल’! आणखी काय काय हवे होते?

त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातील स्वार्थ सांगितला आणि त्यांना तळवलकरसरांच्या नावाने ‘अनुकरणीय उद्योजक’ हा पुरस्कार देणार आहोत असे सांगितले. त्यांना आश्चर्य वाटले. ते काही क्षण बोलू शकले नाही. ‘अहो, मी फार छोटा माणूस. मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत?’ त्यांनी त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले, “मी त्यांना ओळखायचो, कारण मीदेखील ‘कुस्रो वाडीया’चाच ना. मला ते शिकवायला नव्हते, पण त्यांची शिस्त माहीत होती.”

त्यांनी पुरस्कार स्वीकारणार असे कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली. एकदा ते माझ्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले, “समारंभावेळचे भाषण लिहून आणले आहे, तुम्ही ऐका.” मी ते ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. ते भाषण प्रत्यक्ष करत असताना त्यांनी लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि ते फार उत्स्फूर्त व उत्कट बोलले. विद्या बाळ अध्यक्ष होत्या. त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.

गोखले यांचे भाषण एवढे नितांतसुंदर झाले, कारण ते त्यांच्या ‘मन्मना’तून आलेले होते, आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या ‘मन्मना’त भिडले होते. मधुकर गोखले यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.

– श्रीकांत कुलकर्णी, whatsapp: ९८५००३५०३७

ब्लॉग – shrikaant.blogspot.com

Last Updated On 7th Oct 2017

About Post Author

Previous articleकोकणातील कातळशिल्पे
Next articleसिन्‍नरचा डुबेरे गड
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'प्रजावाणी', 'तरुण भारत', 'लोकसत्ता' अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्‍यांना साहित्याची - विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्‍यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्‍ट व्‍यक्‍तींवर लिहिलेल्या 'असे छन्द असे छांदिष्ट ' आणि 'जगावेगळे छांदिष्ट' या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: 'छांदिष्ट' असून ते दगडांमधून पशुपक्ष्‍यांच्‍या आकारांचा शोध घेतात. ते 'निर्मळ रानवारा' या 'वंचित विकास' संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422319143

3 COMMENTS

Comments are closed.