मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे

carasole

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा साहित्य संमेलना’च्या व्यासपीठावरून जाहीर कबूल केले, की ‘ती मराठीतून लिहिते खरी, पण तिच्या बोलण्यात कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा प्रचंड पगडा आहे.’ ती बोलताना सहज इंग्रजीत शिरते आणि इंग्रजी शब्दांचा खूप वापर करते, पण ‘तिला लिहिताना मराठीच जवळची वाटते!’ हेही तिने सांगितले.

शिल्पाची ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी दलित स्त्रियांचे जीवनवास्तव मांडते. खाजगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण यांची दारे खुली झाली. त्यांचा एकूणच, सामाजिक-कौटुंबिक-मानवी नातेसंबंधांवर परिणाम झाला. एकीकडे पैसा खेळू लागला, श्रीमंती वाढली तर दुसरीकडे वंचित-दुर्बल घटकांच्या जीवनातील बकालपणाही वाढला. त्या घटकांतील स्त्रियांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. तिने शोषित, अत्याचारित दलित स्त्रिया आणि समाज यांचे दु:ख मांडण्याचे काम केले आहे. शिल्पाने कादंबरीची नायिका उल्का आणि मग तिच्या निमित्ताने ओळख होणा-या वेगवेगळ्या स्त्रिया, पुरूष- त्यांची मानसिकता, आंबेडकरी विचार, स्त्रीवाद असे विविध कंगोरे उलगडत ते लेखन केले आहे.

शिल्पाच्या कादंबरीतून मुंबई महानगराचा परिसर डोकावला आहे, तो तिच्या रोजच्या अनुभवाचा. शिल्‍पा मुंबईची. तिचे वडील अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील डाकू निमगाव येथील तर, आई बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मैदान मातकुळी या गावाची. त्यामुळे शिल्‍पाने ग्रामीण अंगही अनुभवले आहे. ती, आई-वडील आणि बहीण असे तिचे चौकोनी कुटुंब होते. तिचे प्राथमिक शिक्षण विक्रोळीच्या महानगरपालिकेच्या शाळेत झाले. ती विकास हायस्कूल या शाळेतून दहावी झाली, मग रुईया कॉलेजमधून सांख्यिकी विषयात बी.एस्सी. झाली. घरात शिक्षणाचे पूर्ण स्वातंत्र्य आणि वातावरण. तिच्या आईची इच्छा, की शिल्‍पाने शिकून ‘खूप मोठ्ठे’ व्हावे. दरम्यान, ती सेंट्रल गव्हर्मेंटच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि आयकर विभागात रूजू झाली. ती आयकर अधिकारी म्हणून काम करत आहे. तिने शिकण्याच्या आवडीतून अगदी अलिकडे ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स’मधून कम्युनिटी मिडीयाचा डिप्लोमा पूर्ण केला.

ती शाळेत निबंध लिहायची. तिने पाचवीत असताना एक इंग्रजी कविता लिहिली होती. शिल्पा सांगते, “माझे वडील गोष्टीवेल्हाळ होते. त्यांचा गोष्टी सांगण्याचा जनुक माझ्यात संक्रमित झाला असेल. वाचनाची आवडही त्यांच्यामुळेच निर्माण झाली.”

शिल्पाला लहानपणापासून कथा-कवितांपेक्षा कादंबरी वाचण्याचे वेड. पण ती तिच्या जगण्याचे प्रतिबिंब कोठे दिसते? या प्रश्नाने अस्वस्थ होऊन कादंबरी लेखनाकडे वळली. ती म्हणते, “मी मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तिन्ही भाषांतून अधाश्यासारखी कादंब-या वाचायचे. लेखकाच्या दृष्टीने, कादंबरी एका आशयसूत्राच्या विकासाचा एक प्रदीर्घ कालावकाश उपलब्ध करून देते. पण माझी वाचनाची समज जशी वाढत गेली तशी मला मी जे अनुभवते, पाहते, आसपासच्या लोकांना अनुभवताना बघते त्याचे प्रतिबिंब कादंबरीत कोठे आहे? कितीसे आहे? असे प्रश्न मनात येत. स्त्रियांचे, समाजाचे प्रतिबिंब मला कादंबरीतून दिसत नव्हते. मनाची ही भावना कितीतरी काळ सुप्तावस्थेत होती. पण एका दिवाळी अंकात अरूण साधू यांनी लिहिलेले वाचले होते, की दलित गद्य साहित्यामध्ये निर्मितीच्या अनेक शक्यता होत्या, पण ती निर्मिती आत्मकथनामध्येच अडकून पडली. त्यांच्या त्या गंभीर विधानाला मीही तितकेच गंभीरपणे घेतले व ठरवले, की आपण आंबेडकरी तत्त्वज्ञानावर आधारलेली कादंबरी लिहायची.”

शिल्‍पाच्या पतीने, प्रवीण भोरे यांनी तिला पुरेपूर प्रोत्साहन दिले. शिवाय तिची आई जी, नेहमीच तिला अनवट वाटा निवडण्यासाठी प्रेरणा द्यायची. त्या दोघांचे पाठबळ तिला लेखनाकडे वळवण्यास पूरक ठरले. तिला वर्णव्यवस्थेमुळे अमानुष अवस्थेला पोचलेल्या पूर्वाश्रमीच्या ‘अस्पृश्य’ समाजातील स्त्रियांच्या जगण्याविषयीच लिहायचे होते. नव्वदच्या दशकानंतर जागतिकीकरणाने भरडल्या जाणा-या दुर्बल घटकांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित झाले होते. शिल्‍पाने हे सगळे एकवटून घ्यायचे ठरवले. तिच्या शब्दांत सांगायचे तर, “जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर शोषणाचे सांस्कृतिक संचय पोटाशी बांधून मुंबईसारख्या महानगरात असलेल्या दलित स्त्रीचे काय हाल होणार? ते सांगण्यास कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. तिचे शोषण, भावनिक उलथापालथ घेऊन मी वाचकांसमोर जाण्याचे ठरवले.”

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही ‘उल्का’ व ‘मीरा’ या दोन परस्परविरोधी मुलींची गोष्ट आहे. त्या दोघींबरोबर ती ‘वैजंयताबाई’, ‘सुमन’, ‘राणी’, ‘पानीवाली भय्याणी’, ‘नंदा’ या बायकांचीही गोष्ट आहे. असंवेदनशील, क्रूर मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये अनेक स्त्रिया त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न घेऊन उभ्या आहेत. ‘उल्का’ ही या कादंबरीची नायिका आहे. पण तिच्या जगण्याला प्रतिष्ठा नाही, भविष्य नाही. ‘आक्रोश’ या आंबेडकरी विचारांवर काम करणा-या संघटनेच्या संपर्कात आल्यावर उल्‍काला स्वत:च्या आत्मसन्मानाची ओळख होते. तिच्‍यात तिचे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द निर्माण होते. पण संघटनेत उल्का रेडिमेड उत्तरे नाकारते. ती तिच्या बुद्धीला पटेल ते विचारपूर्वक स्वीकारते. ‘मीरा’ ही ‘उल्का’ची जवळची मैत्रीण, पण विचारांनी तिच्यापासून खूप दूर. मीरा भावनिक आहे पण वैचारिक नाही. उल्काला आंबेडकरी विचारांची दिशा सापडली नसती तर तीही मीरासारखीच शोषित राहिली असती. समूहाच्या समस्या सुटण्यासाठी समूहाला एकत्र येऊन कृतिप्रवण व्हावे लागेल हा विचार या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.”

शिल्पाने कादंबरी एकामागोमाग सहा ड्राफ्ट लिहून तीन वर्षांत पूर्ण केली. औरंगाबादचे ‘गोदा प्रकाशन’ यांनी ती प्रकाशित केली. तिला त्या सर्व प्रवासात उदय रोटे, अश्विनी तोरणे व रेहमान अब्बास या स्नेह्यांची मदत झाली. त्या कादंबरीची पुढची आवृत्‍ती ‘शब्द प्रकाशना’कडून प्रकाशित करण्‍यात आली.

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीमुळे तिला रसिकांचे प्रेम तर मिळालेच; पण तिच्या आकलनाची व अभ्यासाची खोली वाढली, विचारांच्या कक्षा रूंदावल्या असेही शिल्पा कबूल करते.

शिल्पा आयकर विभागातील नोकरी, घर-संसार, मुलगा या सगळ्यातून लेखन-वाचनासाठी उसंत काढता येते ते नवरा प्रवीणमुळे, हे सांगण्यास विसरत नाही. “घरातील अनेक कामांत आणि मुलाला वाढवण्यात प्रवीणची खूप मदत होते, तेही विना कटकट.”

“लेखनाची भूक भागवण्याची प्रथम प्रवीणची अशा रीतीने मदत मिळते, मग लोकल ट्रेनमध्ये वाचन करते, लेखनही. खूप गर्दी असली की लेखनाबाबतचे चिंतन. पण केव्हातरी थकायलाही होतेच की. तेव्हा माझा मुलगा, साहिरचा सहवास मन प्रसन्न करणारा ठरतो. त्याच्यासाठी चांगलेचुंगले बनवणे, त्याचा अभ्यास घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणे, कधी मावसबहिणीशी गप्पा मारणे या गोष्टी मला विरंगुळा देतात आणि ऊर्जाही! शनिवार-रविवारी चांगले वाचन आणि चांगले चित्रपट पाहणे हे ठरलेले. पण केव्हा त्यातूनही कंटाळा आला, की हक्काच्या नव-याकडून त्याची कंपनी मनमुराद अनुभवायला घेते.” शिल्पा हे अगदी बिनधास्त आणि मोकळेपणाने सांगत होती.

शिल्पा कांबळे – 9969234961

– हिनाकौसर खान-पिंजार

Previous articleमराठीच्‍या नावाने ‘टाहो’ची गरज नाही
Next articleइगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

6 COMMENTS

  1. शिल्पा, पहिल्यांदा तुझ्या
    शिल्पा, पहिल्यांदा तुझ्या इतक्या सुंदर पुस्तकासाठी अभिनंदन… आपले लिखाण हीच आपली ओळख असते… तुझ्या पुस्तकाने, तुला वेगळी ओळख दिली… तुला असेच खूप अनेकविध लिखाण करायला मिळो, आणि वाचकांना तू वेगवेगळ्या तुझ्या पुस्तकातून पुन्हा पुन्हा भेटत राहो… हीच शुभेच्छा.

  2. खूप सुंदर लिखाण… शिल्पा चे
    खूप सुंदर लिखाण… शिल्पा चे पुस्तक छानच… शैली, ओघवती भाषा, कथानक यामुळु हे पुस्तक इतिहास घडवेल… शिल्पा, तुला खूप शुभेच्छा…

  3. शिल्पा, तुला तुझ्या भावी…
    शिल्पा, तुला तुझ्या भावी लिखाणासाठी खूप शुभेच्छा,,,,,तुझे विचार आम्हाला वाचायला मिळाेत़़़,,,

Comments are closed.