मंगळवेढ्याची ज्वारी जागतिक बाजारपेठेत!

_Mangalvedha_Jwari_1.jpg

मंगळवेढा पूर्वापार मालदांडी ज्वारी पिकवण्यात प्रसिद्ध आहे. म्हणून म्हण अशी आहे, की ‘पंढरपूर पाण्याचे, सांगोला सोन्याचे आणि मंगळवेढा दाण्याचे’. त्याचा अर्थ असा, की ते तीन तालुके त्या तीन पदार्थांनी समृद्ध आहेत. मंगळवेढा दाण्याचे म्हणजे मालदांडी ज्वारी पिकवण्यामध्ये (प्रादेशिक भाषेत त्याला ‘शाळू’ म्हणतात) मंगळवेढा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सात नवीन पिकांना 2016 मध्ये ‘जीआय’ (भौगोलिक निर्देशांक Geographical Index) मानांकन मिळाले. त्यात मंगळवेढ्याच्या ज्वारीचाही समावेश आहे. तेथील जमीन व वर्षानुवर्षें ती पीकरचना जपण्यात तेथील शेतकऱ्यांनी दाखवलेले सातत्य हे मानांकनामागील इंगीत आहे.

मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका असून, भीमा आणि सीना या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख चौदा हजार एकशेपासष्ट चौरस हेक्टर आहे. त्यात लागवडीयुक्त जमिनीचे प्रमाण ब्याण्णव टक्के आहे. परिसरात चौदा गावे वसली आहेत. ज्वारी हे तेथील प्रमुख पीक. पीकरचनेत बदल अलिकडील दहा-पंधरा वर्षांत दिसत असला, तरी ज्वारीच्या पिकाखालील क्षेत्र कमी झालेले नाही. म्हणून ‘मंगळवेढा दाण्याचे’ हे नाव टिकून आहे. शहराच्या पूर्व भागात एकशेपंचेचाळीस चौरस किलोमीटरचा सलग, अतिशय सपाट, काळ्या जमिनीचा पट्टा असून, ती जमीन केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. ती जमीन चिकणयुक्त मातीने तयार झालेली, सपाट अशी आहे. ते तीस ते पन्नास फूट खोलवर काळ्या मातीने भरलेले सरोवरच म्हणा ना! जमिनीचा उतारा 0.2 टक्के ते 0.5 टक्के एवढा आहे. पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या पटकन बाहेर वाहून जात नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर जमिनीच्या वरच्या भागात साचलेले पाणी हे समुद्रासारखे दिसते. जास्त झालेले पाणी वाहून जाण्यासाठी मध्यभागी छोटी छोटी वगळी (छोटा ओढा) दिसतात. उरलेले पाणी जेवढे शक्य आहे तेवढे जमिनीत मुरते आणि उर्वरित पाणी बाष्पीभवनाने उडून जाते. त्या जमिनीत चिकण मातीचे प्रमाण साठ-पासष्ट टक्के आहे. पिकास अपायकारक असे क्षारांचे प्रमाण एक मीटर खोलपर्यंत नाही. परंतु, त्यानंतर मात्र करल, क्षार आणि आम्ल यांचा निर्देशांक वाढत जातो. ओल्या मातीचा थर एक मीटरच्या खाली भर उन्हाळ्यातदेखील असतो. त्या ओल्या मातीत सोडियमयुक्त चिकण मातीचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहे. पाणी शोषून घेण्याची क्षमता त्या जमिनीत फारच कमी असल्यामुळे पाणी खाली लवकर मुरत (झिरपत) नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते, ती जमीन उल्कापाताच्या आधारे तयार झाली असावी. त्याला ‘विवर’ असेही म्हणतात. प्रस्तुत जमीन भीमा आणि माण नद्यांच्या काठावर असल्याने पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येणारी चिकण माती, गाळ आणि क्षार यांच्या भरण्याच्या प्रक्रियेमुळे ती जमीन तयार झाली असावी. कारण अशा प्रक्रियेशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपातील जमीन घडल्याचा जगाच्या पाठीवर कोठेच दाखला मिळत नाही.

_Mangalvedha_Jwari_3.jpgमातीचा थर खोलवर असल्यामुळे त्या परिसरात विहिरी खणता येत नाहीत, बोअरवेल घेता येत नाहीत. अलीकडे काही ठिकाणी दगडी बांधकाम वा सिमेंटच्या रिंगा टाकून विहिरी तयार करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. परंतु ते नगण्य स्वरूपात आहेत. मंगळवेढ्याच्या जमिनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तेथे चढउतार कोठेही दिसत नाही. जमिनीच्या एका कडेला उभे राहून पाहिले, तर मानवी नजर जेथपर्यंत जाते तेथपर्यंत जमीनच जमीन सपाट दिसते. त्या जमिनीच्या पट्ट्यात फारशी झाडी नाही. लिंबाची व बाभळीची झाडे किरकोळ, विरळपणे दिसतात. सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकशेपंचेचाळीस चौरस किलोमीटर जमिनीत कोणत्याच शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची हद्द ओळखण्यासाठी कोठेही बांध घातलेले नाहीत. शेतकरी त्यांची त्यांची हद्द साधे दगड ठेवून ओळखतात (प्रत्येक शेतकऱ्याचा बांधाच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांवर जबरदस्त विश्वास दिसून येतो). त्यामुळे एवढ्या मोठ्या भूभागात बांधाखाली एक इंचदेखील जमीन वाया गेलेली नाही.

मंगळवेढ्याची ज्वारी चवदार, पांढरी व चमकदार असते. पोसलेल्या ज्वारीचे कण मोठे असतात. ज्वारीची भाकरी पांढरी, मऊसूत होते. ती खाण्यास चविष्ट व शरीराला पौष्टिक असते. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या जेवणातील मुख्य पदार्थ भाकरी आहे. ज्वारी भरडून व रांधून त्याच्या कण्या केल्या जातात. ज्वारी भिजवून-सडून त्याचे पांढरे पीठ तयार करून सांडगे, कुरडया, पापड इत्यादी खाद्यपदार्थ तयार केले जातात. ज्वारीचे पीठ पातळ रांधून त्यात ताक मिसळून अंबील बनवले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत त्याचे सेवन आरोग्याला उत्तम असते.

मंगळवेढ्याच्या ज्वारीचा कडबादेखील मऊ, पांढरा आणि चवदार असतो. जनावरे तो आवडीने खातात. तो इतर भागांतील कडब्यापेक्षा मऊ असल्यामुळे जनावरांना खाण्यास सोपा जातो. त्या कडब्याच्या बुडक्यापर्यंतचा भाग जनावरांकडून खाल्ला जातो. मंगळवेढ्यात पिकणारा बराचसा कडबा सांगलीकोल्हापूर व कर्नाटकातील काही भागांत विकला जातो.

_Mangalvedha_Jwari_5.jpgमालदांडी ज्वारी पीक पद्धतीत कोणत्याही प्रकारचे बदल न झाल्यामुळे ती जमीन ज्वारीच्या उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्या ज्वारीला ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. मंगळवेढा तालुका हा महाराष्ट्रातील अती अवर्षणप्रवण भागातील आहे. पूर्व मान्सूनचा पाऊस अगदीच बेभरवशाचा. तेथे परतीचा पाऊस थोड्याफार प्रमाणात पडतो, परंतु सप्टेंबरमध्ये रब्बीचा पाऊस मात्र हमखास पडतो. ज्वारीच्या पेरण्या मघा (मृग) नक्षत्रापासून ते उत्तरा नक्षत्रापर्यंत (सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत) होतात. जमीन मऊ असल्यामुळे ओल टिकून राहते. पिकाची वाढ चांगली होण्यासाठी कमीत कमी एकशेऐंशी मिलिमीटर ओलावा लागतो. पेरणीच्या वेळेस तेवढा ओलावा सरासरीने मिळतो, परंतु पेरणीनंतर मात्र चाळीस-पंचेचाळीस दिवसांनी हलक्या सरीचा एकादा पाऊस मिळाला, तर पिकात हमखास वाढ होते.

काही शेतकरी ज्वारीच्या पिकामध्ये पट्टा पद्धतीने करडई पेरण्याची पद्धत अवलंबतात, तर काही शेतकरी ज्वारीच्या ऐवजी करडईची स्वतंत्र पेरणी करतात. परंतु त्याचे प्रमाण अगदी कमी आहे. शेतातून जाणाऱ्या ओगळीत पावसाचे पाणी टिकून राहिले आणि ते बरेच दिवस आटले नाही तर, काही दिवसांनी तेथे जवस पेरतात. त्याचेही पीक चांगले येते. परंतु तो सर्व व्यवहार पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे.

काळ्या जमिनीव्यतिरिक्त भीमा नदीकाठचा भाग वगळता तालुक्याच्या इतर भागातील मुख्य पीकदेखील ज्वारीच आहे. तेथेदेखील ज्या ठिकाणी तीन-चार फूटांपर्यंत खोलवर काळी जमीन आहे; त्या ठिकाणची ज्वारी काळ्या जमिनीतील ज्वारीसारखी असते. काही ठिकाणी त्याहून हलक्या असलेल्या जमिनीत पेरलेल्या ज्वारीला पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी एक-दोन वेळा पाणी देण्याचा प्रयत्न करतात. परंतु काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्यामुळे पीक अधिक काळ तग धरून राहू शकते. पेरणीनंतर चाळीस-पंचेचाळीस दिवसांनी निसर्गाने साथ दिली व ऐंशी-शंभर  मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला, तर जमिनीची उत्पादकता पूर्ण क्षमतेने व्यक्त होते. तीच मंगळवेढ्याला निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे.

जगात नावाजलेल्या या काळ्या जमिनीतील पीकपद्धत बदलून तेथे नगदी पिके अधिक घ्यावी. महाराष्ट्र शासनाने 1970 सालच्या सुमारास उजनी धरणाच्या उजव्या कालव्याचे आठमाही पाणी देण्याचा निर्णय घेतला. परंतु माझ्यासहित अनेक अभ्यासकांनी त्या जमिनीला सतत पाणी दिले तर काही वर्षांतच मीठ फुटून जमीन कायमची नाकामी होईल असा निष्कर्ष काढल्यामुळे, शासनाने त्याची दखल घेऊन, मालदांडी ज्वारीच्या पेरणीच्या नंतर आवश्यकतेनुसार एक-दोन पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन केले. गंमत अशी, की आजअखेर पाणी देण्याच्या तरतुदीची कार्यवाही काही झालेली नाही. म्हणून या एकशेपंचेचाळीस चौरस किलोमीटर पट्ट्यातील ज्वारीची शेती ही निव्वळ पावसावर अवलंबून आहे. तिला ‘जीआय’ मानांकन मिळाले, हे खरोखर चांगल्या भविष्याचे लक्षण आहे.

_Mangalvedha_Jwari_2.jpgज्वारीची पेरणी, मळणी व इतर सर्व प्रकारची मशागत यंत्रांच्या साहाय्याने केली जाते. बहुसंख्य शेतकरी पेरणीच्या वेळी काही प्रमाणात वरखत (रासायनिक खते) वापरतात. त्याचाही उत्पादन वाढीवर अनुकूल परिणाम झाला आहे. ज्वारीचे एक ताट सरासरी सात ते नऊ फूट उंचीपर्यंत असते. सुपीक जमिनीत त्याहून उंच कडबा येतो. परंतु त्याचे प्रमाण कमी असते. हलक्या जमिनीत मात्र कडब्याची उंची सरासरी सहा-सात फूटापर्यंत असते. एकरी साधारण पाचशे ते सातशे पेंड्या कडबा निघतो आणि ज्वारीचे उत्पादन सरासरी चार ते सात क्विंटल निघते. परंतु हे सर्व वेळेवर व पुरेशा प्रमाणात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे.

मंगळवेढ्याच्या ज्वारीचे भाव प्रति क्विंटल सतराशे ते तेवीसशे रुपयांपर्यंत सरासरी आहेत. कडब्याचे दर शंभर पेंड्यांना सोळाशे ते एकवीसशेपर्यंत आहेत. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत ते भाव टिकून नाहीत. मंगळवेढ्यातील बहुतांश ज्वारी तालुक्याच्या खरेदी-विक्री संघामार्फत विकली जाते. त्यांचे सौदे आठवड्यातून दोन वेळा होतात. अडत दुकानदार एकत्र येऊन सौदे पुकारतात. त्यात जो दुकानदार अधिक भाव देण्यास तयार होतो त्याला शेतकरी माल विकतो. विशेष म्हणजे सौद्यात निश्चित झालेला दर जर शेतकऱ्याला परवडणारा नसेल तर शेतकरी त्याचा माल विकण्यास तयार होत नाही. तो भाव वाढवून मिळेपर्यंत वाटदेखील पाहतो. मंगळवेढ्याची ज्वारी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वदूर बाजारांपर्यंत पोचते.

जागतिक खुल्या व्यापाराचा अर्थ असा, की निसर्गाने जगाच्या पाठीवर अनेक देशांना एखादा दुसरा शेतमाल तयार करण्याची अधिक अनुकूल परिस्थिती (वरदान) उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ, आसाममध्ये चहा हा नैसर्गिक रीत्या चांगला व इतरांच्या मानाने कमी खर्चात पिकतो. निसर्गाने श्रीलंकेत नारळ, बांगलादेशात ज्यूट, ब्रह्मदेशात तांदूळ अशा काही जिनसा/पीकपाणी. ते त्या त्या देशाचे बलस्थान – उत्पन्नाचे मुख्य साधन असते आणि त्या साधनावर त्या देशाचा विकास अवलंबून असतो. तेव्हा ती वस्तू जागतिक बाजारात विकण्यासाठी त्या देशाचा नैसर्गिक हक्क बनतो. हे तत्त्व डंकेल प्रस्तावात मान्य करण्यात आले आहे. जर ती वस्तू विकण्यासाठी जागतिक बाजारात काही बंधने घालून अशा देशांच्या वस्तूंना त्यांच्या बाजारपेठेची दारे बंद केली असती, तर त्या वस्तू तो संबंधित देश विकणार कोठे? डंकेल प्रस्तावावर सही करण्यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक अडचणी जागतिक बाजारात वस्तू विकण्यासाठी होत्या. त्या मुद्दाम निर्माण केल्या गेल्या होत्या. बडे श्रीमंत देश त्यांच्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या हेतूने अधिक प्रमाणात सबसिडी देऊन कृत्रिम रीत्या त्यांच्या शेतमालाचा उत्पादनखर्च कमी करून जागतिक बाजारात त्यांचाच माल अधिक कसा विकला जाईल याचा विचार करत होते. जर असे चालत असेल तर मंगळवेढ्याच्या ज्वारीला, आसामच्या चहाला, देवगडच्या आंब्याला जागतिक बाजारपेठ कशी मिळणार होती? म्हणून त्यावेळी असा करार झाला, की ज्या देशात एखादी वस्तू उत्तम रीत्या व इतर देशांच्या मानाने कमी उत्पादन खर्चात तयार होण्याची क्षमता असेल, तर अशा देशांना त्यांची वस्तू जागतिक बाजारात विकण्यासाठी जागतिक बाजार खुला असावा, त्यास कोणतीच आडकाठी असू नये. तो त्यांचा नैसर्गिक हक्क आहे. अशी मुभा देणे म्हणजे ‘खुला जागतिक व्यापार’ होय. या विचाराचा भारतासारख्या देशांना फायदा होत आहे.

मंगळवेढ्याच्या ज्वारीला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे त्या ज्वारीला जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे. जगाच्या पाठीवर मंगळवेढ्याच्या ज्वारीची मागणी वाढेल. त्याचा फायदा मंगळवेढ्यातील ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. जागतिक पातळीवर त्याचा मान टिकवून ठेवण्यासाठी ज्वारीचा दर्जा, तिची चव, तिचा रंग आणि तिची सुबकता टिकवून ठेवून जागतिक बाजारात तिचा वरचष्मा सतत निर्माण करत राहणे ही शेतकऱ्यांची कसोटी आहे. मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना तेथेच थांबून चालणार नाही, तर त्या मालाला ‘पीजीआय’ नोंद करून घेणे आवश्यक आहे.

_Mangalvedha_Jwari_4.jpgते मानांकन मिळाले म्हणजे मुलाला शाळेत प्रवेश मिळाल्यासारखे आहे. तेवढ्यावर तो सर्व वर्गात पास होऊन नोकरी पटकावेल असे नाही, तर त्याने शाळेचे सर्व नियम पाळून नेटाने दररोज अभ्यास करायला पाहिजे, परिश्रम घ्यायला पाहिजेत, म्हणजेच तो दरवर्षी पास होईल व नंतर त्याला नोकरी मिळेल. तसेच, ‘जीआय’ मानांकनाचे आहे. त्या मानांकनाचा फायदा घेऊन जागतिक बाजारात ज्वारी पाठवायची असल्यास मंगळवेढेकरांना पुढील काही गोष्टींसाठी परिश्रम घ्यावे लागतील.

1. ‘जीआय’ मानांकन उत्पादक संस्थेला मिळते. ज्वारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला जर ते व्यक्तिगत पातळीवर मिळवावयाचे असेल म्हणजे तो टॅग वापरायचा असेल तर केंद्र सरकारच्या ‘भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री’कडे ‘मान्यताप्राप्त कर्ता’ म्हणून स्वत:ची नोंद करावी लागते.

2. केवळ ‘जीआय’ मानांकन मिळवून पुरेसे नाही, तर त्या सोबत ‘पीजीआय’ (प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेशन)चेही मानांकन मिळवावे लागेल.

3. ‘पीजीआय’ मानांकन मिळवण्यासाठी व्यक्तिगत शेतकरी, उत्पादन संस्था, राज्य व केंद्र सरकार यांनी एकत्रितपणे ‘जागतिक व्यापार संघटने’कडे एका विशिष्ट पद्धतीने प्रयत्न करावे लागतील. त्यात चिकाटी, सातत्य आणि जागतिक बाजारात स्वत:ची ज्वारी पाठवेनच ही महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे.

4. हे सर्व करण्यासाठी मंगळवेढ्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक संघटना तयार करावी. ‘पीजीआय’ मानांकनासाठी आवश्यक त्या गोष्टींसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करावी.

मंगळवेढे ही भूमी संतांची असे म्हटलेल्या या मंगळवेढ्याला निसर्गाने उपयुक्त अशी नैसर्गिक देणगी जमिनीच्या रूपात दिली आहे. त्या नैसर्गिक देणगीचा पुरेपूर वापर करावा. ज्वारीचे पीक पार पडेपर्यंत एक-दोन पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी शासनावर आयुष्यभर अवलंबून न राहता त्याची सोय करून तेवढ्या रानात अधिक पीक कसे घेता येईल, याचा सतत विचार व संशोधन करून दारी चालून आलेल्या त्या संधीचे सोने करावे!

– अप्पासाहेब पुजारी, dragpujari@yahoo.com