भूमातेच्या आरोग्यासाठी कर्बप्रयोग

0
13
_BhumatechyaAarogyasathi_Karbprayog_1.jpg

सजीवाची आई ही भूमाता आहे. तिचेच आरोग्य धोक्यात आले आहे, तर माणसांचे व सर्व जीवसृष्टीचे आरोग्य का धोक्यात येणार नाही? प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना! रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का? नाहीतर, पुढील पिढ्या विद्यमान पिढ्यांना माफ करणार नाहीत.

कृषिक्षेत्र मातीचा कस कमी झाल्यामुळे धोक्यात येऊ पाहत आहे. ती समस्या फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. तो प्रश्न जगभर गंभीरपणे भेडसावत आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेसने त्यासाठी 2015 ते 2024 हे आंतरराष्ट्रीय मृदादशक म्हणून घोषित केले आहे. भारत देशापुरता विचार केला, तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जे हरित क्रांतीपूर्वी चार टक्के इतके होते ते आज 0.2 ते 0.5 टक्क्यांपर्यंत शिल्लक राहिले आहे! ते एक टक्का विनाखर्चिक किंवा कमीत कमी खर्चात वाढवणे हे कृषी शास्त्रज्ञांपुढील आव्हान सध्या आहे. भारतात अठरा कोटी अडुसष्ट लाख हेक्टर भूक्षेत्र मृत अवस्थेकडे वाटचाल करत आहे असा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे. कृषिक्षेत्र धोक्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी देशपातळीवर त्वरित काम होणे गरजेचे आहे.

मी एक शेतकरी आहे. मी त्याच विषयावर गेली आठ वर्षें संशोधन करून कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. मी ते संशोधन शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केले आहे. त्यामुळे माझ्यावर काही मर्यादा खर्चाच्या बाबतीत येत होत्या. परंतु भूमातेसाठी व मानवी आरोग्य धनसंपन्न करणारे संशोधन माझ्याकडून होत आहे यातच मला आनंद आहे.

सेंद्रिय खताचे वितरण शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने ट्रॉली बैलगाडीने केले जाते. त्या पद्धतीने सेंद्रिय खत वितरण पद्धत काहीशी गैरसोयीची ठरत आहे. कारण त्या पद्धतीत एक एकराच्या त्रेचाळीस हजार पाचशेसाठ चौरस फूट या सर्व क्षेत्राचे कर्ब वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याची गरज राहणार नाही. ते काम ‘फोकस्ड’ पद्धतीने वनस्पतीच्या मुळाजवळ होईल.

पारंपरिक पद्धतीमध्ये पन्नास टक्के सेंद्रिय खतांचा ऱ्हास होतो. कारण ते खत साऱ्या क्षेत्रावर पसरले जाते. तो खटाटोप टाळणे गरजेचे आहे. रासायनिक खते ज्याप्रमाणे पेरून पिकांना दिली जातात त्याप्रमाणेच सेंद्रिय खतांची गुणवत्ता वाढवून योग्य ठिकाणी, म्हणजे वनस्पतींच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पेरून देता येणे शक्य आहे. त्यामुळे अन्नद्रव्ये स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ व रासायनिक खतास पर्याय या दोन्ही गोष्टी साधल्या जातील. मी विकसित केलेल्या कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर टेक्नॉलॉजीची तीच वैशिष्ट्ये आहेत. त्या तंत्रज्ञानाने फक्त सेंद्रिय कर्बाची समस्या सुटणार आहे असे नाही. भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. परंतु पोषणमूल्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांना जमिनीतून अपेक्षित पोषणद्रव्ये मिळत नसल्यामुळे अन्नधान्य व फळभाज्या यांतील पोषणमूल्ये कमी झाली आहेत. त्यामुळे मानवी आरोग्याचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. मानवाला अन्नातून पुरेसे पोषणमूल्य मिळत नसल्यामुळे त्याच्या भोवती अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे केवळ शेतकऱ्यासाठी नाही तर समाजाच्या सर्व घटकांसाठी जमिनीच्या अनारोग्याची ही समस्या गंभीर बनते. ती या तंत्रज्ञानामुळे संपुष्टात येणार आहे.

शेती उत्पादन खर्चात होणारी वाढदेखील कमी करणे गरजेचे आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत घटत चालले आहे. सेंद्रिय खते वापरली न गेल्यामुळे ते घडत गेले आहे. सेंद्रिय खतांच्या किंमतीपण खूप वाढल्या आहेत. रासायनिक खते अधिक वापरूनसुद्धा पिके प्रतिसाद देत नाहीत, कारण रासायनिक खते वनस्पतीच्या पोषणासाठी उपयुक्त स्थितीत आणली जातात, ती जीवाणूंच्या सहाय्याने. जीवाणूंना त्यासाठी खूप ऊर्जा लागते. हे ऊर्जास्रोत म्हणजे सेंद्रिय पदार्थांपासून होणारा सेंद्रिय कर्ब असतो. त्या साऱ्या प्रक्रियेत अन्नद्रव्ये स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ करणे महत्त्वाचे आहे. ती वाढ गेल्या काही वर्षांत घटल्यामुळे नत्रयुक्त खताची कार्यक्षमता चाळीस ते पन्नास टक्के, स्फुरद खताची कार्यक्षमता पंधरा ते पंचवीस टक्के व पोटॅश खताची पन्नास ते साठ टक्के, सूक्ष्म मूलद्रव्याची कार्यक्षमता सहा टक्केपर्यंत घटली आहे. जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. ते कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर टेक्नॉलॉजीने साध्य होणार आहे.

जगात अद्याप अशा प्रकारचे तंत्रज्ञान पिकांना सेंद्रिय खत वितरणासाठी वापरले गेलेले नाही. माझ्या संशोधनाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य कोरडवाहू शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याच्या शेतात जे सेंद्रिय घटक उपलब्ध आहेत त्या घटकांचा उपयोग करून शेतातच त्या खताची निर्मिती करायची आहे. त्यासाठी थोडे कष्ट करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. मी खतनिर्मितीसाठी एक मशीन तयार केले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यास शेतातच खत तयार करता यावे, खतनिर्मिंती सहज व्हावी या दृष्टीने मशीनमध्ये जास्त गुंतागुंती असू नयेत, त्याची कमी किंमत असावी, दुरुस्ती करण्यास लागू नये, तरीही मशीन बिघडले तर पन्नास-शंभर रुपयांत शेतातच दुरुस्त व्हावे यासाठी विविध मॉडेल तयार करण्यात मी सहा-सात लाख रुपये खर्च केले व तयार झालेले आठवे मॉडेल यशस्वी ठरले आहे. खत तयार करण्यासाठी लागणारे घटक शेतातच उपलब्ध आहेत. सर्वसाधारण घटक उदाहरणार्थ, शेणखत, जनावरांचे मूत्र, वाया जाणारे अन्नधान्य, लिंबोळी, कोंबडी खत, शेळी लेंडी, प्रेसमड, राख, गुणवत्ता वाढवणारे घटक, अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकणारे करंज पेंड, हळकुंड, पॉलिश चुरा, खराब गूळ, शेंगपेंड, सोयाबीन, सूर्यफूल (खराब), पेंडी हे घटक आवश्यक आहेत. देशात साठ-पासष्ट टक्के शेती ही कोरडवाहू आहे. ती शेती बहुतांशी रासायनिक खतांवर अवलंबून आहे. ते अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे. बागायती शेतीसाठीसुद्धा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक शेत हा खताचा कारखाना होणार आहे व जमिनीतील सेंद्रिय कर्ब एक टक्कापर्यंत वाढवता सहज येणार आहे.

कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर टेक्नॉलॉजीचा वापर करून मानवाचे व जमिनीचे आरोग्य धनसंपन्न करणे हे माणसांच्या हातात आहे. ते आपण करू या. माझे संशोधन वर्ल्ड बँकेने Social Enterprise Innovation (SEI) Program साठी मागवले आहे.

– वैभव मोडक